Friday, August 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 14 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 14 
Ovya 366 to 397 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १४ 
ओव्या ३६६ ते ३९७

मूळ श्लोक

 म्हणोनि मद्याजी जे जाहले । ते माझिया सायुज्या आले ।

जिहीं उ]चारामिषें दिधलें । आपणपें मज ॥ ३६६ ॥

३६६) याकरितां ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्तानें मला आपला आत्मभाव आर्पण केला आहे, असे माझें भजन करणारे जें आहेत, ते माझ्या सायुज्य ( मोक्ष ) गतीस जातात.  

पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेनावीण सौरसु नाहीं ।

मी उपचारीं कवणाही । नाकळें गा ॥ ३६७ ॥

३६७) अर्जुना, भक्तानें आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाहीं. अरें, मी ( इतर दुसर्‍या ) कोणत्याही उपचारांनीं कोणालाहि वश होत नाहीं.

एथ जाणीव करी तोचि नेणे । आथिलेपण मिरवी तेंचि उणें ।

आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥

३६८) येथें जो, ‘ मी परमात्मस्वरुप जाणलें ‘ असें म्हणतो, त्यास तें खास कळलें नाहीं, असें समजावें. माझ्यापुढें जो आपला संपन्नपणा मिरवतो , तोच त्याचा उणेपणा आहे जो आम्ही कृतार्थ झालों, असें म्हणतों, तो कांहींच झाला नाहीं ( असें समजावें ). 

अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी ।

ते तृणा एकासाठीं । न सरे येथ ॥ ३६९ ॥

३६९) अथवा अर्जुना, यज्ञ दान किंवा तप, यांच्या योगानें मी सहज भगवत्प्राप्ति करुन घेईल, असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेचि गवताच्या काडीइतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही.

पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळे ।

कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी ॥ ३७० ॥

३७०) अर्जुना, विचार कर. ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणी तरी आहे काय ? किंवा शेषापेक्षां अधिक तोंडांनी बोणारा कोठें आहे काय ?

तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे ।

एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ ३७१ ॥

३७१) तो शेषदेखील माझ्या अंथरुणाखालीं लपून बसतो. दुसरा जो ( वेद  ) तो, मी ( परमात्मा ) असा नाहीं, मी ( परमात्मा ) तसा नाहीं, असें म्हणून परत फिरतो. माझ्या ( परमात्मस्वरुपाच्या ) ठिकाणीं सनकादिक अगदी वेडेपिसे झाले आहेत.  

करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी ।

तोही अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥ ३७२ ॥

३७२) तपस्व्यांची निवड करुं गेलें तर, जो महादेवाच्या पंक्तीला बसवितां येईल, असा तपस्वी आहे ? त्या शिवानेदेखील, अभिमान टाकून माझें चरणोदक ( गंगा ) मस्तकावर धारण केलें.   

नातरी आथिलेपणें सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी ।

श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥ ३७३ ॥

अथवा, ऐश्र्वर्यानें लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे ? ज्या लक्ष्मीच्या घरं श्रियेसारख्या दासी आहेत,

तियां खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरि ठेवलीं ।

तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं ॥ ३७४ ॥

३७४) त्यांनीं भातुकली खेळतांना केलेल्या घरकुलास अमरावती हे नांव दिलें, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळांतील बाहुल्या होणार नाहींत काय ?

तियां नावडोनि जेव्हां मोडली । तेव्हां महेंद्राचे रंक होती ।

तियां झाडां येउते जयां पाहती । ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥

३७५) खेळाचा कंटाळा येऊन जेव्हां त्या दासी खेळ ( घरकुलें वगैरे ) मोडतात तेव्हां मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. ज्या ज्या झाडांकडे एवढेसें पाहतात, ते कल्पवृक्ष होतात.  

ऐसें जियेचियां जवळिकां । सामर्थ्य घरींचियां पाइकां ।

ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥ ३७६ ॥

३७६) जिच्या घरांतील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ति आहे, अशी जी ऐश्र्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीहि तेथें किंमत नाहीं.

मग सर्वस्वें करुनि सेवा । अभिमान सांडुनि पांडवा ।

ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहली ॥ ३७७ ॥

३७७) हे अर्जुना, मग ती जेव्हां आपल्या ठिकाणीं असलेल्या ऐश्वर्याच्या अभिमानाचा त्याग करुन सर्वस्वीं माझी सेवा करुं लागली , त्या वेळीं ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली.

म्हणोनि थोरपण पर्‍हांचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।

जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥

३७८) एवढ्याकरितां आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूर टाकून द्यावा, शास्त्राध्ययन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून, जसें कांहीं   शास्त्राध्ययन केलेलेच नाही, अशी वृत्ती ठेवावी. जगतांत अशा प्रकारचा सर्व प्रकारें लहानपणा जेव्हां घ्यावा, तेव्हां माझें सान्निध्य प्राप्त होते.   

अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढां चंदुही लोपे किरीटी ।

तेथ खद्योत गा हुटहुटी । आपुलेनि तेजें ॥ ३७९ ॥

३७९) अरे अर्जुना, हजारों किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशांत चंद्रसुद्धा नाहींसा होतो; त्या सूर्यापुढे काजव्यांनीं आपल्या यःकश्चित् प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा ?

तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे ।

तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे ॥ ३८० ॥

३८०) त्याप्रमाणें लक्ष्मीचा मोठेपणा जेथें चालत नाहीं, आणि शिवाचें तपहि जेथें पुरें पडत नाहीं, त्या मला ( परमात्म्याला ) सामान्य व अजागळ लोक कसें जाणू शकतील ?

यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे ।

संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥

३८१) याकरितां परमात्म्यावरुन आपलें शरीर ओंवाळून टाकावें आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचें लिंबलोण करावें; तसेंच संपत्तीचा फुजं ओंवाळून टाकून द्यावा.  

मूळ श्लोक

पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।

तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥

२६) जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी भक्तीनें अर्पण करतो; त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचें भक्तिपूर्वक आणलेलें तें ( पानफूल इत्यादि ) मी सेवन करतों.

मग निस्मीमभावउल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें ।

फळ आवडे तैसे । भलतयाचें हो ॥ ३८२ ॥

३८२) मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षानें मला अर्पण करण्याच्या निमित्तानें एखादें फळ, वाटेल तसलें कसल्याहि झाडाचें का असेना ! 

भक्तु माझियाकडे दावी । आणि मा दोन्हीं हात वोडवी ।

मग देंठु न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥ ३८३ ॥

३८३) भक्त माझ्यापुढें तें दाखवितो, आणि तें घेण्याकरितां मी माझें दोन्ही हात पुढें करतों आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकतां आदरानें त्याचें सेवन करतों.  

पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें ।

तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥

३८४) अर्जुना, भक्तीच्या उद्देशानें भक्तानें एखादें फूल मला दिलें; विचार केला तर मीं त्याचा वास घ्यावा; परंतु भक्तीनें भुलल्यामुळें प्रेमभरांत मी तें तोंडांतच चालतों.

हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें ।

तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥ ३८५ ॥

३८५) हें राहूं दे ! फुलाची काय गोष्ट आहे ? कसल्याहि झाडाचें एक पानच मग तें ताजेंच पाहिजे असें नाहीं, वाळलेलें किंवा कसलेंहि असलें तरी चालेल;

परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखे ।

तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥ ३८६ ॥

३८६) परंतु तें दिलेलें पान त्याच्या सर्व प्रेमानें भरलेलें आहे, असें ( मी ) जाणतों आणि भुकेलेला अमृतामुळें असा संतुष्ट होतो, त्याचप्रमाणें तें पानच, परंतु तितक्या आनंदानें मी खाऊं लागतों,  

अथवा ऐसेंही एक घडे । जे पालाही परि न जोडे ।

तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ॥ ३८७ ॥

३८७) अथवा एक वेळ असेंही घडेल कीं, पाला खरा पण तोहि मिळाला नाहीं; पण पाण्याचा तर ( कोठें ) दुष्काळ नाहीं ना !

तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें ।

तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें । जेणें मज ॥ ३८८ ॥

३८८) तें पाणी वाटेल तेथें, बिनखर्चानें व मिळविण्याचा कांहीं प्रयत्न न करतां स्वभावतःच प्राप्त झालेलें आहे. तेंच आपलें सर्व भांडवल समजून ज्यानें मला अर्पण केले, 

तेणें वैकुंठांपासोनि विशाळें । मजलागीं केली राउळें ।

कौस्तुभाहूनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥

३८९) त्यानें त्या करण्यांत वैकुंठापेक्षां मोठी मंदिरें माझ्याकरितां तयार केलीं व कौस्तुभ रत्नांपेक्षां जास्त तेजस्वी रत्नाचे अलंकार मला अर्पण केले. 

दुधाचीं शेजारें । क्षीराब्धीऐसीं मनोहरें ।

मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥

३९०) त्यानें क्षीरसागरासारखीं मनोवेधक दुधाचीं अनेक शय्यागृहें माझ्याकरितां उत्पन्न केलीं,

कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु ।

मज हातीं लाविला दिनकरु । दीपमाळे ॥ ३९१ ॥

३९१) त्याच्या त्या करण्यांत कापूर, चंदन, अगरु अशा या सुगंधी पदार्थांचा मेरुएवढा मोठा डोंगर त्यानें मला अर्पण केल्याप्रमाणें होतें. त्यानें आपल्या हाताने मजकरितां सूर्याला दीपमाळेवर लावलें;  

गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतरुंची उद्याने ।

कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥

३९२) त्यानें गरुडाच्या सारखीं वाहनें, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला अर्पण केले.

मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिलीं बहूवसें ।

ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥ ३९३ ॥

३९३) मला अमृतापेक्षां रसभरित अशीं पुष्कळ पक्वान्नें त्यानें नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्यानें याप्रमाणें संतुष्ट होतों.

हें सांगावें काय किरीटी । तुम्हीचि देखिलें आपुलिया दिठी ।

मी सुदामयाचिया सोडीं गांठी । पव्हयालागीं ॥ ३९४ ॥

३९४) अर्जुना, हें ( तरी ) सांगावयास कशास पाहिजे ? तुम्हींच आपल्या डोळ्यांनीं पाहिलें आहे कीं, मी पोह्याकरितां, सुदामदेवानें आणलेल्या पुरचुंडीच्या गांठी आपल्या हातानें सोडल्या. 

पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें ।

आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५ ॥

३९५) मी एक भक्तीच ओळखतों. मग त्या ठिकाणीं लहानथोर अशी निवड करीत नाहीं. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरुपी मेजवानीचे पाहुणे होतों.

येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ ।

वांचूनि आमुचा लाग निष्कल । भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥

३९६) बाकी पान, फूल, फळ यांचें अर्पण करणें, तें मला भजण्याचें केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिलें तर आम्हांला आवडतें असें म्हटलें म्हणजे, भक्तांच्या ठिकाणीं असलेलें शुद्ध भक्तितत्वच होय.

म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं ।

तरी सहजें आपुलां मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥ ३९७ ॥

३९७) म्हणून अर्जुना, ऐक प्रथम तूं आपली एक बुद्धि वश

 करुन घे; असें जर करणें असेल, तर मग सहजच

 आपल्या मनोरुप देवळामध्यें तूं मला विसरु नकोस.



Custom Search

No comments: