Friday, August 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 11श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ११

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 11 
Ovya 265 to 306 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ११ 
ओव्या २६५ ते ३०६

मूळ श्लोक

अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।

मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥

१६) ( वेदानेंसांगितलेलें विधान ) ऋतु, , ( त्यापासून निर्माण होणारा ) यज्ञ, स्वधा, औषधि, मंत्र, तूप, अग्नि आणि आहुति मीच आहें.

तोचि जाणिवेचा उदयो जरी होये । तरी मुदल वेदु मीचि आहें ।

आणि तों विधानातें जया विये । तो ऋतुही मीचि ॥ २६५ ॥

२६५) त्याचा ज्ञानाचा जर उदय होईल, तर मुळांत वेद मीच आहें आणि तो वेद जीं जीं कर्में करावयास सांगतो, त्या कर्मांचें विधानरुप ऋतु ( यज्ञकर्म ) देखील मीच आहें ( असें लक्षांत येईल. ) 

मग तया करमापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा ।

यज्ञु प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥ २६६ ॥

२६६) मग वेदामध्यें करावयास सांगतलेल्या त्या ऋतुरुप कर्मापासून जीं अंगें व उपांगें यांसहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना, तो क्रियारुप यज्ञहि मीच आहे.  

स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा ।

आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥

२६७) स्वाहा ( देवांना द्यावयाच्या आहुतीचें अन्न ) व स्वधा ( पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न ), यज्ञाच्या कामी उपयोगांत येणार्‍या सोमादिक अनेक वनस्पति, ही मी आहें. यज्ञांत हवन करण्याचें तूप व समिधा मीच आहें, यज्ञांत उच्छारावयाचे मंत्र व यज्ञाकरितां तयार केलेलें द्रव्य, ही देखील मीच आहें.  

होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें ।

आणिक हुतक जें जें । तेंहि मीचि ॥ २६८ ॥

२६८) यज्ञकर्म करण्याकरितां नेमलेला ब्राह्मण मी आहें. व ज्यांत हवन करतात तो अग्नि तर माझेंच स्वरुप आहे. आणि हवन करण्याचें जें जें द्रव्य, तें देखील मीच आहें. 

मूळ श्लोक

पिताहमस्य जगतो माता धाति पितामहः ।

वेद्यं पवित्रोमोङ्कार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥ 

१७) मी या जगाचा पिता, माता, पालनकर्ता, पितामह आहे. श्रेयवस्तु, पवित्र वस्तु, ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे.

पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगे ।

जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ २६९ ॥

२६९) अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगानें या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो, तो जगाचा पिता मी आहें.

अर्धनारीनटेश्र्वरीं । जो तोचि पुरुष नारी ।

तेविं मी चराचरीं । माताही होय ॥ २७० ॥

२७०) ज्याप्रमाणें अर्धनारीनटेश्र्वराच्या स्वरुपांत जो पुरुष तोच स्त्री असतो, त्याप्रमाणें चराचरांच्या बाबतींत माताहि मीच होतो;

आणि जाहालें जग जेथ राहे । जेणें जित वाढत आहे ।

तें मीचि वाचूनि नोहे । आन निरुतें ॥ २७१ ॥

२७१) आणि उत्पन्न झालेलें जग जेथें राहतें व ज्या योगानें जगाचे आयुष्य वाटत आहे, तें स्थान माझ्यावाचून खरोखर दुसरें नाहीं. 

इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही । उपजलीं जयाचिया अमनमनीं ।

तो पितामह त्रिभुवनीं । विश्र्वाचा मी ॥ २७२ ॥

२७२) प्रकृति व पुरुष ही दोन्ही ज्याच्या मन ह्या उपाधीनें रहित असलेल्या, मूळ संकल्पांत उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे.  

आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।

जें वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥    

२७३) आणि अर्जुना, सर्व ज्ञानरुपी वाटा ज्या गांवाला येऊन मिळतात व वेदाच्या चव्हाट्यावर ज्याला देव ( जाणण्याची मुख्य गोष्ट ) म्हणतात,    

जेथ नानामतां बुझावणी जाहली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।

चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥

२७४) आणि ज्या परमात्मस्वरुपा ठिकाणी वेगवेगळ्या मतांमधील भेद नाहेंसा होतो व जेथे शास्त्राची एकमेकात असलेली अनोळखी दूर होते, ( सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचें प्रतिपादन करतात, असा शास्त्राचा एकमेकांशी परिचय होतो, ) च चुकलेल्या ज्ञानाची ज्या परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी एकमेकांशी भेट होते व ज्या परमात्मस्वरुपाल पवित्र म्हणतात ( ते मी आहें ).    

पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।

तयांचें गा भुवन जो ॐकारु । तो ही मी गा ॥ २७५ ॥

२७५) ब्रह्मरुपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष ( परा )) , ध्वनि ( पश्यन्ती ), नाद ( मध्यमा ), आकार ( वैखरी ) यांचें मंदिर असा जो ॐकार , तो मी आहे.

जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती अउमकारेंसी ।

जिये उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥

२७६) ज्या ॐकाराच्या पोटांत अ, उ, म् अशी अक्षरें होती व तो उपजतांक्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रकट झाली;

म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।

एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥

२७७) म्हणून ऋग्वेद , यजुर्वेद, सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. असें आत्माराम ( श्रीकृष्ण ) म्हणाले.

मूळ श्लोक

गतिर्भर्ता प्रभः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।

प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥

१८) ( प्रकृतीचें ) विश्रांतीस्थान, भर्ता ( पोषण करणारा ), ( जगाचा ) नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्यास योग्य ठिकाण, ( जगाचा ) सुहृद्, जगाची उत्पत्ति, प्रलय, स्थिति, निधान ( राहण्याचे स्थान ) आणि त्याचें अविनाशी कारण ( हें सर्व मी ) आहे.      

हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे ।

ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥ २७८ ॥

२७८) हें स्थावरजंगमात्मक सर्व जग ( महाप्रलयकाळीं ) ज्या मायेच्या पोटांत सांठते, ती माया श्रम पावली असतां, ज्या ठिकाणीं विश्रांती घेते ती परम गति मीच आहें.

आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्र्व विये ।

जो घेऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥ २७९ ॥

२७९) आणि ज्याच्या योगानें प्रकृति जगते, ज्यानें तिचा ( प्रकृतिचा ) अंगीकार केला असतां ती जगाला प्रसवते आणि जो ह्या प्रकृतीशीं तादात्म्य करुन गुणांचा ( सत्वरजतमांचा ) भोग घेतो, 

तो विश्र्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता ।

मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥ २८० ॥ 

२८०) अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहें; या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहें.

आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगें नसावें ।

पावकें दहावें । वर्षावें जळें ॥ २८१ ॥

२८१) आकाशानें सर्वत्र ठिकाणीं राहावें, वार्‍यानें क्षणभर

 देखील स्वस्थ राहूं नये, अग्नीनें जाळण्याचें काम करावें 

आणि पाणयानें वर्षाव करावा;

पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी ।

पृथ्विया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥

२८२) डोंगरांनीं आपलें आसन सोडूं नये, समुद्रांनीं आपली मर्यादा उल्लंघन करुं नये. पृथ्वीनें सर्व प्राण्यांचा भार व्हावा. हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. 

म्यां बोलाविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।

म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥

२८३) मी बोलण्यानें वेद बोलतो; मी चालण्यानें सूर्य चालतो; मी हालवल्यानें जगाचा प्रवर्तक प्राण आपलें काम करुं शकतो. 

मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासतसे भूतां ।

इयें म्हणियागतें पंडुसता। सकळें जयाचीं ॥ २८४ ॥

२८४) मी नियम घालून दिल्या कारणानेच मृत्यु हा प्राण्यांचा ग्रास करतो व अर्जुना, हीं सर्व ज्याच्या आज्ञेप्रमाणें वागणारी आहेत,

ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु ।

आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोहि मीचि ॥ २८५ ॥

२८५) असा जो सर्व शक्तिमान् या जगाचा मालक तो मी आहे; आणि आकाशासारखा सर्वांत मिसळून उदासीन असणारा, तो देखील मीच आहें.   

इहीं नामरुपीं आघवा । जो भरला असे पांडवा ।

आणि नामरुपांहि वोल्हावा । आपणचि जो ॥ २८६ ॥

२८६) या नामरुपानें जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना, नामरुप यांना जो आपण स्वतःच आधार आहे,

जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळीं आथी जळ ।

ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवासु मी ॥ २८७ ॥

२८७) पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटांत जसें पाणी असतें, याप्रमाणें जेथे सर्व जगाची रचना केली जातें, तें जगाचें राहण्याचें ठिकाण मीच आहें,

जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्म मरण ।

यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥ २८८ ॥

२८८) जो मला एकनिष्ठपणानें शरण येतो, त्याचे जन्म व मरण मी दूर करतो; एवढ्याकरितां शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे.

मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतिगुणें ।

जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥ २८९ ॥

२८९) मी एक असून अनेक स्वरुपें धारण करुन, प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावधर्माप्रमाणें जिवंत असलेले जें जग, त्याच्या प्राणाच्या रुपानें वागतों.

जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंब सविता ।

तैसा ब्रह्मादि सर्वां भूतां । सुहृद तो मी ॥ २९० ॥

२९०) ज्याप्रमाणें सूर्य हा हें डबकें, हा समुद्र, असा भेद न पाहतां वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो ( त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव, हा कीटकआहे, असा भेद न करतां मोबदल्याची अपेक्षा न करतां ) ब्रह्मादि सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे.  

मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि बोलावा ।

सृष्टिक्षयप्रभावा । मूळ तें मी ॥ २९१ ॥

२९१) अर्जुना, या त्रैलोक्याचें जीवन मीच आहें सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीलाही जें कारण, तें मीच आहें.     

बीज शाखातें प्रसवे । मग तें रुखपण बीजीं सामावे ।

तैसे संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥

२९२) बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग तें सर्व वृक्षत्व ज्याप्रमाणें त्या बीजामध्येंच लीन होतें, त्याप्रमाणें संकल्पाच्या योगानें सर्वांची उत्पत्ती होते. आणि नंतर सर्व संकल्पांतच नाहीसें होते.

ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारुपु ।

तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें मी ॥ २९३ ॥

२९३) याप्रमाणें जगाचें मूळ बीज जो संकल्प, जो सूक्ष्म वासनारुप असतो; तो संकल्प कल्पाच्या अंती जेथें सूक्ष्म रुपानें राहतो, तें ( स्थान ) मीच आहे.

इयें नामरुपें लोटती । वर्णव्यक्ती आटती ।

जातींचे भेद फिटती । जैं आकाश नाहीं ॥ २९४ ॥

२९४) हीं नामरुपें जेव्हा नाहींशी होतात वर्ण व व्यक्ति आटून जातात, जातीचे निरनिराळे प्रकार नाहींसे होतात आणि जेव्हां आकाशहि नाहीसें होतें, ( तात्पर्य जेव्हां हा सर्व जगदाकार नाहींसा होतो ), 

तैं संकल्पु वासनासंस्कार । माघौतें रचावया आकार ।

जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥ २९५ ॥

२९५) त्या वेळी वासनारुप संकल्पाचे संस्कार हे पुन्हां जगदाकार रचण्याकरितां जेथें अमर होऊन असतात, तें ठिकाण मी आहे.

मूळ श्लोक

तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।

अमृतं चैव मृत्युश्र्च सदसच्चहमर्जुन ॥ १९ ॥

१९) हे अर्जुना, ( सूर्याच्या रुपाने ) मी उष्णता देतों; पाणी शोषून घेतों व मीच ( पुन्हां ) पाऊस पाडतों. अमर वस्तु, मृत्यु तसेंच सत्–असत् सर्व मीच आहें.

मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे ।

पाठीं  इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढती भरे ॥ २९६ ॥

२९६) मी सूर्याच्या रुपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जातें आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्या वेळेला पाऊस पाडतों, त्या वेळीं पुन्हां आबादानी होते.   

अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये ।

तैसें मरतें मारितें पाहें । स्वरुप माझें ॥ २९७ ॥

२९७) अग्नि लांकडें खातो, तेव्हां लांकडेंच अग्नि बनतात, त्याप्रमाणें मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरुपें आहेत, असे समज.

यालागीं मृत्यूचां भागीं जें जें । तेंही पै रुप माझें ।

आणि न मरतें तंव सहजें । अविनाशु मी ॥ २९८ ॥  

२९८) याकरितां मृत्युनें घेरलेलें जें जें आहे., तें देखील माझेंच रुप आहे आणि त्याचप्रमाणें न मरणारें जें अविनाश, तें तर मी आहेच आहें.      

आतां बहु बोलोनी सांगावें । तें एकिहेळा घे पां आघवें ।

सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥ २९९ ॥

२९९) आतां फार बोलून जें सांगावयाचें तें सर्व एकदाच सांगतों. लक्षांत ठेव; तर विनाशी व अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत तें मीच आहें, असें समज. 

म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे ।

परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें ॥ ३०० ॥

३००) म्हणून अर्जुना, जेथें मी नाहीं, असें कोणतें ठिकाण आहे ? परंतु या प्राण्यांचें दुर्दैव कसें आहे ते पाहा. मी सर्वव्यापी असूनहि, ते मला कोठेंहि पाहात नाहींत.

तरंग पाणियेंविण सुकती । रश्मि वातीविण न देखती ।

तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखें ॥ ३०१ ॥

३०१) लाटा या ( जलरुप ) असून ( त्या ) जलाशिवाय ( वृक्षादिकांप्रमाणें ) सुकून जाव्यात, तसेंच प्रकाशरुप जीं सूर्यकिरणें त्यांना दिव्याशिवाय दिसूं नये, त्याप्रमाणें सर्व प्राणी मद्रूपच असून, त्यांना आपण भगवद्रूप आहोंत असें वाटत नाही, हे केवढें आश्र्चर्य आहे पाहा !      

हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें ।

कीं कैसें कर्म तयां आलें । जे मीचि नाहीं म्हणती ॥ ३०२ ॥

३०२) हें सर्व जग आंतबाहेर माझ्याच रुपानें कोंदून भरलें आहे. जग हें केवळ माझेंच ओतलेलें आहे; परंतु प्राण्यांचें कर्म त्यांच्यावर कसें ओढवलें आहे की, ते मीच ( देवच ) नाही असें म्हणतात.

परि अमृताकुहां पडिजे । कां आपण यातें कडिये काढिजे ।

ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि ॥ ३०३ ॥

३०३) परंतु अमृताच्या आडांत पडावें आणि आपण आपल्याला काठावर कां काढावें ? परंतु तें ज्याला अप्राप्य आहे अशाला असेंच होते त्याला काय करावें ? 

ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी ।

आडळला चितामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥ ३०४ ॥

३०४) अर्जुना, एका घांसभर अन्नाकरितां एक आंधळा रस्त्याने धांवत असतां चिंतामणि रत्नाला ठेंच लागून अडखळला; ( पण ) तो आंधळा होता, म्हणून त्यानें तो चिंतामणि लाथेनें उडविला.

तैसे ज्ञान जें सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे ।

म्हणोनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंविण ॥ ३०५ ॥

३०५) त्याप्रमाणें जेव्हां जीवाला ज्ञान सोडून जातें, त्यावेळी जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जें कांहीं ज्ञानाशिवाय करावें, तें केल्यासारखें होत नाही.

आंधळेया गरुडाचें पांख आहाती । ते कवण उपेगा जाती ।

तैसे सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥

३०६) आंधळ्याला जरी गरुडाचे पंख असले, तरी त्याला

 ते कोणत्या उपयोगाला पडतील ? त्याप्रमाणें ज्ञानाशिवाय

 सत्कर्माचरणाचे श्रम केले असतां व्यर्थ जातात.   



Custom Search

No comments: