Saturday, August 14, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 39 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३९

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 39 
Doha 227 and 232 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३९ 
दोहा २२७ आणि २३२

दोहा—नाथ सुहृद सुठि सरल चित सील सनेह निधान ।

सब पर प्रीति प्रतीति जियँ जानिअ आपु समान ॥ २२७ ॥

हे बंधुराज ! तुम्ही अकारण परम हित करणारे आहात, सरल-हृदय आणि शील व प्रेमाचे भांडार आहात. तुमचे सर्वांवर प्रेम आणि विश्वास आहे आणि मनात सर्वांना आपल्यासारखेच मानता. ॥ २२७ ॥

बिषई जीव पाइ प्रभुताई । मूढ़ मोह बस होहिं जनाई ॥

भरतु नीति रत साधु सुजाना । प्रभु पद प्रेमु सकल जगु जाना ॥

परंतु मूढ व विषयी जीव सत्ता मिळाल्यावर मोहामुळे आपले खरे स्वरुप दाखवितात. भरत हा नीतिपरायण साधु व चतुर आहे आणि प्रभु, तुमच्या चरणी त्याचे प्रेम आहे, ही गोष्ट सार्‍या जगाला माहीत आहे.  ॥ १ ॥

तेऊ आजु राम पदु पाई । चले धरम मरजाद मेटाई ॥

कुटिल कुबंधु कुअवसरु ताकी । जानि राम बनबास एकाकी ॥

तो भरतसुद्धा आज तुमचे सिंहासन मिळाल्यावर धर्म-मर्यादा सोडून वागत आहे. दुष्ट व खोटा भाऊ भरत वाईट वेळ आल्यावर आणि श्रीराम वनवासामध्ये एकटे आहेत, हे पाहून, ॥ २ ॥

करि कुमंत्रु मन साजि समाजू । आए करै अकंटक राजू ॥

कोटि प्रकार कलपि कुटिलाई । आए दल बटोरि दोउ भाई ॥

आपल्या मनात वाईट विचार धरुन व सर्व समाजाला आपल्या बाजूला घेऊन राज्य निष्कंटक करण्यासाठी येथे आला आहे. अनेक प्रकारची कारस्थाने करुन सेना जमवून दोघे बंधू आलेले आहेत. ॥ ३ ॥

जौं जियँ होति न कपट कुचाली । केहि सोहाति रथ बाजि गजाली ॥

भरतहि दोसु देइ को जाएँ । जग बौराइ राज पदु पाएँ ॥

जर त्यांच्या मनात कपट नसते व दुष्ट विचार नसते, तर रथ, घोडे आणि हत्तींच्या रांगा यावेळी कुणाला बर्‍या वाटल्या असत्या काय ? परंतु भरताला विनाकारण दोष कसा द्यावा ? राजपद मिळाल्यावर सर्वच उन्मत्त होत असतात. ॥ ४ ॥

दोहा—ससि गुर तिय गामी नघुषु चढ़ेउ भूमिसुर जान ।

लोक बेद तें बिमुख भा अधम न बेन समान ॥ २२८ ॥

चंद्र गुरुपत्नीगामी झाला. नहुषाने ब्राह्मणांना पालखीला जुंपले आणि राजा वेन याच्याइतका नीच कोणी असणार नाही. तो लोक व वेद यांना विन्मुख झाला. ॥ २२८ ॥

सहसबाहु सुरनाथु त्रिसंकू । केहि न राजमद दीन्ह कलंकू ॥

भरत कीन्ह यह उचित उपाऊ । रिपु रिन रंच न राखब काऊ ॥

सहस्त्रबाहू, देवराज इंद्र आणि त्रिशंकू इत्यादींपैकी कुणाला राजमदाने कलंकित केले नाही ? भरताने हा योग्य उपाय योजला आहे. कारण शत्रू किंवा ऋण यांना कधी थोडेसुद्धा शिल्लक ठेवू नये. ॥ १ ॥

एक कीन्हि नहिं भरत भलाई । निदरे रामु जानि असहाई ॥

समुझि परिहि सोउ आजु बिसेषी । समर सरोष राम मुखु पेखी ॥

श्रीरामांना असहाय्य समजून त्याने त्यांचा अनादर केला, ही गोष्ट भरताने चांगली केली नाही. परंतु आज युद्धात हे श्रीराम, तुमचे क्रोधित मुख पाहून त्याला ही गोष्ट चांगली कळून येईल आणि या अवमानाचे फळ त्याला मिळेल. ‘ ॥ २ ॥

एतना कहत नीति रसभूला । रन रस बिटपु पुलक मिस फूला ॥

प्रभु पद बंदि सीस रज राखी । बोले सत्य सहज बलु भाषी ॥

इतके बोलून लक्ष्मण नीती विसरला आणि त्याच्या शरीरात वीर-रस संचारला. तो प्रभू श्रीरामांना वंदन करुन, त्यांची चरणधूळ मस्तकी लावून आपले सत्य व सहज बळ लक्षात आणून म्हणाला, ॥ ३ ॥

अनुचित नाथ न मानब मोरा । भरत हमहि उपचार न थोरा ॥

कहँ लगि सहिअ रहिअ मनु मारें । नाथ साथ धनु हाथ हमारें ॥

‘ हे नाथ, माझे बोलणे अनुचित मानू नका. भरताने आपणाला काही कमी डिवचले नाही. अखेर कुठवर सहन करायचे आणि मन मारायचे ? जर स्वामी आमच्या सोबत आहेत आणि आमच्या हाती धनुष्य आहे, ॥ ४ ॥

 दोहा—छत्रि जाति रघुकुल जनमु राम अनुग जगु जान ।

लातहुँ मारें चढ़ति सिर नीच को धूरि समान ॥ २२९ ॥

मी जातीने क्षत्रिय आहे, रघुकुलातील माझा जन्म आहे आणि शिवाय मी श्रीरामामचा सेवक आहे. हे सर्व जगाला माहीत आहे. ( मग सहन का करायचे ? ) धुळीसारखे क्षुद्र काय आहे ? परंतु तीसुद्धा लाथ मारल्यावर डोक्यावर बसते. ‘ ॥ २२९ ॥

उठि कर जोरि रजायसु मागा । मनहुँ बीर रस सोवत जागा ॥

बॉंधि जटा सिर कसि कटि भाथा । साजि सरासनु सायकु हाथा ॥

असे म्हणून लक्ष्मणाने उठून हात जोडून आज्ञा मागितली. जणू तो म्हणजे जागा झालेला मूर्तिमंत वीररस होता. त्याने डोक्यावरील जटा बांधून कमरेला भाता आवळला आणि धनुष्य सज्ज करुन व बाण हातात घेऊन तो म्हणाला. ॥ १ ॥

आजु राम सेवक जसु लेऊँ । भरतहि समर सिखावन देऊँ ॥

राम निरादर कर फलु पाई । सोवहुँ समर सेज दोउ भाई ॥

‘ आज मी श्रीरामांचा सेवक असण्याची कीर्ती मिळवीन आणि भरताला युद्धात धडा शिकवीन. श्रीरामांचा अनादर करणारे दोघे बंधू रण शय्येवर झोपू देत. ॥ २ ॥

आइ बना भल सकल समाजू । प्रगट करउँ रिस पाछिल आजू ॥

जिमि करि निकर दलइ मृगराजू । लेइ लपेटि लवा जिमि बाजू ॥

बरे झाले सर्व परिवार एकत्र जमलेला आहे. आज मी पूर्वीचा सर्व राग काढतो. जसा सिंह हत्तींच्या कळपाचे निर्दालन करतो आणि ससाणा लावा पक्ष्याला पकडतो; ॥ ३ ॥

तैसेहिं भरतहि सेना समेता । सानुज निदरि निपातउँ खेता ॥

जौं सहाय कर संकरु आई । तौ मारउँ रन राम दोहाई ॥

त्याप्रमाणे भरताला सैन्यासह व लहान भावासह तुच्छ मानून मी रणमैदानात लोळवीन. जरी प्रत्यक्ष शंकर येऊन त्यांनी त्यांना मदत केली, तरीही मी श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो की, मी त्यांना युद्धात नक्की मारुन टाकीन. ‘ ॥ ४ ॥

दोहा—अति सरोष माखे लखनु लखि सुनि सपथ प्रवान ।

सभय लोक सब लोकपति चाहत भभरि भगान ॥ २३० ॥

अत्यंत क्रोधामुळे संतापलेल्या लक्ष्मणाला पाहून आणि त्याची सत्य प्रतिज्ञा ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि लोकपाल घाबरुन पळू लागले. ॥ २३० ॥

जगु भय मगन गगन भइ बानी । लखन बाहुबल बिपुल बखानी ॥

तात प्रताप प्रभाउ तुम्हारा । को कहि सकइ को जननिहारा ॥  

सर्व जग भीतीने धास्तावले. तेव्हा लक्ष्मणाला पाहून अपार बाहुबलाची प्रशंसा करीत आकाशवाणी झाली की, ‘ हे लक्ष्मणा, तुझा प्रताप कोण सांगू शकेल. ? आणि कोण जाणू शकेल ? ॥ १ ॥

अनुचित उचित काजु किछु होऊ । समुझि करिअ भल कह सबु कोऊ ॥

सहसा करि पाछें पछिताहीं । कहहिं बेद बुध ते बुध नाहीं ॥

परंतु कोणतेही कार्य असो, ते उचित-अनुचित याचा खूप विचार करुन करावे, म्हणजे सर्वजण त्याला चांगले म्हणतात. वेद व विद्वान म्हणतात की, जे विचार न करता घाईघाईने एखादे काम करुन मागाहून पश्चात्ताप करतात, ते बुद्धिमान नव्हेत. ‘ ॥ २ ॥

सुनि बचन लखन सकुचाने । राम सीयँ सादर सनमाने ॥

कही तात तुम्ह नीति सुहाई । सब तें कठिन राजमदु भाई ॥

देववाणी ऐकून लक्ष्मण ओशाळला. श्रीरामांनी व सीतेने आदरपूर्वक त्याचा सन्मान करुन म्हटले की, ‘ वत्सा ! तू फार चांगली नीति सांगितलीस. हे बंधो, राज्याचा मद हा फार कठीण मद आहे. ॥ ३ ॥

जो अचवँत नृप मातहि तेई । नाहिन साधुसभा जेहिं सेई ॥

सुनहु लखन भल भरत सरीसा । बिधि प्रपंच महँ सुना न दीसा ॥

ज्यांनी साधूंचा सत्संग केलेला नाही, तेच राजे राजमदरुपी मदिरा पिताच धुंद होऊन जातात. हे लक्ष्मणा ऐक, भरतासारखा उत्तम पुरुष ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये कुठे ऐकलेला नाही की पाहिलेला नाही. ॥ ४ ॥

दोहा—भरतहि होइ न राजमदु बिधि हरि हर पाइ ।

कबहुँ कि कॉंजी सीकरनि छीरसिंधु बिनसाइ ॥ २३१ ॥

अयोध्येचे राज्य ते काय, ब्रह्मदेव, विष्णू, महादेव यांचे पद मिळाले, तरी भरताला मद होणार नाही. आंबट थेंबांनी क्षीरसमुद्र कधी नासतो का ? ॥ २३१ ॥

तिमिरु तरुन तरनिहि मकु गिलई । गगन मगन मकु मेघहिं मिलई ॥

गोपद जल बूड़हिं घटजोनी । सहज छमा बरु छाड़ै छोनी ॥

जरी माध्यान्हीच्या सूर्याला अंधकाराने गिळून टाकले, आकाश हे मेघांमध्ये विरुन गेले, गाईच्या खुराइतक्या पाण्यात अगस्त्य मुनी बुडाले आणि पृथ्वीने आपली स्वाभाविक सहनशीलता सोडून दिली, ॥ १ ॥

मसक फूँक मकु मेरु उड़ाई । होइ न नृपमदु भरतहि भाई ॥

लखन तुम्हार सपथ पितु आना । सुचि सुबंधु नहिं भरत समाना ॥

डासाच्या फुंकरीने सुमेरु उडून गेला, तरीही हे बंधो, भरताला कधी राजमद बाधू शकणार नाही. मी तुझी व बाबांची शपथ घेऊन सांगतो की, भरतासारखा पवित्र व उत्तम भाऊ जगात नाही. ॥ २ ॥

सगुन खीरु अवगुन जलु ताता । मिलइ रचइ परपंचु बिधाता ॥

भरतु हंस रबिबंस तड़ागा । जनमि कीन्ह गुन दोष बिभागा ॥

हे बाळा ! गुणरुपी दूध व अवगुणरुपी पाणी मिसळून विधाता या जगाची रचना करतो. परंतु भरताने सूर्यवंशरुपी तलावात हंसरुपाने जन्म घेऊन गुण व दोष यांना वेगवेगळे केलेले आहे. ॥ ३ ॥

गहि गुन पय तजि अवगुन बारी । निज जस जगत कीन्हि उजिआरी ॥

कहत भरत गुन सीलु सुभाऊ । पेम पयोधि मगन रघुराऊ ॥

गुणरुपी दूध घेऊन व अवगुणरुपी जल टाकून देऊन भरताने आपल्या कीर्तीने जगाला उजळून टाकले आहे. भरताचे गुण, शील व स्वभाव हे सांगता सांगता श्रीरघुनाथ प्रेमसमुद्रात मग्न झाले. ॥ ४ ॥

दोहा—सुनि रघुबर बानी बिबुध देखि भरत पर हेतु ।

सकल सराहत राम सो प्रभु को कृपानिकेतु ॥ २३२ ॥

श्रीरामचंद्रांची वाणी ऐकून आणि भरतावर असलेले त्यांचे प्रेम पाहून सर्व देव त्यांची स्तुती करीत म्हणू लागले की, ‘ श्रीरामांसारखा कृपा-धाम असलेला प्रभू दुसरा कोण आहे ? ॥ २३२ ॥

जौं न होत जग जनम भरत को । सकल धरम धुर धरनि धरत को ॥

कबि कुल अगम भरत गुन गाथा । को जानइ तुम्ह बिनु रघुनाथा ॥

जर जगात भरताचा जन्म झाला नसता, तर पृथ्वीवर सर्व धर्मांची धुरा कुणी धारण केली असती ? हे रघुनाथ, कविकुलालाहि अगम्य असलेली भरताच्या गुणांची कथा तुमच्याखेरीज दुसरा कोण जाणु शकणार ?’ ॥ १ ॥

लखन राम सियँ सुनि सुर बानी । अति सुखु लहेउ न जाइ बखानी ॥

इहॉं भरतु सब सहित सहाए । मंदाकिनीं पुनीत नहाए ॥

लक्ष्मण, श्रीराम व सीता ही देववाणी ऐकून सुखावून गेले. त्याचे वर्णन करता येत नाही. तेथे पोहोचल्यावर भरताने सर्व मंडळींच्याबरोबर पवित्र मंदाकिनीत स्नान केले. ॥ २ ॥

सरित समीप राखि सब लोगा । मागि मातु गुर सचिव नियोगा ॥

चले भरतु जहँ सिय रघुराई । साथ निषादनाथु लघु भाई ॥

नंतर सर्वांना नदीजवळ थांबवून, माता, गुरु व मंत्री यांची आज्ञा घेऊन आणि निषादराज व शत्रुघ्नाला बरोबर घेऊन जेथे सीता व श्रीरघानाथ होते, तिकडे भरत गेला. ॥ ३ ॥                   

समुझि मातु करतब सकुचाहीं । करत कुतरक कोटि मन माहीं ॥

रामु लखनु सिय सुनि मम नाऊँ । उठि जनि अनत जाहिं तजि ठाऊँ ॥

आपली माता कैकयीच्या कृत्याची आठवण आल्यावर

 भरत संकोचत होता आणि मनात अनेक कुतर्क करीत

 होता की, माझे नाव ऐकल्यावर श्रीराम ,लक्ष्मण व सीता

 हे येथील जागा सोडून दुसरीकडे जाऊ नयेत, म्हणजे 

झाले. ॥ ४ ॥





Custom Search

No comments: