Wednesday, December 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 1 
Ovya 1 to 30 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग १ 
ओव्या १ ते ३०

नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।

पराप्रमेयप्रमदा-। विलासिया ॥ १ ॥

१) स्पष्ट बोध करण्यात चतुर असलेल्या व विद्यारुपी कमलाचा विकास करणार्‍या व परावाणीचा विषय ( स्वरुपस्थिति ) हीच कोणी तरुण स्त्री, विलास करणार्‍या, ( श्रीगुरो, ) तुम्हांला माझा नमस्कार असो.

नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।

तरुणतरतूर्या-। लालनलीला ॥ २ ॥

२) अहो, संसाररुपी अंधाराचा नाश करणार्‍या सूर्या, निरुपम अशा श्रेष्ठ सामर्थ्यानें युक्त ज्वानीच्या भरांत असलेल्या ज्ञानरुप चौथ्या अवस्थेचें स्नेहानें पालन करणें, ही ज्यांची क्रीडा आहे, अशा श्रीगुरो, तुम्हांस माझा नमस्कार असो.

नमो जगदखिलापालना । मंगळमणिनिधाना ।

स्वजनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥

३) अहो, सर्व जगाचें पालन करणारे, कल्याणरुपी रत्नांची खाण असलेलें भक्तरुपी वनांतील चंदन असलेले आणि पूजा करण्यास योग्य असलेले देव, तुम्हांला माझा नमस्कार असो.    

नमोचतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मनुभवनरेंद्रा ।

श्रुतिगुणसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥

४) शहाण्या चित्तरुपी चकोरास आनंद देणार्‍या चंद्रा, ब्रह्मानुभवाच्या राजा, वेदगुणांच्या समुद्रा व कामाला मोहित करणार्‍या, तुम्हालां माझा  नमस्कार असो.

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभजंना ।

विश्र्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥

५) शुद्ध भावानें भजन करण्यास योग्य असणारे, संसाररुपी हत्तीच्या गंडस्थळाचा नाश करणारे व विश्वाच्या उत्पत्तीचें स्थान असणारे, अहो श्रीगुरुराया, तुम्हांला माझा नमस्कार असो. 

तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु ।

तैं प्रवेशु । बाळकाही आथी ॥ ६ ॥

६) तुमची कृपा हाच कुणी गणेश, तो जेव्हां आपलें सामर्थ्य देतो, तेव्हां सर्व विद्यांमध्यें बालकाचा देखील प्रवेश होतो.

दैविकी उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।

तैं नवरसदीपांचा । थावो लाभो ॥ ७ ॥

७) आपण जें श्रीगुरुदेव त्या आपली उदार वाणी जेव्हां ‘ भिऊं नकोस ‘ असें आश्वासन देते, तेव्हां शांतादि नवरसरुपी दिव्यांचा ठाव लगतो. ( म्हणजे नवरसरुपी दिवे प्रज्वलित केले जातात) .

जी आपुलिया स्नेहाची वागेश्र्वरी । जरी मुकेयातें अंगीकारी ।

तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा ॥ ८ ॥

८) महाराज, आपलें प्रेम हीच कोणी सरस्वती, तिनें जर मुक्याचा अंगीकर केला, तर तो पैजेने बृहस्पतीबरोबर वादविवाद करतो.

हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।

तो जीवचि परि तुके । महेशेंशीं ॥ ९ ॥

९) हें राहूं द्या, ज्याच्यावर आपली कृपादृष्टि पडते अथवा आपला वरदहस्त ज्याच्या मस्तकावर ठेवला जातो, तो जीवच खरा, परंतु तो शिवाच्या बरोबरीला येतो.  

एवढें जिये महिमेचें करणें । ते वाचाळपणें वानूं मी कवणें ।

का सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ॥ १० ॥

१०) एवढ्या सर्व गोष्टी ज्या सामर्थ्यानें होतात, त्यांचे मी कोणत्या विशेष बोलण्यानें वर्णन करुं ? सूर्याचें शरीर चकाकित दिसावें म्हणून त्यास ( लोखंडाच्या आरशाप्रमाणें ) घासण्याची जरुरी आहे काय ?

केउता कल्पतरुवरी फुलौरा । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ।

ऐसा कवणें वासी कापुरा । सुवासु देवों ॥ ११ ॥

११) कल्पतरुला फलद्रूप होण्यास मोहोर कशाला फुटावयास पाहिजे ? क्षीरसमुद्राला कशानें पाहुणचार करावा ? त्याचप्रमाणें कोणत्या वासाच्या योगाने कापराला सुगंधित करावें ?  

चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें ।

 गगनावरी उभवावें । घडे केवीं ॥ १२ ॥

१२) चंदनाला कशाची उटी लावावी ? अमृताचें पक्वान्न कसें तयार करावें ? आकाशावर मांडव घालणें शक्य आहे काय ?   

तैसें श्रीगुरुचें महिमान । आकळितें कें असे साधन ।

हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें ॥ १३ ॥

१३) त्याप्रमाणें श्रीगुरुंच्या मोठेपणाचें आकलन करणारें साधन कोठें आहे ? ( कोठेहिं नाहीं. ) हें लक्षांत घेऊन मी निमूटपणानें त्यांना नमस्कार केला. 

तरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरुसमर्था रुप करुं म्हणें ।

तरि मोतियासी भिंग देणें । तैसें होईल ॥ १४ ॥

१४) जर बुद्धीच्या संपन्नतेवर समर्थ श्रीगुरुचें यथार्थ वर्णन करुं म्हणेन, तर तें माझें करणें मोत्यांना ( चकाकी येण्याकरितां ) अभ्रकाचें पूट देण्यासारखें होईल.   

कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतीचीं बोलणीं ।

उगियाचि माथां ठेविजे चरणीं । हेंचि भलें ॥ १५ ॥

१५) साडेपंधरा दराच्या बावन्नकशी सोन्याला ज्याप्रमाणें चांदीचा मुलामा द्यावा, त्याप्रमाणे मी केलेल्या स्तुतीच्या भाषणाचा प्रकार होणार आहे. म्हणून यापुढें कांहीं न बोलताआपल्या पायावर मस्तक ठेवावें, हेच बरें.

मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं ।

म्हणोनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों ॥ १६ ॥

१६) नंतर ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणाले, अहो स्वामी, चांगल्या प्रेमाने, ज्ञानेश्र्वर आमचा आहे, या भावनेनें तुम्हीं माझ्याकडे पाहिलें. त्यामुळें कृष्णार्जुनसंवादरुपी गंगायमुनांच्या संगमाच्या प्रयागावर मी वड झालों.  

मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघवियाचि क्षीराब्धीची करुनि वाटी ।

उपमन्यूपुढें धुर्जटी । ठेविली जैसी ॥ १७ ॥

१७) मागे ‘ दूध दे ‘ अशी विनंती केल्यावरुन सर्वच क्षीरसमुद्राची वाटी करुन, शंकरानें उपमन्यूच्या पुढें जशी ठेवली,

ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें ।

बुझविला देऊनि भातुके । ध्रुवपदाचें ॥ १८ ॥

१८) किंवा, वैकुंठाधीश प्रभूनें रुसलेला जो ध्रुव त्याची अढळ पदाचा खाऊं देऊन कौतुकानें समजूत घातली.

तैसी ब्रह्मविद्यारावो। सकल शास्त्रांचा विसंवता ठावो ।

ते भगवद्गी योगिया गावों । ऐसें केले ॥ १९ ॥

१९) त्याप्रमाणें गीता, जी ब्रह्मविद्येचा राजा आहे व सर्व शास्त्रांचें विश्रांतिस्थान आहे, ती भगवद्गीता मी प्राकृत ओंवीछंदांत गावी, असें श्रीगुरुनें केलें,   

जे बोलणियांचा रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षरांची वार्ता ।

परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची ॥ २० ॥

२०) ( हें पाहा ) शब्दरुपी अरण्यामध्यें वाटेल तितकें भटकले असतां, त्या वाचारुप वृक्षास विचाररुप फळे आल्याची गोष्ट कानांवर येत नाहीं; परंतु वाचाच विचारांचा कल्पवृक्ष केली.

होती देहबुद्धि एकसरी । आनंदभांडरा केली वोवरी ।

मन गीतार्थसागरीं । जळशयन आलें ॥ २१ ॥

२१) माझ्या बुद्धीनें जे देहाशीं एकसारखें तादात्म्य केलें होतें, त्या माझ्या बुद्धीला ( देहतादात्म्यापासून सोडून ) आनंदरुपी खजिन्याची खोली केली आणि माझें मन गीतेच्या अर्थरुपी क्षीरसमुद्रात महाविष्णु झालें.    

तैसें एकैक देवांचे करणें । अपार बोलों केवीं मी जाणें ।

तर्‍ही अनुवादलों धीटपणें । तें उपसाहिजो जी ॥ २२ ॥

२२) त्याप्रमाणे श्रीगुरुंच्या एक एक लीला आहेत. त्या अनंत असल्यामुळे त्यांचे वर्णन करण्याचे मला कसें कळेल ? असें असूनहि, बेडरपणानें जो काही मी अनुवाद केला, तो, महाराज, सहन करा.

आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मिया भगवद् गीता वोवीप्रबंधे ।

पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें ॥ २३ ॥

२३) एवढा वेळ आपल्या कृपेच्या प्रसादाने मी भगवद् गीतेचा पहिला भाग विनोदाने ओवीच्या छंदांत वर्णन केला.

प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु ।

परि सां ख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां ॥ २४ ॥

२४) पहिल्या अध्यायामध्यें अर्जुनाचा खेद सांगितला, दुसर्‍यामध्ये स्पष्ट निष्काम कर्मयोग सांगितला, परंतु ज्ञानयोग आणि बुद्धियोग यांच्यांत काय फरक आहे तो दाखवून सांगितला.

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थी ज्ञानेंशीं प्रगटिलें ।

पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व ॥ २५ ॥

२५) तिसर्‍यांत केवळ कर्मयोग सांगितला. तोच कर्मयोग चौथ्यांत ज्ञानासह सांगितला आणि पाचव्यांत गूढ रीतीनें अष्टांगयोग सांगितला. 

तेंचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट ।

जीवत्मभाव एकवाट । होती जेणें ॥ २६ ॥

२६) ज्याच्या योगानें जीवात्म्याचें ऐक्य होतें, तेच योगाचें तत्त्व आसनापासून प्रारंभ करुन ( तों समाधीपर्यंत ) स्पष्ट तर्‍हेनें ( सहाव्यांत ) उघड केलें,

तैसीचि जे योगस्थिति । आणि योगभ्रष्टां जे गति ।

ते आघवीचि उपपत्ती । सांगितली ॥ २७ ॥

२७) त्याचप्रमाणें योग सिद्ध झालेल्याची स्थिति आणि योगानें आचरण करीत असतां मध्येंच मरण आलेल्यास जी गति प्राप्त होते, तो सर्व विचार ( सहाव्या ) अध्यायांत सांगितला.

तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं ।

भजति जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चार्‍ही ॥ २८ ॥

२८) त्यानंतर सातव्यांत आरंभी ( कार्य-कारण अशा दोन प्रकारांनी ) प्रकृतीचें रुप सांगून, भगवंताला भजणारे जे चार प्रकारचे भक्त, त्यांचे वर्णन केलें,      

पाठीं सप्तमींची प्रश्र्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसिद्धी ।

एवं ते सकळवाक्यअवघि । अष्टमाध्यायीं ॥ २९ ॥

२९) नंतर सातव्या अध्यायांत शेवटीं सांगितलेल्या सात वाक्यांसंबंधीं ( आठव्याच्या आरंभीं ) अर्जुनानें विचारलेल्या सात प्रश्नांची उत्तरे देऊन प्रयाणसिद्धीचा प्रकार सांगितला; अशा रीतीनें सर्व सात प्रश्नांची उत्तरे देऊन आठव्या अध्यायांत ते प्रश्र्न संपविले. 

आतां शब्दब्रह्मीं असंख्याके । जेतुला कांहीं अभिप्राय पिके ।

तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे ॥ ३० ॥        

३०) आतां असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा म्हणून

 मतलब प्राप्त होतो, तेवढा सर्व एक लक्ष ग्रंथ असलेल्या

 महाभारतामध्यें सांपडतो.



Custom Search

No comments: