Shri Dnyaneshwari
आतां अठरा पर्वी भारतीं ।
तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं
। तो एकलाचि नवमीं ॥ ३१ ॥
३१) आता भारताच्या अठरा
पर्वांमध्यें जो कांहीं अभिप्राय आहे, तो कृष्णार्जुनांच्या संवादामध्यें ( गीतेंत
) प्राप्त होतो, आणि गीतेच्या सातशें श्लोकामध्ये जो अभिप्राय आहे, तो एकट्या
नवव्या अध्यांयांत आहे.
म्हणोनि नवमीचिया अभिप्राया
। सहसा मुद्रा लावावया ।
बिहाला मी वायां । गर्व कां
करुं ॥ ३२ ॥
३२) म्हणून नवव्या
अध्यायांतील मतलब पूर्ण झाला, असे दाखविणारा लेखनसीमेचा शिक्का, त्यावर एकदम
द्यावयास भ्यालेला जो मी, तो, नवव्या अध्यायांतील अभिप्राय पूर्णपणे सांगितला, असा
व्यर्थ अभिमान कशाकरिता धरुं ?
अहो गूळा साखरे मालेयाचे ।
हे बांधे तरी एकाचि रसाचे ।
परि स्वाद गोडियेचे । आनआन
जैसे ॥ ३३ ॥
३३) अहो, गूळ, साखर व
राव यांचे आकार जरी एकाच रसाचें झालें आहेत, तरी त्यामध्यें गोडीचे स्वाद जसे
निरनिराळे आहेत;
एक जाणोनियां बोलती । एक
ठायेंठावो जाणविती ।
एक जाणों जातां हारपती ।
जाणते गुणेंशी ॥ ३४ ॥
३४) ( त्याप्रमाणे अठरा
अध्याय हे एकाच गीतेचे आहेत व त्यामध्यें एकाच ब्रह्मरसाचें वर्णन आहे, पण
त्याच्या परिणामांकडे पाहिलें तर ते निरनिराळे आहेत, ते असे कीं, ) कांही अध्याय,
अधिष्ठानब्रह्मस्वरुपाला जाणून त्याचें वर्णन करतात; कांहीं अध्याय त्या त्या
ठिकाणींच तूं ब्रह्म आहेस अशी जाणीव करुन देतात व काही अध्याय जाणावयास गेले असतां,
जाणण्याच्या धर्मासह जाणणारा हरपून जातो ( ब्रह्मरुप होतो. )
हे ऐसे अध्याय गीतेचे । परि
अनिर्वाच्य नवमाचें ।
तो अनुवादलों हें तुमचें ।
सामर्थ्य प्रभू ॥ ३५ ॥
३५) असे हे गीतेचे
अध्याय आहेत. परंतु नववा अध्याय शब्दानें सांगण्याच्या पलीकडचा आहे. तो देखील मी
स्पष्ट करुन सांगितला. महाराज ही सर्व शक्ति आपली आहे.
कां एकाचि काठि तपिन्नली ।
एकीं सृष्टीवरी सृष्टी केली ।
एकीं पाषाण वाऊनि उतरलीं ।
समुद्रीं कटकें ॥ ३६ ॥
३६) एकाच्या ( वसिष्ठ
ऋषींच्या ) काठीनें सूर्याप्रमाणें प्रकाश केला एकानें ( विश्र्वामित्रानें ) या
जगाहून वेगळें जगच निर्माण केले. एकानें ( नल वानरानें ) दगड पाण्यावर टाकून समुद्रावरुन
सैन्य पार उतरवून नेलें.
एकीं आकाशीं सूर्यातें
धरिलें । एकीं समुद्रा चुळीं भरिलें ।
तैसें मज नेणतयाकरवीं
बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं ॥ ३७ ॥
३७) एकानें ( मारुतीने
) आकाशांत असलेल्या सूर्यास पकडलें; एकानें ( अगस्तीनें ) एका घोटांतच समुद्र
प्राशन केला. त्याप्रमाणें मी जो अजाण, त्या माझ्याकडून बोलण्याच्या पलीकडे असलेल्या
नवव्या अध्यायाचा अभिप्राय तुम्हीं बोलविला.
परि हें असो एथ ऐसें ।
रामरावण झुंजिन्नले कैसे ।
रामरावण जैसे । मीनले समरीं
॥ ३८ ॥
३८) परंतु हे असो,
येथें असें आहे कीं, राम व रावण हे एकमेकांशी कसें लढले हे सांगावयाचें असेल, तर
जसें राम-रावण हें एकमेकांत युद्धांत भिडले तसें, ( असे सांगावें लागेल; )
तैसें नवमीं कृष्णाचें
बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें ।
या निवाडा तत्तवज्ञु जाणे ।
जया गीतार्थु हातीं ॥ ३९ ॥
३९) त्याप्रमाणें
नवव्या अध्यायांतील श्रीकृष्णाने केलेला जो उपदेश तो नवव्या अध्यायासारखाच आहे,
असें माझे म्हणणें आहे. हा मी केलेला निर्णय ज्याला गीतेच्या अर्थाचें आकलन झालें
आहे, त्या तत्त्ववेत्त्याला पटेल.
एवं नवही अध्याय पहिले ।
मियां मतीसारिखे वाखाणिले ।
आतां उत्तरखंड उपाइलें । ग्रंथाचें ऐका ॥ ४० ॥
४०) त्याप्रमाणें
पहिल्या नऊहि अध्यायांचे मी आपल्या बुद्धीप्रमाणें व्याख्यान केलें, आता
गीताग्रंथाचा राहिलेला दुसरा भाग प्राप्त झालेला आहे, तो ऐका.
येथ विभूती प्रतिविभूती ।
प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ।
ते विदग्धा रसवृत्ती ।
म्हणिपैल कथा ॥ ४१ ॥
४१) या अध्यायांतआतां
अर्जुनाला विशेष व सामान्य विभूति सांगितल्या जातील. ती कथा चातुर्यानें व रसयुक्त
वर्णनानें सांगितली जाईल.
देशियेचेनि नागरपणें ।
शांतु शृंगारातें जिणे ।
तरि ओंविया होती लेणें ।
साहित्यासी ॥ ४२ ॥
४२) मराठी भाषेंतील
सौंदर्यानें शांतरस शृंगाररसाला जिंकील व ओंव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील.
मूळग्रंथींचिया संस्कृता ।
वरि मर्हाटी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचिता ।
कवण भूमी हें न चोजवे ॥ ४३ ॥
४३) मूळ संस्कृत
गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रीतीनें दोन्हींचा
अभिप्राय जर चांगला पटला, तर कोणता ग्रंथ मूळ आहे. हें कळणार नाही.
जैसें अंगाचेनि सुंदरपणें ।
लेणियासी आंगचि होय लेणें ।
अळंकारिलें कवण कवणें । हें
निर्वचेना ॥ ४४ ॥
४४) ज्याप्रमाणे
शरीराच्या सौंदर्याने शरीर हेंच अलंकारास भूषण होतें, अशा स्थितीत कोणी कोणाला
शोभा आणली, याची निवड होत नाही.
तैसी देशी आणि संस्कृत वाणी
। एका भावार्थाचां सोकासनीं ।
शोभती आयणी । चोखट आइका ॥
४५ ॥
४५) त्याचप्रमाणें माझी
मराठी भाषा व संस्कृत भाषा या दोन्हीहि एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात; त्या
तुम्ही चांगल्या बुद्धीनें ऐका.
उठावलिया भावा रुप । करितां
रसवृत्तीचें लागे वडप ।
चातुर्य म्हणे पडप । जोडलें
आम्हां ॥ ४६ ॥
४६) गीतेचा पुढेआलेला
अभिप्राय सांगत असतां शृंगारादि नवरसांचा वर्षाव होतो व चातुर्य म्हणतें, आम्हांला
प्रतिष्ठा प्राप्त झाली.
तैसें देशियेचें लावण्य ।
हिरोनि आणिलें तारुण्य ।
मग रचिलें अगण्य ।
गीतातत्त्व ॥ ४७ ॥
४७) ( वरच्या ओवींत
सांगितलेला परिणाम ज्याच्या योगानें होईल ) तसें मराठी भाषेचें सौंदर्य घेऊन, (
नवरसांना ) तारुण्य आणलें व मग अमर्याद गीतातत्त्व रचलें ( म्हणजे गीतेवर टीका
केली ).
तैसा चराचरपरमगुरु ।
चतुरचित्तचमत्कारु ।
तो ऐका यादवेश्र्वरु ।
बोलता झाला ॥ ४८ ॥
४८) याप्रमाणे संपूर्ण
जगाचे श्रेष्ठ गुरु असलेले व शहाण्यांच्या चित्ताला आश्चर्यभूत असणारे, असे जे
यादवांतील श्रेष्ठ श्रीकृष्ण ते बोलले, तें ऐका.
ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे
। काई बोलिलें श्रीहरी तेणें ।
अर्जुना आघवियाचि मातू
अंतःकरणें । घडौता आहासि ॥ ४९ ॥
४९) निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात, त्या
श्रीकृष्णांनी काय भाषण केले. ( तें ऐका. ) श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तू सर्व
गोष्टीनी अंतःकरणाचा धड आहेस.
श्र्लोक
श्रीभगवानुवाच
भूय एव महाबाहो शृणु मे
परमं वचः ।
यत्तेऽहं प्रीयमाणाय
वक्ष्यामि हितकाम्यया ॥ १ ॥
१) श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहो, ( माझ्या
भाषणानें ) संतोष पावणार्या तुला, तुझ्या हिताच्या इच्छेनें जें मी आणखीदेखील
सांगत आहें, तें माझें श्रेष्ठ भाषण ऐक.
आम्हीं मागील जे निरुपण
केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें ।
तंव टांचें नव्हे भलें ।
पुरतें आहे ॥ ५० ॥
५०) आम्हीं पूर्वी जे
व्याख्यान केले त्यामुळें तुझें लक्ष किती आहे हेंच अजमावून पाहिलें; त्यांत तें
अपुरें नाहीं तर चांगलें पूर्ण आहे ( असें आढळून आलें. )
घटी थोडेसें उदक घालिजे ।
तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।
तैसा परिसौनि पाहिलासि तंव
परिसाविजे । ऐसेंचि होतसे ॥ ५१ ॥
५१) ज्याप्रमाणें
घागरीत थोडेंसे पाणी घालावें व तें गळालें नाही, तर जास्त भरावें; त्याप्रमाणे तूं ऐकावें म्हणून
सांगितलें, तेव्हां तुला आणखी ऐकावें असेंच वाटू लागलें.
अवचितयावरी सर्वस्व सांडिजे
। चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा तूं आतां माझें ।
निजधाम की ॥ ५२ ॥
५२) एखाद्या अकस्मात्
आलेल्या मनुष्यावर आपलें सर्वस्व सोंपवावें व तो प्रामाणिक आहे असें आढळून आलें,
तर त्यालाच खजिनदार करावा, त्याप्रमाणें ( आम्ही तुला सांगितलेलें तूं लक्षपूर्वक
ऐंकतोस अशी आमची खात्री झाल्यामुळें ) तूं आतां आमचें राहण्याचें ठिकाण झाला
आहेस.
तैसें अर्जुना येउतें
सर्वेश्र्वरें । पाहोनि बोलिलें आदरें ।
गिरी देखोनि सुमरे । मेघु
जैसा ॥ ५३ ॥
५३) याप्रमाणें
सर्वांचे प्रभू जे श्रीकृष्ण, ते अर्जुनाला एवढ्या योग्यतेचा पाहून ( त्याजबरोबर )
प्रेमानें बोलावयास लागले. ज्याप्रमाणें डोंगर पाहून मेघांची दाट फळी येते.
तैसा कृपाळुवांचा रावो ।
म्हणे आइके गा महाबाहो ।
सांगितलाचि अभिप्रावो ।
सांगेन पुढती ॥ ५४ ॥
५४) त्याप्रमाणें ( मोठ्या प्रेमभरानें ) कृपाळूंचे राजे
श्रीकृष्ण म्हणाले, अरे, आजानुबाहु अर्जुना, ऐक, सांगितलेलाच मतलब आम्ही पुन्हां
सांगतो.
प्रतिवर्षी क्षेत्र पेरिजे
। पिके तरी वाहो नुवगिजे ।
पिकासी निवाडु देखिजे ।
अधिकाधिक ॥ ५५ ॥
५५) प्रत्येक वर्षाला
शेताची पेरणी करावी आणि जर तें पिकेल, तर त्याची मशागत करण्याचा कंटाळा करुं नये;
कारण त्यामुळें पिकाची निप्पति अधिकाधिक दिसते.
पुढतपुढती पुटें देतां ।
जोडे वानियेची अधिकता ।
तें सोनें पांडुसुता ।
शोधूंचि आवडे ॥ ५६ ॥
५६) ज्या सोन्याला
वारंवार क्षाराची पुढें दिली असतां त्याचा कस अधिकाधिक वाढत जातो, अर्जुना. तें
सोनें शुद्ध करावेसेंच वाटतें.
तैसें एथ पार्था । तुज आभार
नाहीं सर्वथा ।
आम्ही आपुलियाचि स्वार्था ।
बोलौनि आम्ही ॥ ५७ ॥
५७) अर्जुना,
त्याप्रमाणें येथेंहि आहे या सांगण्यात तुझ्यावर मुळींच उपकाराचें ओझे नाहीं कारण
आम्ही आपल्या स्वार्थासाठी बोलत आहोंत.
अगा बाळका लेवविजे लेणें ।
तयाप्रमाणें तें काय जाणो ।
तो सोहळा भोगणें । जननीयेसी
दृष्टी ॥ ५८ ॥
५८) अरे, मुलाला दागिने
चालतात; पण तें मूल त्याप्रमाणें ( दागिन्यांना ) जाणतें काय ? दागिन्यांनी मूलाला
आलेल्या शोभेचा आनंद आईनें आपल्या दृष्टीनें भोगावयाचा असतो.
तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे ।
तंव तंव आमुचें सुख दुणावे
। ऐसें असे ॥ ५९ ॥
५९) त्याप्रमाणें तुझें
सर्व हित जसजसें तुला समजेल, तसतसा आनंद दुपट्ट होतो; अशी वस्तुस्थिति आहे.
आतां असो हे विकडी । मज उघड
तुझी आवडी ।
म्हणोनि तृप्तीची सवडी ।
बोलतां न पडे ॥ ६० ॥
६०) आतां हें अलंकारिक
बोलणें राहू दे तुझ्यावर माझें उघड प्रेम आहे, म्हणून तुझ्याशी बोलतांना तृप्तीचा
शेवट होत नाही. ( म्हणजे तुझ्याशी बोलणें पुरेसें वाटत नाही )
आम्हां येतुलियाचि कारणें ।
तेंचि तें तुजशीं बोलणें ।
परि असो हें अंतःकरणें ।
अवधान दे ॥ ६१ ॥
६१) आम्हाला
एवढ्याचकरितां तेंच तें फिरुन तुझ्याशी बोलावे लागतें परंतु हें असूं दे. तू
मनापासून लक्ष दे
ऐकें ऐकें सुवर्म । वाक्य
माझें परम ।
जें अक्षरें लेऊनि परब्रह्म
। तुज खेंवासि आलें ॥ ६२ ॥
६२) तर ऐकमर्मज्ञ
अर्जुना, आमचें श्रेष्ठ बोलणें ऐक हें आमचे बोलणे म्हणजे ब्रह्नच अक्षरांचा अंगरखा
घालून तुला आलिंगन देण्यांत आले आहे.
तरी किरीटी तूं मातें ।
नेणसी ना निरुतें ।
तरि गा जो मी येथें । तें
विश्र्वचि हें ॥ ६३ ॥
६३) तरी अर्जुना, तू मला खरोखर जाणत नाहीस ना ? (
जर जाणत नसलास तर सांगतों ) येथें जो मी तुझ्यापुढें
उघड आहे, तो दिसतो एवढ्या मर्यादित नसून मी म्हणजे
हें विश्वच आहे.
No comments:
Post a Comment