Shri Dnyaneshwari
मूळ श्र्लोक
न मे विदुः
सुरगणाः प्रभवं न महर्षयः ।
अहमादिर्हि देवानां
महर्षीणां च सर्वश: ॥ २ ॥
२) देवांना किंवा
महर्षींना माझी उत्पत्ति माहीत नाहीं. कारण देव आणि महर्षि या सर्वांचें आदिकारण
मी आहें.
एथ वेद मुके जाहाले । मन
पवन पांगुळले ।
रातीविण मावळले । रविशशी ॥
६४ ॥
६४) या माझ्या स्वरुपीं
वेदांना बोलतां येईना, मन आणि प्राण यांची गति माझ्या स्वरुपीं चालेना, सूर्य व
चंद्र हे माझ्या स्वरुपीं रात्रींशिवाय मावळले. ( ते माझ्या स्वरुपाचें प्रकाशन
करुं शकत नाहीत. )
उदरींचा गर्भु जैसा । नेणे
मायेची वयसा ।
देवांसि मी तैसा । चोजवेना
॥ ६५ ॥
६५) पोटांत असलेला गर्भ
ज्याप्रमाणें ( आपल्या ) आईचें वय जाणत नाहीं, त्याप्रमाणें देवांना माझें ज्ञान
होत नाहीं,
आणि जळचरां उदधीचें मान ।
मशकां नोलांडवे गगन ।
तैसें महर्षींचे ज्ञान ।
नेणे मातें ॥ ६६ ॥
६६) आणि ज्याप्रमाणें
पाण्यांत राहणार्या प्राण्यांना समुद्राचें माप कळत नाहीं. ( किंवा ) चिलटास आकाश
ओलांडता येत नाहीं, त्याप्रमाणें मोठाल्या ऋषींचे ज्ञान मला जाणू शकत नाहीं.
मी कवण केतुका । कवणाचा कैं
जाहला ।
निरुती या करितां बोला ।
युगें गेलीं ॥ ६७ ॥
६७) मी कोण आहे, केवढा
आहे कोणापासून व केव्हां उत्पन्न झालों, या गोष्टींचा निर्णय करण्यांत किती एक
युगें निघून गेली.
महर्षी आणि या देवां ।
येरां भूतजातां सर्वां ।
मी आदि म्हणोनि पांडवा ।
जाणता अवघड ॥ ६८ ॥
६८) मोठाले ऋषि आणि देव
यांना आणि दुसरे जेवढे म्हणून प्राणी आहेत त्या सर्वांना मीच कारण आहे. म्हणून
अर्जुना मला जाणणें, त्यांना कठीण आहे.,
उतरलें उदक पर्वत वळघे ।
कां वाढते झाड मुळीं लागे ।
तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मी ॥ ६९ ॥
६९) पर्वतावरुन खालीं
आलेलें पाणी जर पुन्हा पर्वतावर चढेल, अथवा वाढणारें झाड शेंड्याकडून मुळाकडे
येईल, तर माझ्यापासून झालेल्या जगाकडून मी जाणला जाईन.
का गाभेवनें बटु गिंवसवे ।
तरंगीं सागरु सांठवे ।
कां परमाणूमाजीं सामावे ।
भूगोलु हा ॥ ७० ॥
७०) अथवा वडाच्या
सूक्ष्म अंकुरांत जर वडाचें विस्तीर्ण झाड सापडलें जाईल, अथवा, जर लाटेमध्ये जर
समुद्र सांठवला जाईल, अथवा ही पृथ्वी जर परमाणूंत सांपडली जाईल;
तरी मियां जालियां जीवां ।
महर्षी अथवा देवां ।
मातें जाणावया होआवा ।
अवकाशु गा ॥ ७१ ॥
७१) असेण होईल तर,
अर्जुना, माझ्यापासून उत्पन्न झालेल्या प्राण्यांना, महर्षींना अथवा देवांना माझी
ओळख होणयास लाग आहे.
ऐसाही जरी विपायें ।
सांडुनि पुढील पाये ।
सर्वेंद्रियांसि होये ।
पाठिमोरा जो ॥ ७२ ॥
७२) असा जरी मी
जाणण्याला कठीण आहे, तरी कदाचित् जो कोणी बाह्य वृत्ति टाकून ( देहादि अनात्म
तत्त्वांकडे जाणारी वृत्ति काढून ) सर्व इंद्रियांकडे पाठमोरा होतो ( वृत्ति अंतर्मुख
करतो; )
प्रवर्तलाही वेगीं बहुडे ।
देह सांडुनि मागलीकडे ।
महाभूतांचिया चढे ।
माथयावरी ॥ ७३ ॥
७३) देहादि अनात्म
तत्त्वांकडे जरी त्याची प्रवृत्ति झाली, तरी तेथून वेगानें माघारी फिरतो; स्थूल,
सूक्ष्म व कारण हे देह मागें टाकून ( विचाराने यांचा निरास करुन )
पंचमहाभूतांच्याहि माथ्यावर ( जो ) चढतो, ( पंचमहाभूतांचा निरास करतो. )
मूळ श्लोक
यो मामजमनादिं च वेत्ति
लोकमहेश्वरम् ।
असंमूढः स मर्तेषु
सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ३ ॥
३) जो मला जन्मरहित,
अनादि आणि लोकमहेश्वर असें जाणतो, तो मानवांमध्यें ज्ञानी आहे व तो सर्व
पापांपासून मुक्त होतो.
तैसा राहोनि ठायठिके ।
स्वप्रकाशें चोखें ।
अजत्व माझें देखे । आपुलिये
डोळां ॥ ७४ ॥
७४) याप्रमाणें
चांगल्या रीतीनें त्या ठिकाणीं स्थिर राहून शुद्ध आत्मप्रकाशाच्या योगानें, आपल्या
डोळ्यांनी ( प्रत्यक्ष ) माझें जन्मरहित्य ( जो ) जाणतो
मी आदिसि परु ।
सकळलोकमहेश्र्वरु ।
ऐसिया मातें जो नरु । यापरी
जाणे ॥ ७५ ॥
७५) मी आरंभाच्या
पलीकडील ( अनादि ) आहे व सर्व लोकांचा मुख्य ईश्र्वर आहे, अशा मला जो पुरुष
याप्रमाणें जाणतो;
तो पाषाणांमाजि परिसु ।
रसांमाजी सिद्धरसु ।
तैसा मनुष्याकृति अंशु । तो
माझाचि जाण ॥ ७६ ॥
७६) तो पुरुष
पाषाणामध्ये परीस जसा श्रेष्ठ किंवा सर्व रसांत अमृत जसें श्रेष्ठ, त्याप्रमाणें
तो मनुष्याच्या आकारानें असलेला माझा ( श्रेष्ठ ) अंश आहे असें समज.
तो चालतें ज्ञानाचें बिंब ।
तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
परी माणुसपणाची भांब ।
लोकाचि भागु ॥ ७७ ॥
७७) तो ज्ञानाची चालती
मूर्ति आहे, त्याचे अवयव ते सुखाला फुटलेले अंकुर आहेत; परंतु ( त्याच्या ठिकाणीं
दिसणारा ) माणूसपणा हा लोकांच्या दृष्टीला होणारा भ्रम आहे.
अगा अवचिता कापुरा--। माजीं
सांपडला हिरा ।
वरी पडलिया नीरा । न निगे
केवीं ॥ ७८ ॥
७८) अर्जुना, हिरा जर
अकस्मात् कापरांत सांपडला व त्यावर जर पाणी पडलें, तर त्या पाण्याकडून तो
विघळल्याशिवाय भिन्न असा बाहेर निराळा कसा पडणार नाहीं ? ( तर पडेल तो कापरासारखा
पाण्यांत विरघळणार नाहीं. )
तैसा मनुषयलोकाआंतु । तो
जरी जाहला प्राकृतु ।
तर्ही प्रकृतिदोषाची मातु
। नेणिजे तेथ ॥ ७९ ॥
७९) त्याप्रमाणें
मनुष्यप्राण्यांत जरी तो शरीरधारी दिसला, तरी पण त्याच्या ठिकाणीं जन्ममृत्यु
आदिकरुन प्रकृतिदोषांची गोष्टहि माहीत नसते.
तो आपसयेंचि सांडिजे पापीं
। जैसा जळत चंदनु सर्पीं ।
तैसा मातें जाणे तो
संकल्पीं । वर्जूनि घालिजे ॥ ८० ॥
८०) त्या पुरुषाला
आपोआपच पापें टाकून जातात. ज्याप्रमाणें आग लागलेल्या चंदनाच्या झाडाला वेढा घालून
असलेले साप सोडून जातात, त्याप्रमाणें मला जो ओळखतो; तो संकल्पांकडून टाकला जातो.
तेंचि मातें कैसें जाणिजे ।
ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।
तरी मी ऐसा हे माझे । भाव
ऐकें ॥ ८१ ॥
८१) तेंच मला कसें जाणावें,
असें जर कांहीं तुझें मन इच्छा करील, तर मी असा आहें व हें माझ्यापासून झालेले
निराळे पदार्थ असे आहेत, तें ऐक,
जे वेगळालां भूतीं । सारिखे
होऊनि प्रकृती ।
विखुरले आहेति त्रिजगतीं ।
आघविये ॥ ८२ ॥
८२) ते माझे विकार
भिन्न भिन्न प्राण्यांमध्यें त्यांच्या त्यांच्या प्रकृतीसारखे बनून संपूर्ण
त्रैलोक्यांत पसरले आहेत.
मूळ श्र्लोक
बुद्धिर्ज्ञानमसंमोहः क्षमा
सत्यं दमः शमः ।
सुखं दुःखं भवोऽभावो भयं
चाभयमेवच ॥ ४ ॥
४) बुद्धि, ज्ञान,
असंमोह, क्षमा, सत्य, दम, शम, सुख, दुःख, होणें, न होणें, भय व अभय;
अहिंसा समता तुष्टिस्तपो
दानं यशोऽयशः ।
भवन्ति भावा भूतानां मत्त
एव पृथग्विधाः ॥ ५ ॥
५) अहिंसा, समता,
तुष्टि, तप, दान, यश, अपकीर्ति, इत्यादि भूतांचे निरनिराळ्या प्रकारचे भाव,
माझ्यापासूनच उत्पन्न होतात.
ते प्रथम जाण बुद्धि । मग
ज्ञान जें निरवधि ।
असंमोह सहनसिद्धि । क्षमा
सत्य ॥ ८३ ॥
८३) त्यापैकी पहिली
बुद्धि आहे असें समज. नंतर अगाध ज्ञान, असंमोह ( सहज उपस्थित झालेल्या ज्ञेय
गोष्टींकडे विवेकपूर्वक प्रवृत्ति ), सहन करण्याचा स्वभाव म्हणजे भ्रम आणि सत्य (
हीं समज ).
मग शम दम दोन्ही । सुख दुःख
वर्तत जनीं ।
अर्जुना भावाभाव मानीं ।
भावाचिमाजीं ॥ ८४ ॥
८४) मग शम ( मनोनिग्रह
) आणि दम ( इंद्रियनिग्रह ) हे दोन आणि लोकांत असलेलें सुख व दुःख, आणि अर्जुना,
होणें आणि नसणें या सर्वांची माझ्याच विकारात गणना कर.
आतां भय आणि निर्भयता ।
अहिंसा आणि समता ।
हे मम रुपाचि पांडुसुता ।
ओळख तूं ॥ ८५ ॥
८५) आतां अर्जुना, भय
आणि निर्भयपणा, अहिंसा आणि समबुद्धि हीं माझींच रुपें आहेत, हें तूं जाण.
दान यश अपकीर्ति । हे जे
भाव सर्वत्र वसती ।
ते मजचि पासून होती ।
भूतांचां ठायीं ॥ ८६ ॥
८६) दान, यश व
दुष्कीर्ति, हे जे विकार सर्व ठिकाणीं राहतात, ते माझ्यापासून प्राण्यांच्या
ठिकाणीं उत्पन्न होतात;
जैसीं भूते आहति सिनानीं ।
तैसे चिहे वेगळाले मानीं ।
एक उपजती माझां ज्ञानी । एक
नेणती मातें ॥ ८७ ॥
८७) जशीं भूतें
वेगवेगळाली आहेत, तसेच हे भाव वेगवेगळाले आहेत, असें समज. त्यापैकीं कित्येक भाव
माझ्या ज्ञानांत उत्पन्न होतात आणि कित्येक मला जाणत नाहींत, ( माझ्या अज्ञानांत
उत्पन्न होतात ).
अगा प्रकाश आणि कडवसें ।
सूर्याचिस्तव जैसें ।
प्रकाश उदयीं दिसे । तम
अस्तूसीं ॥ ८८ ॥
८८) अरे अर्जुना,
प्रकाश आणि अंधार हे परस्पर विरुद्ध स्वभावाचे असूनहि ते ज्याप्रमाणें एका
सूर्यापासून होतात; सूर्याच्या उदयांत प्रकाश दिसतो आणि सूर्याच्या अस्ताबरोबर
अंधार होतो.
आणि माझें जें जाणणें
नेणणें । तें तंव भूतांचिया दैवांचें करणें ।
म्हणोनि भूतीं भावाचें होणें
। विषम पडे ॥ ८९ ॥
८९) आणि माझें जें
ज्ञान होणें अथवा माझें जें अज्ञान असणें, हें प्राण्यांच्या दैवाचें कर्तव्य आहे,
म्हणून त्याप्रमाणें प्राणिमात्राच्या ठिकाणीं कमीजास्त प्रमाणांत ह्या विकारांस
व्हावें लागतें.
यापरी माझां भावीं । हें
जीवसृष्टि आहे आघवी ।
गुंतली असे जाणावीं ।
पंडुकुमरा ॥ ९० ॥
९०) ह्याप्रमाणें माझ्या विकारांत ही संपूर्ण जीवनसृष्टि
सांपडली आहे, असें अर्जुना, समज,
आतां इये सृष्टीचे पालक ।
तयां आधीन वर्तती लोक ।
ते अकरा भाव आणिक । सांगेन
तुज ॥ ९१ ॥
९१) आतां ह्या सृष्टिचें पालन करणारे आणि ज्यांच्या
ताब्यांत सर्व लोक वागतात, ते आणखी अकरा भाव तुला
सांगेन.
No comments:
Post a Comment