Thursday, February 10, 2022

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 51 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ५१

ShriRamCharitManas
AyodhyaKanda Part 51 
Doha 299 to 304 
श्रीरामचरितमानस
अयोध्याकाण्ड भाग ५१ 
दोहा २९९ ते ३०४

दोहा—यों सुधारि सनमानि जन किए साधु सिरमोर ।

को कृपाल बिनु पालिहै बिरिदावलि बरजोर ॥ २९९ ॥

अशाप्रकारे आपल्या सेवकाची चूक सुधारुन व त्याला सन्मान देऊन तुम्ही त्याला साधूंचा शिरोमणी बनविता. हे कृपाळू, तुमच्याविना आपल्या बिरुदावलीचे असे आग्रहाने पालन करणारा दुसरा कोण आहे ? ॥ २९९ ॥

सोक सनेहँ कि बाल सुभाएँ । आयउँ लाइ रजायसु बाएँ ॥

तबहुँ कृपाल हेरि निज ओरा । सबहि भॉंति भल मानेउ मोरा ॥

मी शोकाने किंवा स्नेहाने आपल्या बालस्वभावानुसार आज्ञा न मानता निघून आलो. तरीहि हे कृपाळू स्वामी, तुम्ही आपल्या स्वभावानुसार सर्व प्रकारे माझे कृत्य चांगलेच मानले. ॥ १ ॥

देखेउँ पाय सुमंगल मूला । जानेउँ स्वामि सहज अनुकूला ॥

बड़े समाज बिलोकेउँ भागू । बड़ीं चूक साहिब अनुरागू ॥

मी सुंदर मांगल्याचे मूळ असलेल्या तुमच्या चरणांचे दर्शन घेतले, तेव्हा स्वामी माझ्यावर स्वभावतःच अनुकूल आहेत, हे मी जाणले.माझ्याकडून एवढी मोठी चूक होऊनहि स्वामींचा माझ्यावर किती लोभ आहे, हे एवढ्या मोठ्या समाजामध्ये मी स्वतःचे भाग्य असल्याचे जाणले. ॥ २ ॥

कृपा अनुग्रहु अंगु अघाई । कीन्हि कृपानिधि सब अधिकाई ॥

राखा मोर दुलार गोसाईं । अपनें सील सुभायँ भलाईं ॥

कृपानिधानांनी माझ्यावर संपूर्ण कृपा केली, अनुग्रह केला. माझी योग्यता नसतानाही हे खूपच केले. हे स्वामी, तुम्ही आपल्या शील, स्वभाव आणि चांगुलपणाने माझे प्रेम राखले. ॥ ३ ॥

नाथ निपट मैं कीन्हि ढिठाई । स्वामि समाज सकोच बिहाई ॥

अबिनय बिनय जथारुचि बानी । छमिहि देउ अति आरति जानी ॥

हे नाथ, स्वामी व समाज यांची भीड न बाळगता मी मन मानेल तसे बोलण्याचे धारिष्ट्य केले. हे देवा, माझी व्याकुळता जाणून तुम्ही मला क्षमा करावी. ॥ ४ ॥

दोहा—सुहृद सुजान सुसाहिबहि बहुत कहब बड़ि खोरि ।

आयसु देइअ देव अब सबइ सुधारी मोरि ॥ ३०० ॥

अकारण हित करणार्‍या सुहृद, बुद्धिमान व श्रेष्ठ स्वामींना जास्त सांगणे हा अपराध आहे. म्हणून हे देव, आता मला आज्ञा द्या. तुम्ही मला सर्वतोपरी सांभाळून घेतले. ॥ ३०० ॥

प्रभु पद पदुम पराग दोहाई । सत्य सुकृत सुख सीवँ सुहाई ॥

सो करि कहउँ हिए अपने की । रुचि जागत सोवत सपने की ॥

हे प्रभू, तुमच्या चरणांची धूळ ही सत्य, पुण्य व सुख यांची मोठी परिसीमा आहे. तिचे स्मरण करुन मी आपल्या हृदयातील जागेपणी, झोपेत व स्वप्नातही असणारी इच्छा सांगतो. ॥ १ ॥

सहज सनेहँ स्वामि सेवकाई । स्वारथ छल फल चारि बिहाई ॥

अग्या सम न सुसाहिब सेवा । सो प्रसादु जन पावै देवा ॥

ती इच्छा की, कपट,स्वार्थ आणि अर्थ-कामादी चारी फले सोडून स्वाभाविक प्रेमाने स्वामींची सेवा करणे, हीच आहे आणि आज्ञापालनासारखी स्वामींची दुसरी कोणतीही श्रेष्ठ सेवा नाही. म्हणून हे देवा, आता तोच आज्ञारुप प्रसाद सेवकाला मिळावा. ‘ ॥ २ ॥

अस कहि प्रेम बिबस भए भारी । पुलक सरीर बिलोचन बारी ॥

प्रभु पद कमल गहे अकुलाई । समउ सनेहु न सो कहि जाई ॥

असे म्हणून भरत प्रेमात मग्न झाला. त्याचे शरीर पुलकित झाले. डोळ्यांत प्रेमाश्रू दाटले. व्याकूळ होऊन त्याने प्रभू रामचंद्रांचे चरणकमल धरुन ठेवले. तो प्रसंग व ते प्रेम यांचे वर्णन करता येणार नाही. ॥ ३ ॥

कृपासिंधु सनमानि सुबानी । बैठाए समीप गहि पानी ॥

भरत बिनय सुनि देखि सुभाऊ । सिथिल सनेहँ सभा रघुराऊ ॥

कृपासिंधु श्रीरामचंद्रांनी सुंदर वाणीने भरताचा मान राखून त्याचा हात धरुन त्याला आपल्याजवळ बसवून घेतले. भरताची विनंती ऐकून व त्याचा स्वभाव पाहून सर्व सभा आणि श्रीरघुनाथ स्नेहामुळे स्वतःला हरवून बसले. ॥ ४ ॥

छंद—रघुराउ सिथिल सनेहँ साधु समाज मुनि मिथिला धनी ।

मन महुँ सराहत भरत भाय भगति की महिमा घनी ॥

भ रतहि प्रसंसत बिबुध बरषत सुमन मानस मलिन से ।

तुलसी बिकल सब लोग सुनि सकुचे निसागम नलिन से ॥

श्रीरघुनाथ, साधु-समाज, मुनी वसिष्ठ आणि मिथिलापती जनक हे स्नेहाने ओथंबून गेले. सर्वजण मनातल्या मनात भरताचे बंधु-प्रेम आणि त्याच्या भक्तीचा महिमा यांची खूप प्रशंसा करु लागले. देव नाइलाजाने भरताची प्रशंसा करुन त्याच्यावर फुले उधळू लागले. तुलसीदास म्हणतात, सर्व लोक भरताचे भाषण ऐकून व्याकूळ झाले आणि ज्याप्रमाणे रात्र झाल्यावर कमळ कोमेजते, तसे म्लान झाले.  

सो०—देखि दुखारी दीन दुहु समाज नर नारि सब ।

मघवा महा मलीन मुए मारि मंगल चहत ॥ ३०१ ॥

दोन्ही समाजांतील सर्व स्त्री-पुरुष दीन व दुःखी झालेले पाहून महामलिन मनाचा इंद्र मेलेल्याला मारुन आपले मंगल व्हावे, अशी इच्छा करीत होता. ॥ ३०१ ३

कपट कुचालि सीवँ सुरराजू । पर अकाज प्रिय आपन काजू ॥

काक समान पाकरिपु रीती । छली मलीन कतहुँ न प्रतीती ॥

इंद्र हा कपट व वाईट चालीची परिसीमा होता. त्याला दुसर्‍याची हानी आणि आपला लाभ आवडे. इंद्राची रीत कावळ्यासारखी होती. तो कपटी आणि मलिन मनाचा होता आणि त्याचा कुठेही व कुणावरही विश्वास नव्हता. ॥ १ ॥

प्रथम कुमत करि कपटु सँकेला । सो उचाटु सब कें सित मेला ॥

सुरमायॉं सब लोग बिमोहे । राम प्रेम अतिसय न बिछोहे ॥

प्रथम त्याने वाईट विचार करुन कपट रचले. नंतर त्याने आपल्या मनातील कपटी मळमळ सर्वांच्या डोक्यात भरली आणि देवमाया टाकली. तिने सर्व लोकांना खूप मोहित करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे श्रीरामांच्याबद्दलचे प्रेम पूर्णपणे नाहीसे झाले नाही. ॥ २ ॥ 

भय उचाट बस मन थिर नाहीं । छन बन रुचि छन सदन सोहाहीं ॥

दुबिध मनोगति प्रजा दुखारी । सरित सिंधु संगम जनु बारी ॥

भय व इंद्राच्या माया-प्रयोगामुळे कुणाचे मन स्थिर नव्हते. एका क्षणी त्यांना वनात राहण्याची इच्छा होई आणि दुसर्‍या क्षणीं त्यांना घर बरे वाटू लागे. मनाच्या द्विधा अवस्थेमध्ये प्रजा दुःखी झाली. जसे नदी व समुद्र यांच्या संगमाचे पाणी क्षुब्ध होते, तशी प्रजेच्या मनाची स्थिती झाली. ॥ ३ ॥

दुचित कतहुँ परितोषु न लहहीं । एक एक सन मरमु न कहहीं ॥

लखि हियँ हँसि कह कृपानिधानू । सरिस स्वान मघवान जुबानू ॥

चित्त द्विधा झाल्यामुळे त्यांना समाधान वाटत नव्हते. शिवाय दुसर्‍याला आपल्या मनातील ही गोष्ट सांगताही येईना. कृपानिधान रामचंद्र त्यांची ही दशा पाहून मनात हसून म्हणाले, ‘ कुत्रा, इंद्र आणि युवक एकसारख्या स्वभावाचे असतात.’ ( पाणिनीने श्र्वन् ( कुत्रा ), युवन् ( तरुण ), मघवन् ( इंद्र ) या तिन्ही शब्दांची रुपे एकसारखी होतात असे एका सूत्रात सांगितले आहे. तो संदर्भ येथे आहे. ) ॥ ४ ॥

दोहा—भरतु जनकु मुनिजन सचिव साधु सचेत बिहाइ ।

लागि देवमाया सबहि जथाजोगु जनु पाइ ॥ ३०२ ॥

भरत, जनक, मुनिजन, मंत्री आणि ज्ञानी साधु-संत यांना सोडून इतर सर्वांवर प्रत्येक मनुष्याच्या प्रकृती व स्थितीप्रमाणे देवमायेचा प्रभाव पडला. ॥ ३०२ ॥

कृपासिंधु लखि लोग दुखारे । निज सनेहँ सुरपति छल भारे ॥

सभा राउ गुर महिसुर मंत्री । भरत भगति सब कै मति जंत्री ॥

कृपासिंधू श्रीरामांनी आपल्या प्रेमाने व इंद्राच्या अनिवार मायेमुळे  लोक दुःखी असल्याचे पाहिले. सभा, राजा जनक, गुरु, ब्राह्मण, मंत्री इत्यादी सर्वांना भरताच्या भक्तीने आपल्या अधीन केले. ॥ १ ॥  

रामहि चितवत चित्र लिखे से । सकुचत बोलत बचन सिखे से ॥

भरत प्रीति नति बिनय बड़ाई । सुनत सुखद बरनत कठिनाई ॥

सर्व लोक चित्राप्रमाणे स्तब्ध होऊन श्रीरामचंद्रांकडे पाहात होते. पढावल्याप्रमाणे संकोचाने बोलत होते. भरताची प्रीती, नम्रता, विनय व महिमा हे ऐकण्यास सुखद होते, परंतु त्यांचे वर्णन करणे फार कठीण. ॥ २ ॥

जासु बिलोकि भगति लवलेसू । प्रेम मगन मुनिगन मिथिलेसू ॥

महिमा तासू कहै किमि तुलसी । भगति सुभायँ सुमति हियँ हुलसी ॥

ज्याच्या भक्तीचा लवलेश पाहून मुनिगण व मिथिलेश्र्वर जनक हे प्रेममग्न झाले. त्या भरताचा महिमा तुलसीदास कसा सांगणार ? भरताची भक्ती व सुंदर भाव पाहून कवीच्या हृदयातील सुबुद्धी विकसित होत होती. ॥ ३ ॥

आपु छोटि महिमा बड़ि जानी । कबिकुल कानि मानि सकुचानी ॥

कहि न सकति गुन रुचि अधिकाई । मति गति बाल बचन की नाई ॥

परंतु कवीची ती बुद्धी स्वतःला लहान व भरताचा महिमा मोठा समजून कविपरंपरेची मर्यादा मानून संकोच पावत होती. तिला गुणांची खूप आवड होती. परंतु ते ती सांगू शकत नव्हती. त्यामुळे बुद्धीची गती बालकांच्या बोलांप्रमाणे कुंठित झाली. ॥ ४ ॥

दोहा—भरत बिमल जसु बिमल बिधु सुमति चकोरकुमारि ।

उदित बिमल जन हृदय नभ एकटक रही निहारि ॥ ३०३ ॥

भरताची निर्मल कीर्ती ही निर्मल चंद्रमा आहे आणि कवीची सुबुद्धी ही चकोरी आहे. ती भक्तांच्या हृदयरुपी निर्मल आकाशात तो चंद्रमा उगवल्याचे पाहून त्याच्याकडे एकटक पाहातच राहिली. मग वर्णन कसे करणार ? ॥ ३०३ ॥

भरत सुभाउ न सुगम निगमहूँ । लघु मति चापलता कबि छमहूँ ॥

कहत सुनत सति भाउ भरत को । सीय राम पद होइ न रत को ॥

भरताच्या स्वभावाचे वर्णन वेदांनाही सुगम नाही. म्हणून माझ्या तुच्छ बुद्धीच्या चांचल्याबद्दल कविराजांनी क्षमा करावी. भरताचा स्वभाव सांगताना व ऐकताना कोण मनुष्य श्रीसीतारामांच्या चरणी अनुरक्त होणार नाही ? ॥ १ ॥

सुमिरत भरतहि प्रेमु राम को । जेहि न सुलभु तेहि सरिस बाम को ॥

देखि दयाल दसा सबही की । राम सुजान जानि जन जी की ॥

भरताचे स्मरण केल्याने ज्याला श्रीरामांचे प्रेम लाभले नसेल, त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोण असणार ?  दयाळू आणि ज्ञानी श्रीरामांनी सर्वांची ती दशा आणि भक्त भरताच्या मनाची अवस्था जाणली. ॥ २ ॥

धरम धुरीन धीर नय नागर । सत्य सनेह सील सुख सागर ॥

देसु कालु लखि समउ समाजू । नीति प्रीति पालक रघुराजू ॥

आणि धर्मधुरंधर, धीर, नीति-चतुर; सत्य, स्नेह, शील आणि सुखाचे समुद्र असलेले आणि नीती-प्रीतीचे पालन करणारे श्रीरघुनाथ देश, काल, प्रसंग व समाज पाहून, ॥ ३ ॥

बोले बचन बानि सरबसु से । हित परिनाम सुनत ससि रसु से ॥

तात भरत तुम्ह धरम धुरीना । लोक बेद बिद प्रेम प्रबीना ॥

त्याप्रमाणे बोलू लागले. ते बोलणे जणू वाणीचे सर्वस्वच होते. परिणामी हितकारक व ऐकण्यास चंद्राच्या अमृतासारखे होते. ते म्हणाले, ‘ कुमार भरत, तू धर्माची धुरा धारण करणारा आहेस. लोकव्यवहार व वेद जाणणारा आहेस आणि प्रेमाचे निधान आहेस. ॥ ४ ॥

दोहा—करम बचन मानस बिमल तुम्ह समान तुम्ह तात ।

गुर समाज लघु बंधु गुन कुसमयँ किमि कहि जात ॥ ३०४ ॥

बाबा रे ! कायावाचामनाने निर्मल असा तुझ्यासारखा तूच आहेस. गुरुजनांच्या समाजामध्ये आणि अशा वाईट प्रसंगी लहान भावाचे गुण कसे सांगता येतील ? ॥ ३०४ ॥

जानहु तात तरनि कुल रीती । सतयसंध पितु कीरति प्रीती ॥

समउ समाजु लाज गुरजन की । उदासीन हित अनहित मन की ॥

हे वत्सा, तू सूर्यकुलाची रीत, सत्यप्रतिज्ञ पित्याची कीर्ती आणि प्रीती, प्रसंग, समाज आणि गुरुजनांची मर्यादा तसेच उदासीन, मीत्र व शत्रू या सर्वांच्या मनातील जाणतोस. ॥ १ ॥

तुम्हहि बिदित सबही कर करमू । आपन मोर परम हित धरमू ॥

मोहि सब भॉंति भरोसा तुम्हारा । तदपि कहउँ अवसर अनुसारा ॥

तुला सर्व कर्तव्यांची व स्वतःच्या व माझ्या परम हितकारक धर्माची जाण आहे. जरी माझा सर्व प्रकारे तुझ्यावर विश्वास आहे, तरीही मी प्रसंगानुरुप काही सांगतो. ॥ २ ॥

तात तात बिनु बात हमारी । केवल गुरुकुल कृपॉं सँभारी ॥

नतरु प्रजा परिजन परिवारु । हमहि सहित सबु होत खुआरु ॥

हे बंधो ! वडिलांच्या अनुपस्थितील केवळ कुलगुरु वसिष्ठांच्या कृपेने आम्हांला सांभाळून घेतले, नाहीतर आमच्यासह प्रजा, कुटुंब, परिवार या सर्वांची वाताहत झाली असती. ॥ ३ ॥

जौं बिनु अवसर अथवँ दिनेसू । जग केहि कहहु न होइ कलेसू ॥

तस उतपातु तात बिधि कीन्हा । मुनि मिथिलेस राखि सबु लीन्हा ॥

जर अवेळी सूर्याचा अस्त झाला, तर मग सांग, जगात

 कुणाला धक्का बसणार नाही ? तशाच प्रकारचा उत्पात

 विधात्याने पित्याच्या अवेळी मृत्यूने घडवला आहे. परंतु

 पूज्य वसिष्ठांनी व मिथिलेश्वरांनी सर्वांना सांभाळले. ॥ ४

 ॥



Custom Search

No comments: