Friday, February 11, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 4 
Ovya 92 to 118 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ४ 
ओव्या ९२ ते ११८

मूळ श्लोक

महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवतस्था ।

मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः ॥ ६ ॥

६) प्राचीन ( कश्यपादि ) सात महर्षि, तसेच चार ( स्वायंभूआदि ) मनु हे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झाले. ही ( सर्व ) प्रजा यांची सृष्टि आहे.   

तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षीमाजि प्रबुद्ध ।

कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी ॥ ९२ ॥

९२) तरी अर्जुना, सर्व गुणांनी श्रेष्ठ, मोठमोठ्या ऋषींमध्यें प्रसिद्ध असलेले ज्ञाते जे कश्यपादि सात ऋषि,   

आणिकही सांगिजतील । जे चादा आंतील ।

स्वायंभू मुख्य मुदल । चारी मनु ॥ ९३ ॥

९३) चौदा मनूंपैकीं स्वयंभू आदिकरुन मुख्य मूळ जे चार मनु. तेहि आणखी सांगितले जातील. 

ऐसे हे अकरा । माझां मनीं जाहाले धनुर्धरा ।

सृष्टीचिया व्यापारा--। लागोनिया ॥ ९४ ॥

९४) अगा अर्जुना, सृष्टीची घडामोड चालवावी, म्हणून वर सांगितल्याप्रमाणें हे अकराजण माझ्या मनापासून उत्पन्न झाले.

जै लोकांची ये व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचें कांहीं न मांडे ।

तैं महाभूतांचें दळवाडें । अचुंबित असे ॥ ९५ ॥

९५) ज्यावेळीं ( स्वर्गादि ) लोकांची कांहीं व्यवस्था लागली नव्हती व या त्रैलोक्याचा कांहीं मांड मांडलेला नव्हता आणि महाभूतांचे समुदाय उपयोगांत आले नव्हते,

तैंचि जे जाहाले । इहीं लोकपाळ केले ।

अध्यक्ष रचुनि ठेविले । इहीं जन ॥ ९६ ॥

९६) त्याच वेळीं हे कश्यपादि अकराजण उत्पन्न झाले. मग त्या अकरा जणांनी इंद्रादि आठ लोकांना ( दिशांच्या स्वामींना ) उत्पन्न केलें, त्यांना दिशांचे स्वामी नेमून ठेवले व त्या लोकपालांनीं नाना प्रकारचे लोक उत्पन्न केले.

म्हणोनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा ।

ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तूं ॥ ९७ ॥

९७) म्हणून वर सांगितलेले महर्षि इत्यादिक हे अकरा राजे आहेत आणि बाकीचे लोकपालादिक हे यांची प्रजा आहेत. असा हा माझा विस्तार आहे, असें समज. 

पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरुढलिया बुड जाहलें ।

बुडीं कोंभ निघाले । खांदियाचे ॥ ९८ ॥

९८) अर्जुना, पाहा, पहिल्या प्रथम फक्त एक बीं असते. मग त्यालाच अंकुर फुटल्यावर तें बुंधा होतें व बुंध्यांतून फांद्याचें अंकुर निघतात.

खांदियापासूनि अनेका । पसरलिया शाखेपशाखा ।

शाखांस्तव देखा । पल्लव पानें ॥ ९९ ॥

९९) पाहा, त्या फांद्यांपासून पुढें लहानमोट्या शाखा पसरतात आणि त्या फांद्यांपासून कोवळी पालवी व पानें फुटतात.

पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहलें सकळ ।

तें निधारितां केवळ । बीजचि तें ॥ १०० ॥

१००) पालवीपासून फूल व फळ उत्पन्न होते; याप्रमाणें सर्व झाड तयार होतें. विचार करुन पाहिलें तर तें झाड म्हणजे केवळ बीज आहे.

ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें ।

तेथ सप्त ऋषि जाहाले । आणि चारी मनु ॥ १०१ ॥

१०१) त्याप्रमाणें प्रथम एकटाच मी होतों, मग ( तें ) ‘ मी ‘ मनाला उत्पन्न करतें झालें आणि त्या मनापासून कश्यपादि सात ऋषि आणि चार मनु उत्पन्न झाले.   

इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं  विविध लोक स्रजिले ।

लोकांपासूनि निपजले । प्रजाजात ॥ १०२ ॥

१०२) त्यांनीं ( इंद्र, अग्नि, यम, वरुण, नैर्ऋती, वायु, कुबेर व ईशान असे हे ) लोकपाल उत्पन्न केले. त्या लोकपालांनीं अनेक प्रकारच्या ( स्वर्गादि ) लोकांची रचना केली व त्या लोकांपासून ही सर्व प्रजा उत्पन्न झाली.    

ऐसेनि हें विश्र्व येथें । मीचि प्रसवलाना निरुतें ।

परि भावाचेनि हातें । माने जया ॥ १०३ ॥

१०३) याप्रमाणें हें दिसत असलेलें विश्व खरोखर माझ्यापासूनच ( मिर्माण ) झालें नाहीं काय ? परंतु हा सर्व माझाच विस्तार आहे, अशा दृष्टीनें जो पाहील, त्याला पटेल.   

मूळ श्र्लोक

एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः ।

सोऽविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः ॥ ७ ॥

७) हा माझा विस्तार ( विभूति ) व ( अभेद ) योग जो पूर्णपणें जाणतो, तो माझ्या अखंड अशा महा ( अभेद ) योगानें युक्त होतो, याविषयीं संदेह नाहीं. 

यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूति ।

आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्र्व ॥ १०४ ॥

१०४) अर्जुना, म्हणून वर सांगितलेले हे बुद्ध्यादिक भाव ह्या माझ्या विभूति आहेत, आणि ह्यांच्या योगानें हें सर्व जग व्यापून राहिलें आहे.

म्हणोनि गा यापरि । ब्रह्मादिपिपीलिकावरी ।

मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं ॥ १०५ ॥

१०५) म्हणून अर्जुना, याप्रमाणें ब्रह्मदेवापासून प्रारंभ करुन, शेवट मुंगीपर्यंत, माझ्यावांचून दुसरी गोष्टच नाहीं,  

ऐसें जाणे जो साचें । तया चेईरें जाहालें ज्ञानाचें ।

म्हणोनि उत्तममध्यम भेदाचें । दुःस्वप्न तया ॥ १०६ ॥

१०६) याप्रमाणें जो यथार्थ जाणतो, त्याला ज्ञानाची जागृति झाली आहे, म्हणून त्याला उत्तम व मध्यम या भेदांचे स्वप्न पडेल का ? ( नाहीं. )

मी माझिया विभूती । आणि विभूतीं व्यष्टलिया व्यक्ती ।

हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी ॥ १०७ ॥

१०७) मी आणि माझ्या विभूति व विभूतींनी व्यापलेलें प्राणी, हे सर्व एकच आहेत, असें ऐक्याच्या प्रतीतीने जो जाणतो;

म्हणोनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें ।

एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला ॥ १०८ ॥

१०८) म्हणून अशा या संशयरहित महायोगानें ( ऐक्य भावनेनें ) तो खरोखर कृतार्थ झाला.आहे, यांत शंका घेण्याचे कारण नाही.

कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी ।

तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज ॥ १०९ ॥

१०९) कारण की, अर्जुना, अशा अभेददृष्टीनें जो मला भजतो, त्याच्या भजनाच्या छंदात माझा प्रवेश आहे. 

म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु ।

करितां ठेला तरी  चांगु । ते सांगितलें षष्ठी ॥ ११० ॥

११०) म्हणून अभेद असा हा जो भक्तियोग, याच्याबद्दल काहीं एक शंका नसून यास खंडही नाही, शिवाय याचे आचरण करीत असतां त्यांत जरी थोडाबहुत व्यत्यय आला तरी त्यापासून चांगलेंच फल प्राप्त होतें हें तुला सहाव्या अध्यायांत सांगितलेच आहे.    

तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा ।

साद जाली तरी परियेसा । बोलिजेल ॥ १११ ॥

१११) तेंच माझें ऐक्य कसें आहे, हें समजण्याची मनांत इच्छा उत्पन्न होत असेल तर ऐक; तें मी सांगतों.

अहं सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते ।

इति मत्वा भजन्ते मां बुधा भावसमन्विताः ॥ ८ ॥

८) मी सर्वांचें आदिकारण आहें. माझ्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ति होते; असें जाणून प्रेमानें युक्त होऊन ज्ञानी माझी भक्ति करतात. 

तरी मीचि एक सर्वा । या जगा जन्म पांडवा ।

आणि मजचिपासून आघवा । निर्वाहो यांचा ॥ ११२ ॥

११२) तरी अर्जुना, सर्व जगाला मीच जन्म देणारा आहें आणि या सर्वांची स्थिति माझ्यापासून आहे.

कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा ।

आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥ ११३ ॥

११३) लाटांच्या अनेक परंपरांचा जन्म, अर्जुना, पाण्यांतच होतो व त्या लाटांना आश्रय पाणीच असते व त्यांचें असणें पाण्यावरच अवलंबून आहे.    

ऐसें आघवांचि ठायीं । तया जळचि जेविं पाहीं ।

तैसा मी वांचूनि नाहीं । विश्र्वी इये ॥ ११४ ॥

११४) याप्रमाणें पाहा, सर्व स्थितींत त्या लाटांना ज्याप्रमाणें एक पाणीच आहे, त्याप्रमाणें माझ्याशिवाय ह्या सर्व विश्वांत दुसरें असें कांहीं नाहीं.  

ऐसिया व्यापकामातें । मानूनि जे भजती भलतेथें ।

परि साचोकारें उदितें । प्रेमभावें ॥ ११५ ॥

११५) याप्रमाणें मी व्यापक आहें असें समजून, ते मला वाटेल तेथें भजतात, परंतु हें त्यांचें भजन खरोखरच्या निर्माण झालेला अशा प्रेमभावनेनें केलेलें असतें.     

देशकाळवर्तमान । आघवें मजसीं करुनि अभिन्न ।

जैसा वायु होऊनि गगन । गगनीचि विचरे ॥ ११६ ॥

११६) वारा जसा आकाशरुप होऊन आकाशांतच वावरतो, तसें देश काळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरुपाशीं एकरुप आहेत, असें समजून ते वागतात.

ऐसिनि जे निजज्ञानीं । खेळत सुखें त्रिभुवनीं ।

जगद्रूप मनीं । सांठवूनि मातें ॥ ११७ ॥

११७) अशा माझ्या ज्ञानानें युक्त असलेलें जे आत्मज्ञानी आहेत, ते, मी जो जगद्रूप, त्या मला अंतःकरणांत सांठवून त्रैलोक्यांत सुखानें क्रीडा, व्यवहार करीत असतात.   

जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।

हा भक्तियोगु निश्र्चित । जाण माझा ॥ ११८ ॥     

११८) जो जो प्राणी दिसेल, तो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे

 असें समजावें. हा माझा भक्तियोग आहे असें निश्र्चित

 समज.



Custom Search

No comments: