Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
बृहत् साम तथा साम्नां
गायत्री छन्दसामहम् ।
मासानां
मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥
३५) तसेंच ( चौदा
सामांमध्ये बृहत् साम मी आहें, मासांमधें मार्गशीर्ष मास मी आहें; ऋतुंमध्ये वसंत ऋतु मी आहे.
वेदराशीचिया सामा--। आंत
बृहत्साम जे प्रियोत्तमा ।
तें मी म्हणे रमा- - ।
प्राणेश्र्वरु ॥ २८१ ॥
२८१) अत्यंत आवडत्या
अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादि सामांमध्ये बृहत्साम, ही माझी विभूति आहे,
असें लक्ष्मीचा पति श्रीकृष्ण म्हणाला.
गायत्री छंद जें म्हणिजे ।
तें सकळां छंदांमाजि माझें ।
स्वरुप हें जाणिजे ।
निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥
२८२) ज्यास गायत्री छंद
असें म्हणतात, तो सर्व छंदामध्यें माझे स्वरुप आहे, असें तूं निःसंशय सनज.
मासांआंत मार्गशीरु । तो मी
म्हणे शार्ङ्गधरु ।
ऋतूंमाजीं कुसुमाकरु ।
वसंतु तो मी ॥ २८४ ॥
२८३) सर्व
महिन्यांमध्यें मार्गशीर्ष नांवाचा महिना, तो मी आहें, असें शार्ङ्गधर श्रीकृष्ण
म्हणाले. सहा ऋतूंमध्यें पुष्पांची खाण जो वसंत ऋतु तो मीच आहें.
मूळ श्लोक
द्यूतं छलयतामस्मि
तेजस्तेजस्विनामहम् ।
जयोऽस्मि व्यवसायोङस्मि
सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६ ॥
३६) छलन करणार्या
वस्तूंमध्यें द्यूत मी आहें, तेजस्वी पदार्थांमधील तेज मी आहें, सिद्धि मी आहें,
उद्योग मी आहें. सात्त्विक वस्तूंमध्यें सत्त्व मी आहें.
वृष्णीनां वासुदेवोऽस्मि
पाण्डवानां धनञ्जयः ।
मनीनामप्यहं व्यासः
कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥
३७) यादवांमध्यें
श्रीकृष्ण मी आहें. पाण्डवांमध्यें धनंजय मी आहें, मुनींमध्यें व्यास मुनी मी
आहें, कवींमध्यें शुक्राचार्य मी आहें.
छळितयां विंदाणा--। माजी
जूं तें मी विचक्षणा ।
म्हणोनि चोहटां चोरी परि
कवणा । निवारुं न ये ॥ २८४ ॥
२८४) हे चतुर अर्जुना, कपटकारक
कारस्थानांमध्यें जुगार ती माझी विभूति आहे;
म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते, तरी कोणास निवारण करतां येत
नाही.
अगा अशेषांही तेजसां—। आंत
तेज ते मी भरवंसा ।
विजयो मी कार्योद्देशां ।
सकळांमाजीं ॥ २८५ ॥
२८५) अर्जुना, एकूणएक
तेजस्वी पदार्थांमध्ये असणारें जें तेज; तें मी आहें, अशी खात्री असूं दे. मी सर्व
व्यवहारांतील उद्दिष्टांमध्यें विजय ( हातात घेतलेल्या कामांत येणारें यश )
आहे.
जेणें चोखळ दिसे न्याय । तो
व्यवसायांत व्यवसाय ।
माझेंचि स्वरुप हें राय ।
सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥
२८६) सर्व उद्योगांत
ज्या उद्योगानें शुद्ध न्याय दिसतो, ( म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाहीं ) तो माझेंच
स्वरुप आहे, असें सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले.
सत्त्वाथिलियांआंतु ।
सत्त्व मी म्हणे अनंतु ।
यादवमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी ॥ २८७ ॥
२८७)
सत्त्वगुणसंपन्नांमध्यें जें सत्त्व आहे, तें मी आहें, असें अनंत म्हणाला; आणि
यदुकुळांतील पुरुषंमध्ये ऐश्र्वर्यनवान जो कृष्ण तोच तो मी आहे.
जो देवकीवसुदेवास्तव जाहला
। कुमारीसाठीं गोकुळी गेला !
तो मी प्राणासकट पियाला ।
पूततेनें ॥ २८८ ॥
२८८) जो देवकी
वसुदेवांपासून जन्मास आलेला व जो योगमाया नांवाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली
गोकुळांत गेलेला त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचें तिच्या प्राणासह शोषण केले
नुघडतां बाळपणाची फुली ।
जेणें मियां अदानवी सृष्टि केली ।
करिं गिरि धरुनि उमाणिली
। महेंद्रमहिमा ॥ ८९ ॥
२८९) बाळपणची दशा
संपली नाहीं तोंच, ज्या मी दैत्यरहित सृष्टि केली आणि करांगुळीवर गोवर्धन पर्वत
धारण करुन इंद्राचा थोरपणा मोडून टाकला ( म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला )
कालिंदीचे हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ
राखिलें ।
वासरुवांसाठीं लाविलें ।
विरंचीस पिसें ॥ २९० ॥
२९०) यमुनेला
हृदयांत काट्याप्रमाणे सलणारा ( जो कालिया नाग ) त्याचा नाश केला. ज्या मीं दावाग्नीपासून
जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केलें व ब्रह्मदेवानें गायींवासरें व गोपाळ यांचें
हरण केलें असतांना त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ, गायीं, वासरें वगैर आपण बनून )
ब्रह्मदेवास वेड लावलें;
प्रथमदशेचिये पहांटे--।
माजी कंसाऐशीं अचाटें ।
महाधेंडीं अवचटें ।
लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥
२९१)
बाल्यावस्थेंच्या सुरवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली धेंडे अकस्मात सहज नाहींशी
केली.
हें काहय कितीएक
सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें ।
तरि यादवांमाजी जाणावें
। हेंचि स्वरुप माझें ॥ २९२ ॥
२९२) हें एक एक
वेगळें किती सांगणार ? हें सर्व तूंदेखील पाहिलेलें व ऐकलेलें आहेस. तर
यादवांमध्ये हेंच ( कृष्ण ) माझें स्वरुप आहे, असे समज.
आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां--।
माजीं अर्जुन तो मी जाणावा ।
म्हणोनि एकमेकांचिया
प्रेमभावा । विघडु न पडे ॥ २९३ ॥
२९३) आणि सोमवंशामधील
तुम्हां पांडवांमध्यें जो तूं अर्जुन, तो मी आहे, असें समज. म्हणून तुमच्या आमच्या
परस्रांमधील स्नेहसंबंधामध्ये बिघाड येत नाहीं.
संन्यासी तुवां होऊनि
जनीं । चोरुनि नेली माझी भगिनी ।
तर्ही विकल्प नुपजे
मनीं । मी तूं दोन्ही स्वरुप एक ॥ २९४ ॥
२९४) या लोकांमध्यें
तूं संन्यासी होऊन माझी बहीण चोरुन नेलीस, तर माझ्या मनांत कांहीं विकल्प उत्पन्न
झाला नाही; कारण मी व तूं दोघेहि एकरुप आहोंत.
मुनींआंत व्यासदेवो । तो
मी म्हणे यादवरावो ।
कवीश्र्वरांमाजीं धैर्या
रावो । उशनाचार्य मी ॥ २९५ ॥
२९५) सर्व मुनींमध्यें
जे व्यासदेव ती माझी विभूति आहे, असें यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले; मोठमोठाल्या
पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूति आहे.
मूळ श्लोक
दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि
जिगीषताम् ।
मौनं चैवास्मि गुह्यानां
ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८ ॥
३८) दमन करणारांचा (
दमनाला साधनीभूत ) दंड मी आहें, जयाची इच्छा करणारांचे नीतिशास्त्र मी आहें, (
सर्व ) गुह्य वस्तूंमध्यें मौन मी आहें, ज्ञानी माणसांचें ज्ञान मी आहें.
अगा दमितयांमाझारीं ।
अनिवार दंडु तो मी अवधारीं ।
जो मुंगियेलागोनि
ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥ २९६ ॥
२९६) अर्जुना, नियमन
करणार्यांमध्यें जें मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखें नियमन करतें,
तें अनिवार्य शासन, ही माझी विभूति आहे, असें समज.
पैं सारासार निर्धारितयां ।
धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां ।
सकळशास्त्रांमाजीं ययां ।
नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥
२९७) सारासार विचार
करणार्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणार्या सगळ्या शास्त्रांमध्ये नितिशास्त्र
तें मी आहे.
आघवियाची गूढां--। आंतु मौन
तें मी सुहाडा ।
म्हणोनि न बोलतयां पुढां ।
स्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥
२९८) हे राजा अर्जुना,
सर्व गुह्यांमध्यें मौन, तें मी आहें म्हणून न बोलणारांपुढें ब्रह्मदेवहि अज्ञानी
होतो.
अगा ज्ञानियांचां ठायीं ।
ज्ञान तें मी पाहीं ।
आतां असो हें ययां कांहीं ।
पार न देखों ॥ २९९ ॥
२९९) अर्जुना, ज्ञानवान
पुरुषाच्या ठिकाणी असणारे जें ज्ञान, ती माझी विभूति आहें, असें समज. आतां हें राहूं
दे. या विभूतिंचा कांहीं अंतच दिसत नाहीं.
No comments:
Post a Comment