Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
न तदस्ति विना यत् स्यान्
मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥
३९) हे अर्जुना, या
सर्व भूतांचे जें बीज तें मी आहें, स्थावरजंगम अशी कोणतीहि वस्तू नाहीं कीं, जी
माझ्यावांचून ( अस्तित्वात ) असूं शकेल.
नान्तोऽस्ति मम दिव्यानां
विभूतीनां परंतप ।
एष तूद्देशतः प्रोक्तो
विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥
४०) हे शत्रूतापना,
माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाहीं. हा विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ
सांगितला आहे.
पैं पर्जन्याचिया धारां ।
वरी लेख करवेल धनुर्धरा ।
कां पृथ्वीचिया तृणांकुरां
। होईल ठी ॥ ३०० ॥
३००) अर्जुना,
पावसाच्या धारांची गणाना करतां येईल काय ? अथवा पृथ्वीवर उगवणार्या गवताचे अंकुर
किती आहेत, याचा निश्चय करतां येईल काय ?
पैं महोदधीचिया तरंगां ।
व्यवस्था धरुं नये जेवीं गा ।
तेवीं माझिया विशेष लिंगां
। नाहीं मिती ॥ ३०१ ॥
३०१) अर्जुना,
महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणें ठेवता येणार नाहीं, त्याप्रमाणें माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाहीं.
ऐशियाही सातपांच प्रधाना ।
विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।
तो हा उद्देशु जो गा मना ।
आहाच गमला ॥ ३०२ ॥
३०२) माझ्या मुख्य
विभूतींना पार नाहीं असें जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरुन आम्हीं तुला
पंचाहत्तर मुख्य विभूति सांगितल्या; पण हें आमचें जें थोडक्यांत विभूति सांगणे, ते
अर्जुना, आमच्या मनाला वरवरचे वाटतें.
येरां विभूतिविस्तारांसि
कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं ।
म्हणौनि परिससीं तूं काई ।
आम्ही सांगों किती ॥ ३०३ ॥
३०३) बाकीच्या आमच्या
विभूतीविस्ताराला येथें मुळींच कांहीं मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व
तूं ऐकणार काय ?
यालागीं एकिहेळां तुज ।
दाऊं आतां वर्म निज ।
सर्वभूतांकुरें बीज ।
विरुढत असे तें मी ॥ ३०४ ॥
३०४) याकरितां आम्ही
आपलें वर्म आतां तुला एकदम सांगतों. तें असें की, सर्व प्राणिरुप अंकुरानें
वाढणारें जें बीज तें मी आहे.
म्हणोनि सानें थोर न
म्हणावें । उंच नीच भाव सांडावे ।
एक मीचि ऐसें मानावें ।
वस्तुजातातें ॥ ३०५ ॥
३०५) एवढ्याकरितां
लहानमोठें अशी निवड करुं नये. अधिकउणी अशी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व
जेवढ्या म्हणून वस्तू आहेत, त्या मीच एक आहे, असें समजावे.
तरी यावरी साधारण । आईक पां
आणिकही खुणा ।
तरी अर्जुना ते तूं जाण ।
विभूति माझी ॥ ३०६ ॥
३०६) अर्जुना,
यापेक्षांहि सर्वसामान्य आणखी एक खूण आहे. ती ऐक. त्यावरुन ती माझी विभूति आहे
असें तूं समज.
मूळ श्लोक
यद्यद्विभूतिमत्वत्त्वं
श्रीमदूर्जितमेव वा ।
तत्तदेवावगच्छ त्वं मम
तेजोंऽशसंभवम् ॥ ४१ ॥
४१) जी जी वस्तु
वैभवानें, संपत्तीनें अथवा उदारतेनें युक्त असेल, ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून
उत्पन्न झाली आहे, असें जाण.
जेथ जेथ संपत्ति आणि दया ।
दोन्ही वसती आलिया असती ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूती
माझी ॥ ३०७ ॥
३०७) अर्जुना, ज्या
ज्या ( पुरुषाच्या ) ठिकाणीं ऐश्वर्य आणि दया हीं दोन्ही राहावयास आलेलीं असतील,
तो तो पुरुष माझी विभूति आहे असे समज.
अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन
तवार्जुन ।
विष्टभ्याहमिदं
कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ॥ ४२ ॥
४२) अथवा हे अर्जुना,
हें ( प्रत्येक वस्तूचें ) वेगवेगळें ज्ञान तुला काय करावयाचें ? ( कारण असा तूं
मला कोठवर जाणशील ? तर थोडक्यांत सांगतों ) मी आपल्या एकाच अंशानें हें सर्व विश्व
व्यापून राहिलों आहें.
अथवा एकलें एक बिंब गगनीं ।
तरी प्रभा फांके त्रिभुवनीं ।
तेवीं एकाक्रियाची सकळ जनीं
। आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥
३०८) अथवा, सूर्यबिंब
जसें आकाशांत एकटें एकच असतें, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यांत पसरतो, त्याप्रमाणें
या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात.
तयांते एकलें झणी म्हण । ते
निर्धन या भाषा नेण ।
काय कामधेनूसवें सर्व साहान
। चालत असे ॥ ३०९ ॥
३०९) त्या पुरुषांना
तूं कदाचित एकटें असें म्हणशील, तर असें म्हणूं नकोस. ते निर्धन आहेत असें समजूं
नकोस. ( जरी त्यांच्याजवळ साधनें प्रत्यक्ष दिसली नाहींत; तरी ती त्यांच्या अंगभूत
आहेतच.) कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते कीं काय ?
तियेतें जें जेधवां जो मागे
। तें ते एकसरेंचि प्रसवों लागे ।
तेवीं विश्र्वविभव तया
अंगें । होऊनि आहाति ॥ ३१० ॥
३१०) तिच्याजवळ जो जें
जेव्हां मागेल, तें ती एकदम प्रसवूं लागते. त्याप्रमाणें विश्वांतील ऐश्वर्यें
त्यांच्या अंगभूत होऊन राहातात.
तयातें वोळखावया हेचि
संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।
ऐसें आथि ते जाण प्राज्ञा ।
अवतार माझे ॥ ३११ ॥
३११) त्यांना ओळखायची
खूण हीच कीं, त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिवान् अर्जुना, असे जे
आहेत, ते माझे अवतार समज.
आतां सामान्य विशेष । हें
जाणणें एथ महादोष ।
कां जे मीचि एक अशेष ।
विश्र्व आहे म्हणोनि ॥ ३१२ ॥
३१२) आतां हें संपूर्ण
विश्व मीच आहें म्हणून या विश्वांत एक साधारण व मुख्य, अशी निवड करणें म्हणजें
मोठे पाप आहे.
तरी आतां साधारण आणि चांगु
। ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु ।
वायां आपुलियेचि मती वंगु ।
भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥
३१३) तर आतां एक साधारण
व एक चांगला असा भेद कसा कल्पावा ? आपल्याच बुद्धीनें माझ्या ठिकाणीं भेदाचा कलंक
व्यर्थ कां लावावा ?
एर्हवी तरी तूप कासया
घुसळावें । अमृत का रांधूनि अर्धे करावें ।
हा गां वायूसि काय डावें--।
उजवें अंग आहे ॥ ३१४ ॥
३१४) नाहीं तर तूप
कशाला घुसळावयाचें ? अमृताला शिजवून काय अर्धे करावयाचें ? बाबा अर्जुना, वार्याला
उजवें डावें असें वेगवेगळें अंग आहे काय ?
पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं
। पाहतां नासेल आपुली दिठी ।
तेवीं माझां स्वरुपी गोठी ।
सामान्यविशेशाची नाहीं ॥ ३१५ ॥
३१५) सूर्यबिंबाला
पोटपाठ आहे का म्हणून पाहावयास गेलें तर, आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल;
त्याप्रमाणें माझ्या स्वरुपाच्या ठिकाणीं सामान्यविशेषाची नुसती गोष्टहि नाहीं.
आणि सिनाना विभूति । मज
अपारातें मविसील किती ।
म्हणोनि किंबहुना सुभद्रपती
। असो हें जाणणें ॥ ३१६ ॥
३१६) आणि निरनिराळ्या विभूतींद्वारां अमर्याद जो मी, त्या
मला किती मोजशील ? यास्तव अर्जुना, फार बोलून काय
करावयाचें आहे ? हा विभूति जाणण्याचा प्रकार राहूं दे.
No comments:
Post a Comment