Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
तेषामेवानुकम्पार्थंमहमज्ञानजं
तमः ।
नाशयाम्यात्मभावस्थो
ज्ञानदीपेन भास्वता ॥ ११ ॥
११) मी केवळ
त्यांच्यावर अनुग्रह करण्याकरितां त्यांच्या अंतःकरणांत राहून, प्रकाशमान अशा
ज्ञानरुपी दिव्यानें अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या ( त्यांच्या) मोहरुपी अंधकाराचा नाश करतों.
म्हणोनि मज आत्मयाचा भावो ।
जिहीं जियावया केला ठावो ।
एक मीवांचूनि वावो । येर
मानिलें जिहीं ॥ १४१ ॥
१४१) म्हणून मी जो
आत्मा, त्याविषयींची अखंड प्रेमवृत्ति, ज्यांनी आपल्या जगण्याला ठिकाण केले आहे;
ज्यांनी एका माझ्यावाचून बाकीचें सर्व फोलकट मानिलें आहे;
तयां तत्त्वज्ञां चोखटां ।
दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा ।
पुढां पुढां चालें ॥ १४२ ॥
१४२) अर्जुना, त्या
शुद्ध तत्त्वज्ञ प्रेमळ भक्तांच्यापुढें ( ज्ञानरुपी ) कापराची मशाल धरणारा मशाळजी
मीच होऊन त्यांच्या पुढें पुढें चालतो.
अज्ञानाचिये राती--। माजीं
तयाची मिळणी दाटती ।
ते नाशूनि घालीं परौती ।
करीं नित्योदयो ॥ १४३ ॥
१४३) अज्ञानाच्या
रात्रीमध्यें ( त्या भक्तांपुढें ) दाट काळोख येऊन मिळाला असतां, त्या अज्ञानरुपी
रात्रीचा नाश करुन तिला पलीकडे सारतों व ज्ञानाचा नित्य उदय करतों.
ऐसे प्रेमळाचेनि
प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें ।
तेथ अर्जुन मनोधर्में ।
निवालों म्हणतसे ॥ १४४ ॥
१४४) याप्रमाणें प्रेमळ
भक्तांना अतिशय प्रिय असणारा पुरुषोत्तम जेव्हां बोलला, तेव्हां अर्जुन म्हणाला, ‘
माझें मन शांत झालें.’
अहो जी अवधारा । भला केरु
फेडिला संसारा ।
जाहलों जननीजठरजोहरा-।
वेगळा प्रभू ॥ १४५ ॥
१४५) अहो, महाराज, ऐका.
( माझा ) जन्ममरणरुप कचरा तुम्हीं चांगला नाहीसा केला, यामुळें देवा, मी आईच्या
पोटांतील अग्निकुडापासून ( पोटात जन्म घेण्याच्या त्रासापासून ) मुक्त झालों.
जी जन्मलेपण आपुलें । हें
आजि मियां डोळां देखिलें ।
जीवित हाता चढलें । मज
आवडतसे ॥ १४६ ॥
१४६) महाराज, मी आपला
जन्म हा आज डोळ्यांनीं पाहिला. ( आत्मज्ञान होणें हा नवा जन्म आहे व तो माझा आज
झाला. ) त्यामुळें माझें जीवित माझ्या हातीं आलें, असें मला वाटतें.
आजि आयुष्या उजवण जाहली ।
माझिया दैवा दशा उदयली ।
जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि
मुखें ॥ १४७ ॥
१४७) आज माझ्या
आयुष्याची सफलता झाली व माझ्या दैवाला चांगले दिवस उगवले कारण की, देवाच्या
मुखानें उपदेशरुपी कृपा प्राप्त झाली.
आतां येणें वचनतेजाकारें ।
फिटलें आंतील बाहेरील आंधारें ।
म्हणोनि देखतसें साचोकारें
। स्वरुप तुझें ॥ १४८ ॥
१४८) आतां या तुझ्या
वाक्यरुपी प्रकाशानें आंतील अंधार ( स्वतःला आत्मरुप न समजतां जीवस्वरुप उमजणें,
हें अज्ञान ) हें सर्व नाहीसें झालें. म्हणून तुझें स्वरुप यथार्थपणें मी पाहात
आहें.
अर्जुन उवाच :-परं ब्रह्म
परं धाम पवित्रं परमं भवान् ।
पुरुषं शाश्वतं
दिव्यमादिदेवमजं विभुम् ॥ १२ ॥
१२) अर्जुन म्हणाला,
तूं परब्रह्म, महाभूतांचें श्रेष्ठ विश्रांतिस्थान व अत्यंत पवित्र आहेस.
अनादिसिद्ध व दिव्य असा ( प्रकृतिपलीकडील ) पुरुष, सर्व देवांनाहि दैवत असलेला
देव, जन्मरहित व सर्वव्यापी तूं आहेस.
तरी होसी गा तूं परब्रह्म ।
जें या महाभूतां विसंबतें धाम ।
पवित्र तूं परम । जगन्नाथा
॥ १४९ ॥
१४९) अर्जुन म्हणाला,
श्रीकृष्णा, या पंचमहाभूतांच्या विश्रांतीचें ठिकाण असलेलें जें सर्वांत श्रेष्ठ
ब्रह्म, तें तूं आहेस. हे जगन्नाथा, तूं अतिशय पवित्र आहेस.
तूं परम दैवत तिहीं देवां ।
तूं पुरुष जी पंचविसावा ।
दिव्य तूं प्रकृतीभावा- ।
पैलीकडील ॥ १५० ॥
१५०) देवा, तूं
ब्रह्मादि तिन्ही देवांचें श्रेष्ठ असें आराध्य दैवत आहेस. तूं चोवीस
तत्त्वांपलीकडील पंचविसावें तत्त्व आहेस. तूं अलौकिक तेजस्वी असून प्रकृतीनें
उत्पन्न केलेल्या पदार्थांपलीकडील आहेस.
अनादिसिद्ध तूं स्वामी । जो
नाकळिजसी जन्मधर्मीं ।
तो तूं हें आम्हीं ।
जाणितलें आतां ॥ १५१ ॥
१५१) हे नाथ, तूं
नित्यसिद्ध आहेस व जन्मादिक धर्मांचा अंमल तुझ्यावर चालत नाहीं, असा तूं आहेस; हें
आम्हांला आतां समजून आलें.
तूं या कालयंत्रासि सूत्री
। तूं जीवकळेची अधिष्ठात्री ।
तूं ब्रह्मकटाहधात्री । हें
कळलें फुडें ॥ १५२ ॥
१५२) तूं या काळरुपी
यंत्राचा सूत्रधार आहेस. तूं जीवितास आश्रयस्थान आहेस. तूं ब्रह्मांडरुपी कढईला
आधार आहेस. हें मला निश्चित समजलें.
मूळ श्लोक
आहुस्त्वामृषयः सर्वे
देवर्षिर्नारदस्त्था ।
असितो देवलो व्यासः स्वयं
चैव ब्रवीषि मे ॥ १३ ॥
१३) सर्व- ऋषि, देवर्षि
नारद, तसेंच असित, देवल आणि व्यास म्हणतात व तूं स्वतः देखील असेंच सांगतोस.
पैं आणिकही एके परी । इयेचि
प्रतीतीची येतसे थोरी ।
जे मागें ऐसेंचि
ऋषीश्र्वरीं । सांगितलें तूंतें ॥ १५३ ॥
१५३) आणखीहि एका
प्रकारानें याच अभवाचा थोरपणा कळून येतो. कारण कीं मागें मोठमोठ्या ऋषींना
याप्रमाणें तुझें वर्णन केलें होतें.
परि तया सांगितलियाचें
साचपण । हें आतां देखतसे अंतःकरण ।
जे कृपा केली आपण । म्हणोनि
देवा ॥ १५४ ॥
१५४) परंतु त्यांनी
सांगितलेल्याचा खरेपणा ( माझ्या ) मनाला हा आतां पटत आहे. कारण देवा, आपण कृपा
केली म्हणून हें होत आहे.
एर्हवीं नारदु अखंड जवळां
ये । तोही ऐसींचि वचनें गाये ।
परि अर्थ न बुजोनि ठायें ।
गीतसुखचि ऐकों ॥ १५५ ॥
१५५) एर्हवीं देव आणि
ऋषि असलेले नारद आमच्याकडे नेहमीं येत असत; आणि ते देखील अशाच अर्थाचीं गाणी
गातअसत; परंतु त्यांचे मर्म आम्हांला समजत नव्हतें आणि आम्ही ( नुसत्या )
गाण्याचाच आनंद अनुभवीत होतों.
हां गा आंधळ्यांचां गांवीं
। आपणपें प्रगटले रवी ।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी
। वांचूनि प्रकाशु कैंचा ॥ १५६ ॥
१५६) हे देवा,
आंधळ्यांच्या नांवामध्यें सूर्य स्वतः प्रकट झाला, तर त्याना त्याच्या उष्णतेचाच (
फक्त ) अनुभव येणार. त्याखेरीज सूर्याच्या प्रकाशाचा त्यांना अनुभव कोठला ?
येरवीं देवर्षिही अध्यात्म
गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता ।
तेचि फावे येर चित्ता ।
नलगेचि कांहीं ॥ १५७ ॥
१५७) एर्हवीं देवर्षि
नारदहि अध्यात्मपर गाणें गात असतांना त्यांच्या गाण्याच्या रागांत असणारी वरवरची
मधुरा तीच काय ती आमच्या अनुभवाला येत होती, त्या वांचून चित्ताला या गाण्यापैकीं
दुसरें कांहीं कळत नव्हतें.
पैं असितादेवलाचेनिही मुखें
। मी एवंविधा तूंतें आइकें ।
परि तैं बुद्धि विषयविखें ।
धारिली होती ॥ १५८ ॥
१५८) त्याचप्रमाणें
असित व देवल या ऋषींच्या तोंडूनसुद्धां तुझें स्वरुप ( असें आहे ) म्हणून मी ऐकलें.
परंतु त्या वेळेला माझी बुद्धि विषयरुप विषानें व्यापली होती.
विषयविषाचा पडिपाडू । गोड
परमार्थु लागे कडू ।
विषय तो गोडू । जीवासी
जाहला ॥ १५९ ॥
१५९) विषयरुप विषाचा
एवढा मोठा पराक्रम आहे कीं, वस्तुतः गोड असलेला जो परमार्थ, तो त्या विषयांच्या
योगाने कटु वाटुं लागतो व स्वाभाविक कटु असलेले शब्दादिक जे विषय, ते प्राण्यांना
गोड वाटतात.
आणि हें आणिकांचें काय
सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें ।
तुझें स्वरुप आघवें ।
सर्वदा सांगिजे ॥ १६० ॥
१६०) आणखी दुसर्यांचे
हें कशाला सांगू ? व्यासदेवांनी आपण स्वतः आमच्या राजवाड्यांत येऊन नेहमीं तुझ्या
संपूर्ण स्वरुपांचें वर्णन करावें;
परि तो अंधारीं चिंतामणि
देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला ।
पाठीं दिनोदयीं वोळखिला ।
होय म्हणोनि ॥ १६१ ॥
१६१) परंतु त्यांचा तो
उपदेश, म्हणजे अंधारांत पडलेल्या चिंतामणीसारखा होवा. परंतु तो चिंतामणि नाही, अशा
समजुतीनें जसें त्याविषयीं उदास राहावें व मागाहून दिवस उजाडल्यावर हा चिंतामणीच
आहे, म्हणून ओळखपटावी.
तैसीं व्यासादिकांचीं
बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्नांचिया खाणी ।
परि उपेक्षिल्या जात होतिया
तरणी । तुजवीण कृष्णा ॥ १६२ ॥
१६२) त्याप्रमाणें व्यासादिकांची भाषणें या माझ्यापाशीं
ज्ञानरुपी रत्नांच्या खाणी होत्या; परंतु कृष्णा, तूं जो सूर्य,
ज्या तुझ्या उदय न झाल्यामुळें त्यांचा अनादर केला
जात
होता.
No comments:
Post a Comment