सर्वमेतदृतं मन्ये यन्मां
वदसि केशव ।
न हि ते भगवन् व्यक्तिं
विदुर्देवा न दानवाः ॥ १४ ॥
१४) हे केशवा, हें जें
मला तूं सांगतोस, ते सर्व मी सत्य मानतों, हे भगवान्, देव अथवा दानव ( यांपैकीं
कोणीहि ) तुझें स्वरुप जाणत नाहींत.
ते आतां वाक्यसूर्यकर तुझे
फाकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले ।
तयां आघवयांचेंचि फिटलें ।
अनोळखपण ॥ १६३ ॥
१६३) आतां ती तुझी
वाक्यरुपी सूर्याची किरणें माझ्या हृदयावर येऊन पडली आणि मग पूर्वी ऋषींनी जे उपाय
सांगितले होते, त्या सर्वांचांच अपरिचितपणा नाहींसा झाला.
जी ज्ञानाचें बीज तयांचे
बोल । माझिये हृदयभूमिके पडिले सखोल ।
वरि इये कृपेची जाहाली वोल
। म्हणोनि संवादफळेंशीं उठले ॥ १६४ ॥
१६४) महाराज, त्यांचे
वाक्यरुपी ज्ञानबीज माझ्या हृदयरुपी खोल जमिनींत पेरलें गेलें व त्यावर या आपल्या
कृपेचा ओलावा झाला. म्हणून त्यास हें ( तुम्हां-आम्हांमधील संवादरुपी ) फल प्राप्त
झाले.
अहो नारदादिकां संतां ।
त्यांचिया युक्तिरूप सरिता ।
मी महोदधि जालां अनंता ।
संवादसुखाचा ॥ १६५ ॥
१६५) अहो देवा, नारदादि
संतांच्या युक्तिरुपी नखांना मी संवादरुपी सुखाचा समुद्र झालों.
प्रभु आघवेनि येणें जन्में
। जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें ।
तयांचीं न ठकतीचि अंगीं
कामें । सद्गुरु तुवां ॥ १६६ ॥
१६६) महाराज, या
जन्मासह पूर्वीच्या सर्व जन्मांत मी जीं उत्तम पुण्यें केली, त्यांच्याकडे माझी
कामगिरी शिल्लक राहिली नाहीं. कारण त्यांनी ( पुण्यांनी ) तुझ्या सारख्या योग्य
सद्गुरु जोडून दिला.
एर्हवीं वडिलवडिलांचेनि
मुखें । मी सदा तूंतें कानीं आइकें ।
परि कृपा न किजेचि तुवा
एकें । तंव नेणवेचि कांहीं ॥ १६७ ॥
१६७) एरवीं मी
वाडवडिलांच्या मुखानें तुझें वर्णन नेहमी कानानें ऐकत होतों; पण तुमची एकाची कृपा
झाली नव्हती, तेथपर्यंत मला कांहींच कळले नाही.
म्हणोनि भाग्य जैं सानकूळ ।
जालिया केले उद्यम सदां सफळ ।
तैसें श्रुताधीत सकळ ।
गुरुकृपा साच ॥ १६८ ॥
१६८) म्हणून ज्या वेळेला
दैव अतिशय अनुकूल असतें, त्या वेळेला हातांत घेतलेंले सर्व उद्योग नेहमीं फलद्रूप
होतात; त्याप्रमाणें गुरुंची कृपा झाली म्हणजे ऐकलेले व पडलेले सर्व ज्ञान आपलें
काम करतें.
जी बनकरु झाडेंसी
जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी ।
परि फळेंसीं तैंचि भेटी ।
जैं वसंतु पावे ॥ १६९ ॥
१६९) महाराज, माळी
झाडांविषयी जिवापाड मेहनत करुन जन्म काढतों; परंतु ज्या वेळेला वसंत ऋतु येतो,
त्याच वेळेला फळाची भेट होते.
अहो विषमा जैं वोहट पडे ।
तैं मधुर तें मधुर आवडे ।
पैं रसायनें तैं गोडे ।
जेव्हां आरोग्य देहीं ॥ १७० ॥
१७०) महाराज, ज्या
वेळेला विषयज्वराला उतारा पडतो, त्या वेळेला गोड असलेलें पदार्थ गोड लागूं लागतात
व त्या वेळेला देहांत आरोग्य प्राप्त होते, त्याच वेळेला घेतलेले भस्मादिक औषध
चांगले परिणामकारक आहे. असे ठरतें.
कां इंद्रियें वाचा प्राण ।
यां जालियांचें तैंचि सार्थकपण ।
जैं चैतन्य येउनि आपण ।
संचरे माजीं ॥ १७१ ॥
१७१) अथवा चैतन्य (
ज्या वेळेला जीव ) आपण होऊन शरीरांत स्वतः प्रवेश करतें, त्याच वेळेला इंद्रियें,
वाचा व प्राण ही सर्व असल्याचे सार्थक होते.
तैसें शब्दजात आलोडिलें ।
अथवा योगादिक जें अभ्यासिलें ।
तें तैंचि म्हणों ये आपुलें
। जैं सानकूळ गुरु ॥ १७२ ॥
१७२) त्याप्रमाणें
अध्ययन केलेलीं सर्व शास्त्रें किंवा अभ्यास केलेलीं योगादिक साधनें, ज्या वेळेला
आपलीं आहेत, असें म्हणतां येतें.
ऐसिये जालिये प्रतीतीचेनि
माजें । अर्जुन निश्र्चयाचीं नाचतुसे भोजें ।
तेवींचि म्हणे देवा तुझें ।
वाक्य मज मानलें ॥ १७३ ॥
१७३) भगवंतांचें खरें
स्वरुप कळण्याच्या अशा अनुभवमदांत निश्चयाच्या संतोषानें नाचत असतां अर्जुन
म्हणाला, देवा, आपलें बोलणें मला पटलें.
तरि साचचि हे कैवल्यपती ।
मज त्रिशुद्धी आली प्रतीती ।
जे तूं देवदानवांचिये मती-
। जोगा नव्हसी ॥ १७४ ॥
१७४) हे मोक्षाच्या
मालका श्रीकृष्णा, खरोखर मला निश्चयानें हा अनुभव आलेला आहे कीं, तू देव अथवा
दैत्य, यांच्या बुद्धींना आकळण्यासारखा नाहींस.
तुझें वाक्य व्यक्ती न
येतां देवा । आपुलिया जाणे जाणिवा ।
तैंसा कहींचि नाहीं हे
सद्भावा । भरवसेंनि आलें ॥ १७५ ॥
१७५) देवा, तुझा उपदेश
होण्याच्या अगोदरच आपल्या शहाणपणानें तुझे ज्ञान करुन घेतों, असें कोणी म्हणेल तर
असा जीव बुद्धीच्या सामर्थ्यावर समजला जाण्याजोगा तूं केंव्हांच नाहीस, हें (
माझ्या मनाला ) आतां खात्रीपूर्वक पटलें.
मूळ श्लोक
स्वयमेवात्मनात्मात्मानं
वेत्थ त्वं पुरुषोत्तम ।
भूतभावन भूतेश देवदेव
जगत्पते ॥ १५ ॥
१५) हें पुरुषोत्तमा,
भूतभावना, भूतनाथा, देवाधिदेवा, जगन्नायका, तूं स्वतःच स्वतःला यथार्थ स्वरुपानें
जाणतोस.
एथ आपुलें वाडपण जैसें ।
आपणचि जाणिजे आकाशें ।
का मी येतुली धनवट ऐसें ।
पृथ्वीचि जाणे ॥ १७६ ॥
१७६) ज्याप्रमाणें आपला
विस्तार किती आहे, हें आकाशाचें आकाशालाच माहीत; अथवा मी इतकी भरीव आहे, हें
प्रमाण पृथ्वीचें पृथ्वीला माहीत,
तैसा आपुलिये सर्वशक्ती ।
तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती ।
येर वेदादिक मती । मिरवती
वायां ॥ १७७ ॥
१७७) त्याप्रमाणें
आपल्या सर्व सामर्थ्यानें, हे लक्ष्मीपति देवा, तूंच जाणणारा आहेस. बाकी देवादिक
जे इतर आहेत, त्यांच्या मति ( आम्ही देवाच्या स्वरुपाला जाणतों ) अशी व्यर्थ बढाई
मारतात.
हां गा मनातें मागां
सांडावें । पवनातें वावीं मवावें ।
आदिशून्य उतरोनि जावें ।
केउतें बाहीं ॥ १७८ ॥
१७८) अहो, सर्वांत चपल
असलेल्या मनालाहि ( शर्यतीत ) कसें मागें
टाकाता येईल ? वारा हातानें कसा मोजतां येईल ? मायेंतून आपल्या बाहूंच्या जोरावर
कसें पार पाडतां येईल ? .
तैसें हें जाणणें आहे ।
म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे ।
आतां तुझें ज्ञान होये ।
तुजचिजोगें ॥ १७९ ॥
१७९) ( हें जसें
असंभाव्य, ) त्याप्रमाणें तुझें ज्ञान करुन घेण्याचीहि गोष्ट असंभवनीय आहे आणि
म्हणूनच तुझें ज्ञान कोणालाहि होत नाही; एवढ्याकरितां तुझ्या स्वरुपाचें ज्ञान
करुन घेण्यानें काम तुलाच फक्त शक्य आहे.
जी आपणपयातें तूंचि जाणसी ।
आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी ।
तरि आतां एक वेळ घाम पुसीं
। आतींचिये निडळींचा ॥ १८० ॥
१८०) अरे देवा, तूं
आपल्या स्वरुपाला तूंच जाणतोस; आणि तें ज्ञान दुसर्यास सांगण्यास देखील तूंच
समर्थ आहेस. तर आता एक केवळ माझ्या इच्छारुपी कपाळावरचा घाम पुसून टाक.
हें आइकिलें कीं भूतभावना ।
त्रिभुवनगजपंचानना ।
सकलदेवदेवतार्चना ।
जगन्नायका ॥ १८१ ॥
१८१) हे प्राणीमात्राची
उत्पत्ति करणार्या, त्रिभुवन हत्तीचा नाश करणार्या सिंहा, सर्व देव व देवता
यांना पूज्य असणार्या, हे जगाच्या स्वामी, श्रीकृष्णा, हें ऐंकलेस कां ?
जरी थोरी तुझी पाहत आहों ।
तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों ।
या शोच्यता विनवूं बिहों ।
तरी आन उपायो नाहीं ॥ १८२ ॥
१८२) जर तुझ्या
स्वरुपाची थोरवी पाहूं गेलो तर आम्ही तुझ्याजवळ राहण्यालादेखील योग्य नाहीं; अशी
शोचनीय स्थिती आहे. म्हणून ( जर ) आम्ही तुला विनंति करण्यास भ्यालों, तर तुझें
स्वरुप जाणण्यास दुसरा उपाय उरला नाहीं.
भरले सरिता समुद्र चहूंकडे
। परि ते बापियासि कोरडे ।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे
। तें पाणी कीं तया ॥ १८३ ॥
१८३) जिकडे तिकडे सर्व
बाजूंना नद्या व समुद्र तुडुंब भरलेले असले, तरी चातकाला ते कोरडे ठणठणीत
असल्यासारखे आहेत. कारण ज्या वेळेला खास मेघांतून थेंब पडतील, त्या वेळेलाच त्याला
पाणी मिळणार.
तैसें गुरु जी सर्वत्र आयी
। परि कृष्णा आम्हां तूंचि गती ।
हें असो मजप्रती । विभूती
सांगें ॥ १८४ ॥
१८४) त्याप्रमाणें
देवा, गुरु खरोखर आहेत; परंतु कृष्णा, आम्हांला तूंच एक आश्रयाचें ठिकाण आहेस. हें
राहूं दे ! मला विभूति सांग.
वक्तुमर्हस्यशेषेण दिव्या
ह्यात्मविभूतयः ।
याभिर्विभूतिभिर्लोकनिमांस्त्वं
व्याप्य तिष्ठसि ॥ १६ ॥
१६) म्हणून ज्या
विभूतींनीं या सर्व लोकांना व्यापून तूं आहेस, अशा आपल्या दिव्य विभूति
पूर्णत्वानें मला सांगण्यास तूंच योग्य आहेस.
जी तुझिया विभूती आघविया ।
परि व्यापिती या शक्ती दिव्या जिया ।
तिया आपुलिया दावाविया ।
आपण मज ॥ १८५ ॥
१८५) महाराज, सर्व
विभूति आपल्याच आहेत; परंतु दिव्य शक्तीनें व्याप्त असलेल्या अशा ज्या आपल्या
विभूति आहेत, त्या आपण मला दाखवाव्या.
जिहीं विभूतीं ययां समस्तां
। लोकांतें व्यापूनि आहाती अनंता ॥
तिया प्रधाना नामांकिता ।
प्रगटा करीं ॥ १८६ ॥
१८६) कृष्णा, ज्या
विभूतींनीं सर्व लोकांस व्यापून टाकलेलें आहे, त्या मुख्य मुख्य व नामांकित विभूति
आपण सांगाव्या.
कथं विद्यामहं योगिस्त्वां
सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु
चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १७ ॥
१७) हे योगिन् सर्वथा
तुझें चिंतन करण्याची इच्छा करणारा जो मी, त्या मी तुला कसें जाणावें ? हे भगवन्
कोणकोणत्या भावांमध्यें ( विभूतींमध्ये ) मीं तुझें चिंतन करणें शक्य आहे ?
जी कैसें मियां तूंतें
जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें ।
जरी तूंचि म्हणों आघवें ।
तरि चिंतनचि न घडे ॥ १८७ ॥
१८७) कृष्णा, तुला मी
जाणावें कसें ? व काय म्हणून नेहमीं चिंतन करावें ? कारण तूंच सर्व आहेस, असें जर
म्हटलें, तर चिंतनच घडणार नाहीं.
म्हणोनि मागां भाव जैसे ।
आपुले सांगितले तुवां उद्देशें ।
आतां विस्तारोनि तैसे । एक
वेळ बोलें ॥ १८८ ॥
१८८) म्हणून मागें (
सातव्या व नवव्या अध्यायांत व या अध्यायाच्या आरंभीं ) ज्या आपल्या विभूति तूं
थोडक्यांत सांगितल्यास; त्याचा आतां एक वेळ विस्तारानें सांग.
जयां जयां भावांचा ठायीं ।
तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं ।
तो विवळ करुनि देईं । योगु
आपुला ॥ १८९ ॥
१८९) ज्या ज्या
विभूतींच्या ठिकाणीं तुझें स्मरण होण्याला मला अडचण पडणार नाहीं, तो आपला
विभूतियोग तूं मला स्पष्ट करुन दाखव.
No comments:
Post a Comment