Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
सर्गाणामादिरन्तश्च मध्यं
चैवाहमर्जुन ।
अध्यात्मविद्या विद्यानां
वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥
३२) हे अर्जुना, सर्व
सृष्ट वस्तूंचा आदि, अंत तसाच मध्य मीआहें, विद्यांमध्यें अध्यात्मविद्या मी आहें
आणि वादविवाद करणारांचा वाद मी आहें.
अक्षराणामकारोऽस्मि
द्वन्द्वः सामासिकास्य च ।
अहमेवाक्षयः कालौ
धाताऽहंविश्वतोमुखः ॥ ३३ ॥
३३) अक्षरांमध्यें अकार मी आहें; आणि समासांमध्यें द्वंद्वसमास मी आहें. क्षयरहित काल मी आहें. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहें.
जैसीं अवघींचि नक्षत्रें
वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जें जीवीं ।
तैं गगनाची बांधावी । लोथ
जेवीं ॥ २५९ ॥
२५९) आकाशांतील एकूणएक
नक्षत्रें टिपून घ्यावींत, अशी ज्या वेळेला अंतःकरणांत इच्छा उत्पन्न होईल, त्या
वेळेला आकाशाचेंच गाठोडें बांधणें ज्याप्रमाणें बरें;
कां पृथ्वीये परमाणूंचा
उगाणा घ्यावा । तरि भूगोलचि काखे सुवावा ।
तैसा विस्तारु माझा पहावा ।
तरि जाणावें मातें ॥ २६० ॥
२६०) किंवा पृथ्वीच्या परमाणुंची मोजदाद करावी, अशी
जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी,
त्याप्रमाणे माझी व्याप्ति जर पाहावयाची असेल तर,
माझेंच ज्ञान करुन घ्यावें.
जैसें शाखांसी फूल फळ ।
एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ ।
तरि उघडुनियां मूळ । जेवीं
हातीं घेपे ॥ २६१ ॥
२६१) फांद्यासकट फुलें
व फळें ही सर्व एका वेळेंतच हस्तगत व्हावीं, असें जर मनांत असेल, तर जसें त्या
झाडाचे एक मूळ उपटून हातात घेतले पाहिजे;
तेवीं माझें विभूतिविशेष ।
जरी जाणों पाहिजेती अशेष ।
तरी स्वरुप एक निर्दोष ।
जाणिजे माझें ॥ २६२ ॥
२६२) त्याप्रमाणें
माझ्या मुख्य मुख्य विभूति जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल, तर एकच माझेंच दोषरहित
स्वरुप जाणावें.
एर्हवीं वेगळालिया विभूती
। कायिएक परिससी किती ।
म्हणोनि एकिहेळां महामती ।
सर्व मी जाण ॥ २६३ ॥
२६३) एर्हवीं
वेगवेगळ्या विभूति तूं किती ऐकणार ? म्हणून बुद्धिमान् अर्जुना, एकदाच समज कीं, हे
सर्व मी आहें.
मी आघवियेची सृष्टी ।
आदिमध्यांती किरीटी ।
ओतप्रोत पटीं । तंतु जेवी ॥
२६४ ॥
२६४) ज्याप्रमाणें
वस्त्रांमध्ये आडवें उभें एक सुतच भरलेलें असतें, त्याप्रमाणें या सर्व जगाच्या
प्रारंभी, मध्यें आणि शेवटी, मीच सर्व भरलेला आहे.
ऐसिया व्यापका मातें जैं
जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें ।
परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥ २६५ ॥
२६५) अशा सर्वव्यापक असलेल्या मला जाणले असतां मग
वेगवेगळ्या विभूति सांगून काय करावयाच्या आहेत ?. परंतु, एवढी तुझी योग्यता नाही
म्हणून हे असूं दे.
कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती ।
तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥
२६६) किंवा ज्या अर्थी तूं विभूति विचारल्यास त्या अर्थी अर्जुना,
मी सांगत आहें, त्या तूं ऐक. तर आतां प्रस्तुत, सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या
आहे, ती माझी विभूति आहे.
अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं ।
जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥ २६७ ॥
२६७) अरे बाबा ! सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधींच न
संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद, तो मी आहें असे समज.
जो निर्वंचूं जातां वाढे । आइकिलियां उत्प्रेक्षे सळु चढे ।
जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होती ॥ २६८ ॥
२६८) वादांतील विषयाचा निश्र्चय करुं लागलें असतां, तो वाद
वाढतो व जो ऐकला असतां तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणारांची गोड भाषणें (
मात्र ) होतात, ( पण निर्णय काहींच लागत नाहीं. )
ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु ।
अक्षरांआंतु विशदु । अकारु तो मी ॥ २६९ ॥
२६९) याप्रमाणें प्रतिपादनामध्यें जो वाद चालतों, ती माझी
विभूति आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्यें स्पष्ट असें ‘ अ ‘ हें
अक्षर, ती माझी विभूति आहे.
पैं गा समासांमाझारीं । द्वन्द्व तो मी अवधारीं ।
मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥ २७० ॥
२७०) अर्जुना, सर्व समासांमध्ये द्वंद्व नांवाचा समास, ती
माझी विभूति आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल, तो
मी आहे.
मेरुमंदारादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी ।
जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ॥ २७१ ॥
२७१) मेरु, मंदार इत्यादि सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो
विरवितो, जो जलरुप झालेल्या जगालाहि जेथल्या तेथेंच आटून टाकतो;
जो प्रळयतेजा देत मिठी । सगळियां पवनातें गिळी किरीटी ।
आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥ २७२ ॥
२७२) जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून अर्जुना, संपूर्ण वार्याला
गिळून टाकतो आणि हे राहिलेलें आकाशदेखील ज्याच्या पोटांत मावतें;
ऐसा अपार जो कालु । तो मी लक्ष्मीलीळु ।
मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥ २७३ ॥
याप्रमाणें अमर्याद जो काळ ती माझी विभूति आहे, असें
लक्ष्मीशीं लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हां सृष्टीचा जमाव
उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव माझी विभूति आहे.
मूळ श्लोक
मृत्युः
सर्वहरश्र्चाहमुद्भवश्र्च भविष्यताम् ।
कीर्तिः श्रीर्वाक्च
नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥
३४) सर्वांचा संहार करणारा मृत्यु मी आहें. ( पुन्हां
कल्पान्तीं ) उत्पत्ति पावणार्या प्राण्यांना उत्पन्न करणारा
मी आहें. स्त्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ति, संपत्ति, वाणी,
स्मृति, बुद्धि, धृति आणि क्षमा ( या सात ) मी आहें.
आणि सृजिलिया भूतांतें मीचि
घरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं ।
शेखीं सर्वांतें या संहारीं
। तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥
२७४) आणि उत्पन्न
झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहें.
आतां स्त्रीगणांचां पैकीं ।
माझिया विभूती सात आणिकी ।
तिया ऐक कवतिकीं ।
सांगिजतील ॥ २७५ ॥
२७५) आता आणखी माझ्या
सात विभूति स्त्रीवर्गांपैकीं आहेत. त्याहि सहजच सांगितल्या जातील, तूं ऐक.
तरी नीच नवी जे कीर्ति ।
अर्जुना ते माझी मूर्ती ।
आणि औदार्येंसी जे संपत्ती
। तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥
२७६) तरी नेहमी
भरभाटींत असलेली जी कीर्ति, अर्जुना, ती माझी विभूति आहे आणि औदार्याची जोड असलेली
जी संपत्ति, ती देखिल माझी विभूति आहे, असें समज.
आणि ते गा मी वाचा । जे
सुखासनीं न्यायाचां ।
आरुढोनि विवकाचां । मार्गीं
चाले ॥ २७७ ॥
२७७) आणि जी वाचा
न्यायाच्या सुहासनावर बसून विवेकाच्या वाटेनें चालते, ती वाचा मी आहें.
देखिलेनि पदार्थें । जे
आठवूनि दे मातें ।
ते स्मृतिही पैं एथें ।
त्रिशुद्धि मी ॥ २७८ ॥
२७८) पदार्थ
पाहिल्याबरोबर माझी आठवण करुन देणारी अशी जी स्मृति, ती निश्र्चयेंकरुन येथें मी
आहें.
पैं स्वहिता अनुजायिनी ।
मेधा ते गा मी इये जनीं ।
धृती मी त्रिभुवनीं । क्षमा
ते मी ॥ २७९ ॥
२७९) स्वहिताला अनुकूल
अशी जी बुद्धि, ती या लोकांमध्ये मी आहें व त्रैलोक्यांत धैर्य व क्षमा मी आहे.
एवं नारींमाझारीं । या
सातही शक्ति मीचि अवधारीं ।
ऐसें संसारगजकेसरी । म्हणता
जाहला ॥ २८० ॥
२८०) याप्रमाणें स्त्रीवर्गामध्यें या सातहि शक्ति मीच आहें,
असें समज; संसाररुपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरुपी
सिंह म्हणाला.
No comments:
Post a Comment