Shri Dnyaneshwari
मूळ श्लोक
अश्वत्थः सर्ववृक्षाणां
देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां
कपिलो मुनिः ॥ २६ ॥
२६) सर्व वृक्षांमध्यें
पिंपळ वृक्ष, देवऋषींमध्यें नारद, गंधर्वांमध्यें चित्ररथ, सिद्धांमध्यें कपिल
महामुनि ( मी आहें )
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि
माममृतोद्भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां
च नराधिपम् ॥ २७ ॥
अश्वांमध्यें
अमृतप्राप्त्यर्थ केलेल्या मंथनापासून उत्पन्न झालेला उच्चैःश्रवा मी आहें,
गजेंद्रांमध्यें ऐरावत मी आहें, आणि नरांमध्यें राजा मी आहें, असें जाण.
कल्पद्रुम हन पारिजातु ।
गुणें चंदनुही वाड विख्यातु ।
तरि ययां वृक्षजातां आंतु ।
अश्र्वत्थु तो मी ॥ २३५ ॥
२३५) कल्पवृक्ष,
पारिजातक वृक्ष आणि गुणांनीं अतिशय प्रसिद्ध असलेला चंदन; हे जरी श्रेष्ठ वृक्ष
आहेत, तरी या सर्व वृक्षांमध्यें जो पिंपळ, ती माझी विभूति आहे.
देवऋषी आंतु पांडवा । नारदु
तो मी जाणावा ।
चित्ररथु मी गंधर्वां ।
सकळिकांमाजीं ॥ २३६ ॥
२३६) अर्जुना,
देवर्षींमध्यें जो नारद, तो माझी विभूति आहे, असे समज आणि सर्व गंधर्वांमध्यें
चित्ररथ नावाचा गंधर्व, माझी विभूति आहे.
ययां अशेपांही सिद्धां--।
माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा ।
तुरंगजातां प्रसिद्धां--।
आंत उच्चैक्षवा मी ॥ २३७ ॥
२३७) हे बुद्धिमान्
अर्जुना,या संपूर्णहि सिद्धांमध्यें कपिलाचार्य ही माझी विभूति आहे, प्रसिद्ध
असलेल्या सर्व घोड्यांमध्यें ( चौदा रत्नांतील एक ) जो उच्चैःश्रवा नांवाचा घोडा,
ती माझी विभूति आहे.
राजभूषण गजांआंतु । अर्जुना
मी गा ऐरावतु ।
पयोराशी सुरमथितु ।
अमृतांशु तो मी ॥ २३८ ॥
२३७) अर्जुना,
राज्याचें भूषण असलेल्या हत्तींमध्यें ऐरावत ही माझी विभूति आहे. तो देवांनीं मंथन
केलेल्या क्षीरसमुद्रांतून अमृताबरोबर निघाला.
ययां नरांमाजीं राजा । तो
विभूतिविशेष माझा ।
जयातें सकळ प्रजा । होऊनि
सेविती ॥ २३९ ॥
२३९) ज्याला सर्व लोक
आपण प्रजा होऊन करभार देतात, असा जो या सर्व मनुष्यांमध्यें राजा आहे, तो माझी
महत्त्वाची विभूति आहे.
मूळ श्लोक
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि
कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः
सर्पाणामस्मि वासुकिः ॥ २८ ॥
२८) आयुधांमध्यें वज्र मी आहें, धेनूंमध्यें कमधेनु मी
आहें, प्रजोत्पत्तीला कारण जो काम तो मी आहें, सर्पांमध्यें वासुकि मी आहें,
अनन्तश्चास्मि नागानां
वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः
संयमतामहम् ॥ २९॥
२९) नागांमध्यें अनंत
मी आहें, जलदेवतांमध्यें वरुण मी आहें, पितरांमध्यें अर्यमा मी आहें, नियमन
करणारांमध्यें यम मी आहें.
पैं आघवेयां हातियेरां--।
आंत वज्र तें मी धनुर्धरा ।
जें शतमखोत्तीर्णकरा ।
आरुढोनि असे ॥ २४० ॥
२४०) अर्जुना, सर्व
हत्यारांमध्ये, जे शंभर यज्ञ पार पाडलेल्या इंद्राच्या हातांत असतें, ते वज्र माझी
विभूति आहे.
धेनुमध्यें कामधेनु । ते मी
म्हणे विष्वक्सेनु ।
जन्मवितयां आंतमदनु । तो मी
जाणें ॥ २४१ ॥
२४१) सर्व गायींमध्यें
स्वर्गातील कामधेनू ही माझी विभूति आहे, असें श्रीकृष्ण म्हणाला. जन्म देवविणार्यांमध्यें
काम तो मी आहें, असे समज.
सर्पकुळाआंतु अधिष्ठाता ।
वासुकी गा मी कुंतीसुता ।
नागांमाजी समस्तां । अनंतु
तो मी ॥ २४२ ॥
२४२) सापांच्या
कुळांमध्यें मुख्य असलेला जो वासुकि नांवाचा साप, तो अर्जुना, माझी विभूति आहे.
सर्व नागांमध्यें अनंत नावाचा नाग, ती माझी विभूति आहे.
अगा यादसांआंतु । जो
पश्र्चिमप्रमदेचा कांतु ।
तो वरुण मी हें अनंतु ।
सांगत असे ॥ २४३ ॥
२४३) अगा अर्जुना,
जलचरांमध्यें पश्र्चिम दिशारुप तरुण स्त्रीचा स्वामी जो वरुण, तो मी आहें; असें
अनंत सांगतात,
आणि पितृगणां समस्तां--।
माजीं अर्यमा जो पितृदेवता ।
तो मी हें तत्त्वतां । बोलत
आहें ॥ २४४ ॥
२४४) आणि सर्व
पितरांच्या समुदायांमध्यें अर्यमा नांवाची पितृदेवता आहे, ती माझी विभूति आहे. हें
मी खरें खरें सांगत आहे.
जगाचीं शुभाशुभें लिहिती ।
प्राणियांचीया मानसाचा झाडा घेती ।
मग केलियानुरुप होती ।
भोगनियम जे ॥ २४५ ॥
२४५) जगाची शुभाशुभें (
पुण्यपापें ) जें लिहितात, प्राण्यांच्या मनाचा जे झाडा घेतात, मग जशीं कर्में
केली असतील त्याला अनुरुप जे भोगाचे नियंते होतात, ( कर्मानुरुप सुखदुःखाचा जे भोग
देतात, )
तयां नियमितयांमाजीं यमु ।
जो कर्मसाक्षी धर्मु ।
तो मी म्हणे रामु । रमापती
॥ २४६ ॥
२४६) त्या
निग्रहानुग्रह करणारांमध्यें सर्व कर्मांचा साक्षी जो यमधर्म तो मी आहें, असें
लक्ष्मीपति आत्माराम म्हणाले.
मूळ श्लोक
प्रल्हाद्चास्मि दैत्यानां
कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं
वैनतेयश्च पक्षिणाम् ॥ ३० ॥
३०) आणि दैत्यांमध्यें
प्रल्हाद मी आहे, हरण करणार्यांत काल मी आहें, पशूंमध्यें सिंह मी आहें,
पक्ष्यांमध्यें गरुड मी आहें.
अगा दैत्यांचियां कुळीं ।
प्रल्हादु तो मी न्याहाळीं ।
म्हणोनि दैत्यभावादिमेळीं ।
लिंपेचिना ॥ २४७ ॥
२४७) अरे, राक्षसांच्या
कुळांमध्ये जो प्रल्हाद आहे, तो माझी विभूति होय, असें समज आणि म्हणूनच तो आसुरी
स्वभावादिकांच्या संसर्गानें लिप्त झाला नाहीं.
पैं कळितयांमाजीं महाकाळु ।
तो मी म्हणे गोपाळु ।
श्र्वापदांआंतु शार्दुळु ।
तो मी जाण ॥ २४८ ॥
२४८) ग्रासणार्यांमध्यें
महाकाळ, ती माझी विभूति आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले, आणि हिंस्र पशूंमध्ये जो
सिंह, ती माझी विभूति आहे, असे समज.
पक्षिजातीमाझारीं । गरुड तो
मी अवधारीं ।
यालागीं जो पाठीवरी । वाहों
शके मातें ॥ २४९ ॥
२४९) अर्जुना, ऐक सर्व
पक्ष्यांमध्यें गरुड ही माझी विभूति आहे आणि म्हणूनच तो आपल्या पाठीवर मला धारण
करुं शकतो.
मूळ श्लोक
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभूतामहम् ।
मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जाह्नवी ॥ ३१ ॥
३१) वेगवान् वस्तूंमध्यें वायु मी आहें. शस्त्रधार्यांमध्यें
राम मी आहें. मत्स्यांमध्यें मकर मी आहें, नद्यांत भागीरथी नदी मी आहें.
पृथ्वीचिया पैसारा--। माजीं घडी न लगतां धनुर्धरा ।
एकेंचि उड्डाणें सातांही सागरां । प्रदक्षिणा करी जो ॥ २५० ॥
२५०) पृथ्वीच्या विस्तारामध्यें एक क्षण देखील लावतां
अर्जुना, एका उडीसरशी पृथ्वीच्या विस्तारातील सातही समुद्रांना जो प्रदक्षिणा
करतो,
तयां वहिलियां गतिमंतां--। आंतु पवनु तो मी पांडुसुता ।
शस्त्रधरां समस्तां- -। माजीं श्रीराम तो मी ॥ २५१ ॥
२५१) ( असे जे आहेत ) त्या अत्यंत वेग असलेल्यांमध्ये जो
वारा आहे, अर्जुना, तो माझी विभूति आहे. सर्व शस्त्रधार्यांमध्यें जो श्रीराम, तो
माझी विभूति आहे.
जेणें सांकडलिया धर्माचेनि कैवारें । आपणपयां धनुष्य करुनि दुसरें ।
विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं ॥ २५२ ॥
२५२) ज्या रामचंद्रानें संकटांत पडलेल्या धर्माच्या कैवार
घेऊन, आपल्यास काय तें दुसरे धनुष्यच मदतीला घेऊन त्रेतायुगांत विजयरुप लक्ष्मीस
आपलया एकाकडेच वळविले.
पाठीं उ भें ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्र्वराचीं सिसाळीं ।
गगनीं उदो म्हणतया हस्तबळी । दिधलीं भूतां ॥ २५३ ॥
२५३) नंतर ज्या रामचंद्राने सुवेळ पर्वताच्या माथ्यावर उभे
राहून, प्रतापवान असा जो लंकेचा राजा रावण, त्याची मस्तकें आकाशात ‘ उदो उदो ‘ जी
पिशाच्चे त्यांचे हातात बळी म्हणून दिली.
जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्वार केला ।
सूर्यवंशी उदेला । सूर्य जो कां ॥ २५४ ॥
२५४) ज्या रामचंद्रानें देवांचा गेलेला मान शोधून काढला व
धर्माचा जीर्णोद्धार केला, सूर्यवंशांत जो प्रतिसूर्यच उदयास आला,
तो हतियेरुपरजितयांआंतु । रामचंद्र मी जानकीकांतु ।
मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं ॥ २५५ ॥
२५५) असा जो जानकीनाथ रामचंद्र, तो शस्त्र धारण करणार्यांमध्यें
माझी विभूति आहे. जलचरांमध्यें शेपूट असलेला मकर, ही माझी विभूति आहे.
पै समस्तांही वोंघां--। मध्यें जे भगीरथें आणितां गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली ॥ २५६ ॥
२५६) सर्वहि जलप्रवाहांमध्यें जी गंगा, तिला भगीरथ आणीत असतां
मध्ये जहनृ नावाच्या ऋषीनें गिळली व नंतर भगीरथाच्याच प्रार्थनेवरुन आपली मांडी
फाडून परत त्याची त्यास मोकळी करुन दिली अशी,
ते त्रिभुवनैकसरिता । जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहां समस्तां--। माझारीं जाणें ॥ २५७ ॥
२५७) तिन्ही लोकांत एकच असलेली जान्हवी नांवाची जी नदी, ती
सर्व जलप्रवाहांमध्यें अर्जुना, माझी विभूति आहे असे समज.
ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सुतां एकेकी ।
सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्घ्या नव्हती ॥ २५८ ॥
२५८) अशा प्रकारानें जगांतील वेगवेगळ्या विभूतींची एक
एक नांवें घेऊ लागले असतां पूर्ण आयुष्य असलेल्या
हजारों जन्मांमध्यें त्या अर्ध्यादेखील सांगून व्हावयाच्या
नाहींत, हे पक्के समज.
No comments:
Post a Comment