ShriRamCharitManas
दोहा—सुनि सिख पाइ असीस बड़ि
गनक बोलि दिनु साधि ।
सिंघासन प्रभु पादुका
बैठारे निरुपाधि ॥ ३२३ ॥
हे ऐकून, आज्ञा घेऊन व
मोठा आशीर्वाद मिळवून भरताने ज्योतिष्यांना बोलाविले आणि चांगला मुहूर्त पाहून
प्रभूंच्या चरणपादुका निर्विघ्नपणे सिंहासनावर विराजमान केल्या. ॥ ३२३ ॥
राम मातु गुर पद सिरु नाई ।
प्रभु पद पीठ रजायसु पाई ॥
नंदिगावँ करि परन कुटीरा ।
कीन्ह निवासु धरम धुर धीरा ॥
नंतर श्रीरामांची माता
कौसल्या आणि गुरुजींच्या चरणांना नतमस्तक होऊन व प्रभूंच्या चरणपादुकांची आज्ञा
घेऊन धर्माची धुरा धारण करण्यामध्ये धैर्यशील असलेल्या भरताने नंद्रीग्रामात
पर्णकुटी बनविली आणि तेथे तो राहू लागला. ॥ १ ॥
जटाजूट सिर मुनिपट धारी ।
महि खनि कुस सॉंथरी सँवारी ॥
असन बसन बासन ब्रत नेमा ।
करत कठिन रिषिधरम सप्रेम ॥
शिरावर जटाजूट आणि
शरीरावर वल्कले धारण करुन त्याने पृथ्वी खोदून तिच्यामध्ये कुशांचे आसन घातले.
भोजन, वस्त्रे, भांडी, व्रते, नियम या गोष्टींमध्ये तो ऋषींच्या कठीण धर्माचे
श्रद्धापूर्वक आचरण करु लागला. ॥ २ ॥
भूषन बसन भोग सुख भूरी । मन
तन बचन तजे तिन तूरी ॥
अवध राजु सुर राजु सिहाई ।
दसरथ धनु सुनि धनदु लजाई ॥
दागिने-कपडे आणि इतर
अनेक प्रकारचे सुखभोग यांचा त्याने कायावाचामनाने प्रतिज्ञापूर्वक त्याग केला.
ज्या अयोध्येच्या राज्याचा इंद्रालाही हेवा वाटे आणि जेथील राजा दशरथ यांच्या
संपत्तीबद्दल ऐकून कुबेरही ओशाळून जात असे, ॥ ३ ॥
तेहिं पुर बसत भरत बिनु
रागा । चंचरीक जिमि चंपक बागा ॥
रमा बिलासु राम अनुरागी ।
तजत बमन जिमि जन बड़भागी ॥
त्याच अयोध्यापुरीमध्ये
भरत असा अनासक्त बनून निवास करीत होता की, ज्याप्रमाणे सोनचाफ्याच्या बागेत भ्रमर
चाफ्याजवळ फिरकत नाही. श्रीरामचंद्रांचे प्रेमी मोठे भाग्यवान पुरुष असतात. ते
लक्ष्मीच्या विलासाचा वमनाप्रमाणे त्याग करतात. ॥ ४ ॥
दोहा—राम पेम भाजन भरतु बड़े
न एहिं करतूति ।
चातक हंस सराहिअत टेंक
बिबेक बिभूति ॥ ३२४ ॥
मग भरत हा तर प्रत्यक्ष
श्रीरामचंद्रांचा आवडता होता. तो या भोगैश्वर्याच्या त्यागाच्या बळावर मोठा झाला
नव्हता. ( तर श्रीराम येईपर्यंत त्यागाने राहण्याचा निग्रह व धर्माधर्मविवेक या
दोन गुणांमुळे भरत श्रेष्ठ ठरला होता. ) पृथ्वीवरील पाणी न पिण्याचा हट्ट धरुन
बसलेल्या चातकाची आणि नीर-क्षीर-विवेकाची शक्ती असलेल्या हंसाचीच प्रशंसा होत
असते. ॥ ३२४ ॥
देह दिनहुँ दिन दूबरि होई ।
घटइ तेजु बलु मुखछबि सोई ॥
नित नव राम प्रेम पनु पीना
। बढ़त धरम दलु मनु न मलीना ॥
भरताचे शरीर तर
दिवसेंदिवस दुबळे होत होते. पण बळ व तेज वाढत होते. मुखावरील कांतीही वाढत होती.
रामप्रेमाचा निश्र्चय नित्य नवीन व पुष्ट होत होता. धर्मनिष्ठा वाढत होती.
त्यामुळे मनात श्रीरामभक्ती दिवसेंदिवस वाढत होती. ॥ १ ॥
जिमि जलु निघटत सरद प्रकासे
। बिलसत बेतस बनज बिकासे ॥
सम दम संजम नियम उपासा ।
नखत भरत हिय बिमल अकासा ॥
ज्याप्रमाणे शरदऋतूच्या
येण्याने पाणी स्वच्छ होते, आकाशही स्वच्छ होते. आणि कमळे विकसित होतात. तसे शम,
दम, संयम, नियम, उपवास इत्यादी भरताच्या निर्मळ हृदयरुपी आकाशातील तारांगण
प्रकाशित होत होते. ॥ २ ॥
ध्रुव बिस्वासु अवधि राका
सी । स्वामि सुरति सुरबीथि बिकासी ॥
राम पेम बिधु अचल अदोषा ।
सहित समाज सोह नित चोखा ॥
त्या आकाशातील
ध्रुवतारा विश्वासच होता. चौदा वर्षांचा अवधीचे ध्यान हा पौर्णिमेचा चंद्र होता.
स्वामी श्रीरामचंद्र यांची स्मृती ही आकाशगंगेप्रमाणे प्रकाशित होती. राम-प्रेम
हाच नित्य राहणारा अधळ व कलंकरहित चंद्र होता. तो आपलया समाजरुपी नक्षत्रांसह शोभत
होता. ॥ ३ ॥
भरत रहनि समुझनि करतूती ।
भगति बिरति गुन बिमल बिभूती ॥
बरनत सकल सुकबि सकुचाहीं ।
सेस गनेस गिरा गमु नाहीं ॥
भरताची राहणी, समजूत,
करणी, भक्ती, वैराग्य, निर्मळ गुण आणि ऐश्र्वर्य यांचे वर्णन करण्यास सर्व
मोठमोठ्या कवींना संकोच वाटतो. कारण तेथे स्वतः शेष, गणेश व सरस्वतीसुद्धा पोहोचू
शकत नाहीत. ॥ ४ ॥
दोहा—नित पूजत प्रभु पॉंवरी प्रीति न हृदयँ समाति
।
मागि मागि आयसु करत राज काज बहु भॉंति ॥ ३२५ ॥
भरत प्रभूंच्या पादुकांची नित्य पूजा करी.
त्याच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. पादुकांची आज्ञा मागूनच तो सर्व प्रकारचा
राज्यकारभार करीत असे. ॥ ३२५ ॥
पुलक गात हियँ सिय रघुबीरु । जीह नामु जप लोचन
नीरु ॥
लखन राम सिय कानन बसहीं । भरतु भवन बसि तप तनु
कसहीं ॥
त्याचे शरीर पुलकित असे. कारण त्याच्या
हृदयात श्रीसीताराम होते. जीभ राम-नाम जपत असे. नेत्रांमध्ये प्रेमाश्रू भरलेले
असत. लक्ष्मण, श्रीराम आणि सीता हे तर वनात निवास करतात, परंतु भरत घरात राहूनच
तपाद्वारे शरीर कृश करीत होता. ॥ १ ॥
दोउ दिसि समुझि कहत सबु लोगू । सब बिधि भरत सराहन
जोगू ॥
सुनि ब्रत नेम साधु सकुचाहीं । देखि दसा मुनिराज
लजाहीं ॥
दोन्हीकडची स्थिती समजून आल्यावर सर्व लोक
म्हणत की, ‘ भरत सर्वप्रकारे प्रशंसनीय आहे. त्याचे व्रत आणि नियम ऐकून
साधु-संतांनाही संकोच वाटे आणि त्याची प्रेमनिष्ठा पाहून मुनिराजांनाही लज्जा
वाटे. ॥ २ ॥
परम पुनीत भरत आचरनू । मधुर मंजु मुद मंगल करनू ॥
हरन कठिन कलि कलुष कलेसू । महामोह निसि दलन
दिनेसू ॥
भरताचे परम पवित्र चरित्र हे मधुर, सुंदर, आनंदायक
व मांगल्य करणारे आहे. कलियुगातील पापे व कठीण क्लेश यांचे हरण करणारे आहे.
महामोहरुपी रात्रीचा नाश करणार्या सूर्यासारखे आहे. ॥ ३ ॥
पाप पुंज कुंजर मृगराजू । समन सकल संताप समाजू ॥
जन रंजन भंजन भव भारु । राम सनेह सुधाकर सारु ॥
हे चरित्र पापसमूहरुपी हत्तींसाठी सिंह आहे.
सर्व तापांच्या समुदायाचा नाश करणारे आहे. भक्तांना आनंद देणारे आहे आणि सांसारिक
दुःखांचा भंग करणारे व श्रीरामप्रेमरुपी चंद्रम्यातून स्रवणारे अमृत आहे. ॥ ४ ॥
छं०—सिय राम प्रेम पियूष पूरन होत जनमु न भरत को
।
मुनि मन अगम जम नियम सम दम बिषम ब्रत आचरत को ॥
दुख दाह दारिद दंभ दूषन सुजस मिस अपहरत को ।
कलिकाल तुलसी से सठन्हि हठि राम सनमुख करत को
॥
श्रीसीतारामांच्या प्रेमरुपी अमृताने
परिपूर्ण असलेल्या भरताचा जन्म जर झाला नसता तर मुनींच्या मनालाही अगम्य असलेले
यम, नियम, शम, दम इत्यादी कठीण व्रताचे आचरण कुणी केले असते ? दुःख, संताप,
दरिद्रता, दंभ इत्यादी दोषांचे आपल्या उत्तम कीर्तीच्या निमित्ताने कोणी हरण केले
असते ? आणि कलिकाळात, तुलसीदासासारख्या अभक्तांना बळेच श्रीरामांच्याकडे वळविले
असते ?
सो०---भरत चरित करि नेमु तुलसी जो सादर सुनहिं ॥
सीय राम पद पेमु अवसि होइ भव रस बिरति ॥ ३२६ ॥
तुलसीदास म्हणतात, जे कोणी भरताचे चरित्र
नियमाने आदरपूर्वक ऐकतील त्यांना निश्र्चितपणे श्रीसीतारामांच्या चरणी प्रेम
उत्पन्न होईल आणि सांसारिक विषयरसाविषयी वैराग्य वाटू लागेल. ॥ ३२६ ॥
मासपारायण, एकविसावा विश्राम
इति श्रीमद्रामचरितमानसे सकलकलिकलुषविध्वंसने
द्वितीयः सोपानः समाप्तः ॥
कलियुगांतील संपूर्ण पापांचा विध्वंस करणार्या
श्रीरामचरितमानसाचा हा दुसरा सोपान समाप्त झाला.
( अयोध्याकाण्ड समाप्त )
No comments:
Post a Comment