Tuesday, December 28, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 49 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४९

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 49 
Doha 287 to 292 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४९ 
दोहा २८७ आणि २९२

दोहा—बार बार मिलि भेंटि सिय बिदा कीन्हि सनमानि ।

कही समय सिर भरत गति रानि सुबनि सयानि ॥ २८७ ॥

राजा-राणीने वारंवार तिला भेटून व हृदयाशी धरुन सन्मानाने तिला निरोप दिला. चतुर राणीने सवडीने राजांना सुंदर वाणीने भरताच्या दशेचे वर्णन करुन सांगितले. ॥ २८७ ॥

सुनि भूपाल भरत ब्यवहारु । सोन सुगंध सुधा ससि सारु ॥

मूदे सजल नयन पुलके तन । सुजसु सराहन लगे मुदित मन ॥

सोन्याला सुगंध असावा, तसेच तशी चंद्रम्याचे सार असलेल्या अमृतासमान भरताची वागणूक ऐकून राजा जनकांनी प्रेम-विव्हळ होऊन प्रेमाश्रूंनी भरलेले नेत्र मिटून घेतले. जणू ते भरताच्या प्रेमामध्ये ध्यानस्थ झाले. त्यांचे शरीर पुलकित झाले आणि आनंदित होऊन ते भरताच्या सुंदर कीर्तीची प्रशंसा करु लागले. ॥ १ ॥

सावधान सुनु सुमुखि सुलोचनि । भरत कथा भव बंध बिमोचनि ॥

धरम राजनय ब्रह्मबिचारु । इहॉं जथामति मोर प्रचारु ॥

ते म्हणाले, ‘ हे सुमुखी, हे सुनयने, लक्षात ठेव. भरताची कथा संसार-बंधनातून मुक्त करणारी आहे. धर्म, राजनीती आणि ब्रह्मविचार या तिन्ही विषयांमध्ये माझ्या बुद्धीप्रमाणे मला कमी-जास्त गती आहे. ॥ २ ॥

सो मति मोरि भरत महिमाही । कहै काह छलि छुअति न छॉंही ।

बिधि गनपति अहिपति सिव सारद । कबि कोबिद बुध बुद्धि बिसारद ॥

ती माझी बुद्धी भरताच्या महिम्याचे वर्णन काय करणार ? चुकूनही माझी बुद्धी त्याच्या सावलीलासुद्धा स्पर्श करु शकत नाही. ब्रह्मदेव, गणेश, शेष, महादेव, सरस्वती, कवी, ज्ञानी, पंडित आणि बुद्धिमान ॥ ३ ॥

भरत चरित कीरति करतूती । धरम सील गुन बिमल बिभूती ॥

समुझत सुनत सुख सब काहू । सुचि सुरसरि रुचि निदर सुधाहू ॥

या सर्वांना भरताचे चरित्र, कीर्ती, कृती, धर्म, शील, गुण, निमल ऐश्र्वर्य हे गुण समजून घेण्याने आणि ऐकण्याने सुख देणारे आहेत आणि पावित्र्यामध्ये गंगेला आणि माधुर्यामध्ये अमृतालाही मागे टाकणारे आहेत. ॥ ४ ॥

दोहा—निरवधि गुन निरुपम पुरुषु भरतु भरत सम जानि ।

कहिअ सुमेरु कि सेर सम कबिकुल मति सकुचानि ॥ २८८ ॥

भरत अनंत गुणसंपन्न आणि उपमारहित पुरुष आहे. भरतासारखा भरतच आहे, असे समज. सुमेरु पर्वताला तराजूत तोलता येईल काय ? म्हणून त्याला कुणा पुरुषाची उपमा देताना कवींची बुद्धीही संकोच पावते. ॥ २८८ ॥

अगम सबहि बरनत बरबरनी । जिमि जलहीन मीन गमु धरनी ॥

भरत अमित महिमा सुनु रानी । जानहिं रामु न सकहिं बखानी ॥

हे सुंदरी, भरताचा महिमा वर्णन करणे हे जलरहित पृथ्वीवर माशाने चालणयासारखे सर्वांना अगम्य आहे. हे राणी, भरताचा अपार महिमा फक्त श्रीरामचंद्रच जाणतात, परंतु ते सुद्धा त्याचे वर्णन करु शकत नाहीत.’ ॥ १ ॥

बरनि सप्रेम भरत अनुभाऊ । तिय जिय की रुचि लखि कह राऊ ॥

बहुरहिं लखनु भरतु बन जाहीं । सब कर भल सब के मन माहीं ॥

अशा प्रकारे भरताच्या प्रभावाचे वर्णन प्रेमाने करुन, मग पत्नीच्या मनातील इच्छा पाहून राजे म्हणाले, ‘ लक्ष्मणाने परत जावे व भरताने वनात जावे, यामध्ये सर्वांचे भले आहे आणि हेच सर्वांच्या मनात आहे. ॥ २ ॥

देबि परंतु भरत रघुबर की । प्रीति प्रतीति जाइ नहिं तरकी ॥

भरतु अवधि सनेह ममता की । जद्यपि रामु सीम समता की ॥

परंतु हे देवी, भरत व श्रीराम यांचे प्रेम, परस्पर विश्वास, हे बुद्धी व विचारांच्या पलीकडेच आहेत. जरी श्रीराम हे समतेची परिसीमा आहेत, तरी भरत हा प्रेम व ममता यांची परिसीमा आहे. ॥ ३ ॥

परमारथ स्वारथ सुख सारे । भरत न सपनेहुँ मनहुँ निहारे ॥

साधन सिद्धि राम पग नेहू । मोहि लखि परत भरत मत एहू ॥

श्ररामांविषयी एक अनन्य प्रेम सोडल्यास भरताने सर्व परमार्थ, स्वार्थ आणि सुख यांचेकडे स्वप्नातही चुकूनही पाहिले नाही. श्रीमांच्या चरणी प्रेम हेच त्याचे साधन आहे आणि हीच त्याची सिद्धी आहे. मला भरताचा फक्त हाच एक सिद्धांत वाटतो. ॥ ४ ॥

दोहा—भोरेहुँ भरत न पेलिहहिं मनसहुँ राम रजाइ ।

करिअ न सोचु सनेह बस कहेउ भूप बिलखाइ ॥ २८९ ॥

राजांनी प्रेमाने सद्गदित होऊन म्हटले की, ‘ भरत हा चुकूनही श्रीरामचंद्रांची आज्ञा टाळण्याचे मनातही आणणार नाही. म्हणून प्रेमवश होऊन चिंता करु नये. ॥ २८९ ॥

राम भरत गुन गनत सप्रीती । निसि दंपतिहि पलक सम बीती ।

राज समाज प्रात जुग जागे । न्हाइ न्हाइ सुर पूजन लागे ॥

श्रीराम आणि भरत यांच्या गुणांची प्रेमाने चर्चा करता करता पति-पन्नींची रात्र क्षणाप्रमाणे सरुन गेली. प्रातःकाली दोन्ही राजसमाज जागे झाले आणि स्नान करुन देव-पूजा करु लागले. ॥ १ ॥ 

गे नहाइ गुर पहिं रघुराई । बंदि चरन बोले रुख पाई ॥

नाथ भरतु पुरजन महतारी । सोक बिकल बनबास दुखारी ॥ 

श्रीरघुनाथ स्नान करुन गुरु वसिष्ठांच्याजवळ गेले आणि त्यांच्या चरणांना वंदन करुन व त्यांचा कल पाहून म्हणाले, ‘ हे गुरुवर्य ! भरत, अयोध्यावासी व माता हे सर्वजण शोकाने व्याकूळ आणि वनवासामुळे दुःखी आहेत. ॥ २ ॥

सहित समाज राउ मिथिलेसू । बहुत दिवस भए सहत कलेसू ॥

उचित होइ सोइ कीजिअ नाथा । हित सबही कर रौंरे हाथा ॥

मिथिलपती राजा जनक हे सुद्धा आपल्या परिवारासह बरेच दिवस कष्ट सहन करीत आहेत म्हणून हे नाथ, योग्य असेल, त्याप्रमाणे करा. तुमच्या हाती सर्वांचे हित आहे. ॥ ३ ॥

अस कहि अति सकुचे रघुराऊ । मुनि पुलके लखि सीलु सुभाऊ ॥

तुम्ह बिनु राम सकल सुख साजा । नरक सरिस दुहु राजा समाजा ॥    

असे म्हणून श्रीराम अत्यंत संकोचले. त्यांचे शील व स्वभाव पाहून मुनी वसिष्ठ प्रेम व आनंदाने पुलकित झाले. ते म्हणाले, ‘ हे रामा, तुमच्याविना घर-दार इत्यादी सर्व सुखे दोन्हीकडच्या समाजाला नरकासारखी आहेत. ॥ ४ ॥

दोहा—प्रान प्रान के जीव के जिव सुख राम ।

तुम्ह तजि तात सोहात गृह जिन्हहि तिन्हहि बिधि बाम ॥ २९० ॥

हे रामा, तुम्ही प्राणांचेही प्राण,आत्म्याचेही आत्मा आणि सुखाचे सुख आहात. हे प्रभो ! तुम्हांला सोडून ज्यांना घर आवडते, त्यांना विधाता प्रतिकूल असतो. ॥ २९० ॥

सो सुखु करमु धरमु जरि जाऊ । जहँ न राम पद पंकज भाऊ ॥

जोगु कुजोगु ग्यानु अग्यानू । जहँ नहिं राम पेम परधानू ॥

जेथे श्रीरामांच्या चरण-कमलांविषयी प्रेम नाही, ते सुख, कर्म आणि धर्म जळून जावोत. ज्यामध्ये श्रीरामांच्या प्रेमाला प्राधान्य नाही, तो योग कुयोग होय आणि ते ज्ञान अज्ञान होय. ॥ १ ॥

तुम्ह बिनु दुखी सुखी तुम्ह तेहीं । तुम्ह जानहु जिय जो जेहि केहीं ॥

राउर आयसु सिर सबही कें । बिदित कृपालहि गति सब नीकें ॥

तुमच्याविना सर्व दुःखी आहेत आणि जे सुखी आहेत ते तुमच्यामुळे सुखी आहेत. कुणाच्या मनात काय आहे ते सर्व तुम्ही जाणता. तुमची आज्ञा सर्वांना शिरोधार्थ आहे. हे कृपाळू ! तुम्हांला सर्वांची स्थिती चांगली ठाऊक आहे. ॥ २ ॥

आपु आश्रमहि धारिअ पाऊ । भयउ सनेह सिथिल मुनिराऊ ॥

करि प्रनामु तब रामु सिधाए । रिषि धरि धीर जनक पहिं आए ॥

म्हणून तुम्ही आश्रमाला जा. ‘ इतके म्हणून मुनिराज प्रेमाने भरुन गेले. मग श्रीराम प्रणाम करुन निघाले आणि ऋषी वसिष्ठ मोठ्या धैर्याने जनकांच्याकडे गेले. ॥ ३ ॥

राम बचन गुरु नृपहि सुनाए । सील सनेह सुभायँ सुहाए ॥

महाराज अब कीजिअ सोई । सब कर धरम सहित हित होई ॥

गुरुजींनी श्रीरामचंद्रांच्या शील व स्नेहाबद्दल अत्यंत स्वाभाविकपणे जनकराजांना सांगितले आणि ते म्हणाले, ‘ महाराज, ज्यामध्ये सर्वांचे धर्मासह हित होईल असे करा. ॥ ४ ॥

दोहा—ग्यान निधान सुजान सुचि धरम धीर नरपाल ।

तुम्ह बिनु असमंजस समन को समरथ एहि काल ॥ २९१ ॥

हे राजन, तुम्ही ज्ञानाचे भांडार, ज्ञानी, पवित्र व धर्मामध्ये धीर आहात. या वेळी तुमच्याविना ही द्विधा स्थिती दूर करण्यास दुसरा कोण समर्थ आहे ? ॥ २९१ ॥

सुनि मुनि बचन जनक अनुरागे । लखि गति ग्यानु बिरागु बिरागे ॥

सिथिल सनेहँ गुनत मन माहीं । आए इहॉं कीन्ह भल नाहीं ॥

मुनि वसिष्ठांचे बोलणे ऐकून जनक प्रेममग्न झाले. त्यांची ती दशा पाहून ज्ञान व वैराग्य आले. ते प्रेमांत बुडून गेले. मनात विचार करु लागले की, ‘ आम्ही येथे आलो, हे काही चांगले केले नाही. ॥ १ ॥

रामहि रायँ कहेउ बन जाना । कीन्ह आपु प्रिय प्रेम प्रवाना ॥

हम अब बन तें बनहि पठाई । प्रमुदित फिरब बिबेक बड़ाई ॥

राजा दशरथांनी श्रीरामांना वनात जाण्यास सांगितले आणि स्वतः प्रिय रामांच्या वियोगामध्ये प्राण सोडून आपले प्रेम सिद्ध केले. परंतु आता आम्ही यांना या वनातून आणखी दाट अशा वनात पाठवून आपल्या विवेकाचा मोठेपणा मिरवीत आनंदाने परत जायचे काय ? ‘ ॥ २ ॥

तापस मुनि महिसुर सुनि देखी । भए प्रेम बस बिकल बिसेषी ॥

समउ समुझि धरि धीरजु राजा । चले भरत पहिं सहित समाजा ॥

तपस्वी, मुनी, ब्राह्मण हे सर्व ऐकून आणि पाहून प्रेमामुळे व्याकुळ झालेले आहेत. शेवटी प्रसंग पाहून राजा जनक मोठ्या धीराने आपल्या समाजासह भरताकडे गेले. ॥ ३ ॥

भरत आइ आगें भइ लीन्हे । अवसर सरिस सुआसन दीन्हे ॥

तात भरत कह तेरहुति राऊ । तुम्हहि बिदित रघुबीर सुभाऊ ॥

भरताने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि प्रसंगनुरुप चांगले आसन दिले. राजा जनक म्हणू लागले, ‘ हे बाळ भरत, तुला श्रीरामांचा स्वभाव ठाऊक आहे. ॥ ४ ॥

दोहा—राम सत्यब्रत धरम रत सब कर सीलु सनेहु ।

संकट सहत सकोच बस कहिअ जो आयसु देहु ॥ २९२ ॥

श्रीराम सत्यव्रती आणि धर्मपरायण आहेत. सर्वांचे मन व प्रेम राखणारे आहेत. म्हणून ते संकोचामुळे संकट सहन करीत आहेत. आता तू जी आज्ञा देशील, ती त्यांना सांगू.’ ॥ २९२ ॥

सुनि तन पुलकित नयन भरि बारी । बोले भरतु धीर धरि भारी ॥

प्रभु प्रिय पूज्य पिता सम आपू । कुलगुरु सम हित माय न बापू ॥

हे ऐकून भरत पुलकित होऊन आणि डोळ्यांत पाणी आणून मोठ्या धीराने म्हणाला, ‘ हे तात ! तुम्ही आम्हांला पित्याप्रमाणे प्रिय व पूज्य आहात आणि कुलगुरु वसिष्ठ हे माता-पित्याहून अधिक आमचे हित पाहणारे आहेत. ॥ १ ॥   

कौसिकादि मुनि सचिव समाजू । ग्यान अंबुनिधि आपुनु आजू ॥

सिसु सेवकु आयसु अनगामी । जानि मोहि सिख देइअ स्वामी ॥

विश्वामित्र इत्यादी मुनींचा समाज आहे. मंत्रांचा समाज आहे. आणि आज ज्ञानाचे समुद्र असलेले तुम्हीसुद्धा उपस्थित आहात. मला आपला बालक, सेवक आणि आज्ञाधारक समजून योग्य सल्ला द्या. ॥ २ ॥

एहिं समाज थल बूझब राउर । मौन मलिन मैं बोलब बाउर ॥

छोटे बदन कहउँ बड़ि बाता । छमब तात लखि बाम बिधाता ॥

या समाजात व पुण्य स्थानात आपणासारख्या ज्ञानी व पूज्य पुरुषाने विचारले आणि त्यावर मी गप्प बसलो, तर मला अविचारी समजले जाईल आणि मी बोलणे हे वेडेपणाचे ठरेल. तरीही मी लहान तोंडी मोठी गोष्ट सांगतो. हे तात, दैव प्रतिकूल आहे असे समजून मला क्षमा करा. ॥ ३ ॥

आगम निगम प्रसिद्ध पुराना । सेवाधरमु कठिन जगु जाना ॥

स्वामि धरम स्वारथहि बिरोधू । बैरु अंध प्रेमहि न प्रबोधू ॥

वेद, शास्त्र व पुराणे यांमध्ये हे प्रसिद्ध आहे आणि

 जगालाही माहीत आहे की सेवाधर्म हा मोठा कठीण

 आहे. स्वामिधर्म व स्वार्थ यांमध्ये विरोध आहे. दोन्ही

 एकाच वेळी निभावता येत नाहीत. वैर आंधळे असते

 आणि प्रेमाला ज्ञान नसते. मी स्वार्थाने बोललो किंवा

 प्रेमाने बोललो, तर दोन्ही गोष्टींमध्ये चूक होण्याची भीती

 आहे. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: