ShriRamCharitManas
दोहा—आश्रम सागर सांत रस
पूरन पावन पाथु ।
सेन मनहुँ करुना सरित
लिएँ जाहिं रघुनाथु ॥ २७५ ॥
श्रीरामांचा आश्रम
शांतरसरुपी पवित्र जलाने पूर्ण भरलेला समुद्र होता. जनकांचा समाज जणू करुणरसाची
नदी होती. आणि आश्रमरुपी शांतरसाच्या समुद्राला भेटायला श्रीराम तिला घेऊन
निघाले.॥ २७५ ॥
बोरति ग्यान बिराग करारे । बचन ससोक मिलत नद नारे ॥
सोच उसास समीर तरंगा । धीरज तट तरुबर कर भंगा ॥
या करुणा-नदीला इतका पूर आला होता की, तिने
ज्ञान-वैराग्यरुपी तटांना बुडवून टाकले होते. शोकपूर्ण बोलणे म्हणजे नद्या व ओढे
होते, ते या नदीस मिळत होते आणि चिंतापूर्णा दीर्घ श्वास हवेच्या झोतात उसळलेल्या लाटा होत्या. त्या धैर्यरुपी किनार्यावरील
उत्तम वृक्ष उपटून टाकीत होत्या. ॥ १ ॥
बिषम बिषाद तोरावति धारा । भय भ्रम भवँर अबर्त
अपारा ॥
केवट बुध बिद्या बड़ि नावा । सकहिं न खेइ ऐक नहिं
आवा ॥
भयानक शोक हा या नदीतील प्रचंड प्रवाह होता.
भय व भ्रम हे त्यामधील असंख्य भोवरे व चक्रे होती. विद्वान हे नावाडी होते व
विद्या ही मोठी नौका होती, परंतु ते चालवू शकत नव्हते. कुणाला तिचा अंदाज येत
नव्हता. ॥ २ ॥
बनचर कोल किरात बिचारे । थके बिलोकि पथिक हियँ
हारे ॥
आश्रम उदधि मिली जब जाई । मनहुँ उठेउ अंबुधि
अकुलाई ॥
वनात फिरणारे बिचारे कोल-किरात हे प्रवासी
होते. ते ती नदी पाहून मनातून खचले होते. ही करुणा-नदी जेव्हा आश्रम समुद्रास येऊन
मिळाली, तेव्हा जणू तो समुद्र उसळू लागला. ॥ ३ ॥
सोक बिकल दोउ राज समाजा । रहा न ग्यानु न धीरजु
लाजा ॥
भूप रुप गुन सील सराही । रोवहिं सोक सिंधु अवगाही
॥
दोन्हीही राज-समाज शोकाकुल झाले होते. कुणाला
ज्ञान राहिले नाही की लज्जाही राहिली नाही. राजा दशरथ यांच्या रुप, गुण व शीलाची
प्रशंसा करीत सर्वजण रुदन करीत होते आणि शोक-समुद्रात बुड्या मारीत होते. ॥ ४ ॥
छंद—अवगाहि
सोक समुद्र सोचहिं नारि नर ब्याकुल महा ।
दै दोष सकल सरोष बोलहिं बाम बिधि कीन्हो कहा ॥
सुर सिद्ध तापस जोगिजन मुनि देखि दसा बिदेह की ।
तुलसी न समरथु कोउ जो तरि सकै सरित सनेह की ॥
शोक समुद्रात बुड्या मारणारे सर्व
स्त्री-पुरुष चिंतेने व्याकूळ झाले होते. ते सर्वजण विधात्याला दोष देत क्रोधाने
म्हणत होते की प्रतिकूल दैवाने हे काय केले ? तुलसीदास म्हणतात की, देव, सिद्ध,
तपस्वी, योगी व मुनिगण यांमध्ये कोणीही असा सामर्थ्यशाली नाही की, जो त्या प्रसंगी
राजा विदेहाची दशा पाहून प्रेमाची नदी पार करु शकेल. ॥
सो०—किए अमित उपदेस जहँ तहॅं लोगन्ह मुनिबरन्ह ।
धीरजु धरिअ नरेस कहेउ बसिष्ठ बिदेह सन ॥ २७६ ॥
जेथे तेथे श्रेष्ठ मुनींनी लोकांना असंख्य
उपदेश दिले आणि वसिष्ठांनी विदेह जनकांना म्हटले की, ‘ तुम्ही धीर धरा.’ ॥ २७६ ॥
जासु ग्यानु रबि भव निसि नासा । बचन किरन मुनि
कमल बिकासा ॥
तेहि कि मोह ममता निअराई । यह सिय राम सनेह बड़ाई
॥
ज्या राजा जनकांचा ज्ञानरुपी सूर्य
जन्म-मरणरुपी रात्रीचा नाश करतो आणि ज्यांची वचनरुपी किरणे ही मुनिरुपी कमलांना
प्रफुल्लित करतात, त्यांच्याजवळ मोह व ममता हे फिरकू शकतील काय ? परंतु हा
सीतारामांच्या प्रेमाचा महिमा आहे. ॥ १ ॥
बिषई साधक सिद्ध सयाने । त्रिबिध जीव जग बेद
बखाने ॥
राम सनेह सरस मन जासू । साधु सभॉं बड़ आदर तासू ॥
जगामध्ये विषयी, साधक व सिद्ध असे तीन
प्रकारचे जीव आहेत, असे वेदांमध्ये सांगितले आहे. या तिघांमध्ये ज्याचे चित्त
श्रीरामांच्या स्नेहामध्ये बुडालेले असते, त्याचाच साधूंच्या सभेत मोठा आदर होतो.
॥ २ ॥
सोह न राम पेम बिनु ग्यानू । करनधार बिनु जिमि जलजानू
॥
मुनि बहुबिधि बिदेहु समुझाए । रामघाट सब लोग नहाए
॥
ज्याप्रमाणे नावाड्याविना जहाज चालत नाही,
त्याप्रमाणे श्रीरामांच्या प्रेमाविना ज्ञानाला शोभा नाही. वसिष्ठांनी विदेहराज
जनकांना पुष्कळ प्रकारे समजाविले. नंतर सर्व लोकांनी रामघाटावर स्नान केले. ॥ ३ ॥
सकल सोक संकुल नर नारी । सो बासरु बीतेउ बिनु
बारी ॥
पसु खग मृगन्ह न कीन्ह अहारु । प्रिय परिजन कर
कौन बिचारु ॥
स्त्री-पुरुष सर्वजण शोकाकुल होते. त्या
दिवशी भोजन ते काय, कुणी पाणीही घेतले नाही. पशु-पक्षी व हरिणांनीसुद्धा आहार
घेतला नाही. मग प्रियजन व कुटुंबीयांच्याविषयी काय सांगावे ? ॥ ४ ॥
दोहा—दोउ समाज निमिराजु
रघुराजु नहाने प्रात ।
बैठे सब बट बिटप तर मन
मलीन कृस गात ॥ २७७ ॥
निमिराज जनक आणि
रघुराज रामचंद्र आणि दोन्हीकडची मंडळी यांनी दुसर्या दिवशी सकाळी स्नान केले आणि
सर्वजण वटवृक्षाखाली जाऊन बसले. सर्वांची मने उदास व शरीरे अशक्त झाली होती. ॥ २७७
॥
जे महिसुर दसरथ पुर बासी
। जे मिथिलापति नगर निवासी ॥
हंस बंस गुर जनक पुरोधा
। जिन्ह जग मगु परमारथु सोधा ॥
जे अयोध्येचे
राहणारे व जे मिथिलेचे राहणारे ब्राह्मण होते आणि सूर्यवंशाचे गुरु वसिष्ठ व
जनकांचे पुरोहित शतानंद की ज्यांनी सांसारिक अभ्युदयाचा मार्ग व परमार्थाचा मार्ग
शोधून काढला होता, ॥ १ ॥
लगे कहन उपदेस अनेका ।
सहित धरम नय बिरति बिबेका ॥
कौसिका कहि कहि कथा
पुरानीं । समुझाई सब सभा सुबानीं ॥
ते सर्वजण धर्म,
नीती, वैराग्य व विवेकयुक्त अनेक विचार सांगू लागले. विश्वामित्रांनी प्राचीन कथा
सर्व सभेला सुंदर वाणीमध्ये समजावून दिल्या. ॥ २ ॥
तब रघुनाथ कौसिकहि कहेऊ
। नाथ कालि जल बिनु सबु रहेऊ ॥
मुनि कह उचित कहत रघुराई
। गयउ बीति दिन पहर अढ़ाई ॥
तेव्हा
श्रीरघुनाथांनी विश्र्वामित्रांना म्हटले की, ‘ हे मुनिवर्य ! काल सर्व लोक पाणीसुद्धा न पिता
राहिले आहेत, म्हणून आता काही आहार घेतला पाहिजे.’ विश्र्वामित्र म्हणाले, ‘
श्रीरघुनाथ योग्यच सांगत आहेत. आजही अडीच प्रहर उलटून गेले. ॥ ३ ॥
रिषि रुख लखि कह तेरहुतिताजू । इहॉं उचित नहिं असन
अनाजू ॥
कहा भूप भल सबहि सोहाना
। पाइ रजायसु चले नहाना ॥
विश्र्वामित्रांचा
रोख पाहून जनक म्हणाले की, ‘ येथे अन्न खाणे योग्य नाही.’ राजांचे सुंदर बोलणे
ऐकून सर्वांच्या मनाला बरे वाटले. आज्ञा घेऊन सर्व स्नानास गेले. ॥ ४ ॥
दोहा—तेहि अवसर फल फूल
दल मूल अनेक प्रकार ।
लइ आए बनचर बिपुल भरि
भरि कॉंवरि भार ॥ २७८ ॥
त्याचवेळी अनेक
प्रकारची पुष्कळ फळे, फुले, पाने, मुळे इत्यादी पदार्थंच्या कावड्या घेऊन कोल,
किरात हे वनवासी लोक आले. ॥ २७८ ॥
कामद भे गिरि राम
प्रसादा । अवलोकत अपहरत बिषादा ॥
सर सरिता बन भूमि बिभागा
। जनु उमगत आनँद अनुरागा ॥
श्रीरामचंद्रांच्या
कृपेमुळे सर्व पर्वत मनोवांछित वस्तू देणारे बनले. केवळ दर्शनानेच ते सर्व
दुःखांचे हरण करीत. तेथील तलाव, नद्या, वने आणि पृथ्वीचे सर्व भाग यांमध्ये जणू
आनंद व प्रेमाचा सागर उसळत होता. ॥ १ ॥
बेलि बिटप सब सफल सफूला
। बोलत खग मृग अलि अनुकूला ॥
तेहि अवसर बन अधिक उछाहू
। त्रिबिध समीर सुखद सब काहू ॥
वेली आणि वृक्ष हे
सर्वच फुलांनी भरुन गेले.
पक्षी, पशू आणि भ्रमर हे मनोहर बोल बोलू लागले. त्याप्रसंगी वनामध्ये फार उत्साह
भरला होता. सर्वांना सुख देणारे शीतल, मंद व सुगंधित वारे वाहात होते. ॥ २ ॥
जाइ न बरनि मनोहरताई । जनु महि करति जनक पहुनाई ॥
तब सब लोग नहाइ नहाई । राम जनक मुनि आयसु पाई ॥
देखि देखि तरुबर अनुरागे । जहँ तहँ पुरजन उतरन
लागे ॥
दल फल मूल कंद बिधि नाना । पावन सुंदर सुधा समाना
॥
वनाच्या मनोहरतेचे वर्णन करणेंच कठीण होते.
जणू पृथ्वी ही जनकांचा पाहुणचार करीत होती. त्यावेळी जनकपुरवासी सर्व लोक आंघोळ
करुन श्रीराम, जनक व मुनी यांची आज्ञा घेऊन सुंदर वृक्ष पाहात-पाहात प्रेमाने
जिकडे तिकडे उतरत होते. पवित्र, सुंदर व अमृतासारखी अनेक प्रकारची पाने, फळे, मुळे
व कंद ॥ ३-४ ॥
दोहा—सादर सब कहँ रामगुर
पठए भरि भरि भार ।
पूजि पितर सुर अतिथि गुर
लगे करन फरहार ॥ २७९ ॥
यांची ओझी
श्रीरामांचे गुरु वसिष्ठांनी सर्वांच्याकडे भरभरुन आदराने पाठविली. तेव्हा ते लोक
पितर, देवता, अतिथी आणि गुरु यांची पूजा करुन फलाहार करु लागले. ॥ २७९ ॥
एहि बिधि बासर बीते चारी
। रामु निरखि नर नारि सुखारी ॥
दुहु समाज असि रुचि मन माहीं
। बिनु सिय राम फिरब भल नाहीं ॥
अशा प्रकारे काही
दिवस निघून गेले. श्रीरामचंद्रांच्या दर्शनामुळे सर्व स्त्री-पुरुष सुखी होते.
श्रीसीतारामांना घेतल्याविना परत जाणे चांगले नाही, अशी दोन्ही समाजांच्या मनात
इच्छा होती. ॥ १ ॥
सीता राम संग बनबासू । कोटि
अमरपुर सरिस सुपारी ॥
परिहरि लखन रामु बैदेही
। जेहि धरु भाव बाम बिधि तेही ॥
श्रीसीतारामांच्या सोबत
वनात राहणे म्हणजे कोट्यावधी देवलोकांमध्ये निवास करण्याजोगे सुखदायक होते.
लक्ष्मण, श्रीराम व जानकी यांना सोडून ज्यांना आपले घर बरे वाटते, देव त्यांच्या
विरुद्ध आहे, असे समजावे. ॥ २ ॥
दाहिन दइउ होइ जब सबही ।
राम समीप बसिअ बन तबही ॥
मंदाकिनि मज्जनु तिहु
काला । राम दरसु मुद मंगल माला ॥
जेव्हा दैव हे
सर्वांना अनुकूल असेल,तेव्हाच श्रीरामांच्याजवळ वनात निवास घडू शकतो. मंदाकिनीचे
त्रिकाळ स्नान, आनंद व मांगल्याची रास असलेले श्रीरामांचे दर्शन, ॥ ३ ॥
अटनु राम गिरि बन तापस
थल । असनु अमिअ सम कंद मूल फल ॥
सुख समेत संबत दुइ साता
। पल सम होहिंन जनिअहिंजाता ॥
श्रीरामांचा कामदनाथ
पर्वत, वने व तपस्व्यांच्या स्थानातून फिरणे आणि अमृतासमान मधुर कंद, मुळे, व
फळांचे भोजन. अशा सुखसोहळ्यात चौदा वर्षे पळासारखी निघून जातील. केव्हा गेली कळणार
नाही. ॥ ४ ॥
दोहा—एहि सुख जोग न लोग
सब कहहिं कहॉं अस भागु ।
सहज सुभायँ समाज दुहु
राम चरन अनुरागु ॥ २८० ॥
सर्व लोक म्हणत होते
की, आम्ही या सुखांच्या योग्यतेचे नाही. आमचे एवढे भाग्य कुठचे ? दोन्ही समाजांना
श्रीरामांविषयी मनापासून प्रेम होते. ॥ २८० ॥
एहि बिधि सकल मनोरथ
करहीं । बचन सप्रेम सुनत मन हरहीं ॥
सीय मातु तेहि समय पठाईं
। दासीं देखि सुअवसरु आईं ॥
सर्वजण अशा प्रकारे
मनोरथ करीत होते. त्यांचे प्रेमळ बोलणें ऐकणार्यांची मने आकर्षित करुन घेत होते.
त्याचवेळी सीतेची माता सुनयना हिने पाठविलेल्या दासी कौसल्या इत्यादी राण्यांना
भेटण्याची योग्य वेळ पाहून आल्या. ॥ १ ॥
सावकास सुनि सब सिय सासू
। आयउ जनकराज रनिवासू ॥
कौसल्यॉं सादर सनमानी ।
आसन दिए समय सम आनी ॥
सीतेच्या सर्व सासवा
या वेळी मोकळ्या आहेत. हे ऐकून जनक राजांचा राणीवसा त्यांना भेटायला आला.
कौसल्येने आदराने त्यांना सन्मान दिला आणि प्रसंगानुरुप आसने आणून दिली. ॥ २ ॥
सीलु सनेहु सकल दुहु ओरा
। द्रवहिं देखि सुनि कुलिस कठोरा ॥
पुलक सिथिल तन बारि बिलोचन ।
महि नख लिखन लगीं सब सोचन ॥
दोन्ही बाजूच्या
सर्वांचे वागणे आणि प्रेम पाहून आणि ऐकून कठोर वज्रसुद्धा वितळून जात होते.
त्यांचे देह पुलकित व प्रेमविह्वळ झाले होते. नेत्रांतून दुःखाचे व प्रेमाचे अश्रू
भरले होते. सर्वजणी आपल्या पायांच्या नखांनी जमीन उकरत विचार करीत होत्या. ॥ ३ ॥
सब सिय राम प्रीति कि सि
मूरति । जनु करुना बहु बेष बिसूरति ॥
सीय मातु कह बिधि बुधि
बॉंकी । जो पय फेनु फोर पबि टॉंकी ॥
त्या सर्व
सीतारामांच्या प्रेमाच्या मूर्ती होत्या. जणू प्रत्यक्ष करुणाच अनेक रुपे
धारण करुन स्फुंदत होत्या. सीतेची माता
सुनयना म्हणाली, ‘ विधात्याची बुद्धी मोठी विचित्र आहे. ती दुधाच्या फेसासारख्या
कोमल वस्तूला वज्रासारख्या छिनीने फोडत आहे. कोमल व निर्दोष लोकांवर संकटे घालत
आहे. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment