Monday, November 21, 2022

BhaktiYoga Part 3 Ovya 35 to 59 भक्तियोग भाग ३ ओव्या ३५ ते ५९

 

BhaktiYoga Part 3 
Shri Dnyaneshwari 
Adhyay 12 
Ovya 35 to 59 
भक्तियोग भाग ३ 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १२ 
ओव्या ३५ ते ५९

मूळ श्लोक

श्रीभगवानुवाचः – मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।

                        श्रद्ध्या परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ॥ २ ॥

२) श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणीं मन ठेवून नित्ययुक्त होऊन, अतिशय श्रद्धेनें युक्त असे जे माझी उपासना करतात, ते सर्वांत उत्कृष्ट योगी मी समजतों.   

तरि अस्तुगिरीचां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं ।

रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥ ३५ ॥

३५) तर अर्जुना, अस्ताचलाच्या समीप सूर्य गेल्यानंतर सूर्यबिंबामागून जशी किरणें जातात;

वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता ।

तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥ ३६ ॥

३६) अर्जुना, ज्याप्रमाणें पावसाळ्यांत नदीचें पाणी रोज वाढतें, त्याप्रमाणें माझें भजन करीत असतांना माझ्या भक्तांचें माझ्याविषयींचें प्रेम नित्य नवें ( वाढणारें ) दिसतें.

परि ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु ।

तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥ ३७ ॥

३७) परंतु गंगानदी समुद्रास प्राप्त झाल्यानंतरहि जसा ( तिच्या ) मागील पाण्याचा अनिवार लोट येत राहतो, त्या गंगेसारखा ज्याच्या प्रेमभावाला जोर असतो;

तैसें सर्वांद्रियासहित । मजमाजीं सूनि चित्त ।

जे रातिदिवो न म्हणत । उपासेती ॥ ३८ ॥

३८) तसेंच जे रात्र आणि दिवस असें कांहीं न म्हणतां, सर्व इंद्रियांसहित माझ्या स्वरुपीं दृढ अंतःकरण ठेवून माझी उपासना करतात;

यापरी जे भक्त । आपणपें मज देत ।

तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥ ३९ ॥

३९) याप्रमाणें जे भक्त मला आपला आत्मभाव देतात, त्यांनाच मी श्रेष्ठ प्रतीचे योगयुक्त मानतों.

मूळ श्लोक

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।

सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ॥ ३ ॥

३) तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिन्त्य, अविकारी, अचल व ध्रुव ( अशा वस्तुची ) उपासना करतात;

आणि येर तेही पांडवा । जे आरुढोनिसोऽहंभावा ।

झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥ ४० ॥

४०) आणि अर्जुना, याशिवाय दुसरे ( निर्गुण उपासक ) जें, तें ब्रह्म मी आहें, अशी दृढ भावना करुन अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात; 

मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ।

इंद्रियां कीर जोगें । काइ होईल ॥ ४१ ॥ 

४१) ज्या ब्रह्माच्या ठिकाणीं मनाचा प्रवेश होत नाहीं, आणि बुद्धीची दृष्टि जेथें प्रवेश करीत नाहीं, तें इंद्रियांना खरोखर गोचर होईल काय ?

परि ध्यानाही कुवाडें । म्हणोनि एके ठायीं न संपडे ।

व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥ ४२ ॥

४२) परंतु जें ब्रह्म एका ठिकाणीं न सापडल्यामुळें व कोणत्याहि आकारांत तें येत नसल्यामुळें जें ध्यानालाहि कठिण आहे;

जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें ।

जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥ ४३ ॥

४३) जी वस्तु सर्व ठिकाणीं सर्व रुपानें व सर्व कालीं असते, ज्या स्वरुपाचें ध्यान करण्याकरितां गेलें असतां, चिंतन करण्याची क्रिया तेथें आपला कांहीं लाग न लागल्यामुळें खजील होते;  

जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे ।

ऐसें म्हणोनि उपाये । उपजतीचिना ॥ ४४ ॥

४४) जी वस्तु उत्पन्न होत नाहीं व नाशहि पावत नाहीं व जी वस्तु नाहीं असेंही नाही व आहे असेहीं नाहीं; व जी वस्तु अशी असल्यामुळे जिच्या प्राप्तिविषयीं साधनें संभवतच नाहीत;

जें चळे ना ढळे । सरे ना मैळे ।

तें आपुलेनिचि बळें । आंगविलें जिहीं ॥ ४५ ॥

४५) जें चालत नाहीं व हालत नाहीं, जें संपत नाहीं व मळत नाहीं तें ( ब्रह्म ) आपल्या बळानेंच ज्यांनी स्वाधीन करुन घेतलें आहे.

मूळ श्लोक

संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।

ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥ ४ ॥

४) इंद्रियसमुदायाचें नियमन करुन, सर्वत्र समबुद्धि ठेवणारे व सर्व भक्तांचें जें हित त्यामध्यें रत असणारे, ( अशी उपासना करणारे ) ते देखील माझ्याप्रतच येतात.

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें ।

अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥ ४६ ॥

४६) ( ज्यांनी ) वैराग्यरुपी मोठ्या अग्नीनें विषयांचीं सैन्यें जाळून, त्या योगानें होरपळलेलीं इंद्रियें धैर्यांनें आवरुन धरलीं; 

मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं ।

इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचां ॥ ४७ ॥

४७) मग इंद्रियांस ( निग्रहाच्या ) पाशांत घालून अंतर्मुख केलें व अशा तर्‍हेने त्यांस हृदयाच्या कपाटांत कोंडलें, 

अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा ।

मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥ ४८ ॥

४८) हे सुजाण अर्जुना, गुदद्वाराला आसनमुद्रा लावून मूळबंधाच्या किल्ला तयार केला.

आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले ।

निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥ ४९ ॥

४९) आशेचे संबंध तोडून टाकले. भित्रेपणाचे कडे ढांसळून दिले आणि निद्रारुपी अंधार नाहींसा करुन टाकला.

वज्राग्निचां ज्वाळीं । करुनि अपानधातूंची होळी ।

व्याधींचां सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥ ५० ॥   

५०) वज्राग्नीच्या ज्वाळाने अपानरुप धातूंची होळी करुन रोगरुपी मुंडक्यांनी प्राणायामरुपी तोफा पूजिल्या.  

मग कुंडलिनियेचा टेंभा । आघारीं केला उभा ।

तया चोजविलें प्रभा । निमथावरी ॥ ५१ ॥

५१) मग कुंडलिनीची मशाल आधार चक्रावर उभी केली व तिच्या प्रकाशाने ब्रह्मरंध्रापर्यंत मार्ग समजला.

नवद्वारांचां चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।

उघडली खिडकी । ककारांतींची ॥ ५२ ॥

५२) शरीरांतील नऊहि द्वारांच्या कवाडांवर संयमाचा अडसर घालून, सुषुम्ना नाडीचे मुख उघडलें.

प्राणशक्तिचामुंडे । प्रहारुनि संकल्पमेंढे ।

मनोमहिषाचेनि मुंडे । दिधलीं बळी ॥ ५३ ॥

५३) प्राणशक्तिरुपी चामुंडा देवीला संकल्परुपी मेंढे मारु व मनोरुप महिषाचें मस्तक हे बळी दिले.

चंद्रसूर्यां बुझावणी । करुनि अनाहताची सुडावणी ।

सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगें ॥ ५४ ॥

५४) इडा व पिंगला नाड्यांचा सुषुम्नेंत प्रवेश करुन अनाहत शब्दाचा गजर खुला केला व चंद्रामृत त्वरेनें जिंकून घेतलें.

मग मध्यमामध्यविवरें । तेणें कोरिवें दादरें ।

ठाकिलें चवरें । ब्रह्मरंघ्रींचें ॥ ५५ ॥

५५) मग सुषुम्ना नाडीच्या मधील कोरीव अशा विवररुपी दादरावरुन ब्रह्मरंध्राचें शिखर प्राप्त करुन घेतलें.

वरी मकरांत सोपान । ते सांडोनिया गहन ।

काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं ॥ ५६ ॥

५६) शिवाय आज्ञाचक्ररुप अथवा ॐकाराची तिसरी मात्रा जो मकार, त्या मकाररुपी जिन्याचा बिकट शेवट जे चढून जातात व मूर्घ्नि आकाशाला बगलेंत मारुन ब्रह्माशीं ऐक्याला पावतात.

ऐसेनि जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी ।

आंगविताति निरवधी । योगदुर्गें ॥ ५७ ॥

५७) अशा प्रकारें सर्वत्र सारखी बुद्धि ठेवलेले जे असतात, ते मी ब्रह्म अशीं भावना प्राप्त करुन घेण्याकरितां योगरुपी अमर्याद किल्ले स्वाधीन करुन घेतात.

आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठी ।

तेही मातेंचि किरीटी । पावती गा ॥ ५८ ॥

५८) आपल्याला मोबदल्यांत देऊन निराकार ब्रह्म त्वरित घेतात, तेहि अर्जुना, मला पावतात.

वांचूनि योगाचेनि बळें । अधिक कांहीं मिळे ।

ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया ॥ ५९ ॥

५९) एर्‍हवीं योगाचरणाच्या जोरावर विशेष कांहीं लाभ

 होतो, असे मुळींच नाही. उलट जास्त श्रम मात्र त्यांच्या

 पदरात पडतात; दुसरें कांहीं नाहीं. 



Custom Search

No comments: