Adi Shankaracharya's HastMalk Stotra with meaning in Marathi.
हस्तामलकस्तोत्रम्
कस्त्वं शिशो ! कस्य कुतोऽसि गन्ता,
किं नाम ते त्वं कुत आगतोऽसि
एतन्मयोक्तं वद चार्भक ! त्वं,
मत्प्रीतये प्रीतिविवर्धनोऽसि ॥ १ ॥
भावार्थ
१) अरे मुला ! तूं कोण आहेस ? कोणाचा आहेस ?
तूं कोठे जाणार आहेस ? तुझें नांव काय ? कोठून आलास ?हे मुला, माझ्या या प्रश्र्णाचे उत्तर दे. या प्रश्र्णाचें उत्तर तुझ्याकडून मला मिळाल्यास मला मोठा आनंद होणार आहे.
नाऽहं मनुष्ये न च देवयक्षौ,
न ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्राः ।
न ब्रह्मचारी न गृही वनस्थो,
भिक्षुर्न चाहं निजबोधरुपः ॥ २ ॥
२) मनुष्य, देव, यक्ष, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, अगर भुक्षु-संन्यासी यांपैकी मीं कोणींच नाहीं.उलट मी ज्ञानस्वरुप अखंड आत्मा आहे.
निमित्तं मनःचक्षुरादिप्रवृत्तौ,
निरस्ताखिलोपाधिराकाशकल्पः ।
रविर्लोचेष्टानिमित्तं यथा यः,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽह मात्मा ॥ ३ ॥
३) सूर्य ज्याप्रमाणें सर्व लोकांच्या प्रवृत्तीला निमित्तमात्र असतो, पण त्या लौकिक व्यवहारानें तो लिप्त होत नाही, म्हणजे सदा निर्लेप, निर्विकाररुपानें असतो, त्याप्रमाणें मी मनःचक्षुरादि इंद्रियांच्या प्रवृत्तीला निमित्तमात्र आहे. पण त्यांच्या त्या व्यवहाराशीं
माझा संबंध कांहींच नाही. मी आकाशाप्रमाणें सर्व उपाधिसंबंधरहितआहे. मी असंग, नित्य, अखण्ड, शुद्ध व ज्ञानस्वरुप आहें.
यमग्न्युष्णवन्नित्यबोधस्वरुपं,
मनश्र्चक्षुरादीन्यबोधात्मकानि ।
प्रवर्तन्त आश्रित्य निष्कंपमेकम्,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ४ ॥
४) उष्णता हें जसें अग्नीचें स्वरुप आहे, त्याप्रमाणें नित्यबोधस्वरुप,अचल, एक असा जो मीं, त्या माझ्या आश्रयानें मननेत्रादि इन्द्रिये आपापले विषय ग्रहण करण्यांत प्रवृत्त होतात, तो नित्य ज्ञानस्वरुपआत्मा मी आहे.
मुखाभासको दर्पणे दृश्यमानो,
मुखत्वात्पृथक्त्वेन नैवास्ति वस्तु ।
चिदाभासकोधीषु जीवोऽपि तद्वत्,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ५ ॥
५) ज्याप्रमाणें आरशांत दिसणारें मुखाचें प्रतिबिंब वस्तुतः बिंबरुप मुखाहून पृथक् नाहीं, किंतु बिंबरुपच आहे, त्याप्रमाणें बुद्धिरुप आरशामध्यें जीवरुपानें प्रतीतीला येणारे चैतन्याचें प्रतिबिंब, बिंबरुप
चैतन्याहून निराळें नाहीं; किंतु चैतन्यरुपच आहे; तोच नित्यशिद्धज्ञानस्वरुप आत्मा मी आहे.
यथा दर्पणाभाव आभासहानौ,
मुखं विद्यते कल्पनाहीनमेकम् ।
तथा धीवियोगे निराभासको यः,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ६ ॥
६) ज्याप्रमाणें दर्पणरुप उपाधि नसेल तर दर्पणांत पडलेलें प्रतिबिंब प्रतीतीला येत नाहीं, किंतु बिंबप्रतिबिंब भावकल्पनाशून्य केवळ मुखच उरते, त्याप्रमाणें बुद्धिरुप उपाधि नसेल तर आत्म्याचें
प्रतिबिंब प्रतीतीला येत नाहीं; किंतु सर्वबाधाधि नित्य ज्ञानरुप,एक अखण्ड, निर्विकार, अद्वैत, ब्रह्मरुप आत्माच शिल्लक राहतो.तोच आत्मा मीं आहें.
मनश्र्चक्षुरादेर्वियुक्तः स्वयं यो,
मनश्र्चक्षुरादेर्मनश्र्चक्षुरादिः ।
मनश्र्चक्षुरादेरगम्यस्वरुपः
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ७ ॥
७) जो आत्मा, मन व त्याचप्रमाणें नेत्रादि इंद्रियांहून भिन्न आहे; त्यांचा स्वतः साक्षी आहे. अरे, जो आत्मा मनाचें मन, डोळ्यांचा डोळा, कानांचा कान, वाणीची वाणी आहे, म्हणून मनादि सर्व कार्यकारणसंघाताला स्फूर्ति देऊन त्यांच्या त्यांच्या कार्यांत प्रवृत्त
करितो, त्याचप्रमानणें मननेत्रादि इन्द्रियांना ज्या निर्विकार कूटस्थ आत्म्याचें ज्ञान होत नाही, तोंच नित्यज्ञानस्वरुप, ब्रह्मरुप, व्यापकआत्मा मी आहें.
य एको विभाति स्वतःशुद्धचेताः,
प्रकाशस्वरुपोऽपि नानेव धीषु ।
शरावोदकस्थो यथा भानुरेकः,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ८ ॥
८) जो एक (आत्मा) आपल्या स्वप्रकाशचैतन्यरुपानें प्रकाशित आहे. ज्याप्रमाणें पाण्यानें भरलेल्या अनेक घटांमध्यें प्रतिबिंबित एकच सूर्य अनेक रुपांनी भासतो, त्याप्रमाणें एकच स्वयंप्रकाश आत्मा अनेक बुद्धीमध्यें अनेक रुपांनीं भासतो. तोच नित्यरुप आत्मा मी आहे.
यथाऽनेकचक्षुःप्रकाशोरविर्न,
क्रमेण प्रकाशी करोति प्रकाश्यम् ।
अनेकाधियो यस्तथैकः प्रबोधः
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ९ ॥
९) ज्याप्रमाणें सूर्य अनेक नेत्रांचें प्रकाशन क्रमानें न करितां एकदम करतो, त्याप्रमाणें अनेक बुद्धींना एकाच वेळीं सत्तास्फूर्ति देणारा, नित्य ज्ञानस्वरुप आत्मा मी आहे.
विवस्वत्प्रभावं यथा रुपमक्षं,
प्रतिगृःह्णाति नाभावमेवं विवस्वान् ।
यदाभाव आभासयत्यक्षमेकः,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ १० ॥
१०) ज्याप्रमाणें सूर्यानें प्रकाशित केलेला रुपविषय नेत्राकडून ग्रहण केला जातो, सूर्याकडून रुपविषय अप्रकाशित असेल तर नेत्रेन्द्रिय त्याला ग्रहण करुं शकणार नाहीं, त्याप्रमाणें चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरुप आत्म्याकडून प्रकाशित सूर्यही रुपविषयाला प्रकाशित करितो, आत्म्याच्या प्रकाशानें अप्रकाशित सूर्य कोणाचाही प्रकाश करुं शकणार नाहीं, याकरितां सर्व लोकांचें प्रकाशन करणार्या सूर्यादि प्रकाशमान वस्तु, ज्या आत्मप्रकाशानें प्रकाशित होतात तो नित्य ज्ञानरुप आत्मा मी आहे.
यथा सूर्य एकोऽप्त्वनेकश्र्चलासु,
स्थिरात्वप्यनन्यद्विभाव्यद्विभाव्यस्वरुपः ।
चलासु प्रभिन्नाः सुधीष्वेक एव,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ ११ ॥
११) ज्याप्रमाणें चंचल पाण्यामध्यें सूर्य एकच असतांना अनेक रुपांनी दिसतो, तथापि तो वस्तुतः तसा नसतो, त्याप्रमाणें चंचल रुपानें नानाप्रकारें भासणार्या बुद्धीत वस्तुगत्या आत्मा एक असतांना तो निरनिराळा दिसतो, एकाच सूर्याचे ठिकाणीं उपाधिभेदानें अनेकत्व दिसतें, त्याप्रमाणें एकमेवाद्वितीय आत्म्याचे ठिकाणी बुद्धीभेदानें अनेकत्व भासतें; असा जो एकअद्वैत ज्ञानस्वरुप आत्मा, तो मी आहे.
घनच्छन्नदृष्टिर्घनच्छन्नमर्कम्
यथा निष्प्रभं मन्यते चातिमूढः ।
तथा बद्धवद्भाति यो मूढदृष्टेः
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ १२ ॥
१२) ज्याची दृष्टि मेघांनी आच्छादित झाली आहे; असा अज्ञानी मनुष्य मेघांनी सूर्य प्रभाशून्य झाला असें मानतो, त्याप्रमाणें मूढदृष्टि बहिर्मुख लोक नित्यमुक्तस्वरुप आत्मा, बद्ध नसतांनाच, भ्रांतीनें बद्ध झाला आहे असें समजतात; तोच अखंडज्ञानस्वरुप आत्मा मी आहे.
समस्तेषु वस्तुष्वनुस्यूतमेकं,
समस्तानि वस्तूनि यं न स्पृशन्ति ।
वियद्वत्सदा शुद्धमच्छस्वरुपः,
स नित्योपलाब्धिस्वरुपोऽहमात्मा ॥ १३ ॥
१३) जो आकाशादि सर्व वस्तूंत अनुस्यूत म्हणजे ओतप्रोत भरलेला आहे, परंतु त्या वस्तूंकडून त्याला स्पर्शहि केला जात नाहीं, जो आकाशाप्रमाणें समान (व्यापक), सर्वदा शुद्ध व निर्मल आहे; तोच विशुद्ध विज्ञानस्वरुप आत्मा मी आहे.
उपाधौ यथा भेदता सन्मणीनाम्,
तथा भेदता बुद्धिभेदेषु तेऽपि ।
यथा चन्द्रिकाणां जले चंचलत्वं,
तथा चंचलत्वं तवापीह विष्णो ॥ १४ ॥
१४) ज्याप्रमाणें जपकुसुमादि (जास्वंदीचें फूल) उपाधिसंबंधानें निर्मल स्फटिक त्या त्या रंगाप्रामाणें भासतो, त्याप्रमाणें शुद्धाशुद्ध बुद्धिरुप उपाधिभेदानें एकरस शुद्ध आत्मा अनेक रुपांनी प्रतीतीस येतो. किंवा ज्याप्रमाणें हालणार्या पाण्याच्या संबंधानें स्वरुपेंकरुन स्थिर असणार्या चंद्तबिंबाची अस्थिरता प्रतीत होते., त्याप्रमाणें हे विष्णो ! आपल्या अचल, शुद्धस्वरुपाच्या ठिकाणीं बुद्ध्यादि उपाधिसंबंधानें चंचलता प्रतीत होते. परमार्थदृष्टीनें, हे विष्णो ! तूं अखण्ड, अचल, शुद्ध ज्ञानानंदरुपच आहेस.
Custom Search
1 comment:
अप्रतिम! आपले उपक्रम अत्यंत स्तुत्य व वंदनीय आहेत.
अध्यात्मिक उन्नतीसाठी वेलोवेल अशीच स्तोत्रे व
ते हि सार्थ प्रदान केल्याबद्दल श्री केतकर महाराज खूप खूप धन्यवाद / साष्टांग दंडवत !
Post a Comment