Tuesday, April 17, 2018

Samas Pachava Chanchal Lakshan समास पांचवा चंचळ लक्षण


Dashak Pandharava Samas Pachava Chanchal Lakshan 
Samas Pachava Chanchal Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chanchal. Chanchal means not stable. Chanchal is not everywhere, however Parabrahma is everywhere. Chanchal can be seen in everybody., whereas Parbrahma can be experience with acquiring knowledge.
समास पांचवा चंचळ लक्षण
श्रीराम ॥
दोघां ऐसीं तीन चालती । अगुणी अष्टधा प्रकृती ।  
अधोर्ध सांडून वर्तती । इंद्रफणी ऐसी ॥ १ ॥
१) शक्तिमय प्रकृति व जाणीवमय पुरुष या उभयतांच्या मार्गदर्शनाखालीं सत्व, रज व तम हें तीन गुण चालतात. तीन गुण व पंचभूतें मिळून अष्टधा प्रकृति बनतें. दृश्य विश्व व अव्यक्त परब्रह्म एकमेकांच्या उलट असतात. दृश्य जड विश्व जदत्वामुळें कांहीं करुं शकत नाहीं. परब्रह्म निश्चळ म्हणून तें कांहीं करत नाही. म्हणून या दोघांमधें वावरणारी अष्टधा प्रकृति विश्र्वरचनेचा सगळा खेळ खेळते.    
पणतोंडें भक्षितो पणजा । मूल बापास मारी वोजा ।
चुकार्‍या गेला राजा । चौघां जणांचा ॥ २ ॥ 
२) सर्व विश्वाचा राजा आहे परब्रह्म. मूळपुरुष आहे अंतरात्मा. त्याचा मुलगा सत्वगुण किंवा विष्णु. नातु रजोगुण किंवा ब्रह्मदेव. आणि पणतु महेश किंवा तमोगुण. मूळपुरुष अंतरात्मा पणजोबा आहे. अज्ञानाच्यापायीं स्वस्वरुपाचा लोप झाला. आणि इंद्रियसुख भोगण्याच्यापायीं स्वस्वरुपाकडे जाण्याची प्रवृत्ति नाहींशी झाली. यामुळें परब्ह्म हरवते. माणसाला परब्रह्म प्राप्ती होत नाही.   
देव देवाळयामधें लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला ।
सृष्टिमधें ज्याला त्याला । ऐसेंचि आहे ॥ ३ ॥
३) देवळांत देव आहे पण तो लपलेला आहे. देवळाची पूजा केली कीं ती देवाला पावते. जगांत प्रत्येकाच्याबाबतींत असेंच आहे. प्रत्येक पिंडांत अंतरात्मा वास करतो. परंतु त्याचे प्रत्यक्ष दर्शन कोणास करतां येत नाहीं. देहाची पूजा केली कीं ती अंतरात्म्याला पोचतें. 
दोनी नामें येकास पडिली । लोकीं नेमस्त कल्पिलीं ।
विवेकें प्रत्ययें पाहिलीं । तों येकचि नाम ॥ ४ ॥
४) प्रकृति व पुरुष अशी दोन नांवें लोक वापरतात. पण लोकांनींच आपल्या कल्पनेनें ती निर्माण केलीं आहेत. विचारानें आणि अनुभवानें पाहिलें तर मूळ वस्तु एकच आहे असें आढळतें. 
नाहीं पुरुष ना वनिता । लोकीं कल्पिलें तत्त्वता ।
त्याचा बरा शोध घेतां । कांहींच नाही ॥ ५ ॥ 
५) प्रकृति व पुरुष असें म्हणत असतांना स्त्री व पुरुष असा भास होतो. पण तेथें स्त्री नाहीं व पुरुषही नाहीं, ही लोकांची कल्पना आहे. ती कल्पना तपासून पाहिलीं तर मुळांत कांहींच नाहीं असें आढळते. 
स्त्री नदी पुरुष खळाळ । ऐसें बोलती सकळ ।
विचार पाहातां निवळ । देह नाहीं ॥ ६ ॥
६) नदी ही स्त्री व ओढा हा पुरुष असें म्हणतात. पण विचार केलां तर त्यांना कांहीं स्त्री-पुरुषांचे देह नाहीत असें समजते. 
आपण आपणास कळेना । पाहों जातां आकळेना ।
कशास कांहींच मिळेना । उदंडपणें ॥ ७ ॥ 
७) " मी कोण " हें आपलें आपल्यालाच कळत नाहीं. तें पहायला गेले तर खरा मी आकलन होत नाहीं. अफाटपणामुळें कशाचा कशाशींच मेळ बसत नाहीं.    
येकलाचि उदंड जाला । उदंडचि येकला पडिला ।
आपणासी आपला । गल्बला सोसवेना ॥ ८ ॥
८) आपण अंतरात्मा आहोत, अंतरात्मा एकटाच आहे. त्यानें असंख्य रुपें धारण केली. पण त्या असंख्य रुपांत तो एकटाच भरलेला. आपण स्वतः पुष्कळ झाला पण हा पुश्कळपणाचा पसारा त्याला नकोसा झाला.   
येक असोन फुटी पडिली । फुटी असोन स्थिति येकली ।
विचित्र कळा पैसावली । प्राणिमात्रीं ॥ ९ ॥
९) तो एकच आहे पण पुष्कळ किंवा अनेक झाल्यासारखा फुटल्यानें दिसतो. पण त्याच्या एकटेपणामधें फरक पडला नाही. ही त्याची कला सर्व प्राणीमात्रांत पसरलेली आहे.  
वल्लीमधें जळ संचरे । कोरडेपणें हें वावरे ।
वोलेवांचून न थिरे । कांहीं केल्यां ॥ १० ॥
१०) वनस्पती पाणी भरुन असते. ओलावा असल्याखेरीज वनस्पती जगूंच शकत नाहीं. पण बाहेरुन ती कोरडी असते.  
झाडांमधें केलीं आळीं । झाडें धांवती निराळीं ।
कित्येक झाडें अंतराळीं । उडोन जाती ॥ ११ ॥
११) झाडांना पाणी मिळावे म्हणून त्यांच्या मुळाशी आळें करतात. पाणी मिळाल्यावर झाडें उंच आकाशांत वाढतात. कांहीं झाडें आकाशांत उडून जातात. झाडांच्या अंतर्यामीं मुळापासून शेंड्यापर्यंत पाणी भरलेले असते, पण बाहेरुन ती कोरडी दिसतात. त्याचप्रमाणें अंतरात्मा सर्व प्राण्यांत भरलेला आहे पण तो बाहेरुन दिसत नाही. येवढेंच.  
भूमीपासून वेगळीं जालीं । परी तें नाहींत वाळलीं ।
निराळींच बळावलीं । जेथतेथें ॥ १२ ॥
१२) कांहीं झाडें भूमीपासून वेगळी झालीं तरी वाळत नाहींत. आकाशांत वास्तव्य करुन त्यांची आपापल्या जागीं वाढ होतें. 
देवाकरितां चालती झाडें । देव नस्तां होती लाकडें ।
नीटचि आहे कुवाडें । सर्वथा नव्हे ॥ १३ ॥
१३) अंतरात्म्यामुळें झाडें चालतात. त्यांचया अंतर्यामी नसेल  तर  ती नुसती लाकडे होतात. यांत कांहीं गुप्त नाहीं. हें सगळें उघड आहे.    
झाडापासून झाडें होती । तेहि अंतरीक्ष जाती ।
मुळानें भेदिली जगती । कदापि नाहीं ॥ १४ ॥
१४) झाडापासून झाडें होतात. पण ती झाडें देखील आकाशांत उंच वाढतात. त्यांच्या मुळांनी पृथ्वीचा भेद केला असें कधीं होत नाहीं.
झाडास झाडें खतपाणी । घालून पाळिलीं प्रतिदिनीं ।
बोलकीं झाडें शब्दमथनीं । विचार घेती ॥ १५ ॥
१५) झाडाचेंच खतपाणी दुसर्‍या झाडांना मिळते. प्रत्येक दिवशीं त्यांचे पालन व पोषण घडते. झाडांच्यापैकीं जी बोलकी झाडें आहेत, तीं शब्दांचे मंथन करतात. आणि त्यांतील अर्थ अगर विचार ग्रहण करतात. माणसें इतर माणसांना सांभाळतात व शिकवतात. 
होणार तितुके आधींच जालें । मग कल्पकल्पून बोलिलें ।
जाणतयासी समजलें । सकळ कांहीं ॥ १६ ॥
१६) जें काय व्हावयाचे तें आधींच होऊन गेलें आहे. परंतु विचारवंत लोक त्याबद्दल निरनिराळ्या कल्पना करुन सांगतात. पण या सामान्य कल्पनाच असतात. जें खरें जाणणारे असतात त्यांना हें सगळें माहीत असतें. 
समजलें तरी उमजेना । उमजलें तरी समजेना ।
प्रत्ययेंविण अनुमानेना । सकळ कांहीं ॥ १७ ॥  
१७) एखाद्याला तर्कानें कळतें तरीं त्याचें रहस्य ध्यानांत येत नाहीं. एखाद्याच्या लक्षांत समजा आलें तरी त्याची तर्कानें संगती लावता येत नाहीं. स्वानुभवाखेरीज आत्मसाक्षात्कारावांचून या सगळ्याची बरोबर कल्पना करतां येत नाहीं. 
सर्वत्रांचा वडिल कोण । हेचि पाहावी वोळखण ।
भेटे आपणास आपण । जगदांतरें ॥ १८ ॥   
१८) या विश्वांत सर्व तत्त्वांचा मूळ जनक कोण आहे याची ओळख करुन घ्यावीं. मग जगाच्या अंतर्यामी आपल्याला आपलीच भेट होईल. आपण जगाच्या अंतर्यामीं भरुन आहोत असा अनुभव येईल.      
अंतरनिष्ठांची उंच कोटी । बाहेरमुद्र्याची संगती खोटी ।
मूर्ख काये समजेल गोष्टी । शाहाणे जाणती ॥ १९ ॥
१९) अंतर्मुख होऊन अंतरात्म्याशी स्थिर होणार्‍या पुरुषाची पातळी फार श्रेष्ठ असते. जे केवळ बहिर्मुख असतात त्यांची संगत बेकार असते. या गोष्टी मूर्खांना समजत नाहींत, शहाण्यांना मात्र त्या समजतात.  
अंतरें राखतां राजी । भलत्यास भलताच नवाजी ।
अंतरें न राखतां भाजी । मिळणार नाहीं ॥ २० ॥
२०)  आपण जर लोकांचें अंतःकरण खूष ठेवलें तर कोणी कोणाला मदत करतो, उपयोगी पडतो, पण लोकांना खूष ठेवलें नाहीं तर मात्र भाजीसुद्धा खायला मिळणार नाहीं. 
ऐसें वर्ततें प्रत्यक्ष । अलक्षीं लावावें लक्ष ।
दक्षास भेटतां दक्ष । समाधान होतें ॥ २१ ॥
२१) जगांतील व्यवहार हा असा आहे. प्रत्यक्ष अनुभव तसाच आहे. अलक्ष म्हणजे जेथें लक्ष लागणें कठीण जाते, असें स्वस्वरुप; तेथें लक्ष लवावे. अलक्षी लक्ष लावण्यांत जो तत्पर असतो त्यास दुसरा तसाच माणूस भेटला कीं समाधान होतें.    
मनास मिळतां मन । पाहोन येती निरंजन ।
चंचळचक्र उलंघून । पैलाड जाती ॥ २२ ॥
२२) आपलें मन दुसर्‍याच्या मनाशी तदाकार करतां येऊं लागले कीं निरंजन परमात्मस्वरुप अनुभवण्याची शक्ती येते. चंचळाचें चक्र ओलांडून पलीकडे जातां येतें. आपला मीपणा विरतो, कल्पना विराम पावतें. आणि वेगळेपण खुंटते. चंचळांतून पलीकडे जाण्यास हें उपयोगी पडते. 
येकदा जाऊन पाहोन आले । मग तें सन्निध देखिलें ।
चर्मचक्षीं लक्षिलें । न वचे कदा ॥ २३ ॥
२३) चंचळ ओलांडून जो एकदां निश्र्चळ ब्रह्म पाहून येतो, त्यास तें स्वतःच्या सन्निधच दिसूं लागतें. आपल्या साध्या डोळ्यांनीं तें कधी पाहतां येत नाहीं. ज्ञानदृष्टीनें तें पाहावे लागतें.    
नाना शरीरीं चंचळ । अखंड करी चळवळ ।
परब्रह्म तें निश्र्चळ । सर्वां ठाईं ॥ २४ ॥
२४) चंचलरुप मन नाना प्रकारच्या देहांमध्यें अखंड चळवळ करीत असते. पण परब्रह्म मात्र निश्र्चळ असून सर्व ठिकाणीं राहते.  
चंचळ धांवे येकीकडे । वोस पडे दुसरेकडे ।
चंचळ पुरे सर्वांकडे । हे तो घडेना ॥ २५ ॥
२५) चंचळ आकुंचित व मर्यादित आहे. एका बाजूस तें गेलें कीं दुसरी बाजू ओस पडते. चंचळ सर्व ठिकाणीं पुरें पडूं शकत नाहीं.  
चंचळ चंचळास पुरेना । आवघें चंचळ विवरेना ।
निश्र्चळ अपार अनुमाना । कैसें येते ॥ २६ ॥
२६) चंचळ चंचळास पुरत नाही. अपुरें पडतें. चंचळानें चंचळाचा सारा विस्तार आकलन होत नाहीं. आणि निश्र्चळ तर अपारच असल्यानें तें माणसाच्या कल्पनेंत येऊंच शकत नाहीं. माणसाचें मन चंचळ पण तें चंचळाचे समग्र ज्ञान करुन घेऊं शकत नाहीं.    
गगनीं चालिली हवावी । कैसी पावेल पार पदवी ।
जातां मधेंचि विझावी । हा स्वभावचि तिचा ॥ २७ ॥   
२७) दारुचा बाण आकाशांत उडवला तर तो खूप वर जातो, परंतु तो आकाश ओलांडून पलीकडे जाऊं शकत नाहीं. तो मध्येंच विझतो. आणि असें होणें हा त्याचा स्वाभाविक गुण आहे.      
मनोधर्म येकदेशी । कैसा आकळिल वस्तुसी ।
निर्गुण सांडून अपेसी । सर्व ब्रह्म म्हणे ॥ २८ ॥
२८) त्याचप्रमाणें मानवाचें मन एकदेशीं आहे आणि परब्रह्म सर्वदेशी आहे. म्हणून मन परब्रह्मास जाणूं शकत नाहीं. परब्रह्म शोधतां शोधतां मन मध्येंच पराभूत होतें. अशी अपयशी माणसें निर्गुण सोडून सर्वच ब्रह्म आहे असें म्हणूं लागतात.     
नाहीं सारासारविचार । तेथें अवघा अंधकार ।
खरें सांडून खोटें पोर । नेणतें घेतें ॥ २९ ॥
२९) जेथें सारासार विचार नसतो, तेथें सारा अज्ञानाचा अंधार असतो. अजाण पोर ज्याप्रमाणें खरें टाकून खोटें घेतें, त्याप्रमाणेम अज्ञानी माणूस सार टाकून असार घेतो.   
ब्रह्मांडाचें माहाकारण । तेथून हें पंचीकर्ण ।
माहावाक्याचें विवर्ण । वेगळें असे ॥ ३० ॥
३०) ब्रह्मांडाचा महाकारण देह म्हणजेच मूळमाया होय. तिच्यांतून पंचभूतें व पंचभूतांतून पंचीकरण झालें. परंतु महावाक्याचे विवरण कांहीं वेगळें आहे. ते पंचीकरणाच्या कक्षेंत येत नाहीं. 
महत्तत्त्व महद्भूत । तोचि जाणावा भगवंत ।
उपासना हे समाप्त । येथून जाली ॥ ३१ ॥
३१) महत् तत्व म्हणजे सर्व तत्त्वांमधील श्रेष्ठ तत्व होय. ते म्हणजे शुद्ध जाणीव किंवा जगत्ज्योती किंवा अंतरात्मा होय. नहत्भूत म्हणजे झालेल्या वस्तूंमध्यें मोठी वस्तु होय. ती म्हणजे गुणसाम्य असणारी मूळमाया होय. महत् तत्त्व व महत् भूत यानांच भगवंत म्हणतात. उपासना होण्यासाठी जीच व शीच ही जोडी लागते. पण जीव शीवरुप बनला कीं ज्ञान होऊन उपासना संपते. म्हणून महत् तत्त्वापाशीं उपासना संपते.    
कर्म उपासना आणि ज्ञान । त्रिकांड वेद हें प्रमाण ।
ज्ञानाचें होतें विज्ञान । परब्रह्मी ॥ ३२ ॥
३२) कर्म, उपासना व ज्ञान असे वेदाचे तीन भाग आहेत. वेदांची हद्द ज्ञानापर्यंतच असते. परब्रह्माचा साक्षात् अनुभव आला कीं ज्ञानाचे विज्ञान होते. विज्ञान वेदांच्या पलीकडे आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चंचळलक्षणनिरुपणनाम समास पांचवा ॥ 
Samas Pachava Chanchal Lakshan
समास पांचवा चंचळ लक्षण
  



Custom Search

No comments: