Dashak Pandharava Samas Choutha Shashwat Brahma Nirupan
Samas Choutha Shashwat Brahma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Brahma. Brahma is permanent. Maya is not permanent. Naything which is created get destroyed. Anything which come it goes over a certain period of time. However Brahma is always there.
समास चौथा शाश्वतब्रह्म निरुपण
श्रीराम ॥
पृथ्वीपासून जालीं झाडें । झाडापासून होती लांकडें ।
लांकडें भस्मोन पुढें । पृथ्वीच होये ॥ १ ॥
१) पृथ्वीपासून झाडें होतात. झाडांपासून लाकडें होतात. लाकडें जळून त्याची राख होतें. राख वा माती म्हणजे पृथ्वीच होय.
पृथ्वीपासून वेल होती । नाना जिनस फापावती ।
वाळोन कुजोन मागुती । पृथ्वीच होये ॥ २ ॥
२) पृथ्वीपासून वेल होतात. त्यांच्यावर पानें, फुलें, फळें वगैरे नाना पदार्थ फोफावतात. ते वाळतात व कुजतात अखेर त्यांची पृथ्वीच होते.
नानाा धान्यांचीं नाना अन्नें । मनुष्यें करिती भोजनें ।
नाना विष्ठा नाना वमनें । पृथ्वीच होये ॥ ३ ॥
३) निरनिराळ्या धान्यांची निरनिराळीं अन्नें होतात, माणसें तीं खतात. त्या अन्नाची अखेर विष्ठा होते, वमने होतात म्हणजे अखेर मातीच होते.
नाना पक्षादिकीं भक्षिलें । तरीं पुढें तैसेंचि जालें ।
वाळोन भस्म होऊन गेलें । पुन्हा पृथ्वी ॥ ४ ॥
४) निरनिराळ्या पक्ष्यांनी व पशूंनी धान्य भक्षण केलें तरी त्याची नंतर विष्ठाच होते. ती वाळून भूगा झाला म्हणजे मातीच होते.
मनुष्यें मरतां ऐका । क्रिमि भस्म कां मृत्तिका ।
ऐशा काया पडती अनेका । पुढें पृथ्वी ॥ ५ ॥
५) माणूस मेला कीं त्याला जाळतात किंवा मातींत पुरतात किंवा कृमींना खायला देतात. अशी कितीतरी मानवी शरीरें मरतात. त्या सर्वांची अखेर मातीच होते.
नाना तृण पदार्थ कुजती । पुढें त्याची होये माती ।
नाना किडे मरोन जाती । पुढें पृथ्वी ॥ ६ ॥
६) अनेक वनस्पती, गवत कुजतें शेवटी त्याची मातीच होते. कितीतरी किडे मरुन जातात व शेवटी त्यांची मातीच बनते.
पदार्थ दाटले अपार । किती सांगावा विस्तार ।
पृथ्वीवांचून थार । कोणास आहे ॥ ७ ॥
७) जगांत अगणिक पदार्थ भरलेले आहेत. त्यांचा सगळा विस्तार सांगणें शक्य नाहीं. पण त्या सर्वांना अखेर पृथ्वीचाच आधार आहे.
झाड पाले आणि तृण । पशु भक्षितां होतें सेण ।
खात मूत भस्म मिळोन । पुन्हा पृथ्वी ॥ ८ ॥
८) पशु झाडपाला, गवत वगैरे खातात, खाल्ल्यावर त्याचे शेण बनते. खत, मूत, राख यांची अखेर मातीच होते.
उत्पत्तिस्थितिसंव्हारतें । तें तें पुथ्वीस मिळोन जातें ।
जितुकें होतें आणि जातें । पुन्हा पृथ्वी ॥ ९ ॥
९) जें जें कांहीं निर्माण होते तें कांहीं काल टिकते आणि अखेर नाश पावतें, त्याची अखेर मातीच होते. जें जें होतें व जातें त्याची शेवटी माती बनतें.
नाना बीजांचिया रासी । विरढोन लागती गगनासी ।
पुढें सेवटीं पृथ्वीसी । मिळोन जाती ॥ १० ॥
१०) अनेक बीजांच्या राशी पेरल्यावर उगवतात, वाढत वाढतजणूंआकाशाला भिडतात पण शेवटी त्या मातींत मिसळून जातात.
लोक नाना धातु पुरिती ॥ बहुतां दिवसां होये माती ।
सुवर्णपाषाणाची गती । तैसीच आहे॥ ११ ॥
११) निरनिराळे धातु जमिनींत पुरुन ठेवतात. पुष्कळ काळ झाल्यावर त्यांची मातीच होते. सोनें व पाषाण यांची तीच गत होतें.
मातीचें होतें सुवर्ण । आणी मृत्तिकेचे होती पाषाण ।
माहा अग्निसंगें भस्मोन । पृथ्वीच होये ॥ १२ ॥
१२) मातीचें सोनें बनतें. मातीचाच पाषाण बनतो. मोठ्या अग्नीनें पाषाणाची राख होतें. म्हणजे अखेर त्याची मातीच होते.
सुवर्णाचें जर होतें । जर सेवटीं कुजोन जातें ।
रस होऊन वितुळतें । पुन्हा पृथ्वी ॥ १३ ॥
१३) सोन्यापासून जर तयार करतात. जर शेवटीं कुजून जाते. ती वितळून त्याचा रस होतो. परंतु पुन्हा मातीच होते.
पृथ्वीपासून धातु निपजती । अग्निसंगें रस होती ।
तया रसाची होये जगती । कठीणरुपें ॥ १४ ॥
१४) पृथ्वीपासून धातु होतात. अग्नीनें त्यांचा रस होतो. त्या रसाचा पुनः कठीण पदार्थ होतो. तो पृथ्वीच होय.
नाना जळासी गंधी सुटे । तेथें पृथ्वीचें रुप प्रगटे ।
दिवसेंदिवस जळ आटे । पुढें पृथ्वी ॥ १५ ॥
१५) पुष्कळवेळां पाण्याला वास येतो. वास किंवा गंध हा पृथ्वीचा गुण आहे. म्हणून ज्या पाण्याला वास येतो त्यांत पृथ्वीचा अंश आहे. पाणी हळुहळु आटुन शेवटी पृथ्वीच उरते.
पत्रें पुष्पें फळें येती । नाना जीव खाऊन जाती ।
ते जीव मरतां जगती । नेमस्त होये ॥ १६ ॥
१६) पृथ्वीवर अनेक पानें, फुलें, फळें येतात. अनेक प्राणी ते खातात. ते प्राणी मेल्यावर अखेर त्यांची मातीच बनते.
जितुका कांहीं जाला आकार । तितुक्यास पृथ्वीचा आधार ।
होती जाती प्राणीमात्र । सेवट पृथ्वी ॥ १७ ॥
१७) जी जी वस्तु आकार धारण करतें, त्या त्या वस्तुला पृथ्वीचाच आधार असतो. पुष्कळ प्राणी जन्माला येतात व मरतात या सर्वांचा शेवट अखेर पृथ्वीमधें होतो.
हें किती म्हणौन सांगावें । विवेकें अवघेंचि जाणावें ।
खांजणीभजणीचें समजावें । मूळ तैसें ॥ १८ ॥
१८) हें जितकें सांगावें तितकें कमीच आहे. आपण विवेकानें सगळें समजून घ्यावें. विश्वाच्या उभारणीचें व संहारणीचें मूळ यांत आहें हें ओळखावें.
आप आळोन पृथ्वी जाली । पुन्हां आपींच विराली ।
अग्नियोगें भस्म जाली । म्हणोनियां ॥ १९ ॥
१९) पाणी आटून पृथ्वी झाली. पण पुढें अग्नीनें जळून भस्म झाली. कीं ती पुन्हा पाण्यांत विरुन जाते.
आप जालें तेजापासूनी । पुढें तेजें घेतलें सोखुनी ।
तें तेज जालें वायोचेनी । पुढें वायो झडपी ॥ २० ॥
२०) तेजापासून आप निर्माण होते. पण पुढें तेजच त्यास शोषून घेतें. तेज वायूपासून निर्माण होतें, पुढें वायुच त्यास विझवून टाकतो.
वायो गगनीं निर्माण जाला । पुढें गगनींच विराला ।
ऐसें खांजणीभांजणीला । बरें पाहा ॥ २१ ॥
२१) वायु आकाशापासून निर्माण होतो पण पुढें तो आकाशांतच लीन होऊन जातो. विश्वाच्या उभारणी संहारणीचा विचार अशा पद्धतीनें करावा.
जें जें जेथें निर्माण होतें । तें तें तेथें लया जातें ।
येणें रितीं पंचभूतें । नाश पावती ॥ २२ ॥
२२) जें जें ज्याच्यापासून निर्माण होतें तें तें अखेर त्याच्यामधेच लयास जातें. याच नियमानें पंचभूतांचा नाश घडून येतो.
भूत म्हणिजे निर्माण जालें । पुन्हां मागुतें निमालें ।
पुढें शाश्वत उरलें । परब्रह्म तें ॥ २३ ॥
२३) भूत शब्दाचा अर्थ " जें कांहीं निर्माण झालें तें " असा आहे. म्हणून पंचभूतें नाश पावतात. त्यानंतर शाश्वतपणें जें उरतें तें परब्रह्म होय.
तें परब्रह्म जों कळेना । तो जन्ममृत्य चुकेना ।
चत्वार खाणी जीव नाना । होणें घडे ॥ २४ ॥
२४) तें परब्रह्म जोपर्यंत कळत नाहीं, तोपर्यंत जन्म-मृत्यु चुकत नाहींत. चार खाणीमध्यें अनेक जीवांच्या रुपानें जन्म घ्यावा लागतो.
जडाचें मूळ तें चंचळ । चंचळाचें मूळ तें निश्र्चळ ।
निश्र्चळासी नाहीं मूळ । बरें पाहा ॥ २५ ॥
२५) जडाचें मूळ चंचळामधें आहे. आणि चंचळाचें मूळ निश्र्चळामधें आहे. पण निश्र्चळाचें मूळ आणखीं कशांत नाहीं हें नीट समजून घ्यावें.
पूर्वपक्ष म्हणिजे जालें । सिद्धांत म्हणिजे निमाले ।
पक्षातीत जें संचलें । परब्रह्म तें ॥ २६ ॥
२६) जें निर्माण झालें तें दृश्य विश्व खरें मानणें, हा पूर्वपक्ष होय. जें निर्माण झालें तें दिसलें तरी खरें नाहीं हा सिद्धान्त पक्ष होय. या दोन्ही पक्षांच्या पलीकडे असून जें सर्वत्र भरलेलें आहें तें परब्रह्म होय.
हें प्रचितीनें जाणावें । विचारें खुणेसी बाणावें ।
विचारेंविण सिणावें । तेंचि मूर्खपणें ॥ २७ ॥
२७) प्रचितीनें याचे ज्ञान करुन घ्यावें. विचारानें त्याची खूण अगदीं पक्की ध्यानांत ठेवावी.विचारवांचून फुकट श्रम करणें मूर्खपणाचें असतें.
ज्ञानी भिडेनें दडपला । निश्र्चळ परब्रह्म कैंचे त्याला ।
उगाच करितो गल्बला । मायेंमधें ॥ २८ ॥
२८) एखादा ज्ञानमार्गी माणूस मायेच्या भिडेला बळी पडला तर त्याला निश्चळ परब्रह्म प्राप्त होणार नाहीं. तो मायेच्या कक्षेमधें उगीच गडबड करत राहतो.
माया निशेष नासली । पुढें स्थिति कैसी उरली ।
विचक्षणें विवरिली । पाहिजे स्वयें ॥ २९ ॥
२९) माया संपूर्ण नाश पावली म्हणजे मग अवस्था उरत नाहीं. ही गोष्ट चतुर माणसानें स्वतः विचारानें समजून घ्यावी.
निशेष मायेचें निर्शन । होतां आत्मनिवेदन ।
वाच्यांश नाहीं विज्ञान । कैसें जाणावें ॥ ३० ॥
३०) माया निःशेष निरास पावली कीं खरें आत्मनिवेदन घडते. ज्या ठिकाणीं शब्द पोचूं शकत नाहीं त्या विज्ञानाचे ज्ञान स्वानुभवावांचून घडणें शक्य नाहीं.
लोकांचे बोली जो लागला । तो अनुमानेंच बुडाला ।
याकारणें प्रत्ययाला । पाहिलेंच पाहावें ॥ ३१ ॥
३१) लोक बोलतात त्याच्या नादीं जो लागतो तो अनुमानाच्या चंचळपणानें बुडतो किंवा वाया जातो म्हणून साधकानें पुनः पुनः अनुभवाच्या ज्ञानाकडे वळावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे शाश्र्वतब्रह्मनिरुपणनाम समास चौथा ॥
Samas Choutha Shashwat Brahma
समास चौथा शाश्वतब्रह्म निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment