Dashak Pandharava Samas Aathava Sookshmajiv Nirupan
Samas Aathava Sookshmajiv Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Jiv Shrushti.
समास आठवा सूक्ष्मजीव निरुपण
श्रीराम ॥
रेणूहून सूक्ष्म किडे । त्यांचे आयुष्य निपटचि थोडें ।
युक्ति बुद्धि तेणेंचि पाडें । तयामधें ॥ १ ॥
१) धुळीच्या कणांतसुद्धा अगदी लहान असें सूक्ष्म किडे आहेत. जसा त्याचा ाकार लहान तसेंच त्यांचे आयुष्यही अल्प असते. त्यांची युक्ति व बुद्धिही तशीच अल्प असते.
ऐसें नाना जीव असती । पाहों जातां न दिसती ।
अंतःकर्णपंचकाची स्थिती । तेथेंहि आहे ॥ २ ॥
२) असें अनेक प्रकारचे जीव असतात. साध्या डोळ्यांनीं तें दिसत नाहीत. परंतु त्यांच्यामध्यें देखील अंतःकरण, मन, बुद्धि, चित्त व अहंकार या पंचकाचे सूक्ष्म अस्तित्व असते.
त्यांपुरतें त्यांचें ज्ञान । विषये इंद्रियें समान ।
सूक्ष्म शरीरें विवरोन । पाहातो कोण ॥ ३ ॥
३) त्यांचा जीव केवढासा पण त्यांच्यापुरतें त्यांचें ज्ञान असते. त्यांची इंद्रियें व त्यांचे भोग तसेच असतात. पण हीं सूक्ष्म शरीरें कोणी नीट विवरुन समजून घेत नाहीं.
त्यास मुंगी माहा थोर । नेणों चालिला कुंजर ।
मुंगीस मुताचा पूर । ऐसें बोलती ॥ ४ ॥
४) ते किडे इतके लहान असतात कीं त्यांना मुंगीसुद्धा प्रचंड मोठी आहे असें वाटते. एखाद्या हत्ती येवढा तीचा आकार मोठा आहे असें त्यांना वाटते. पण आपल्यादृष्टीनें मुंगी फारच लहान आहे. मुंगी माणसाच्या मुताचा पूर आहे असें म्हणतात.
तें मुंगीसमान शरीरें । उदंड असती लाहानथोरें ।
समस्तांमध्यें जीवेश्र्वरें । वस्ति कीजे ॥ ५ ॥
५) मुंगीच्या शरीराएवढे शरीर असणारे लहानमोठे जीव तर पुष्कळच आहेत. त्या सगळ्यांमध्यें जीवाचा ईश्र्वर वास करतो.
ऐसिया किड्यांचा संभार । उदंड दाटला विस्तार ।
अत्यंत साक्षपी जो नर । तो विवरोन पाहे ॥ ६ ॥
६) अशा किड्यांची संख्या फार मोठी आहे. जिकडेतिकडे ते दाटीवाटीनें पसरलें आहेत. अतिशय कष्टाळू व जिज्ञासू माणूस त्यांचे निरिक्षण करुन त्यांचे ज्ञान मिळवितो.
नाना नक्षत्रीं नाना किडे । त्यांस भासती पर्वतायेवढें ।
आयुष्यहि तेणेंचि पाडें । उदंड वाटे ॥ ७ ॥
७) निरनिराळ्या नक्षत्रांवर निरनिराळ्या प्रकारचे किडे निर्माण होतात. माणसाला त्यांची कल्पना येत नाही. पृथ्वीवरील किडामुंगीच्या मानानें ते पर्वताएवढे भासतात. त्याच मोजमापानें त्यांचे आयुष्यही फारच मोठें असतें.
पक्षायेवढे लाहान नाहीं । पक्षायेवढें थोर नाहीं ।
सर्प आणि मछ पाहीं । येणेंचि पाडें ॥ ८ ॥
८) पक्ष्यांच्या समुदायांत कांहीं अतिशय लहान असतात. तर कांहीं अतिशय मोठे असतात. साप व मासेसुद्धा असे लहानापासून अतिशय मोठ्या आकाराचे आढळतात.
मुंगीपासून थोरथोरें । चढतीं वाढतीं शरीरें ।
त्यांचीं निर्धारितां अंतरें । कळों येती ॥ ९ ॥
९) मुंगी अति लहान असते तिच्यापासून सुरवात करुन पाहिलें तर पुढील प्राण्यांचे देह एकाहून एक मोठे आढलतात. आपण जर नीट निरिक्षण करुन विचार केला तर त्यांची मनोरचना कळून येते.
नाना वर्ण नाना रंग । नाना जीवनाचे तरंग ।
येक सुरंग येक विरंग । किती म्हणौनि सांगावे ॥ १० ॥
१०) प्राण्यांचे नाना तर्हेचे रंग, वर्ण, त्यांच्या जीवनांतील तरंग किंवा हालचाली, कांही प्राण्यांचे सुंदर रंग, काहींचे घाणेरडे रंग अशी सर्व माहिती सांगणें शक्य नाहीं.
येकें सकुमारें येकें कठोरें । निर्माण केलीं जगदेश्र्वरें ।
सुवर्णासारिखीं शरीरें । दैदिप्यमानें ॥ ११ ॥
११) कांहीं प्राण्यांचे शरीर मऊ, नाजूक असतें. तर काहींचें कठीण व कडक असते.परंतु हे सर्व प्राणी जगदीश्र्वरानेच निर्माण केले आहेत. कांहींचे देह तर सोन्याप्रमाणें चकाकतात.
शरीरभेदें आहारभेदें । वाचाभेदें गुणभेदें ।
अंतरीं वसिजे अभेदें । येकरुपें ॥ १२ ॥
१२) आपण जे प्राणी पाहतो त्याच्यांत खाण्यापिण्याचे, शरीररचनेचे आवाजाचे आणि गुणांचे भेद दिसतात. यांत शंका नाहीं पण प्रत्येक प्राण्यांत राहणार्या अंतरात्म्यामध्यें भेद नाहीं. तो एकच एक आहे.
येक त्रासकें येक मारकें । पाहो जातां नाना कौतुकें ।
कितीयेक आमोलिकें । सृष्टीमध्यें ॥ १३ ॥
१३) एकादा प्राणी चिडका असतो. तर दुसरा मारका असतो. आपण जर नीट निरिक्षण केलें तर या सृष्टीमध्यें अनेकप्रकारची अशी अमोलिक आश्र्चर्ये बघावयास मिळतात.
ऐसीं अवघीं विवरोन पाहे । ऐसा प्राणी कोण आहे ।
आपल्यापुरतें जाणोन राहे । किंचितमात्र ॥ १४ ॥
१४) सृष्टीमधील हीं अमोल कौतुकें नीट निरीक्षण करणारा कोणी भेटत नाहीं. जो तो आपापल्यापुरतें अल्प ज्ञान मिळवतो व जगत असतो.
नवखंड हे वसुंधरा । सप्तसागरांचा फेरा ।
ब्रह्मांडाबाहेरील नीरा । कोण पाहे ॥ १५ ॥
१५) नउ खंड मिळून पृथ्वीचा विस्तार आहे. तिच्या भोवतीं सात समुद्रांचा वेढा आहे. पण ब्रह्मांडाच्या बाहेर असणारे पाणी कोणीच पाहात नाहीं.
त्या नीरामध्यें जीव असती । पाहों जातां असंख्याती ।
त्या विशाळ जीवांची स्थिती । कोण जाणे ॥ १६ ॥
१६) त्या पाण्यांत अक्षरशः असंख्य जीव आहेत. त्या प्रचंड विशाल जीवांची स्थिती कोणालाही माहित नाहीं.
जेथें जीवन तेथें जीव । हा उत्पत्तीचा स्वभाव ।
पाहातां याचा अभिप्राव । उदंड असे ॥ १७ ॥
१७) जेथें पाणी तेथें जीवन आहेच आहे. हा ञत्पत्तीचा नियम, स्वभावच फार मोठा आहे.
पृथ्वीगर्भीं नाना नीरें । त्या नीरामधें शरीरें ।
नाना जीनस लाहानथोरें । कोण जाणे ॥ १८ ॥
१८) पृथ्वीच्या पोटांत पुष्कळ प्रकारचे पाणी असते. त्या पाण्यांत जीव आहेत. अनेकप्रकारचे लहानमोठे पदार्थ आहेत. त्यांचें ज्ञान कोणाला नसतें.
येक प्राणी अंतरिक्ष असती । तेहीं नाहीं देखिली क्षिती ।
वरीच्यावर उडोन जाती । पक्ष फुटल्यानंतरें ॥ १९ ॥
१९) कांहीं प्राणी आकाशांत असतात. त्यांनी पृथ्वी कधीं पाहिलेलीच नसतें. वर आकाशामतच त्यांना पंख फुटतात मग ते वरच्यावर उडून जातात.
नाना खेचरें आणि भूचरें । नाना वनचरें आणि जळचरें ।
चौर्यासि योनीप्रकारें । कोण जाणे ॥ २० ॥
२०) चौर्यांशीं योनींत अनेक प्रकारचे आकाशांत राहणारे, पृथ्वीवर राहणारे, जंगलांत राहणारे, आणि पाण्यांत राहणारे जीवप्राणी आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणास नसतें.
उष्ण तेज वेगळें करुनी । जेथें तेथें जीवयोनी ।
कल्पनेपासुनी होती प्राणी । कोण जाणे ॥ २१ ॥
२१) एक उष्ण अग्नि सोडला तर इतर सर्व ठिकाणीं जीवप्राणी आढळतात. इतकेंच काय पण कल्पनेपासून देखील प्राणी निर्माण होतात. त्यांचें ज्ञान कोणालाच नसतें.
येक नाना सामर्थ्ये केलें । येक इच्छेपासून जाले ।
येक शब्दासरिसे पावले । श्रापदेह ॥ २२ ॥
२२) त्याचप्रमाणें कांहीं प्राणी सिद्धिने, सामर्थ्याने निर्माण होतात. कांहीं इच्छेपासून तर इतरकांहीं शापामुळें निर्माण होतात.
येक देह बाजीगरीचे । येक देह वोडंबरीचे ।
येक देह देवतांचे । नाना प्रकारें ॥ २३ ॥
२३) कांहीं देह माणसाच्या जादुगिरीमुळें होतात. तर कांहीं राक्षसाच्यां मायेने होतात. तर कांहीं देवांच्या देहाचे प्रकार आहेत.
येक क्रोधापासून जाले । येक तपापासून जन्मले ।
येक उश्रापें पावले । पूर्वदेह ॥ २४ ॥
२४) कांहीं देह क्रोधापासून तर कांहीं तपश्र्चर्येंतून जन्मास येतात. कांहीं उःशापाने शापदेह सोडून मुळाच्या देहांत येतात.
ऐसें भगवंताचें करणें । किती म्हणौन सांगणें ।
विचित्र मायेच्या गुणें । होत जातें ॥ २५ ॥
२५) भगवंताचें कर्तृत्व असें विलक्षण आहे. तें सगळें वर्णन करणें शक्य नाहीं. माया मोठी विचित्र आहे. तिच्या योगानें हें सर्व घडून येते.
नाना अवघड करणी केली । कोणीं देखिली ना ऐकिली ।
विचित्र कळा समजली । पाहिजे सर्वे ॥ २६ ॥
२६) मायेनें अशी कांहीं कठिण करणी करुन ठेवली आहे कीं, तशी कोणी पाहिली नाहीं. ऐकली नाहीं. मायेची ही संपूर्ण कला समजून घ्यावी.
थोडे बहुत समजले । पोटापुरती विद्या सिकलें ।
प्राणी उगेंच गर्वे गेलें । मी ज्ञाता म्हणोनी ॥ २७ ॥
२७) एखाद्याला जर थोडें समजले, तो पोटापुरता विद्या शिकला तर त्याला " मी मोठा जाणता आहे " असा गर्व चढतो. व तो माणूस वाया जातो.
ज्ञानी येक अंतरात्मा । सर्वांमधें सर्वात्मा ।
त्याचा कळावया महिमा । बुद्धि कैंची ॥ २८ ॥
२८) जगामध्यें एक अंतरात्मा तेवढा एक खरा ज्ञानी आहे. तोंच सर्वांच्या अंतर्यामी आत्मरुपानें राहतो. त्याचा महिमा आकलन होण्याइतकी बुद्धि फारच कमी आढळते.
सप्तकंचुक ब्रह्मांड । त्यांत सप्तकंचुक पिंड ।
त्या पिंडामधें उदंड । प्राणी असती ॥ २९ ॥
२९) पंचमहाभूतें, अहंकार व महत्तत्व हीं सात वेष्टनें ब्रह्मांडाची आहेत. त्यांत राहणार्या पिंडाला पण तशीच सात आवरणें असतात. त्या पिंडांत असंख्य प्राणी आहेत.
आपल्या देहांतील न कळे । मा तें अवघें कैंचे कळे ।
लोक होती उतावळे । अल्पज्ञानें ॥ ३० ॥
३०) आपल्या देहांत राहणारे प्राणी आपल्याला कळत नाहींत तर मग अवघ्या विश्वामधें राहणारे प्राणी कळणें कसें शक्य आहे ?
अणुरेणा ऐसें जिनस । त्यांचे आम्ही विराट पुरुष ।
आमचें उदंडचि आयुष्य । त्यांच्या हिसेबें ॥ ३१ ॥
३१) अणुरेणुसारखे जे अति लहान पदार्थ व जीव आहेत, त्यांच्या दृष्टीनें आपण माणसें म्हणजे जणुं कांहीं विश्वाएवढे विराट पुरुष आहोत. त्यांच्या हिशेबानें आपलें आयुष्य देखील अतिशय दीर्घ आहे.
त्यांच्या रिती त्यांचे दंडक । वर्तायाचे असती अनेक ।
जाणे सर्वहि कौतुक । ऐसा कैंचा ॥ ३२ ॥
३२) अणुरेणुसमान सूक्ष्म जीवांच्या वागण्याच्या रीति आणि वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. त्या सर्वांचे ज्ञान कोणास नसतें.
धन्य परमेश्र्वराची करणी । अनुमानेना अंतःकरणीं ।
उगीच अहंता पापिणीं । वेढा लावी ॥ ३३ ॥
३३) थोडक्यांत परमेश्र्वराची करणी मोठी विस्मयकारक आहे. माणसाला आपल्या बुद्धिनें तीची कल्पना येणें शक्य नाहीं. असें असूनही अहंता पापिणीनें माणसाला वेढून टाकलें आहे.
अहंता सांडून विवरणें । कित्येक देवाचें करणें ।
पाहातां मनुष्याचें जिणें । थोडें आहे ॥ ३४ ॥
३४) आपली अहंता बाजूस सारुन भगवंताच्या अनेक करणींचें मनन चिंतन माणसाने करावे. माणसाचे आयुष्य फार कमी आहे.
थोडें जिणें अर्धपुडी काया । गर्व करिती रडाया ।
शरीर आवघें पडाया । वेळ नाहीं ॥ ३५ ॥
३५) आयुष्य अल्प व देह क्षणभंगुर असतांना माणूस निष्कारण गर्व धारण करतो. शरीर पडायला मुळींच वेळ लागत नाहीं.
कुश्र्चीळ ठांईं जन्मलें । आणि कुश्र्चीळ रसेंचि वाढलें ।
यास म्हणती थोरलें । कोण्या हिसेबें ॥ ३६ ॥
३६) हा देह घाणेरड्या जागीम जन्म घेतों. घाणेरड्या रसानेंच पोसला जातो. अशा या देहाला थोर म्हणून त्याचा अभिमान बाळगतात याला कांहींच अर्थ नाहीं.
कुश्र्चीळ आणि क्ष्णभंगुर । अखंड वेथा चिंतातुर ।
लोक उगेच म्हणती थोर । वेडपणें ॥ ३७ ॥
३७) घाणेरडें, क्षणभंगुर, निरंतर व्यथेनें आणि कालजीनें पछाडलेले असेम हें शरीर आहे. लोक उगीच वेडेपणानें त्याला थोर म्हणतात.
काया माया दों दिसांची । अदिअंतीं अवघी ची ची ।
झांकातापा करुन उगीचि । थोरीव दाविती ॥ ३८ ॥
३८) शरीर व ऐश्र्वर्य सारा दोन दिवसांचा खेळ आहे. आरंभी व अखेर सारी फजिती असतें. कपड्यालत्यांनीं उगीच झाकताप करुन लोक उगीच मोठेपणा मिरवतात.
झांकिलें तरी उपंढर पडे । दुर्गंधी सुटे जिकडे तिकडे ।
जो कोणी विवेकें पवाडे । तोचि धन्य ॥ ३९ ॥
३९) देह जिवंतपणीं कितीही झाकला तरी तो अखेरीस उघडा पडतोच. त्याची दुर्गंधी जिकडेतिकडे पसरते. म्हणून जो कोणी विवेकानें विशाल बनतो, देहबुद्धितून बाहेर पडतो, तोच खरा धन्य होय.
उगेंचि कायसा तंडावें । मोडा अहंतेचे पुंडावें ।
विवेकें देवास धुंडावें । हें उत्तमोत्तम ॥ ४० ॥
४०) उगीच शब्दजालांत गुरफटु नये. या अहंकाराचा पुंडपणा अगदी मोडून काढावा. विवेकानें भगवंताचा शोध घ्यावा हें उत्तमांतउत्तम आहे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सूक्ष्मजीवनिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Sookshmajiv Nirupan
समास आठवा सूक्ष्मजीव निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment