Friday, April 13, 2018

Samas Tisara Shreshta Antaratma समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा


Dashak Pandharava Samas Tisara Shreshta Antaratma Nirupan 
Samas Tisara Shreshta Antaratma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Anataratma. Antaratmana resides in our body. How we can use it for obtaining knowledge, is described.
समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा निरुपण 
श्रीराम ॥
मुळापासून सैरावैरा । अवघा पंचीकर्ण पसारा ।
त्यांत साक्षत्वाचा दोरा । तोहि तत्त्वरुप ॥ १ ॥
१) या दृश्य विश्वामध्यें पंचभूतांच्या मिश्रणांतून झालेला भरमसाट पसारा दिसतो. त्याचे मूळ मूळमायेमध्यें आहे. पण या सार्‍या पसार्‍यांत साक्षीपणानें राहणार्‍या अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे. अर्थात् अंतरात्मादेखील तत्वांपैकी एक आहे.   
दुरस्ता दाटल्या फौजा । उंच सिंहासनीं राजा ।
याचा विचार समजा । अंतर्यामी ॥ २ ॥
२) एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो. त्याच्या दोन्ही बाजूंना सैन्य दाटून उभे असते. त्याचप्रमाणें या जगांत आढळणारी तत्वें सैन्यासारखीं आहेत. त्यांच्यांतील साक्षी आत्मा राजासारखा आहे. याचा विचार मनांत समजून घ्यावा. 
देहमात्र अस्थिमांशाचें । तैसेंचि जाणावें नृपतीचें ।
मुळापासून सृष्टीचें । तत्त्वरुप ॥ ३ ॥ 
३) सैनिकांचादेह जसा हाडामाांसाचा असतो तसाच राजाचा देह देखील हाडामांसाचाच असतो. त्याचप्रमाणें पंचभूतात्मक जगत् आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरुपच आहेत.  
रायाचे सत्तेनें चालतें । परन्तु अवघीं पंचभूतें ।
मुळीं आधिक जाणिवेचे तें । अधिष्ठान आहे ॥ ४ ॥
४) राजाच्या सत्तेनें सैन्य चालतें. परंतु राजा व सैन्य दोन्ही पंचभूतात्मकच असतात. फरक इतकाच कीं राजाच्या ठिकाणीं सत्तेचे अधिष्ठान अधिक असते. अंतरात्म्याच्या ठिकाणीं जाणिवेचें अधिष्ठान अधिक असते. 
विवेकें बहुत पैसावले । म्हणौन अवतारी बोलिले ।
मनु चक्रवती जाले । येणेंचि न्यायें ॥ ५ ॥
५) " मी देह नसून आत्मा आहे. " या विवेकानें जें अति विशाल झालें त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. याच न्यायानें मनु चक्रवर्ति झालें.
जेथें उदंड जाणीव । तेचि तितुके सदेव ।
थोडे जाणीवेनें नर्देव । होती लोक ॥ ६ ॥
६) ज्याच्या ठिकाणीं अतिविशाल जाणीव असते, तो तितका भाग्यवान असतो. ज्याच्या ठिकाणीं अल्प जाणीव असते तो दुर्दैवी असतो. 
व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती ।
तेणें प्राणी सदेव होती । देखतदेखतां ॥ ७ ॥
७) जीं माणसें व्याप वाढवतात, खटातोप करतात, जीवनांतील धक्के व भार सोसतात तीं माणसें थोड्याच अवधींत भाग्यवान बनतात. 
ऐसें हें आतां वर्ततें । मूर्ख लोकांस कळेना तें ।
विवेकी मनुष्य समजतें । सकळ कांहीं ॥ ८ ॥
८) मानवी जीवनांत आज देखील असेंच आहे. पण मूर्ख लोकांना तें कळत नाहीं. जो विवेकी आहे त्याला मात्र हें सगळें समजते.
थोर लाहान बुद्धीपासी । सगट कळेना लोकांसी ।
आधीं उमजलें तयासी । थोर म्हणती ॥ ९ ॥  
९) जगांतील खरा थोरपणा आणि लहानपणा, माणसाच्या विवेक शक्तीमध्येंच असतो. पण सामान्य लोकांना हें कळत नाहीं. जो आधी जन्मास येतो त्यास लोक थोर म्हणतात.
वयें धाकुटा नृपती । वृद्ध तयास नमस्कार करिती ।
विचित्र विवेकाची गती । कळली पाहिजे ॥ १० ॥
१०) राजा वयानें लहान असला तरी वृद्ध माणसें त्यास नमस्कार करतात. विवेकशक्ति कशी विचित्रपणें काम करते हें कळणें अवश्य आहे. 
सामान्य लोकांचे ज्ञान । तो अवघाच अनुमान ।
दीक्षादंडकाचें लक्षण । येणेंचि पाडे ॥ ११ ॥
११) सामान्य लोकांचें ज्ञान हें सगळें अनुमानावर आधारलेलें असते.  संप्रदयदीक्षा आणि लोकपरंपरा दोन्ही अनुमानावरच चालतात. 
नव्हें कोणास म्हणावें । सामान्यास काये ठावें ।
कोणकोणास म्हणावें । किती म्हणोनी ॥ १२ ॥
१२) हें खरें नाहीं. हें किती लोकांना सांगायचें?  सामान्य जनतेला त्यांतील फारसे कळत नाहीं. आणि सामान्य लोकांचीच संख्या जास्त असल्यानें कोणाकोणाला सांगत बसायचे त्याला अंतच नाही.
धाकुटा भाग्यास चढला । तरी तुछ्य करिती तयाला ।
याकारणें सलगीच्या लोकांला । दुरी धरावें ॥ १३ ॥
१३) आपल्यापेक्षां वयानें लहान माणूस जर भाग्यास चढला तर लोक त्याला तुच्छ लेखतात. त्याला महत्व देतच नाहींत. म्हणून आपल्या सलगी करणार्‍या व सलगी असणार्‍या लोकांना दूर ठेवावें.  
नेमस्त कळेना वचन । नेमस्त नये राजकारण ।
उगेचि धरिती थोरपण । मूर्खपणें ॥ १४ ॥
१४) बोललेल्या शब्दांचा निश्र्चित अर्थ ज्यांना कळत नाहीं, ज्यांना निश्र्चितपणें राजकारण करतां येत नाहीं, असें कांहीं लोक मूर्खपणानें उगीच मोठेपणा मिरवतात. 
नेमस्त कांहींच कळेना । नेमस्त कोणीच मानीना । 
आधीं उपजलें त्या थोरपणा । कोण पुसे ॥ १५ ॥
१५) ज्या माणसाला निश्र्चितपणें कांहींच कळत नाहीं,ज्याला खरें कोणी मानीत नाहीं, असा माणूस केवळ आधीं जन्मला म्हणून वडील बनतो. त्या वडिलपणााला कोणी विचारत नाहीं.  
ऐसे बोलती त्यांस नाहीं । शाहाणपण ॥ १६ ॥
१६) वयानें लहान पण ज्ञानी असलेल्यानें कांहीं सांगितलें तर वृद्ध लोक म्हणतात " आतां मोठ्यांचे वडिलपण उरलें नाहीं. लहानांनी लहानपण सोडलें आहे. " असें जें बोलतात त्यांच्याजवळ शहाणपण नसतें.  
गुणेविण वडिलपण । हें तो आवघेंच अप्रमाण ।
त्याची प्रचीत प्रमाण । थोरपणीं  ॥ १७ ॥
१७) गुणांवांचून वडिलपण येतें हें समजणें खोटे आहे. गुणांवांचून थोरपण असूं शकत नाहीं असा अनुभव येतो.   
तथापि वडिलांस मानावें । वडिलें वडिलपण जाणावें ।
नेणतां पुढें कष्टावें । थोरपणीं ॥ १८ ॥
१८) जरी हें खरें असलें तरी वयानें मोठे असणार्‍यांना मान द्यावा. परंतु मोठ्यांनीसिद्धा आपले वडिलपण खरें नाहीं हें ओळखून वागावें. असें वागलें नाहीं तर म्हातारपणीं त्रास होईल. 
तस्मात वडिल अंतरात्मा । जेथें चेतला तेथें महिमा ।
हें तो प्रगटचि आहे आम्हा । शब्द नाहीं ॥ १९ ॥
१९) हें सगळें सांगण्याचा अर्थ असा कीं, अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंतःकरणांत जागा झाला तेथें मोठेपणा येतो. ही गोष्ट उघड आहे. ती सांगण्यामुळें माझ्याकडे दोष नाहीं.  
याकारणें कोणीयेकें । शाहाणपण सिकावें विवेकें ।
विवेक न सिकतां तुकें । लुटोन जाती ॥ २० ॥
२०) म्हणून माणसानें विवेकाच्या बळावर शहाणपण शिकावें. जो माणूस विवेक करण्यास शिकत नाहीं त्याला लोकांत कांहीं महत्व उरत नाहीं.
तुक तुटलें म्हणिजे गेलें । जन्मा येऊन काये केलें ।
बळेंचि सांदीस घातलें । आपणासी ॥ २१ ॥
२१) ज्या माणसाची लोकांत कांहीं किंमत उरत नाहीं, त्याचा जन्म फुकट गेला. असा माणूस आपणहून आपणास हिन दशा प्राप्त करुन घेतो.  
सगट बायेका सिव्या देती । सांदीस पडिला ऐसें म्हणती ।
मूर्खपणाची प्राप्ती । ठाकून आली ॥ २२ ॥
२२) सगळ्या स्त्रियासुद्धा त्याला नांवें ठेवूं लागतात. तो अशगळींत जाऊन पडला असें म्हणतात. अशा रीतीनें मूर्खपणा पदरांत पडतो.  
ऐसें कोणीयेकें न करावें । सर्व सार्थकचि करावें ।
कळेना तरी विवरावें । ग्रंथांतरी ॥ २३ ॥
२३) माणसानें असें करुं नये. आपल्या जीवनाचे सर्व प्रकारें सार्थक करुन घ्यावें. तें कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करुन त्यांतून शिकावें.
शाहाण्यास कोणीतरी बाहाती । मूर्खास लोक दवडून देती ।
जीवास आवडे संपत्ति । तरी शाहाणे व्हावें ॥ २४ ॥
२४) शहाण्या माणसाला लोक आपणहून बोलावतात. मूर्खला लोक बाजूस सारतात. ज्याला संपत्ति आवडत असेल व हवी असेल त्यानें शहाणें बनावें.
आहो या शाहाणपणाकारणें । बहुतांचे कष्ट करणें ।
परंतु शाहाणपण शिकणें । हें उत्तमोत्तम ॥ २५ ॥
२५) अहो, हें शहाणपण शिकण्यासाठीं पुष्कळांचे कष्ट करावें लागतात, हें खरें परंतु कष्ट करुन शहाणपण शिकावें. कारण त्यासारखी उत्तमांत उत्तम दुसरी गोष्ट नाहीं.  
जों बहुतांस मानला । तो जाणावा शाहाणा जाला ।
जनीं शाहाण्या मनुष्याला । काये उणें ॥ २६ ॥
२६) जो पुष्कळ लोकांना मान्य होतो, तो शहाणा झाला असें समजावें. शहाण्या माणसाला जगांत काहींच कमी पडत नाहीं. 
आपलें हित न करी लोकिकीं । तो जाणावा आत्मघातकी ।
या मूर्खायेवढा पातकी । आणिक नाहीं ॥ २७ ॥ 
२७) जो माणूस लोकांमध्यें आपलें हित करुन घेत नाहीं. तो आत्मघातकी समजावा. त्या मूर्खाइतका पातकी दुसरा कोणी नाहीं.  
आपण संसारीं कष्टलो । लोकांकरवीं रागेजोन घेतो ।
जनामध्यें शाहाणा तो । ऐसें न करी ॥ २८ ॥
२८) मूर्ख माणूस संसारांत कष्ट करतो, लोकांकडून बोलणीं खातो, लोकांत जो शहाणा असतो, तो असें करीत नाहीं.  
साधकां सिकविलें स्वभावें । मानेल तरी सुखें घ्यावें ।
मानेना तरी सांडावें । येकिकडे ॥ २९ ॥
२९) साधकानें कसें वागावें तें मी सहज येथें सांगितलें. तें जर मनास पटलें तर स्विकारावें अन्यथा सोडून द्यावें.   
तुम्ही श्रोते परम दक्ष । अलक्षास लावितां लक्ष ।
हें तों सामान्य प्रत्यक्ष । जाणतसा ॥ ३० ॥
३०) तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षावर लक्ष लावता. परमात्मस्वरुपाचें ध्यान करतां, मग मी सांगितलें तें तर अगदी सामान्य आहे, दृश्यामधील आहे, हें तुम्ही ओळखता.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे श्रेष्ठअंतरात्मानिरुपणनाम समास तिसरा ॥
Samas Tisara Shreshta Antaratma 
समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा 




Custom Search

No comments: