Dashak Pandharava Samas Navava Pindotpatti Nirupan
Samas Navava Pindotpatti Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Pindotpatti, The birth of a person or any animal or tree or living things. The important thing in it is Antaratma.
समास नववा पिंडोत्पत्ति निरुपण
श्रीराम ॥
चौखाणीचे प्राणी असती । अवघे उदकेंचि वाढती ।
ऐसे होती आणि जाती । असंख्यात ॥ १ ॥
१) चारहि खाणींमध्यें जन्म घेणारे सारे प्राणी पाण्यापासूनच वाढतात. असे असंख्य प्राणी जन्मास येतात व मरतात.
तत्वांचें शरीर जालें । अंतरात्म्यासगट वळलें ।
त्यांचें मूळ जों शोधिलें । तो उदकरुप ॥ २ ॥
२) तीन गुण, पंचभूतें आणि अंतरात्मा हे एके ठिकाणीं कालवून मानवी शरीर बनलेले असते. पण त्यामध्यें मूळ शोधलें तर तें आपरुप आहे असेच आढळते.
शरत्कळींचीं शरीरें । पीळपीळों झिरपती नीरें ।
उभये रेतें येकत्रें । मिसळती रक्तीं ॥ ३ ॥
३) पावसाळ्यानंतर उगवणार्या वनस्पती जर पिळून बघितल्या तर त्यांच्यातून पाणी झिरपते. मानवी शरीराच्या बाबतींत रेतें रक्तामध्यें एकत्र मिसळतात.
अन्नरस देहरस । रक्तरेतें बांधे मूस ।
रसद्वयें सावकास । वाढों लागे ॥ ४ ॥
४) रक्तरेताच्या संयोगानें अन्नरस व देहरस यांची एक मूस तयार होते. या दोन्ही रसांच्या योगानें ती मूस किंवा तो पिंड हळुहळु वाढु लागतो.
वाढतां वाढतां वाढलें । कोमळाचें कठीण जालें ।
पुढें उदक पैसावलें । नाना अवेवीं ॥ ५ ॥
५) असाच वाढत जाऊन त्यामधील जे कोमल असतें तें कठीण बनतें. नंतर सर्व अवयवांमध्यें जीवनरस पसरतो.
संपूर्ण होतां बाहेरी पडे । भूमीस पडतां मग तें रडे ।
अवघ्याचें अवघेंच घडे । ऐसें आहे ॥ ६ ॥
६) शरीर संपूर्ण तयार झलें म्हणजें तें बाहेर येते. तें जमिनीवर पडतांच रडूं लागतें. सर्व माणसांच्या बाबतींत सगळें असेंच घडून येते.
कुडी वाढे कुबुद्धि वाढे । मुळापासून अवघेंच घडे ।
अवघेंचि मोडे आणि वाढे । देखतदेखतां ॥ ७ ॥
७) देह वाढत जातो तशी कुबुद्धि पण वाढत जाते. मुळापासून हें सारें घडतें. पाहतां पाहतां सगळें वाढतें आणि मोडतें.
पुढें अवघियांचें शरीर । दिवसेंदिवस जालें थोर ।
सुचों लागला विचार । कांहीं कांहीं ॥ ८ ॥
८) सर्वांचें शरीर दिचसेंदिवस मोठें होत जाते. मग निरनिराळे विचार सुचूं लागतात.
फळामधें बीज आलें । तेणें न्यायें तेथें जालें ।
ऐकतां देखतां उमजलें । सकळ कांहीं ॥ ९ ॥
९) ज्याप्रमाणें झाडाच्या फळांत बीज असते, त्याप्रमाणें मानवी जीवनांत देखील घडतें. ऐकून व स्वतः पाहून तें सगळें कांहीं ध्यानांत येते.
बीजें उदकें अंकुरती । उदक नस्तां उडोन जाती ।
येके ठाईं उदक माती । होतां बरें ॥ १० ॥
१०) बीजाला पाणी मिळालें कीं तें अंकुरते. त्यास पाणी मिळालें नाहीं तर तें उडून जातें. पाणी व मातीचे मिश्रण झालें कीं बीजाला उत्तम असतें.
दोहिमधें असतां बीज । भिजोन अंकुर सहज ।
वाढतां वाढतां पुढें रीझ । उदंड आहे ॥ ११ ॥
११) पाणी व माती यांच्यांत बीज असेल तर तें भिजतें आणि त्यास अंकुर फुटतो. तो आपोआप वाढत जातो. त्या वाढण्यांत मोठा आनंद मिळतो.
इकडे मुळ्या धावा घेती । तिकडे अग्रें हेलावती ।
मुळें अग्र द्विधा होती । बीजापासून ॥ १२ ॥
१२) मुळ्या खालीं जमिनींत धांवतात तर फांद्या वर डोलतात. मुळ्या व फांद्या बीजामध्यें एकच असतात.परंतु नंतर दोनीही दोन्ही बाजूंना वाढतात.
मुळ्या चालिल्या पाताळीं । अग्रें धांवती अंतराळीं ।
नाना पत्रीं पुष्पीं फळीं । लगडलीं झाडें ॥ १३ ॥
१३) मुळ्या जमिनींत खोल जातात तर झाडांचें शेंडे वर आकाशांत जातात. मगे अनेक प्रकारच्या पानांनी, फुलांनीं, फळांनीं झाडें भरुन जातात.
फळांवडिल सुमनें । सुमनांवडिल पानें ।
पानांवडिल अनुसंधानें । काष्ठें आवघीं ॥ १४ ॥
१४) झाड्याच्या वाढण्यामध्यें पाहिलें तर असें आढळतें कीं, फळाहून फूल वडिल आहे, तर फुलाहून पान वडिल आहे. आणि याच क्रमानें पानाहून लाकडें वडिल आहेत.
काष्ठांवडिल मुळ्या बारिक । मुळ्यांवडिल तें उदक ।
उदक आळोन कौतुक । भूमंडळाचें ॥ १५ ॥
१५) लाकडाहून बारीक मुळ्या वडिल आहेत. मुळ्यांहून पाणी वडील आहे. पाणी घट्ट बनतें आणि त्यामुळें पृथ्वीवर अनेक प्रकारच्या पिंडांचें कौतुक पहावयास मिळतें.
याची ऐसी आहे प्रचिती । तेव्हां सकळांवडिल जगती ।
जगतीवडिल मूर्ती । आपोनारायेणाची ॥ १६ ॥
१६) वर सांगितल्याप्रमाणें जगांत पिंडोत्पत्तिच्या बाबतींत प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून पृथ्वीसर्वांमध्यें वडिल होय. परंतु या सृष्टीमध्यें पृथ्वीपेक्षां आप श्रेष्ठ किंवा वडिल आहे.
तयावडिल अग्निदेव । अग्नीवडिल वायोदेव ।
वायेदेवावडिल स्वभाव । अंतरात्म्यांचा ॥ १७ ॥
१७) पाण्याहून अग्नि श्रेष्ठ आहे, अग्नीहून वायु श्रेष्ठ आहे. आणि वायुहून अंतरात्मा स्वाभाविपणें श्रेष्ठ आहे.
सकळांवडिल अंतरात्मा । त्यासि नेणे तो दुरात्मा ।
दुरात्मा म्हणिजे दुरी आत्मा । अंतरला तया ॥ १८ ॥
१८) अशा अनुक्रमानें तर अंतरात्मा सगळ्यांपेक्षा वडील किंवा श्रेष्ठ आहे. त्याला जो जाणत नाहीं तो दुरात्मा होय. आत्म्यापासून जो दूर झाला किंवा आत्मा ज्यास अंतरला तो दुरात्मा होय.
जवळी असोन चुकलें । प्रत्ययास नाहीं सोकलें ।
उगेंचि आलें आणी गेलें । देवाचकरितां ॥ १९ ॥
१९) शोकांतिका अशी आहे कीं, अंतरात्माजवळ असून लोक त्याला चुकतात. त्याला अनुभवावेसें कोणाला वाटत नाहीं. कोणास त्याची जिज्ञासा नाहीं. देवानें जन्मास घातलें म्हणून येतात आणि उगीच जगून तसेंच जातात.
म्हणौन सकळांवडिल देव । त्यासी होतां अनन्यभाव ।
मग हे प्रकृतीचा स्वभाव । पालटों लागे ॥ २० ॥
२०) म्हणून सगळ्यांहून श्रेष्ठ जो अंतरात्मा त्याच्याशी अनन्य व्हावें. मग प्रकृतीचा स्वभाव बदलावयास लागतो.
करी आपुला व्यासंग । कदापि नव्हे ध्यानभंग ।
बोलणें चालणें वेंग । पडोंच नेदी ॥ २१ ॥
२१) अंतरात्म्याशी अनन्यपण साधलेला पुरुष आपला नित्याचा व्यवसाय करतो. पण तो करीत असतांना त्याचा ध्यानभंग होत नाहीम. त्याचे अनुसंधान चुकत नाहीं. त्याच्या बोलण्याचालण्यांत कांहीं दोष, कमीपणा किंवा विपरीतपणा दिसत नाहीं.
जें वडिलीं निर्माण केलें । तें पाहिजे पाहिलें ।
काये काये वडिलीं केलें । किती पाहावें ॥ २२ ॥
२२) वडिलांनीं जें निर्माण करुन ठेवलें आहे तें लाहिलें पाहिजें. असा व्यवहारांत शिरस्ता आहे. पण या वडिल अंतरात्म्यानें जें निर्माण केलें आहें तें पाहूं लागल्यावर मन थक्क होतें. त्यानें काय काय निर्माण केलें आहे आणि आपण काय काय पाहावें असें होऊन जातें.
तो वडिल जेथें चेतला । तोचि भाग्यपुरुष जाला ।
अल्प चेतनें तयाला । अल्पभाग्य ॥ २३ ॥
२३) तो वडिल अंतरात्मा ज्याच्या अंतःकरणांत जागा झाला. तोच भाग्यपुरुष बनला. त्याची जाग अल्प असेल तर भाग्य देखील अल्पच असतें.
तया नारायेणाला मनीं । अखंड आठवावें ध्यानीं ।
मग ते लक्ष्मी तयापासुनी । जाईल कोठें ॥ २४ ॥
२४) त्या अंतरात्मारुप नारायणाला अखंड ध्यानींमनीं आठवावें. मग लक्ष्मी त्याच्यापासून दूर जाणार नाहीं.
नारायेण असे विश्र्वीं । त्याची पूजा करीत जावी ।
याकारणें तोषवावी । कोणीतरी काया ॥ २५ ॥
२५) अंतरात्मा विश्वामध्यें व्यापून आहे. त्याची पूजा करत जावी. त्यासाठी कोणीतरी एखादा जीव संतुष्ट करावा. देहाला केलेले अंतरात्मा ग्रहण करतो. त्याच्यापर्यंत तें पोचतें. म्हणून कोणाच्याही देहाची मनापासून सेवा करावी.
उपासना शोधून पाहिली । तों ते विश्र्वपाळिती जाली ।
न कळे लिळा परीक्षिली । न वचे कोण कोण ॥ २६ ॥
२६) खरी उपासना कोणती हें जर शोधून पाहिलें तर उपासना म्हणजे विश्र्वावर आपलेपणानें प्रेम करणें होय असें आढळतें. सर्व प्राण्यांच्या ठिकाणी अंतरात्मा आहे. म्हणून कोणाचेंही अंतःकरण न दुखावणें आणि जो भेटेल त्याला आपलाच समजणें ही उपासनेची दोन चिन्हें आहेत. अंतरात्म्याचा खेळ कोणास कळत नाहीं. त्याची परीक्षा कोणासच होत नाहीं.
देवाची लीळा देवेंविण । आणीक दुसरा पाहे कोण ।
पाहाणें तितुकें आपण । देवचि असे ॥ २७ ॥
२७) अंतरात्म्याचा खेळ अंतरात्म्याखेरीज दुसर्या कोणास पाहातां येत नाहीं. ज्या प्रमाणांत तो खेळ पाहायला जावें त्या प्रमाणांत पाहाणारा अंतरात्म्याशी तदाकार होत जातो.
उपासना सकळां ठाईं । आत्माराम कोठें नाहीं ।
याकारणें ठाइं ठाइं । रामे आटोपिलें ॥ २८ ॥
२८) अंतरात्मा नाही अशी जागाच नसल्यानें त्याची उपासना सगळीकडे भरलेली आहे. या कारणानें ठिकठिकाणीं भगवंताची सत्ता काम करते.
ऐसी माझी उपासना । आणितां नये अनुमाना ।
नेऊन घाली निरंजना । पैलिकडे ॥ २९ ॥
२९) माझी उपासना ही अशी आहे. तर्कानें कल्पना केल्यानें ती समजणार नाहीं. ही उपासना उपासकाला मूळमायेच्या पलीकडे निरंजनापर्यंत नेऊन पोचवते.
देवाकरितां कर्मे चालती । देवाकरिता उपासक होती ।
देवाकरितां ज्ञानी असती । कितीयेक ॥ ३० ॥
३०) अंतरात्म्याच्या सत्तेनें सर्व कर्मे चालतात. त्याच्या कृपेनें माणूस उपासक बनतो. त्याच्या अनुभवानें कित्येक माणसें ज्ञानसंपन्न बनतात.
नाना शास्त्रें नाना मतें । देवचि बोलिला समस्तें ।
नेमकांनेमक वेस्तावेस्तें । कर्मानुसार ॥ ३१ ॥
३१) नाना शास्त्रें व नाना मतें ही अंतरात्म्यांतूनच प्रगट होतात. तसेंच व्यवस्थित व अव्यवस्थित हे प्रकार ज्याच्या त्याच्या कर्मानुसारच घडतात. संगळ्यांना मूळ प्रेरणा अंतरात्म्याची असते.
देवास अवघें लागे करावें । त्यांत घेऊं ये तितुकें घ्यावें ।
अधिकारासारिखें चालावें । म्हणिजे बरें ॥ ३२ ॥
३२) अंतरात्म्याच्या प्रेरणेनें व सत्तेनें सारें कांहीं घडतें. ही गोष्ट खरी परंतु त्यापैकी आपल्याला जें योग्य व घेण्यासारखें असेल तेंच आपण घ्यावें. आपली ताकद, अधिकार पाहून वागावें. हें चांगलें.
आवाहान विसर्जन । ऐसेंचि बोलिलें विधान ।
पूर्वपक्ष जाला येथून । सिद्धांत पुढें ॥ ३३ ॥
३३) कर्ममार्गांत आवाहन व विसर्जन सांगितलें आहे. येथपर्यंत पूर्वपक्ष झाला यापुढें सिद्धांत वर्णन आहे.
वेदांत सिद्धांत धादांत । प्रचित प्रमाण नेमस्त ।
पंचिकर्ण सांडून हित । वाक्यार्थ पाहावा ॥ ३४ ॥
३४) वेदांत म्हणजे शास्त्र प्रचिती, सिद्धांत म्हणजे गुरुप्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती. यांत आत्मप्रचिती निश्र्चित प्रमाण आहे. पंचभूतांचा अवाढव्य पसारा बाजूस सारावा आणि आपले आत्महीत करुन देणार्या महावाक्यांचा अर्थ पाहावा.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे पिंडोत्पत्तिनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Pindotpatti Nirupan
समास नववा पिंडोत्पत्ति निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment