Adi Shankaracharyas Spiritual Stotras
कौपीनपंचकम्
वेदान्तवाक्येषु सदा रमन्तो
भिक्षान्नमात्रेण च तुष्टिमन्तः,
अशोकवन्तः करुणैकवन्तः
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ १ ॥
१) " अयमात्मा ब्रह्म "; " सर्वं खल्विदं ब्रह्म "; " शिवं शान्तमद्वैततम् प्रपंचोपशमम् " इत्यादि श्रुतिवाक्यांच्या विचारांत जो सदा रममाण झालेला असतो, म्हणजे या वाक्यांच्या रहस्याचें जो अहोरात्र चिंतन करितो, जो यदृच्छेने प्राप्त भिक्षान्नावर संतुष्ट असतो; जो शोकमोहशून्य व प्राणिमात्राकडून प्रत्युपकाराची अपेक्षा न करतां दया करितो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.
मूलं तरोकेवलमाश्रयन्तः
पाणिद्वयं भोक्तुममत्रयन्तः ।
कन्थामपि स्त्रीमिव कुत्सयन्तः ।
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ २ ॥
२) जो नेहमी वृक्षमूलाचा आश्रय करतो म्हणजे गृहादिपरिग्रहशून्य अशा स्थितींत वागतो, दोन हातांत भिक्षा घेऊन भोजन करतो, म्हणजे आपले हात हेंच ज्यानें भिक्षेचें पात्र बनविलें, स्त्रीविषयक जसा त्याचे ठिकाणीं अनादर असतो, तसाच जो वस्त्रप्रावरणादिकांविषयींही ममताशून्य असतो, याप्रमाणें सर्वपरिग्रहशून्य, कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.
देहाभिमानं परिहृत्य दूरात्
आत्मानमात्मन्यवलोकयन्तः ।
अहर्निशं ब्रह्मणि ये रमन्तः
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ३ ॥
३) ' मी देह आहे ' ' माझा देह आहे ' अशा प्रकारच्या क्लेशप्रद देहाभिमानाचा ज्या महात्म्यानें त्याग केला, जो विशुद्ध, विज्ञानघन, अद्वैत आत्म्यामध्यें आपल्याला पाहातो, म्हणजे आत्म्याहून भिन्न दुसरें कांहीं नाहीं असें जो पाहातो, आणि अहोरात्र, जो ब्रह्मानंदामध्यें निमग्न असतो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.
स्वानंदभावे परितुष्टिमन्तः,
सशान्तसर्वेन्द्रियवृत्तिमन्तः
नान्तं न मध्यं न बहिः स्मरन्तः,
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ४ ॥
४) जो शुद्धआत्मानंदामध्यें नित्य तृप्त असतो, ज्यानें सर्व इन्द्रियांच्या वृत्ती अंतर्मुख (शांत) केल्या आहेत, आंत मध्यें अगर बाहेर, प्रपंचाची ज्याला खबर नाहीं, म्हणजे ज्याच्या दृष्टीला अंतर्बाह्य प्रपंच प्रतीतीस येतच नाहीं, उलट सबाह्याभ्यंतर एक अखण्ड ब्रह्मतत्वच जो पाहातो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.
पञ्चाक्षरं पावनमुच्चरन्तः,
पतिं पशूनां हृदि भावयन्तः ।
भिक्षाशिनो दिक्षु परिभ्रमन्तः,
कौपीनवन्तः खलु भाग्यवन्तः ॥ ५ ॥
५) जो ' नमः शिवाय ' या पवित्र मंत्राचा सदा उच्चार करीत असतो, सर्व चराचर जीवांचा स्वामी जो भगवान् शंकर , त्याचे जो हृदयांत नेहमी चिंतन करीत असतो; भिक्षान्त सेवन करीत होत्साता, जो सर्व दिशांमध्यें स्वछंदानें भ्रमण करीत असतो, असा कौपीन धारण करणारा ब्रह्मचारी, विरक्त संन्यासी महाभाग्यवान् समजावा.
Custom Search
No comments:
Post a Comment