Friday, April 20, 2018

ParaPooja परापूजा


Adi Shankaracharyas Spiritual Stotras


परापूजा 
अखण्डे सच्चिदानन्दे निर्विकल्पैकरुपिणि ।
स्थितेऽद्वितीयभावेऽस्मिन्कथं पूजा विधीयते ॥ १ ॥
१) जो आत्मा अखण्ड, सच्चिदानंद, एकमात्र निर्विकल्पस्वरुप आहे, नित्य अद्वितीय भावानें वर्तमान असल्यामुळें, त्याच्या ठिकाणीं द्वैतभावाचा गंधही नाहीं, अशा आत्मतत्वाची पूजा कशी केली जाणार ? पूजा तर पूज्यपूजकभाव असेल तरच होते; अद्वैत तत्व जें ब्रह्म ( आत्मा ) त्याचे ठिकाणीं, पूज्य, पूजकादि त्रिपुटीचा अत्यंत आभाव आहे, यास्तव अद्वैत तत्त्वाची पूजा कोणच्या सामग्रीनें होणार ?    
पूर्णस्याऽवाहनं कुत्र, सर्वाधारस्य चासनम् ।
स्वच्छस्य पाद्यमर्घ्यं च शुद्धस्याऽचमनं कुतः ॥ २ ॥
२) सर्वव्यापक परमात्म्याचें आवाहन कसें करणार ? कारण जो कोणत्यातरी स्थानावर ासतो, किंवा नसतो, त्याचे आवाहन करतां येतें, परंतु जो सर्वत्र भरलेला आहे, त्याचे आवाहन कसें करतां येणार ? करतां येणार नाहीं. त्याचप्रमाणें सर्वाधाराला असन कोठलें ? बसणार्‍याला बसण्याकरितां आसन देतां येतें, परमात्मा तर बसणाराही नाहीं व उठणाराही नाहीं. जो उठनारा व बसणारा असतो तो सर्वांचा आधार होऊं शकणार नाहीं, एवढ्याचकरितां सर्वाधार प्रभूला आसन कशाचें व तें द्यावयाचेम कसें ? जो परमात्मा स्वरुपानें नित्य निर्मल आहे, त्याला पाद्यार्घ्यादिकांची आवश्यकता काय ? कारण पाद्य व अर्घ्य हीं परमात्म्याला स्वच्छ करण्याकरतां देतात, पण ज्याच्या ठिकाणी मलीनताच नाहीं, त्याला त्या पाद्यार्घ्यदिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. तसेंच जो पवित्रच आहे, त्याला आचमनापासून काय फल ? कारण ाचमन शुद्धीकरितां असतें, जो कधीं अशुद्धच नाहीं, त्याला आचमनाचें काय प्रयोजन ? कांहीं नाहीं.      
निर्मलस्य कुतः स्नानं वस्त्रं विश्र्वोदरस्य च ।
अगोत्रस्य त्ववर्णस्य कुतः तस्योपवीतकम्  ॥ ३ ॥
३) नित्यनिर्मलाला स्नानाचें काय प्रयोजन ? स्नान मलशुद्धीकरता केलें जातें. जो नित्य निर्मलच आहे. त्याला स्नानाचा काय उपयोग ? कांहीं नाहीं. ज्याच्या उदरांत सर्व विश्र्व सांठवलेलें आहे, त्याला नेसण्यास वस्त्र कोठून पैदा करणार ? कारण वस्त्र शरिराचें आच्छादन करतें, ज्यानें अखिल ब्रह्माण्डाला व्यापिलें, त्याला यज्ञोपवीताचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. वसिष्ठादि गोत्रयुक्त जे ब्राह्मणादि वर्ण आहेत, त्यांना यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे. तात्पर्य, श्रौत, स्मार्त कर्म करण्याची इच्छा करणाराला यज्ञोपवीत धारण करण्याची आवश्यकता आहे, जो निष्काम आहे त्याला त्याचा काय उपयोग ? कांहीं नाहीं.    
निर्लेपस्य कुतो गंधः पुष्पं निर्वासनस्य च ।
निर्विशेषस्य का भूषा कोऽलंकारो निराकृते ॥ ४ ॥
४) निर्लेपाला गंधाचा काय उपयोग. कारण अंतःकरण प्रसन्नतेकरितां गंधादिकांचा उपयोग होतो. पण जो नित्य प्रसन्न आहे, त्याला गंधाचा कांहींच उपयोग नाहीं. ज्याला वास घेण्याची इच्छा आहे, तो पुष्पादिकांचा वास घेण्याची इच्छा करितो. निर्वासनाला त्याचा कांहींच उपयोग नाहीं. निर्विशेषाला वस्त्रालंकारदिकांचा काय उपयोग ? त्याचप्रमाणें निराकाराला अलंकार कसा घालावा ? अलंकारानें साकार वस्तूला शोभा येते. ज्याला आकार नाहीं अशा निराकार आत्म्याला अलंकारादिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. 
निरंजनस्य किं धूपैदीपैर्वा सर्वसाक्षिणः ।
निजानन्दैकतृप्तस्य नैवेद्यं किं भवेदिह ॥ ५ ॥
५) निरंजनाला धूपादिकांचे काय फल ? सर्वसाक्षीरुप प्रकाशाला त्याच्या प्रकाशाकरितां प्रकाशाची अपेक्षा नसते. प्रकाशाला अन्य प्रकाशाची अपेक्षा मानली तर आत्माश्रयादि दोष येतात. सूर्यादि सर्व प्रकाशगोलकांचा, आत्मा प्रकाशक आहे. अशा स्वयंसिद्ध प्रकाशक आत्म्याचा प्रकाश कोण करणार ? कोणीं नाहीं. जो निजानंदानें नित्य तृप्त आहे त्याला तृप्तीकरितां नैवेद्यादिकाचें काय प्रयोजन ? कांहीं नाहीं.   
विश्र्वानंदयितुस्तस्य किं तांबूलं प्रकल्प्यते ।
स्वयंप्रकाशचिद्रुपो योऽसावर्कादिभासकः ॥ ६ ॥
६) सूर्यादि सर्वप्रकाशक वस्तूंना प्रकाशित करणार्‍या स्वयंप्रकाशाला ( ज्ञानस्वरुप ) , तसेंच आपल्या आनंदानें सर्वांला आनंदविणार्‍या आत्म्याला तांबुलादिकांचा काय उपयोग ? कांहींच नाहीं. 
प्रदक्षिगाह्यनन्तस्य ह्यद्वयस्य कुतो नतिः ।
वेदवाक्यैरवेद्यस्य कुतः स्तोत्रं विधीयते  ॥ ७ ॥
७) अनन्तरुप व्यापक आत्म्याला प्रदक्षिणा कशी घालणार ? ज्याला अन्त आहे, आणि ज्याच्या सभोंवार फिरण्यास कांहीं स्थान आहे. त्याला प्रदक्षिणा घालणें शक्य आहे. पण ज्याला अन्त नाहीं असा व्यापक जो सर्वात्मा त्याला प्रदक्षिणा घालणें अशक्य आहे. तसेंच आद्वितीयाला नमस्कार कसा करावा? आपल्याहून भिन्न व्यक्तिला नमस्कार करतां येतो. परमात्मा एक व द्वैतशून्य आहे. म्हणून स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित आहे. अशा द्वैतशून्य परमात्म्याला नमस्कार कसा केला जाणार ? वेदवाक्याला जो अवेद्य त्याची स्तुति कोणत्या शब्दांत करणार ? करता येणार नाहीं. ज्याच्या ठिकाणीं नाम, रुप, क्रिया, जाति आणि संबंध असतो, ती वस्तु जाणता येते; अत्म्याच्या ठिकाणीं नामरुपादि वस्तुतः नाहींत याकरितां तो स्तुतीचा विषय कसा होणार ? अर्थात् होणार नाहीं.    
स्वयंप्रकाशमानस्य कुतो नीराजनं विभोः ।
अन्तर्बहिश्र्च पूर्णस्य कथमुद्वासनं भवेत् ॥ ८ ॥
८) स्वयंप्रकाश आत्म्याला दीपादिकांच्या साधनानें आरती कशी करावी ? कारण आत्म्याच्या ठिकाणीं अंधकाराला प्रवेशच नाहीं. मग नीरांजनादि दीपाचा काय उपयोग ? कांहीं नाहीं. जो अंतर्बाह्य व्यापून राहिलेला आहे, अशा आत्मरुप देवाचें विसर्जन कसें करावयाचें ? विसर्जन परिछिन्न वस्तुचें करतां येतें. जो परिपूर्ण भरलेला त्याचे विसर्जन कसें करावें ?    
एवमेव परापूजा सर्वावस्थासु सर्वदा ।
एकबुद्ध्या तु देवेशे, विधेया ब्रह्मवित्तमैः ॥ ९ ॥
९) अशा प्रकारची पूजा, ब्रह्मतत्त्ववेत्यांकडून सर्व अवस्थांमध्यें सर्वदा केली जाते. तात्पर्य परमात्म्याशी एकरुपानें रहाणें हीच खरी तात्त्विक पूजा समजावी. 
आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहम् ,
पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः ।
संचारन्तु पदोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वा गिरो ,
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो ! तवाराधनम् ॥ १० ॥
१०) हे शंभो ! महादेवा ! तूं माझा आत्मा आहेस म्हणून तुझ्याहून मी भिन्न नाही. माझी शुद्ध बुद्धि ही पार्वतीदेवी होय. माझे प्राण हे सहचारी गण होत, व हे शरीर शिवमंदिर होय. नाना प्रकारच्या शब्दादि विषयसेवन हीच आपली पूजा होय; झोंप ही समाधि अवस्था आहे. पायानें चालणें हीच प्रदक्षिणा, वाणीनें बोलणें हींच आपली स्तोत्रें होत. सारांश जें जें कर्म माझ्याकडून होईल तें तें सर्व आपलें आराधनच होय. 



Custom Search

No comments: