Dnyaneshwari Adhyay 3 Part 10
हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।
परी कृमिदोषीं विरुद्ध । घेपे केवीं ॥ २२६ ॥
२२६) बाबा, साखर व दूध हे
पदार्थ गोड आहेत, हें सर्वांना ठाऊक आहेत; पण जंतांच्या रोगांत त्यांचा वाईट परिणाम होत असल्यामुळें, ज्यांना तो रोग आहे, त्यांनी ते पदार्थ कसें सेवन
करावेत ?
ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल ।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा ॥ २२७ ॥
२२७) असें असूनहि जर त्यांचें सेवन केलें, तर सेवन करणारांचा तो हट्ट ठरेल. कारण अर्जुना,
त्यांचें तें करणें परिणामीं हितकर होणार नाही.
म्हणोनि आणिकांसी जें विहित । आणि आपणपेयां अनुचित ।
तें नाचरावें जरी हित । विचारिजे ॥ २२८ ॥
२२८) म्हणून दुसर्यांना जे विहित पण आपणांस जें अयोग्य म्हणून ठरलें
आहे, तें हिताचा विचार करुन पाहिलें, तर
आचरुं नये. ( हें बरें ) !
या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता ।
तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥ २२९ ॥
२२९) ( फार काय ) या आपल्या धर्माचें आचरण करीत असतां, जरी प्राण खर्ची पडतील, तरीहि
तरी इहपरलोकाच्या दृष्टीनें तो धर्म चांगलाच आहे.
ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी ।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥ २३० ॥
२३०) सर्व देवांत श्रेष्ठ असलेले, श्रीकृष्ण ज्या वेळीं असें बोलले त्या वेळीं अर्जुन म्हणाला, देवा माझी एक विनंती आहे.
हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें ।
परी आतां पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥ २३१ ॥
२३१) तुम्हीं मला जें सांगितलें, ते खरोखर मी सर्व ऐकलें हें खरें आहे; परंतु आता मला
कांहीं पाहिजे आहे, तें मी विचारतों.
तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थिति भ्रंशे ।
मार्गु सांडुनि अनारिसे । चालत देखों ॥ २३२ ॥
२३२) तर देवा, हें असें कसें
होतें कीं ज्ञानी पुरुषांचीहि स्थिति बिघडून, ते मार्ग सोडून
भलत्याच वाटेनें चालत असल्याचें नजरेस येतें !
सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती ।
तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें ॥ २३३ ॥
२३३) ज्यांना सर्व कळतें व ज्यांस हे उपायहि ठाऊक असतात, ते देखील परधर्माचें आचरण करुन स्वधर्मापासून कशामुळें
भ्रष्ट होतात ?
बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥
२३४) ज्याप्रमाणें आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाहीं, त्याप्रमाणें कधीं कधीं डोळसालाहि कळत नाहीं, असें कां व्हावें ?
जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करितां न धाती ।
वनवासीही सेविती । जनपदातें ॥ २३५ ॥
२३५) जे असलेल्या सर्व संगाचा त्याग करतात तेच परत कितीहि संग केला तरी
तृप्त होत नाहींत. सर्वस्व सोडून अरण्यांत राहिलेले लोकदेखील पुन्हां लोकांत येऊन
राहातात.
आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।
परी बलात्कारें सुइजती । तयाचि माजीं ॥ २३६ ॥
२३६) आपण स्वतः पापांना चुकविण्याकरितां लपून बसतात, सर्व प्रकारें पाप चुकविण्याकरितां प्रयत्न करतात,
परंतु पुनः बळजबरीनें त्यांतच कोंबले जातात.
जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।
चुकविती ते गिंवसी । तयातेंचि ॥ २३७ ॥
२३७) ज्यांचा मनापासून कंटाळा येतो, तेच अंतःकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट
त्यांनाच घेरतात.
ऐसा बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।
हें बोलावें हृषीकेशें । पार्थु म्हणे ॥ २३८ ॥
२३८) अशी एक बळजबरी दिसून येते; ती तेथें कोणाच्या जोरामुळें होते ? हें देवांनी मला
सांगावें. असें अर्जुन म्हणाला.
तंव हृदयकमळआरामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक ॥ २३९ ॥
२३९) तेव्हां हृदयरुपीं कमलामध्यें विश्रांति घेणारा ( राहाणारा ) व
निरिच्छ झालेले योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनाला काय म्हणाला, ऐक.
तरी हे काम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं ।
हें कृतांताचां ठायीं । मानिजती ॥ २४० ॥
२४०) बर बाबा, ( बलात्कार
करणारे ) हे कामक्रोध आहेत असे समज; हे असे आहेत कीं,
ज्यांच्या मनांत दयेचा सांठा मुळीच नाहीं; हे
कामक्रोध प्रत्यक्ष यमधर्म आहेत, असें समजलें जातें.
हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ ।
भजनमार्गींचे मांग । मारक जे ॥ २४१ ॥
२४१) हे ज्ञानरुपी ठेव्यावर असलेले सर्प होत; हे विषयरुपी दर्यांत राहाणारे वाघ आहेत. हे भजनरुपी
रस्त्यावरील वाटमारे मांग आहेत.
हे दैहदुर्गींचे धोंड । इंद्रियग्रामींचें कोंड ।
यांचें व्यामोहादिक बंड । जगावरी ॥ २४२ ॥
२४२) हे देहरुपी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत; हे इंद्रियरुपी गांवाचें बांवकूम आहेत; यांचे अविवेकादिकांच्या रुपानें जगावर ( मोठें ) बंड आहे.
हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे ।
धायपण ययांचें । अविद्या केलें ॥ २४३ ॥
२४३) हें मनांत असलेल्या रजोगुणाचे वळलेले आहेत व मुळापासूनच आसुरी
संपत्तीचे आहेत. यांचें पालनपोषण अविद्येनें केलेलें आहे.
हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।
तेणें निजपद यां दिधलें । प्रमादमोहो ॥ २४४ ॥
२४४) हे वास्तविक रजोगुणाचे जरी बनलेले आहेत, तरी तें तमोगुणाला फार प्रिय होऊन राहिले आहेत. त्या
तमोगुणानें प्रमाद व मोहरुपी आपली गादी यांना बहाल केली आहे.
हे मृत्यूचां नगरीं । मानिजती निकियापरी ।
जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां ॥ २४५ ॥
२४५) ह्यांची मृत्युच्या नगरांत चांगली पत आहे, कारण कीं, जीविताचे शत्रू आहेत.
जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्र्व न पुरेचि घांसा ।
कुळवाडी यांची आशा । चाळीत असे ॥ २४६ ॥
२४६) भूक लागली असतां खाण्यास हें जग एक घांसासहि ज्यांना पुरें पडत
नाहीं, अशा या कामक्रोधांचा जो ( नाशकारक ) व्यापार, त्या व्यापारावर देखरेख आशा करते.
कौतुकें कवळितां मुठीं । जिये चवदा भुवनें थेंकुटीं ।
ते भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही ॥ २४७ ॥
२४७) लीलेनें मुठींत धरली तर चौदाहि भुवनें जिला अपुरीं आहेत, अशी जी भ्रांति ती या आशेची नव्या नवसाची लाडकी धाकटी
बहीण आहे.
जे लोकत्रयाचें भातुकें । खेळताचि खाय कवतिकें ।
तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये ॥ २४८ ॥
२४८) जी खेळत असतां त्रैलोक्यरुप खाऊ सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाचे जोरावर तृष्णा जगली आहे.
हें असो मोहें मानिजे । यांतें अहंकारें घेपे दीजे ।
जेणें जग आपुलेनि मोजें । नाचवीत असे ॥ २४९ ॥
२४९) हें असो. या कामक्रोधांना मोहाच्या घरीं मान आहे; आपल्या करामतीनें जो सर्व जगास नाचवितो, तो अहंकार या कामक्रोधांपाशीं देवघेव करतो;
जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ॥
तो दंभु रुढविला । जगीं इहीं ॥ २५० ॥
२५०) ज्यानें पोटीं असलेला सत्याचा मालमसाला काढून
त्याऐवजीं अकृत्याचा पेंढा भरला, असा जो दंभ, तो या
कामक्रोधांनीं जगांत पुढें आणला.
No comments:
Post a Comment