Tuesday, October 6, 2020

ShriRamcharitmans Part 51 श्रीरामचरितमानस भाग ५१

 

ShriRamcharitmans Part 51 
Doha 240 to 242 
श्रीरामचरितमानस भाग ५१ 
दोहा २४० ते २४२ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा--कहि मृदु बचन बिनीत तिन्ह बैठारे नर नारि ।
उत्तम मध्यम नीच लघु निज निज थल अनुहारि ॥ २४० ॥
त्या सेवकांनी गोड व नम्रपणे बोलून उत्तम, मध्यम, सामान्य अशा सर्व दर्जाच्या स्त्री-पुरुषांना त्या त्या ठिकाणी बसविले. ॥ २४० ॥
राजकुअँर तेहि अवसर आए । मनहुँ मनोहरता तन छाए ॥
गुन सागर नागर बर बीरा । सुंदर स्यामल गौर सरीरा ॥ 
त्याचवेळी राम-लक्ष्मण हे राजकुमात तेथे आले. प्रत्यक्ष मनोहरताच त्यांच्या शरीरावर पसरली होती. एकाचे शरीर सुंदर, सावळे आणि दुसर्‍याचे गोरे होते. ते गुणांचे सागर, चतुर व उत्तम वीर होते. ॥ १ ॥
राज समाज बिराजत रुरे । उडगन महुँ जनु जुगु बिधु पूरे ॥
जिन्ह कें रही भावना जैसी । प्रभु मूरति तिन्ह देखी तैसी ॥
ते राजांच्या समाजामध्ये असे शोभून दिसत होते की, जणू तारागणांच्यामध्ये दोन पूर्ण चंद्र असावेत. ज्यांची जशी भावना होती, त्यांना प्रभूंची मूर्ती तशीच दिसली. ॥ २ ॥
देखहिं रुप महा रनधीरा । मनहुँ बीर रसु धरें सरीरा ॥
डरे कुटिल नृप प्रभुहि निहारी । मनहुँ भयानक मूरति भारी ॥
महान रणधीर अशा राजे लोकांना श्रीरामचंद्रांचे रुप असे दिसत होते की, जणू प्रत्यक्ष वीररस शरीर धारण करुन आला असावा. ते फार भयंकर असावेत, असे वाटून दुष्ट राजे प्रभूंना पाहून घाबरले. ॥ ३ ॥
रहे असुर छल छोनिप बेषा । तिन्ह प्रभु प्रगट काल सम देखा ॥
पुरबासिन्ह देखे दोउ भाई । नरभूषन लोचन सुखदाई ॥
जे राक्षस कपटाने तेथे राजांच्या वेषांत बसले होते, त्यांना प्रभू प्रत्यक्ष काळा-प्रमाणे दिसले. नगरवासीयांना ते दोघे बंधू नररत्ने व नयनाल्हादक वाटले. ॥ ४ ॥
दोहा--नारि बिलोकहिं हरषि हियँ निज निज रुचि अनुरुपा ।
जनु सोहत सिंगार धरि मूरति परम अनूप ॥ २४१ ॥
स्त्रिया मनात आनंदून आपापल्या आवडीप्रमाणे त्यांना पाहात होत्या. जणू शृंगार रसच परम अनुपम मूर्ती धारण करुन शोभून दिसत होता. ॥ २४१ ॥
बिदुषन्ह प्रभु बिराटमय दीसा । बहु मुख कर पग लोचन सीसा ॥
जनक जाति अवलोकहिं कैसें । सजन सगे प्रिय लागहिं जैसें ॥
विद्वानांना ते पुष्कळ मुखे, हात, पाय, नेत्र व शिरे असलेल्या विराट रुपात दिसले. जनकांच्या कुटुंबीयांना प्रभू जणू सख्खे स्वजन व प्रिय वाटत होते. ॥ १ ॥
सहित बिदेह बिलोकहिं रानी । सिसु सम प्रीति न जाति बखानी ॥
जोगिन्ह परम तत्त्वमय भासा । सांत सुद्ध सम सहज प्रकासा ॥
जनकांसह सर्व राण्यांना ते आपल्या मुलासारखे वाटत होते. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करणे कठीण आहे. योग्यांना ते शांत, शुद्ध, सम आणि स्वयंप्रकाशी परम-तत्त्वाच्या रुपात दिसले. ॥ २ ॥
हरिभगतन्ह देखे दोउ भ्राता । इष्टदेव इव सब सुख दाता ॥
रामहि चितव भायँ जेहि सीया । सो सनेहु सुखु नहिं कथनीया ॥    
जे हरिभक्त होते, त्यांना दोघे बंधू सर्व सुखे देणार्‍या इष्टदेवासारखे दिसले. सीता ज्या भावनेने श्रीरामचंद्रांना पाहात होती, ते प्रेम व सुख तर सांगताच येणार नाही. ॥ ३ ॥
उर अनुभवति न कहि सक सोऊ । कवन प्रकार कहै कबि कोऊ ॥
एहि बिधि रहा जाहि जस भाऊ । तेहिं तस देखेउ कोसलराऊ ॥
त्या प्रेम आणि सुखाचा ती मनातल्या मनात अनुभव घेत होती. परंतु ते ती सांगू शकत नव्हती. मग कुणी कवी ते कसे सांगू शकेल ? अशा प्रकारे ज्याचा जसा भाव होता, तसेच त्याला कोसलाधीश श्रीराम दिसले. ॥ ४ ॥
दोहा--राजत राज समाज महुँ कोसलराज किसोर ।
सुंदर स्यामल गौर तन बिस्व बिलोचन चोर ॥ २४२ ॥
सुंदर सावळ्या व गोर्‍या रंगाचे आणि संपूर्ण विश्वाचे नेत्र आकर्षून घेणारे कोसलाधीश कुमार अशा प्रकारे शोभून दिसत होते. ॥ २४२ ॥
सहज मनोहर मूरति दोऊ । कोटि काम उपमा लघु सोऊ ॥
सरद चंद निंदक मुख नीके । नीरज नयन भावते जी के ॥
दोन्ही मूर्ती स्वभावतः मन हरण करुन घेत होत्या. कोट्यावधी कामदेवांची उपमाही त्यांच्यासाठी थिटी आहे. त्यांचे सुंदर मुख शरद पौर्णिमेच्या चंद्राला हिणवणारे होते आणि कमलांसारखे नेत्र मनाला भुरळ पाडणारे होते. ॥ १ ॥
चितवनि चारु मार मनु हरनी । भावति हृदय जाति नहिं बरनी ॥
कल कपोल श्रुति कुंडल लोला । चिबुक अधर सुंदर मृदु बोला ॥
त्यांची सुंदर नजर कामदेवाच्या मनालाही मोहविणारी होती. ती मनाला मोहित करीत होती, पण अवर्णनीय होती, सुंदर गाल, कानांमध्ये डोलणारी कुंडले, हनुवटी व अधर सुंदर होते आणि वाणी कोमल होती. ॥ २ ॥
कुमुदबंधु कर निंदक हॉंसा । भृकुटी बिकट मनोहर नासा ॥
भाल बिसाल तिलक झलकाहीं । कच बिलोकि अलि अवलि लजाहीं ॥
त्यांचे हास्य चंद्रकिरणांना तुच्छ ठरविणारे होते. कमानदार भुवया आणि नासिका मनोहर होती. विशाल भाल प्रदेशावर तिलक झळकत होता. काळ्या-कुरळ्या केसांना पाहून भ्रमरांचे थवेसुद्धा लाजत होते. ॥ ३ ॥    पीत चौतनीं सिरन्हि सुहाईं । कुसुम कलीं बिच बीच बनाईं ॥
रेखें रुचिर कंबु कल गीवॉं । जनु त्रिभुवन सुषमा की सीवॉं ॥
पिवळ्या चौकोनी टोप्या शिरांवर शोभत होत्या. टोप्यांवर मधून-मधून फुलांच्या कळ्या रंगविलेल्या होत्या. शंखासारख्या सुंदर गळ्यावर तीन मनोहर रेषा दिसत होत्या. ज्या जणू तिन्ही लोकांच्या सौंदर्याची मर्यादा दाखवीत होत्या. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: