Monday, October 26, 2020

ShriRamcharitmans Part 57 श्रीरामचरितमानस भाग ५७

 

ShriRamcharitmans Part 57 
Doha 260 to 263 
श्रीरामचरितमानस भाग ५७ 
दोहा २६० ते २६३ 
रामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—राम बिलोके लोग सब चित्र लिखे से देखि ।

चितई सीय कृपायतन जानी बिकल बिसेषि ॥ २६० ॥

श्रीरामांनी सर्व लोकांकडे पाहिले. ते चित्राप्रमाणे स्तब्ध झालेले पाहून कृपासागर श्रीरामांनी सीतेकडे कटाक्ष टाकला आणि ती फार व्याकूळ झाल्याचे त्यांना दिसले. ॥ २६० ॥

देखी बिपुल बिकल बैदेही । निमिष बिहात कलप सम तेही ॥

तृषित बारि बिनु जो तनु त्यागा । मुएँ करइ का सुधा तड़ागा ॥

त्यांनी जानकीला फार व्याकूळ झाल्याचे पाहिले. तिचा एक-एक क्षण कल्पाप्रमाणे जात होता. तहानेने व्याकूळ झालेला माणूस पाण्याविना मेला, तर तो मेल्यावर अमृताचा तलाव मिळाला तरी काय उपयोग ? ॥ १ ॥

का बरषा सब कृषी सुखानें । समय चुकें पुनि का पछितानें ॥

अस जियँ जानि जानकी देखी । प्रभु पुलके लखि प्रीति बिसेषी ॥

सर्व शेती करपून गेल्यावर पाऊस आला तरी काय उपयोग ? वेळ निघून गेल्यावर मग पश्र्चात्ताप करुन काय होणार ? मनात असा विचार करुन श्रीरामांनी जानकीकडे पाहिले आणि तिचे उत्कट प्रेम पाहून ते पुलकित झाले. ॥ २ ॥

गुरहि प्रनामु मनहिं मन कीन्हा । अति लाघवँ उठाइ धनु लीन्हा ॥

दमकेउ दामिनि जिमि जब लयऊ । पुनि नभ धनु मंडल सम भयऊ ॥

त्यांनी मनातल्या मनात गुरुंना प्रणाम केला आणि मोठ्या चपळाईने धनुष्य उचलले. जेव्हा त्यांनी ते हाती घेतले, तेव्हा ते धनुष्य वीजेप्रमाणे चमकले आणि मग अंतराळात वर्तुळाकार झाले. ॥ ३ ॥

लेत चढ़ावत खैंचत गाढ़ें । काहुँ न लखा देख सबु ठाढ़ें ॥

तेहि छन राम मध्य धनु तोरा । भरे भुवन धुनि घोर कठोरा ॥

ते घेताना, सज्ज करताना व जोराने ओढताना कुणीच पाहिले नाही. ( कारण या तिन्ही गोष्टी अतिशय वेगाने घडल्या ) सर्वांनी बघितले की श्रीराम धनुष्य ओढून उभे आहेत. त्याच क्षणी श्रीरामांनी ते मधोमध मोडले. त्या भयंकर कडकडाटाने त्रैलोक्य निनादून गेले. ॥ ४ ॥

छं०—भरे भुवन घोर कठोर रव रबि बाजि तजि मारगु चले ।

चिक्करहिं दिग्गज डोल महि अहि कोल कूरुम कलमले ॥

सुर असुर मुनि कर कान दीन्हें सकल बिकल बिचारहिं ।

कोदंड खंडेउ राम तुलसी जयति बचन उचारहीं ॥

भयंकर कठोर आवाजाने त्रैलोक्य दणाणून गेले. सूर्याचे घोडे मार्ग सोडून धावू लागले. दिग्गज चीत्कार करु लागले. पृथ्वी डगमगू लागली. शेष, वराह व कच्छप व्याकूळ होऊन तळमळू लागले. देव, राक्षस व मुनी सर्वजण कानांवर हात ठेवून व्याकूळ होऊन विचार करु लागले. तुलसीदास म्हणतात कीं सर्वांना पटले की, श्रीरामांनी धनुष्य मोडून टाकले, तेव्हा सर्वजण ‘ श्रीरामचंद्र की जय ‘ असा जयजयकार करु लागले.

सो०—संकर चापु जहाजु सागरु रघुबर बाहुबलु ।

बूड़ सो सकल समाजु चढ़ा जो प्रथमहिं मोह बस ॥ २६१ ॥

शिवांचे धनुष्य जहाज आहे आणि श्रीरामचंद्रांचे बाहुबल समुद्र आहे. धनुष्य मोडल्यामुळे जो समाज मोहामुळे या जहाजावर चढला होता, तो बुडून गेला. ॥ २६१ ॥

प्रभु दोउ चापखंड महि डारे । देखि लोग सब भए सुखारे ॥

कौसिकरुप पयोनिधि पावन । प्रेम बारि अवगाहु सुहावन ॥

प्रभु श्रीरामांनी धनुष्याचे दोन तुकडे भूमीवर टाकून दिले. हे पाहून सर्वांना आनंद झाला. विश्र्वामित्ररुपी पवित्र समुद्रामध्ये प्रेमरुपी सुंदर अथांग जल भरले होते. ॥ १ ॥

रामरुप राकेसु निहारी । बढ़त बीचि पुलकावलि भारी ॥

बाजे नभ गहगहे निसाना । देवबधू नाचहिं करि गाना ॥

श्रीरामरुपी पूर्ण चंद्राला पाहून विश्र्वामित्ररुपी समुद्रात रोमांचरुपी मोठ्या लहरी उसळू लागल्या. आकाशात अत्यंत जोराने नगारे वाजू लागले आणि अप्सरा गात गात नाचू लागल्या. ॥ २ ॥

ब्रहमादिक सुर सिद्ध मुनीसा । प्रभुहि प्रसंसहिं देहिं असीसा ॥

बरिसहिं सुमन रंग बहु माला । गावहिं किंनर गीत रसाला ॥

ब्रह्मदेव इत्यादी देव, सिद्ध, मुनीश्र्वर हे प्रभूंची प्रशंसा करु लागले आणि आशीर्वाद देऊ लागले. ते रंगी-बेरंगी फुले व माळा यांचा वर्षाव करु लागले. किन्नर रसाळ गायन करु लागले. ॥ ३ ॥

रही भुवन भरि जय जय बानी । धनुषभंग धुनि जात न जानी ॥

मुदित कहहिं जहँ तहँ नर नारी । भंजेउ राम संभुधनु भारी ॥

संपूर्ण ब्रह्मांडात जयजयकाराचा ध्वनी दुमदूमु लागला. त्यामुळे धनुष्य-भंगाचा ध्वनी त्यात केव्हा विलीन झाला, हे कळलेच नाही. जिकडे-तिकडे स्त्री-पुरुष प्रसन्न होऊन म्हणत होते की, ‘ श्रीरामचंद्रांनी प्रचंड शिवधनुष्याचा भंग केला. ॥ ४ ॥

दोहा—बंदी मागध सूतगन बिरुद बदहिं मतिधीर ।

करहिं निछावरि लोग सब हय गय धन मनि चीर ॥ २६२ ॥

धीर बुद्धीचे लोक, भाट, मागध आणि सूतजन हे श्रीरामांच्या बिरुदावलीचे वर्णन करु लागले. सर्वजण घोडे, हत्ती, धन, रत्ने आणि वस्त्रे श्रीरामांवरुन ओवाळून टाकू लागले. ॥ २६२ ॥

झॉंझि मृदंग संख सहनाई । भेरि ढोल दुंदुभी सुहाई ॥

बाजहिं बहु बाजने सुहाए । जहँ तहँ जुबतिन्ह मंगल गाए ॥

झांज, मृदंग, शंख, सनई, भेरी, ढोल आणि मोहक नगारे इत्यादी सुंदर वाद्ये मधुर वादन करु लागली. जिकडे-तिकडे तरुणी मंगल गीते गाऊ लागल्या. ॥ १ ॥

सखिन्ह सहित हरषी अति रानी । सूखत धान परा जनु पानी ॥

जनक लहेउ सुखु सोचु बिहाई । पैरत थकें थाह जनु पाई ॥

राणी सख्यांसह अत्यंत आनंदित झाली, जणू सुकत चाललेल्या भात पिकावर पाऊस पडल्यामुळे त्याला जीवदान मिळाले. जनक राजांची चिंता जाऊन त्यांना आनंद झाला. जणू पोहूनपोहून थकून गेलेल्या माणसाला आधार मिळाला. ॥ २ ॥

श्रीहत भए भूप धनु टूटे । जैसें दिवस दीप छबि छूटे ॥

सीय सुखहि बरनिअ केहि भॉंती । जनु चातकी पाइ जलु स्वाती ॥

ज्याप्रमाणे दिवसा दिव्याची शोभा राहात नाही, त्याप्रमाणे धनुष्यभंग झाल्यामुळे जमलेले राजेलोक निस्तेज झाले. सीतेच्या सुखाला पारावार नव्हता. जणू चातक पक्षिणीला स्वातीचे जल पिण्यास लाभले. ॥ ३ ॥

रामहि लखनु बिलोकत कैसें । ससिहि चकोर किसोरकु जैसें ॥

सतानंद तब आयसु दीन्हा । सीतॉं गमनु राम पहिं कीन्हा ॥

ज्याप्रमाणे चकोराचे पिल्लू चंद्राला चकित होऊन पाहात राहाते, त्याप्रमाणे लक्ष्मण श्रीरामांना पाहात होता. तेव्हा शतानंदांच्या आज्ञेने सीता श्रीरामांच्याजवळ गेली. ॥ ४ ॥

दोहा—संग सखीं सुंदर चतुर गावहिं मंगलचार ।

गवनी बाल मराल गति सुषमा अंग अपार ॥ २६३ ॥

तिच्या बरोबर सुंदर व चतुर सख्या मंगल गीते गात निघाल्या आणि सीता बालहंसीच्या चालीने निघाली. तिची सर्वांगे अपार कांतीने उजळली होती. ॥ २६३ ॥

सखिन्ह मध्य सिय सोहति कैसें । छबिगन मध्य महाछबि जैसें ॥

कर सरोज जयमाल सुहाई । बिस्व बिजय सोभा जेहिं छाई ॥

सख्यांच्यामध्ये सीता अशी शोभून दिसत होती की, जणू पुष्कळशा लावण्यवतींच्या मध्ये महालावण्यवती असावी. तिच्या करकमलांमध्ये सुंदर जयमाला होती. तिच्यामध्ये विश्र्वविजयी शोभा सामावली होती. ॥ १ ॥

तन सकोचु मन परम उछाहू । गूढ़ प्रेमु लखि परइ न काहू ॥

जाइ समीप राम छबि देखी । रहि जनु कुअँरि चित्र अवरेखी ॥

सीतेचे शरीर लाजेने चूर होते, परंतु मनामध्ये परम उत्साह भरलेला होता. तिचे ते गुप्त प्रेम कुणाला कळून आले नाही. जवळ गेल्यावर श्रीरामांचे लावण्य पाहून राजकुमारी सीता चित्रासारखी तटस्थ झाली. ॥ २ ॥

चतुर सखीं लखि कहा बुझाई । पहिरावहु जयमाल सुहाई ॥

सुनत जुगल कर माल उठाई । प्रेम बिबस पहिराइ न जाई ॥

चतुर सखीने तिची ही दशा पाहून समजाविले की, ‘ अग, ही सुंदर जयमाला त्यांना घाल ना. ‘ हे ऐकून सीतेने दोन्ही हातांनी माला उचलली, परंतु प्रेमविवश झाल्यामुळे तिला ती घालता येईना. ॥ ३ ॥

सोहत जनु जुग जलज सनाला । ससिहि सभीत देत जयमाला ॥

गावहिं छबि अवलोकि सहेली । सियँ जयमाल राम उर मेली ॥

जणूं देठांसह दोन कर-कमळे चंद्राला पाहाताना बावरुन 

जयमाला अर्पण करीत आहेत. ते रुप पाहून सख्या गाणी 

गाऊ लागल्या. तेव्हा सीतेने श्रीरामांच्या गळ्यात 

जयमाला घातली. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: