Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 1 
Ovya 1 to 33 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १ 
ओव्या १ ते ३३
तरि अवधान एकवेळे दीजे । मग सर्वसुखासि पात्र होइजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
१) श्रीज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, अहो श्रोते हो, तर तुम्ही एक वेळ ( माझ्या बोलण्याकडे ) लक्ष द्या; म्हणजे मग सर्व सुखाला प्राप्त व्हाल; हें माझें उघड प्रतिज्ञेचें बोलणें ऐका. 
परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं ।
देयाचें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥
२) परंतु महाराज, तुमच्यासारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमध्यें हें मी आढ्यतेनें बोलत नाहीं. लक्ष द्यावे ' ही माझी लडिवाळपणची विनंती आहे. 
कां जे लळेयांचें लळे सरती । मनोरथांचे मनौरे पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसी ॥ ३ ॥
३) कारण कीं, तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील, तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात.
तुमचेया दिठिवेयाचिये बोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
४) तुमच्या त्या कृपारुप दृष्टीच्या ओलाव्यानें प्रसन्नतारुप नळें टवटवीत झालें, त्याची ती सावली पाहून, महाराज, तेथें मी भागलेला लोळत आहें.    
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावों लाहों ।
येथही जरी सलगी करुं बिहों । तरी निघों कें पां ॥ ५ ॥
५) महाराज, आपण सुखरुपी अमृयाचे डोह आहांत, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरुप गारवा प्राप्त करुन घेतों. येथें देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालों, तर आम्हीं शांत कोठें व्हावें ?  
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडां विचुकां पाउलीं ।
तें चोज करुनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥
६) अथवा लेकरुं बोबडें बोलत असलें, अथवा वेडेवाकडें पाऊल टाकीत असलें, तर त्याबद्दल त्याचें कौतुक करुन आई जशी समाधान पावते,  
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो ।
या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करित ॥ ७ ॥
७) त्याप्रमाणें तुम्हां संतांचें प्रेम कशानें तरी आमच्यावर व्हावें, अशी आमची फार इच्छा असल्यामुळें, महाराज, आम्ही सलगी करीत आहोंत.    
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।
काय घड्यावर सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥
८) वास्तविक पाहिलें तर, आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढें ' माझ्या बोलण्याकडे अवधान द्या, म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल '; असें बोलण्याची माझी काय योग्यता आहे ? सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन  शिकावयाचें आहे काय ? ( तर नाहीं; सरस्वतीचा मुलगा स्वभावतःच सर्व जाणतो )
अवधारां आवडे तेसणा घुंघुरु । परि महातेजीं न मिरवे काय करुं ।
अमृताचिया ताटीं वोगरुं । ऐसी रससोय कैंची ॥ ९ ॥
९) ऐका. काजवा जरी हवा तेवढा मोठा असला, तरी सूर्याच्या प्रकाशापुढें त्याचें तेज पडत नाहीं; त्याला काय करावें ? अमृताच्या ताटामध्यें वाढण्यासारखें पक्वान्न कोठून असणार ?  
अहो हिमकरासी विंजणें । की नादापुढें आइकवणें ।
लेणियासी लेणें । हें कहीं आथी ॥ १० ॥
१०) अहो, शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्यानें वारा घालणें किंवा प्रत्यक्ष नादब्रह्माला गाणें ऐकविणें, किंवा स्वतः अलंकारास दागिन्यानें सजविणें, असें कोठें झालें आहे काय ? 
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें ।
हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ॥ ११ ॥
११) सांगा सुवासानें कशाचा वास घ्यावा ? समुद्राने कोणत्या ठिकाणीं स्नान करावें ? हे सर्व आकाशच जीमध्यें मावेल अशी मोठी विस्तृत वस्तु कोठून असणार ?   
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये ।
ऐसें वक्तृत्व कावणा आहे । जेणें रिझा तुम्ही ॥ १२ ॥
१२) त्याप्रमाणें तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल कीं, ' याला म्हणावें व्याख्यान ' व ज्या योगानें तुमचें मन रंगून जाईल, असें वक्तृत्व कोणाजवळ आहे ! 
तरि विश्र्वप्रगटितया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती ।
कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे ॥ १३ ॥
१३) असें जरी आहे, तरी जग उजेडांत आणणार्‍या सूर्याला काडवातीनें ओवाळूं नये काय ? किंवा चूळाभर पाण्यानें समुद्राला अर्घ्य देऊं नये काय ?  
प्रभु तुम्हीं महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसें भक्ती ।
म्हणोनि बेल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥
१४) महाराज तुम्ही मूर्तिमंत शंकर आहांत आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीनें पूजा करीत आहें; म्हणून बेलाऐवजी जरी मी निर्गुडी वाहात आहें, तरी तिला आपण बेल समजून स्वीकार कराल.  
बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे ।
की तो संतोषलेनि वेगें । मुखाचि वोडवी ॥ १५ ॥
१५) लहान मूल बापाच्या ताटांत जेवावयास बसतें आणि पानांतील पदार्थ घेऊन बापालाच जेवूं घालावयास लागतें, पण बाप ( न रागावतां उलट ) आनंदाच्या भरानें आपलें तोंडच त्याच्या पुढें करतो.   
तैसा मी जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती ।
तरी तुम्हीं तोषेजे ऐसी जाती । प्रेमाची या ॥ १६ ॥
१६) त्याप्रमाणें जरी मी तुमच्याशीं बालबुद्धिनें बडबड करीत आहे, तरी त्यामुळें तुम्ही ' आनंदीच व्हावें 'असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे.  
आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे ।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥
१७) आणि ( ज्ञानोबा आमचा आहे अशा ) त्या आपलेपणाच्या प्रेमानें तुम्ही संत अतिशय घेरलेले आहांत; म्हणून मी केलेल्या सलगीचें ओझें तम्हाला वाटणार नाही.   
अहो तान्हयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
१८) अहो, गाईच्या सडाना तिच्या वासराने ढुसणी दिली त्या योगानें तिला जास्तच पान्हा फुटतो. ( कारण ) आवडल्याच्या रागानें प्रेम दुपट्ट होत असतें.   
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें ।
तें चेइलें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी ॥ १९ ॥  
१९) म्हणून तुमचें निजलेले कृपाळूपण माझ्या लेंकरांच्याबोलण्यानें जागें झालें, हें मला कळलें, महाराज, याकरितां अवधान द्या असें मी बोललो. 
एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणी । कीं वारया धापत आहे वाहणी ।
हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ॥ २० ॥
२०) वास्तविक पाहिंले तर चांदणें आढीत ( घालून ) पिकवितात काय ? किंवा वार्‍याला कोणी गति दिली आहे काय ? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालाावी ?
आइकां पाणी वोथिजावें न लगे । नवनीतीं माथुला न रिगे ।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांतें ॥ २१ ॥
२१) ऐका. ज्याप्रमाणें पाणी पातळ करावें लागत नाहीं, लोण्यामध्यें रवीचा प्रवेश होत नाहीं, त्याप्रमाणें ज्यांना पाहून माझें व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाहीं.
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावलेया निवांतु निजे ।
तो गितार्थु मर्‍हाटिया बोलिजे । हा पाडु काई ॥ २२ ॥
२२) हे असो; वेदांचे शब्द कुंठित झाले असतां ते वेद ज्या गीतार्थरुपी बाजेवर निवान्त निजतात, तो गीतार्थ मी मराठीमध्यें बोलावा, ही माझी योग्यता आहे काय ?   
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा ।
जे घिटींवा करुनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥
२३) परंतु असे असूनहि ही जी मला ( गीतार्थ मराठींत सांगण्याची ) तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेनें कीं ( अशी ) धिटाई करुन आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावें. 
परि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें ।
तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथा माझिया ॥ २४ ॥
२४) तर, आतां चंद्रापेक्षां शांत करणारें व अमृताहूनहि जीवित वाढविणारें, असें जें आपलें लक्ष, त्या लक्षानें माझ्या मनोरथाची वाढ करावी. 
कां जैं दिठिवा तुमचा वरुषें । तैं सकळार्थासिद्धि मती पिके ।
एर्‍हवीं कोंमेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
२५) कारण कीं, जेव्हां तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हां माझ्या बुद्धींत सर्व अर्थ पूर्णपणें स्फुरतील; पण जर तुम्ही उदास राहाल तर अंकुरदशेला आलेलें माझें ज्ञान सुकून जाईल.
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥
२६) तरी ऐका, कीं, सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरुपी जर खाद्य मिळेल, तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांचीं दोंदें सुटतील. 
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥
२७) ( आणखी दुसरें असें कीं, ) वक्त्याच्या तोंडांतून केव्हां शब्दोच्चार होईल, याची अर्थ वाट पहात असतो व तेथें ( त्या वेळीं ) एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाच्या फुलांचा बहर होत जातो ( बुद्धीमध्यें अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरुं लागतात. ) 
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।
आणि श्रोता दुश्र्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥
२८) म्हणून उत्साहानें प्रश्र्नोत्तर देणें हाच कोणी अनुकूल वारा सुटला तर, हृदयरुपी आकाशांत शास्त्रसिद्धान्तरुपी मेघ दाट येतील; आणि श्रोता दुश्चित्त असेल, तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. 
अहो चंद्रकांतु द्रवता करि होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे ।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नोहे । श्रोतेनविण ॥ २९ ॥
२९) अहो, चंद्रकांतमणि पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ति चंद्रामध्येंच आहे, ( त्याप्रमाणें वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलावयास लावण्याची हातवटी श्रोत्यांमध्यें आहे, ) म्हणून श्रोत्यांशिवाय वक्ता हा वक्ताच नाही.   
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसें हें तांदुळीं कासया विनवावें ।
साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ॥ ३० ॥
३०) परंतु आतां ' आम्हांस गोड करा ' अशी ही तांदुळांनी ( स्वयंपाक करणाराची ) प्रार्थना कशाकरितां करावयाची ? लांकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची कां प्रार्थना करावयाची ?
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी ।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥
३१) तो ( सूत्रधार ) बाहुलीच्या कामाकरितां तिला नाचवितो काय ? ( तर नाहीं, मग ) बाहुली नाचविण्यानें तो आपल्या ज्ञानाची कळा वाढवित असतो. म्हणून ' अवधान द्या ' अशी श्रोत्यांची विनंती करण्याच्या उठाठेवीचें आम्हांला काय काम आहे ?  
तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें ।
आतां सांगे जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥
३२) तेव्हां श्रीगुरुनिवृत्तिनाथ म्हणाले, अरें, झालें तरी काय ? तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनीं जें अर्जुनाला सांगितलें, तें सांग.
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें ।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले ॥ ३३ ॥
३३) यावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्र्वर महाराज संतोषून उल्हासानें म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणें बोलले.


Custom Search

No comments: