Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 3 श्रीज्ञानेश्र्वरी,अध्याय ९ भाग ३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 3 
Ovya 57 to 70 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ३ 
ओव्या ५७ ते ७०
मूळ श्लोक
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवत् र्मनि ॥ ३ ॥ 
३) हे शत्रुतापना, या ( आत्मज्ञानरुपी ) धर्मावर श्रद्धा न ठेवणारे पुरुष माझी प्राप्ती न होतां मृत्युरुप संसाराच्या मार्गावर परत येतात.
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥ ५७ ॥
५७) अर्जुना, ( असें ) पाहा की, दूध हें पवित्र असून शिवाय गोड आहे व तें जवळच ( सडांच्या ) कातडीच्या पदरापलीकडे आहे; परंतु गोचीड तें टाकून देऊन रक्तच पीत नाहीं काय ?  
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेची घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
५८) किंवा, कमळकंद आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणींच असते; परंतु कमळांतील परिमळ ( दूरचें ) भुंगे येऊन, सेवन करुन जातात व जवळच असलेल्या बेडकांना ( मात्र ) चिखलच शिल्लक राहातो. 
नातरी निदैवांचा परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
५९) अथवा, दुर्दैवी पुरुषाच्या घरांत हजारों मोहोरा पुरलेल्या आहेत, परंतु तो तेथें राहून उपवास काढतो किंवा दारिद्र्यांत जीवित कंठितो.
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासि कामु । विषयावरी ॥ ६० ॥
६०) त्याप्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम, तो मी ( सर्वांच्या ) हृदयांत असतांना ( त्या मला न जाणून ) मूर्ख लोक ( सुखाकरितां ) विषयांची इच्छा करतात.  
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।
तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
६१) मोठें मृगजळ डोळ्यांना दिसल्यावर अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा, अथवा गळ्यांत बांधलेला परीस, शिंप मिळावी म्हणून तोडून टाकावा,  
तैसीं अहंममतेचिये लवसवडी । मातें न पवती बापुडीं ।
म्हणोनि जन्ममरणाचिये दुथडी । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें ' मी व माझें ' या नादांत दंग झालेले तें दीन लोक मला येऊन मिळत नाहींत आणि म्हणूनच ते जन्ममरणरुप या दुधड्या नदींत ( संसारांत ) गटांगळ्या खात राहिले आहेत.  
एर्‍हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा ।
कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें ॥ ६३ ॥
६३) तसें पाहिलें तर मी कसा ( सुलभ ) आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य तसा मी सर्वांना सदा समोर आहें; पण तो सूर्य केव्हां ( रात्रीं ) नसतो म्हणून दिसत नाहीं. केव्हां केव्हां ( दिवसा ) दिसत नाहीं, असा त्याच्यांत कमीपणा आहे, तसा कमीपणा माझ्यांत नाहीं. 
मूळ श्लोक
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४ ॥
४) अव्यक्त रुपानें मीं हें सर्व व्यापलेलें आहे. सर्व भूतें माझ्या ठिकाणीं आहेत, पण मी त्यांच्या ठिकाणीं स्थित नाहीं. 
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हें जगचि नोहे आघवें ।
जैसें दूध मुरालें स्नभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
६४) माझा विस्तार म्हणजेच ( हें ) जग, नाही काय ? ( तर होय माझाच विस्तार आहे. ) तें कसें ? तर जसें दूध विरजलें असतां तेंच स्वभावतः दही होतें.
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु ।
तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥
६५) अथवा बीजच झाड झालें किंवा सोनेंच अलंकार बनलें, त्याप्रमाणें हें जग म्हणजे माझ्या एकाचा विस्तार आहे. 
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्र्वाकारें वोथिजलें ।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
६६) हें अव्यक्तपणानें थिजलेलें ( संकुचित ) असतें, तेंच मग विश्वाच्या आकारानें पातळ होतें ( पसरतें ); या रीतीनें अव्यक्त रुप असलेला मी त्रैलोक्याच्या रुपानें विस्तार पावतों, असें समज.
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें ।
परि माझां ठायीं बिंबते । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥
६७) पाण्यवर जसा फेस भासतो, त्याप्रमाणे महत् तत्त्वापासून देहापर्यंत हीं सर्वहि भूतें माझ्या ठिकाणीं भासतात.
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।
नातरीं स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
६८) अर्जुना, पण या फेसाच्याआंत पाहिलें असतां जसें पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नांतील अनेकपण जसें जागें झाल्यावर नसतें,  
तैसीं भूतें इयें माझा ठायीं । बिंबती तयामाजि मी नाहीं ।
इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
६९) त्याप्रमाणें हीं भूतें माझ्या ठिकाणीं जरी भासली तरी पण त्यांमध्यें मी नाहीं, हा विचार तुला आम्हीं मागें ( अध्याय ७ वा श्लोक १२ मध्यें ) सांगितला ( आहे ). तो लक्षांत आण. 
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो ।
तरी मजआंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥
७०) एवढ्याकरितां बोललेल्याच गोष्टींचा ( पुनरुक्ति करुन ) पाल्हाळ करुं ये. म्हणून हें बोलणें राहूं दे. तर माझ्या स्वरुपांत तुझी दृष्टि प्रवेश करो.  



Custom Search

No comments: