Sunday, June 27, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 34 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३४

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 34 
Doha 197 to 202 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३४ 
दोहा १९७ ते २०२

दोहा—एहि बिधि मज्जनु भरतु करि गुर अनुसासन पाइ ।

मातु नहानीं जानि सब डेरा चले लवाइ ॥ १९७ ॥

अशा रीतीने भरताने स्नान केले. नंतर गुरुंची आज्ञा घेऊन सर्व मातांचे स्नान उरकले आहे, असे समजल्यावर तो सैन्याचा तळ उठवून सर्वांसह निघाला. ॥ १९७ ॥

जहँ तहँ लोगन्ह डेरा कीन्हा । भरत सोधु सबही कर लीन्हा ॥

सुर सेवा करि आयसु पाई । राम मातु पहिं गे दोउ भाई ॥

लोकांनी जिकडे-तिकडे मुक्काम ठोकला होता. भरताने सर्वांची व्यवस्था झाली की नाही ते पाहून घेतले. नंतर देवपूजन करुन दोघे भाऊ माता कौसल्येकडे आले. ॥ १ ॥

चरन चॉंपि कहि कहि मृदु बानी । जननीं सकल भरत सनमानी ॥

भाइहि सौंपि मातु सेवकाई । आपु निषादहि लीन्ह बोलाई ॥

तिचे पाय चेपून व कोमल शब्द बोलून भरताने सर्व मातांविषयी आदर व्यक्त केला. त्यानंतर शत्रुघ्नाला मातांच्या सेवेचे काम देऊन त्याने निषादराजाला बोलावले, ॥ २ ॥

चले सखा कर सों कर जोरें । सिथिल सरीरु सनेह न थोरें ॥

पूँछत सखहि सो ठाउँ देखाऊ । नेकु नयन मन जरनि जुड़ाऊ ॥

मित्र निषादराजाच्या हातात हात घालून भरत निघाला. भरताच्या मनात त्याच्याविषयी खूप प्रेम होते. त्यामुळे त्याला देहभान उरले नव्हते. भरताने त्याला म्हटले की, ‘ ते ठिकाण मला दाखव की ज्यामुळे माझे नेत्र व मनातील तळमळ काहीशी शांत होईल. ॥ ३ ॥

जहँ सिय रामु लखनु निसि सोए । कहत भरे जल लोचन कोए ॥

भरत बचन सुनि भयउ बिषादू । तुरत तहॉं लइ गयउ निषादू ॥  

जिथे सीता, श्रीराम, व लक्ष्मण हे रात्री झोपले होते. ‘ असे म्हणताना त्याच्या डोळ्यांच्या कडा प्रेमाश्रूंनी भरल्या. भरताचे बोलणे ऐकून निषादाला फार वाईट वाटले. तो लगेच त्याला तेथे घेऊन गेला. ॥ ४ ॥

दोहा—जहँ सिंसुपा पुनीत तर रघुबर किय बिश्रामु ।

अति सनेहँ सादर भरत कीन्हे दंड प्रनामु ॥ १९८ ॥

जिथे पवित्र अशोक वृक्षाखाली श्रीरामांनी विश्रांती घेतली होती, भरताने त्या ठिकाणी अत्यंत प्रेमाने दंडवत घातला. ॥ १९८ ॥

कुस साँथरी निहारि सुहाई । कीन्ह प्रनामु प्रदच्छिन जाई ॥

चरन रेख रज आँखिन्ह लाई । बनइ न कहत प्रीति अधिकाई ॥

कुशांची तयार केलेली पथारी पाहून भरताने तिला प्रदक्षिणा घातली. श्रीरामचंद्रांच्या चरणचिन्हांची धूळ आपल्या डोळ्यांना लावली. त्यावेळच्या त्याच्या प्रेमाचे उधाण काही वर्णन करता येत नाही. ॥ १ ॥

कनक बिंदु दुइ चारिक देखे । राखे सीस सीय सम लेखे ॥

सजल बिलोचन हृदयँ गलानी । कहत सखा सन बचन सुबानी ॥

तेथे सीतेच्या वस्त्रालंकारातून पडलेले दोनचार सोन्याचे कण पाहून भरताने ते सीतेसमान मानून तेथे डोके टेकले. त्याचे डोळे पाण्याने भरले होते आणि मनात खिन्नता होती. तो मित्र निषादाला मृदु वाणीने म्हणाला, ॥ २ ॥

श्रीहत सीय बिरहँ दुतिहीना । जथा अवध नर नारि बिलीना ॥

पिता जनक देउँ पटतर केही । करतल भोगु जोगु जग जेही ॥

‘ हे सुवर्णाचे कण किंवा तार हे सुद्धा सीतेच्या विरहामुळे असे शोभाहीन व कांतिहीन झाले आहेत की, जसे श्रीरामांच्या वियोगामुळे अयोध्येतील नर-नारी शोकाकुल झालेले होते. ज्या सीतेचे वडील या जगातील भोग व योग मुठीत असलेले राजा जनक आहेत, त्या जनकांना कुणाची उपमा देऊ ? ॥ ३ ॥

 ससुर भानुकुल भानु भुआलु । जेहि सिहात अमरावतिपालू ॥

प्राननाथु रघुनाथ गोसाईं । जो बड़ होत सो राम बड़ाईं ॥

जिचे सासरे सूर्यकुलाचे सूर्य राजा दशरथ आहेत, ज्यांचा हेवा अमरावतीचा स्वामी इंद्र करीत होता, आणि प्रभु रघुनाथ जिचे प्राणनाथ आहेत, जे इतके महान आहेत की, त्यांनी दिलेल्या मोठेपणामुळे कोणीही मोठा होतो. ॥ ४ ॥

दोहा—पति देवता सुतीय मनि सीय सॉंथरी देखि ।

बिहरत हृदय न हहरि हर पबि तें कठिन बिसेषि ॥ १९९ ॥

श्रेष्ठ पतिव्रता स्त्रियांमध्ये शिरोमणी असलेल्या श्रेष्ठ सीतेची ही पथारी पाहून माझे हृदय हाय हाय करुन विदीर्ण होत नाही. यावरुन भगवान शंकरा, हे माझे हृदय वज्राहून कठोर आहे. ॥ १९९ ॥

लालन जोगु लखन लघु लोने । भे न भाइ अस अहहिं न होने ॥

पुरजन प्रिय पितु मातु दुलारे । सिय रघुबीरहि प्रानपिआरे ॥

माझा लहान भाऊ लक्ष्मण फार सुंदर व लाड करण्याजोगा आहे. असा भाऊ कुणाचाही झाला नाही. सध्या नाहीं आणि होणारही नाही. तो लक्ष्मण अयोध्येच्या लोकांचा लाडका, माता-पित्यांचा आवडता आणि सीतारामांचा प्राणप्रिय आहे. ॥ १ ॥

मृदु मूरति सुकुमार सुभाऊ । तात बाउ तन लाग न काऊ ॥

ते बन सहहिं बिपति सब भॉंती । निदरे कोटि कुलिस एहिं छाती ॥

जो कोमलमूर्ती व सुकुमार स्वभावाचा आहे. ज्याच्या शरीराला कधी गरम वारेसुद्धा लागलेले नाहीत, तो वनामध्ये सर्व प्रकारची संकटे सोशीत आहे, माझी ही छाती कोट्यावधी वज्रांपेक्षा कठोर आहे. नाहीतर ती केव्हाच फाटून गेली असती. ॥ २ ॥

राम जनमि जगु कीन्ह उजागर । रुप सील सुख सब गुन सागर ॥

पुरजन परिजन गुर पितु माता । राम सुभाउ सबहि सुखदाता ॥

श्रीरामांनी अवतार घेऊन जगाला उजळून टाकले. ते रुप, शील, सुख व सर्व गुण यांचे सागर आहेत. पुरवासी, कुटुंबीय, गुरु, माता-पिता या सर्वांना सुख देणारा श्रीरामांचा स्वभाव आहे. ॥ ३ ॥

बैरिउ राम बड़ाई करहीं । बोलनि मिलनि बिनय मन हरहीं ॥

सारद कोटि कोटि सत सेषा । करि न सकहिं प्रभु गुन लेखा ॥

शत्रुसुद्धा श्रीरामांची वाखाणणी करतात. ते आपल्या वागण्या-बोलण्याने, भेटण्याच्या शैलीने आणि विनयाने सर्वांचे मन मोहून  टाकतात. कोट्यावधी सरस्वती व अब्जावधी शेषही प्रभू श्रीरामचंद्रांच्या गुणांच्या समूहांची गणना करु शकत नाहीत. ॥ ४ ॥

दोहा—सुखस्वरुप रघुबंसमनि मंगल मोद निधान ।

ते सोवत कुस डासि महि बिधि गति अति बलवान ॥ २०० ॥

जे सुखस्वरुप, रघुवंश शिरोमणी, मांगल्य व आनंदाचे भांडार आहेत, ते जमिनीवर कुश पसरुन झोपतात. दैवाची गती मोठी बलवान आहे, हेच खरे. ॥ २०० ॥

राम सुना दुखु कान न काऊ । जीवनतरु जिमि जोगवइ राऊ ॥

पलक नयन फनि मनि जेहि भॉंती । जोगवहि जननि सकल दिन राती ॥

श्रीरामचंद्रांनीं आपल्या कानांनी   सुद्धा कधी दुःखाचे नावही ऐकले नाही. महाराज दशरथ स्वतः जीवन-वृक्षाप्रमाणे त्यांचा सांभाळ करीत असत. ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचा व साप आपल्या मण्याचा सांभाळ करतो, त्याप्रमाणे सर्व मातासुद्धा रात्रंदिवस त्यांचा सांभाळ करीत असत. ॥ १ ॥

ते अब फिरत बिपिन पदचारी । कंद मूल फल फूल अहारी ॥

धिगा कैकई अमंगल मूला । भइसि प्रान प्रियतम प्रतिकूला ॥

तेच श्रीराम आता जंगलात पायी फिरत आहेत. कंदमुळे व फळफुलांचा आहार घेत आहेत. अमंगलाचे मूळ असलेल्या कैकेयीचा धिक्कार असो. ती स्वतःच्या प्राणप्रियतम पतीच्याही विरुद्ध गेली. ॥ २ ॥

मैं धिग धिग अघ उदधि अभागी । सबु उतपातु भयउ जेहि लागी ॥

कुल कलंकु करि सृजेउ बिधातॉं । साइँदोह मोहि कीन्ह कुमातॉं ॥

पापांचा समुद्र व दुर्भागी असलेल्या माझा धिक्कार असो, धिक्कार असो. माझ्यामुळे हे सर्व उत्पात घडले. विधात्याने मला कुलाचा कलंक म्हणून उत्पन्न केले आणि कुमातेने मला स्वामिद्रोही बनवून टाकले. ‘ ॥ ३ ॥

सुनि सप्रेम समुझाव निषादू । नाथ करिअ कत बादि बिषादू ॥

राम तुम्हहि प्रिय तुम्ह प्रिय रामहि । यह निरजोसु दोसु बिधि बामहि ॥

हे ऐकून निषादराज प्रेमाने समजावत म्हणाला की, ‘ हे नाथ, तुम्ही विनाकारण विषाद का करीत आहात ? श्रीराम तुम्हांला प्रिय आहेत आणि तुम्ही श्रीरामांना प्रिय आहात, हेच सत्य आहे. दोष आहे तो प्रतिकूल विधात्याचा आहे. ॥ ४ ॥

छं०—बिधि बाम की करनी कठिन जेहिं मातु कीन्ही बावरी ।

तेहि राति पुनि पुनि करहिं प्रभु सादर सरहना रावरी ॥

तुलसी न तुम्ह सो राम प्रीतमु कहतु हौं सौंहें किएँ ।

परिनाम मंगल जानि अपने आनिए धीरजु हिएँ ॥

प्रतिकूल विधात्याची करणी फार कठोर आहे. त्याने माता कैकेयीला वेडी करुन टाकले. त्या रात्री प्रभू श्रीरामचंद्र वारंवार मोठ्या आदराने तुमची फार वाखाणणी करीत होते. श्रीरामांना तुमच्यासारखा अत्यंत प्रिय कोणी नाही, हे मी शपथ घेऊन सांगतो. परिणामी मंगलच होईल. असे समजून तुम्ही मनाता धीर धरा.

सो०—अंतरजामी रामु सकुच सप्रेम कृपायतन ।

चलिअ करिअ बिश्रामु यह बिवारि दृढ़ आनि मन ॥ २०१ ॥  

श्रीरामचंद्र अंर्तयामी व संकोच प्रेम व कृपेचे धाम आहेत, असा विचार करुन व मन घट्ट करुन चला आणि विश्रांती घ्या. ‘ ॥ २०१ ॥

सखा बचन सुनि उर धरि धीरा । बास चले सुमिरत रघुबीरा ॥

यह सुधि पाइ नगर नर नारी । चले बिलोकन आरत भारी ॥

मित्राचे म्हणणे ऐकून व मनात धीर धरुन श्रीरामांचे स्मरण करीत भरत मुक्कामाकडे निघाला.नगरातील सर्व स्त्री-पुरुष श्रीरामांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची वार्ता ऐकून आतुर होऊन ते स्थान पाहण्यास निघाले. ॥ १ ॥

परदखिना करि करहिं प्रनामा । देहिं कैकइहि खोरि निकामा ॥

भरि भरि बारि बिलोचन लेहीं । बाम बिधातहि दूषन देहीं ॥

त्यांनी त्या स्थानाला प्रदक्षिणा घालून प्रणाम केला आणि कैकेयीला खूप दोष दिला. डोळ्यांत पाणी आणून त्यांनी प्रतिकूल विधात्याला दूषण दिले. ॥ २ ॥

एक सराहहिं भरत सनेहू । कोउ कह नृपति निबाहेउ नेहू ॥

निंदहिं आपु सराहि निषादहि । को कहि सकइ बिमोह बिषादहि ॥

कोणी भरताच्या प्रेमाची प्रशंसा करीत होता, तर कोणी म्हणे की, राजांनी आपले प्रेम चांगल्या प्रकारे सिद्ध केले. सर्वजण स्वतःची निंदा करीत होते व निषादराजाची प्रशंसा करीत होते. त्या वेळेचे त्या लोकांचे प्रेम व दुःख यांचे वर्णन कोण करु शकेल ? ॥ ३ ॥

एहि बिधि राति लोगु सबु जागा । भा भिनुसार गुदारा लागा ॥

गुरहि सुनावँ चढ़ाइ सुहाईं । नईं नाव सब मातु चढ़ाईं ॥

अशा प्रकारे सर्वजण रात्रभर जागे राहिले. सकाळ होताच नावा सुरु झाल्या. सुंदर नावेवर गुरुजींना बसवून नंतर नवीन नावांवर सर्व मातांना चढविले. ॥ ४ ॥     

दंड चारि महँ भा सबु पारा । उतरि भरत तब सबहि सँभारा ॥

चार घटकांमध्ये सर्वजण गंगेपलीकडे उतरले. तेव्हा भरताने स्वतः उतरुन सर्वांची काळजी घेतली. ॥ ५ ॥

दोहा—प्रातक्रिया करि मातु पद बंदि गुरहि सिरु नाइ ।

आगें किए निषाद गन दीन्हेउ कटकु चलाइ ॥ २०२ ।

प्रातःकालीन कर्में उरकून भरताने मातांच्या चरणी वंदन केले आणि गुरुपुढे मस्तक नमवून निषाद लोकांना मार्ग दाखविण्यासाठी पुढे केले आणि सेनेला जाण्याची आज्ञा केली. ॥ २०२ ॥

कियउ निषादनाथु अगुआईं । मातु पालकीं सकल चलाईं ॥

साथ बोलाइ भाइ लघु दीन्हा ।  बिप्रन्ह सहित गवनु गुर कीन्हा ॥

निषादराजाला पुढे करुन त्याच्यामागे सर्व मातांच्या पालख्या सोडल्या. शत्रुघ्नाला बोलावून त्याला त्यांच्याबरोबर पाठविले. नंतर ब्राह्मणांसह गुरुंनी गमन केले. ॥ १ ॥

आपु सुरसरिहि कीन्ह प्रनामू । सुमिरे लखन सहित सिय रामू ॥

गवने भरत पयादेहिं पाए । कोतल संग जाहिं डोरिआए ॥

त्यानंतर भरताने गंगेला प्रणाम करुन लक्ष्मणासह श्रीसीतारामंचे स्मरण केले. भरत पायीच जाऊ लागला. त्याच्यासोबत लगाम धरलेले रिकामे घोडे जात होते. ॥ २ ॥

कहहिं सुरसेवक बारहिं बारा । होइअ नाथ अस्व असवारा ॥

रामु पयादेहि पायँ सिधाए । हम कहँ रथ गज बाजि बनाए ॥

चांगले सेवक भरताला सांगत होते की, ‘ हे नाथ, घोड्यावर स्वार व्हा. ‘ परंतु तो उत्तर देईं की ‘ श्रीराम तर पायींच गेले आणि आमच्यासाठी रथ, हत्ती व घोडे बनविले आहेत काय ? ॥ ३ ॥

सिर भर जाउँ उचित अस मोरा । सब तें सेवक धरमु कठोरा ॥

देखि भरत गलि सुनि मृदु बानी । सब सेवक गन गरहिं गलानी ॥

डोक्यावर चालत जावे. हेच मला योग्य वाटते. ‘ सेवकाचा

 धर्म मोठा कठीण असतो. भरताची अवस्था पाहून व मृदु

 भाषा ऐकून सर्व सेवक लाजेने चूर होत होते. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: