Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी,अध्याय ९ भाग ४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 4 
Ovya 71 to 97 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ४ 
ओव्या ७१ ते ९७
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्र्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥
५) ( कल्पना टाकून पाहूं लागलास तर ) सर्व भूतें माझ्या ठिकाणींहि नाहींत, असा हा माझा ऐश्र्वर्ययोग आहे, तो पाहा. ( तसेंच ) भूतांना धारण करणारें तथापि ( अलिप्त असल्यानें ) भूतांच्या ठिकाणीं स्थित नसलेलें आणि ज्याच्या ठिकाणीं भूतांची कल्पना केली जाते, अशा प्रकारचें माझें स्वरुप आहे.   
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणउनी ॥ ७१ ॥
७१) मायेच्या पलीकडे असणारी आमची जी शुद्ध स्वरुपस्थिति, ती जर तूं कल्पना टाकून पाहशील, तर हे ( सर्व ) प्राणी माझ्या ठिकाणीं आहेत, हे म्हणणें देखील व्यर्थ आहे; कारण सर्व मीच आहें म्हणून    
एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।
म्हणोनि अखंडित परी झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें ॥ ७२ ॥
७२) सहज विचार केला तर कल्पनारुप संध्याकाळच्या वेळीं बुद्धीची दृष्टि क्षणभर मंद होते, म्हणून माझें स्वरुप अखंड दंडायमान असलें तरी तें अस्पष्ट होतें व ( त्या ठिकाणीं ) भूतें निरनिराळी आहेत, असें दिसतें. 
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें ।
जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥
७३) तीच कल्पनारुपी संध्याकाळ नाहींशी झालीं, म्हणजे त्या वेळीं मी अखंड दंडायमानच स्वरुपानें आहें. तें कसें तर, ज्याप्रमाणें माळेवर भासणारी सर्पकल्पना जातांक्षणीच माळेचें सर्पपण जाऊन, तिचे मूळच स्वरुप दिसतें.  
एर्‍हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयांचे निघती कोंभ ।
परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥
७४) सहज विचार करुन पाहिलें तर, घागरी व मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात काय ? तर नाहीं, परंतु त्या घागरी व मडकीं यांचे आकार उमटले आहेत.
नातरी सागरींचां पाणीं । काय तरंगाचिया आहाती खाणी ।
ते अवांतर करणी । वारियाची नव्हे ॥ ७५ ॥
७५) अथवा समुद्राच्या पाण्यांत लाटांच्या खाणी आहेत काय ? पाण्याचे रुपांत ( लाटा ) ही पाण्याची करणी नव्हे काय ?  
पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी ।
तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥   
७६) असें पाहा की, कापसाच्या पोटांत कापडाचा गठ्ठा असतो काय ? तो कापूस नेसणाराच्या दृष्टीनें, कापड झाला आहे. 
जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे ।
येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
७७) सोन्याचे जरी अलंकार झाले, तरी त्यांचे सोनेपण मोडत नाही, सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात, ते दागिने घाणार्‍याच्या दृष्टीनें दिसतात.  
सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसाँ जें आविष्करे ।
तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ॥ ७८ ॥
७८) प्रतिध्वनी प्रत्युत्तरें अथवा आरशामध्यें जें प्रतिबिंबित होतें, तें ( शब्द आणि रुप ) आपलें ( असतें ) कीं खरोखर दुसरें तेथें उत्पन्न होतें ? सांग.  
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी ।
तयासि तयाचां संकल्पीं । भूतभासु असे ॥ ७९ ॥
७९) त्याप्रमाणें ह्या माझ्या शुद्ध स्वरुपीं जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो, त्याला त्याच्या कल्पनेमध्यें भूतांचा भास होतो. 
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भासु आधींच सरे ।
मग स्वरुप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥
८०) तीच कल्पना करणारी प्रकृति संपली, की भूताभास मूळचाच संपलेला आहे. मग अखंड माझे शुद्ध स्वरुप राहातें.
हें असो आंगीं भरलिया भवंडीं । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।
तैशीं आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥
८१) हें असूं दे ! आपण आपल्या भोंवती गरगर फिरलें असतां अंगांत भोंवळ आल्यामुळें जसें ( भोवतालच्या ) भिंती, नदीचा कांठ वगैरे सर्व कांहीं फिरल्यासारखें दिसतें, त्याप्रमाणें आपल्या कल्पनेनें माझ्या अखंड स्वरुपीं भूतें भासतात.    
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझां ठायीं ।
हें स्वप्नींहीं परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
८२) तीच कल्पना टाकून पाहिले असतां, मी भूतांमध्यें व भूतें माझ्यामध्यें, असें हे स्वप्नामध्येंसुद्धा कल्पना करण्यासारखें नाहीं.  
आतां मी एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजि मी असता ।
या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
८३) आतां मी एक भूतांना धारण करणारा अथवा भूतांमध्यें असणरा, ही बोलणी संकल्प ( कल्पनारुप ) सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत . 
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्र्वेंसीं विश्र्वात्मा ।
जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥
८४) म्हणून प्रियोत्तमा ( अर्जुना, ) ऐक; याप्रमाणें मी विश्वासहित विश्र्वाचाआत्मा आहे, आणि तो मी या मिथ्या भूतसमुदायाला सदा आश्रय आहें. 
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे ।
माझां ठायी भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं ॥ ८५  
८५) सूर्यकिरणांच्या आधारानें जसें मिथ्या मृगजळ भासतें, त्याप्रमाणें प्राणिमात्र माझ्या ठिकाणीं मृगजळवत् मिथ्या समज आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे सत्य समज.    
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।
जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
८६) या प्रकारचा मी, जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाहीं, असा आहे. तो कसा तर, ज्याप्रमाणें सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे. ( त्याप्रमाणें सर्व प्राणी आणि मी एक आहे.) 
हा आमुचा ऐश्र्वर्ययोगु । तुवां देखिला की चांगु ।
आता सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ॥ ८७ ॥
८७) अर्जुना, हा आमचा ऐश्र्वर्ययोग तुला चांगला समजला ना ? आतां येथें महत् तत्त्वापासून देहापर्यंतचीं तत्त्वें व मी, यांमधील भेदाचा कांहीं संबंध आहे का ? सांग.  
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें ।
आणि भूतावेगळिया मातें । कहींच न मनीं हो ॥ ८८ ॥
८८) याकरितां माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहींत हें खास; आणि मलाहि प्राणिमात्राहून वेगळे कधींच मानूं नकोस हो !  
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
६) सर्वत्र संचार करणारा महान् वायु आकाशाच्या ठिकाणीं जसा नित्य स्थित आहे, त्याप्रमाणें सर्व भूतें माझ्या ठिकाणी स्थित आहेस, असे जाण. 
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे ।
सहजे हालविलिया वेगळा दिसे । एर्‍हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥
८९) परंतु आकाश जसें व जेवढें आहे, तसाच व तेवढाच वायू आकाशांत असतो, सहज ( पंखा ) हालवून पाहिलें तर तो वेगळा दिसतो; नाहीं तर आकाश व तो एकच आहेत. 
तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं ।
निरविकल्पीं तरि नाहीं । तेध मीच मी आघवें ॥ ९० ॥
९०) त्याप्रमाणें प्राणिमात्र माझ्या ठिकाणीं कांहीं कल्पिलें तर भासतात व जर कल्पना केली नाही, तर तें नाहींतच त्या ठिकाणीसर्व मीच मी आहे.
म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें ।
जे कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥
९१) म्हणून भूतांचें असणें आणि नसणें कल्पनेच्या योगानें होतें, कारण कीं, भूताभास हा, कल्पना नष्ट झाली कीं, तिजबरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली कीं, तिजबरोबर उत्पन्न होतो.   
तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे ।
म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्र्वर्ययोगु ॥ ९२ ॥
९२) तें कल्पना करणारे भूतच ज्या वेळीं नाहीसें होतें, तेव्हां भूतांचे असणें व नसणें, हा व्यवहार कोठून होणार ? म्हणून तूं आणखी या ऐश्र्वर्ययोगासंबंधी पुनः विचार कर.     
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेंयातें कल्लोळ एक करीं ।
मग जंव पाहासी चराचरी । तव तूंचि आहासी ॥ ९३ ॥
९३) अशा अनुभवरुपी ज्ञानसमुद्रामध्यें तू आपल्याला एक लाट कर.; मग चराचरांत तूं पाहशील, तर तूंच एक आहेस ( असें कळून येईल ).   
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो । 
तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना ॥ ९४ ॥
९४) देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृति तुला आली ना ? जर आली असेल तर आतां द्वैतस्वप्न मिथ्या झालें कीं नाहीं ?  
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये ।
तरी अभेदबोधु जाये । जैं पडिजे ॥ ९५ ॥
९५) तरी पुनः जर कदाचित् बुद्धीला कल्पनेची झोप येईल, तर अभेदज्ञान जाईल. त्यामुळें मग ( कल्पनारुपी झोप लागल्यावर तूं ) द्वैतरुपी स्वप्नांत ( पुनः ) पडशील 
म्हणोनि ये निद्रची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे ।
ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥९६ ॥
९६) म्हणून या कल्पनारुपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरुपजागृतिरुपच होऊन जाऊं, असें जें एक खास वर्म आहे, तें आतां तुला ( उघड ) दाखवितों. 
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देई वा धनंजया ।
पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥
९७) तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगलें लक्ष दे, अरे, सर्व प्राणीमात्रांना मायाच उत्पन्न करतो व तीच त्यांचा नाश करते.


Custom Search

No comments: