Gurucharitra Adhyay 34
Gurucharitra Adhyay 34 is in Marathi. Name of this Adhyay is Rudradhyay Mahima Varnanam.
गुरुचरित्र अध्याय ३४
श्रीगणेशाय नमः । श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः ।
श्रीगुरु म्हणती दंपतीसी । ऐका तो पराशर ऋषि ।
तया काश्मीर रायासी । रुद्राक्षमहिमा निरोपी ॥ १ ॥
तया राजकुमाराचें । पूर्वजन्मींचे चरित्र साचें ।
विस्तार करोनि सुधावाचे । निरोपिलें ऋषीश्र्वरें ॥ २ ॥
संतोषोनि तो राजा । लागला त्याचे पादांबुजा ।
कर जोडोनियां वोजा । विनवीतसे परियेसा ॥ ३ ॥
राजा म्हणे ऋषीश्र्वरासी । स्वामी निरोपिलें आम्हांसी ।
पुण्य घडलें आत्मजासी । रुद्राक्षधारण करोनियां ॥ ४ ॥
पूर्वजन्मीं अज्ञानेसी । रुद्राक्ष बांधिले तये वेश्यीं ।
तेणें पुण्यें दशा ऐशी । पावले दोघे कुमारक ॥ ५ ॥
ज्ञानवंत ते आतां जाण । रुद्राक्ष करिताति धारण ।
पुढें यांचे लक्षण । कवणेपरी वर्ततील ॥ ६ ॥
भूत-भविष्य-वर्तमानीं । त्रिकाळज्ञ तुम्ही ज्ञानी ।
सांगा स्वामी विस्तारुनि । माझे-मंत्रिकुमरकाचें ॥ ७ ॥
ऐकोनि रायाचें वचन । सांगे ऋषि विस्तारुनि ।
दोघां कुमरकांचे लक्षण । अपूर्व असे परियेसा ॥ ८ ॥
ऋषि म्हणे रायासीं । पुत्राचें होणार पुससी ।
ऐकतां दुःख पावसी । कवणेपरी सांगावें ॥ ९ ॥
राजा विनवी तये वेळीं । स्वामी निरोपावें सकळी ।
उपाव करोनि तात्काळीं । दुःखावेगळा तूंचि करिसी ॥ १० ॥
ऐसें म्हणतां ऋषेश्र्वर । सांगता जाहला विस्तार ।
ऐक राया तुझ्या कुमरा । वर्षें बारा आयुष्य असे ॥ ११ ॥
तया बारा वर्षांत । राहिले असती दिवस सात ।
आठवे दिवशीं येईल मृत्यु । तुझ्या पुत्रासी परियेसा ॥ १२ ॥
ऐकोनि ऋषीचे वचन । राजा मूर्छित जाहला तत्क्षण ।
करिता जाहला रोदन । अनेकपरी दुःखित ॥ १३ ॥
ऐकतां राजा तये वेळीं । लागला ऋषीचे चरणकमळीं ।
राखें राखें तपोबळी । शरणागत मी तुझा ॥ १४ ॥
नानापरी गहिंवरत । मुनिवराचे चरण धरीत ।
विनवीतसे स्त्रियेसहित । काय करावें म्हणोनि ॥ १५ ॥
कृपानिधि पराशर । सांगता झाला विस्तार ।
शरण रिघें जगद्गुरु । उमाकांत शिवासी ॥ १६ ॥
मनींचें भय त्यजूनि । असावें आतां शिवध्यानीं ।
तो राखेल शूलपाणि । आराधावें तयासी ॥ १७ ॥
जिंकावया काळासी । उपाव असे परियेसीं ।
सांगेन तुम्हां विस्तारेसीं । एकचित्ते अवधारा ॥ १८ ॥
स्वर्ग-मृत्यु-पाताळासी । देव एक व्योमकेशी ।
निःकलंक परियेसीं । चिदानंदस्वरुप देखा ॥ १९ ॥
ऐसा देव मूर्तिमंत । रजोरुपें ब्रह्मा सृजित ।
सृष्टिक्रमणकारणार्थ । वेद चारी निर्मिले ॥ २० ॥
तयां चतुर्वेदांसी । दिधलें तया विरंचीसी ।
आत्मत्त्व संग्रहासी । ठेविलें होतें उपनिषद ॥ २१ ॥
भक्तवत्सल सर्वेश्र्वर । त्याही दिधला वेदसार ।
' रुद्राध्याय ' विस्तार । दिधला तया ब्रह्मयासी ॥ २२ ॥
रुद्राध्यायाचा महिमा । सांगता असे अगम्या ।
यातें नाश नाहीं प्राणा । अव्यय असे परियेसा ॥ २३ ॥
परतत्व शिवात्मक । रुद्राध्याय असे अधिक ।
ब्रह्मयानें चतुर्मुख । विश्र्व सृजिलें वेदमतें ॥ २४ ॥
तया चतुर्मुखीं देखा । वेद चारी सांगे निका ।
वदनींदक्षिण ऐका । यजुर्वेद निरुपिला ॥ २५ ॥
तया यजुर्वेदांत । उपनिषदसार ख्यात ।
रुद्राध्याय विस्तारत । सांगे ब्रह्मा मुनिवरां ॥ २६ ॥
समस्त देव-ऋषींसी । मरीचि अत्रि परियेसीं ।
आणिक समस्त देवांसी । सांगे ब्रह्मा तये वेळीं ॥ २७ ॥
तेचि ऋषि पुढें देखा । शिकविती आपुले शिष्यादिकां ।
त्यांचे शिष्यें पुढें ऐका । आपुले शिष्यांसी शिकविलें ॥ २८ ॥
पुढें त्यांचे पुत्रपौत्रीं । शिकविलें ऐका पवित्रीं ।
विस्तार झाला जगत्त्रीं । रुद्राध्याय भूमीवरी ॥ २९ ॥
याहूनि नाहीं आणिक मंत्र । त्वरित तप साधत ।
चतुर्विध पुरुषार्थ । लाधे त्वरित परियेसा ॥ ३० ॥
नानापरींचे पातक । केला असेल महादोष ।
रुद्रजाप्यें होय निक । तोचि पावे परम पद ॥ ३१ ॥
आणिक एक नवल केलें । ब्रह्मदेवें रचियेले ।
देवतीर्थ असे भलें । स्नान पान करावें ॥ ३२ ॥
तेणें कर्में परिहरती । संसार होय निष्कृती ।
जे जे श्रीगुरुसी भजती । तेचि तरती भवसागर ॥ ३३ ॥
सुकृत अथवा दुष्कृत । जें जें कीजे आपुले हित ।
जैसें पेरिलें असेल शेत । तेंचि उद्भवे परियेसा ॥ ३४ ॥
सृष्टिधर्मप्रवृत्तीसी । रचिलें ब्रह्मयानें परियेसीं ।
आपुलें वक्षपृष्ठदेशीं । धर्माधर्म उपजविले ॥ ३५ ॥
जे जन धर्म करिती । इह सौख्य होय गति ।
अधर्में जे रहाटती । पापरुपी तेचि जाणा ॥ ३६ ॥
काम क्रोध लोभ खूण । मदमत्सर परिपूर्ण ।
' अधर्माचे सुत ' जाण । इतुके ' नरनायक ' ॥ ३७ ॥
गुरुतल्पग सुरापानी । पुल्कस स्वरुप अंतःकरणीं ।
कामुक असती परिपूर्णी । तेचि प्रधान नरकीचे ॥ ३८ ॥
क्रोधें पितृवधी देखा । मातृवधी असती जे कां ।
ब्रह्महत्यादि पातका । कन्याविक्रयी जे जन ॥ ३९ ॥
इतुके क्रोधापासूनि । उद्भवले म्हणोनि ।
पुत्र जहाले जाणोनि । ' क्रोधसुत ' म्हणती तयांसी ॥ ४० ॥
द्विज-देवस्वहरण देखा । ब्रह्मस्व घेवोनि नेदी जो कां ।
सुवर्णतस्कर ऐका । ' लोभपुत्र ' याचें नाम ॥ ४१ ॥
ऐशा समस्त पातकांसी । यमें निरुपिलें परियेसीं ।
तुम्हीं जावोनि मृत्यासी । रहा्टी करणें आपुल्या गुणें ॥ ४२ ॥
तुम्हांसवें भृत्य देखा । देईन सर्व उपपातकां ।
समस्तां पाठवावें नरका । जे जन असती भूमीवरी ॥ ४३ ॥
यमाची आज्ञा घेऊनि । आलीं पातकें मेदिनीं ।
रुद्रजाप्यातें देखोनि । पळोनि गेलीं परियेसा ॥ ४४ ॥
जाऊनियां यमाप्रती । महापातकें विनविती ।
गेलों होतों आम्ही क्षिती । भयचकित होऊनि आलों ॥ ४५ ॥
जय जया महाराजा । आम्ही पावलों महाभया ।
किंकर तुमचे म्हणोनियां । प्रख्यात असे त्रिभुवनीं ॥ ४६ ॥
आम्ही तुमचे आज्ञाधारी । निरोपें गेलों होतों धरित्रीं ।
पोळलों होतों वन्हिपुरीं । रुद्रजाप्यातें देखोनियां ॥ ४७ ॥
क्षितीवरी रहावयासी । शक्ति नाहीं आम्हांसी ।
पाहतां रुद्रजाप्यासी । पोळतों आम्ही स्वामिया ॥ ४८ ॥
ग्रामोग्रामीं नदीतीरीं । वसती द्विज महानगरीं ।
देवालयीं पुण्यक्षेत्रीं । रुद्रजाप्य करिताति ॥ ४९ ॥
आम्हा कवणेपरी आम्हां गति । जाऊं न शकों आम्ही क्षितीं ।
रुद्रजाप्य नर करिती । तया ग्रामीं जाऊं न शकों ॥ ५० ॥
आम्ही जातों नरापाशीं । वर्तवितों पातकांसी ।
होतो नर महादोषी । मिति नाहीं परियेसा ॥ ५१ ॥
प्रायश्र्चित्तसहस्त्रेसीं । जो कां नव्हे पुण्यपुरुषी ।
तैसा द्विज परियेसीं । पुण्यवंत होतसे ॥ ५२ ॥
एखादे समयीं भक्तीसीं । म्हणतो रुद्राध्यायासी ।
तोही पुण्यवंत कैसी । होतो स्वामी यमराया ॥ ५३ ॥
तैसा पापी महाघोर । पुण्यवंत होय नर ।
भूमीवरी कैसे विचरुं । आम्हां कष्ट होतसे ॥ ५४ ॥
काळकूट महाविष । रुद्रजाप्य आम्हां दिसे ।
शक्ति नव्हे आम्हांसी । भूमीवरी जावया ॥ ५५ ॥
रुद्रजाप्यविषासी । शमन करावया शक्त तूं होसी ।
रक्ष रक्ष गा आम्हांसी । म्हणोनि विनविती पातकें ॥ ५६ ॥
इतुकें बोलती पातकें । ऐकोनि यम माथा तुके ।
कोपोनि निघाला तवकें । ब्रह्मलोका तये वेळीं ॥ ५७ ॥
जाऊनियां ब्रह्मयापाशी । विनवी यम परियेसीं ।
जय जया कमळवासी । जगस्रष्ट्या चतुर्मुखा ॥ ५८ ॥
आम्ही तुझे शरणागत । आज्ञेवरी कार्य करीत ।
पापी नरांते आणीत । नरकार्णव-पुरासी ॥ ५९ ॥
महापातकी नरांसी । आणवूं पाठवितों भृत्यांसी ।
पातकी होती पुण्यराशि । रुद्रजाप्येंकरुनियां ॥ ६० ॥
समस्त जाती स्वर्गासी । महापातकी अतिदोषी ।
नाश केला पातकांसी । शून्य जहालें नरकालय ॥ ६१ ॥
नरक शून्य झाले सकळ । माझें राज्य निर्फळ ।
समस्त जहालें कैवल्य । उत्पत्ति राहिली स्वामिया ॥ ६२ ॥
तुम्हीं होऊनि मनुष्यासी । स्वामित्व दिधलें भरंवसी ।
रुद्राध्यायनिधानेंसी । केवीं कारणें दिधलेति ॥ ६३ ॥
यातें उपाव करावयासी । देवा तूंचि समर्थ होसी ।
राखें गा आम्हांसी । राज्य गेलें स्वामिया ॥ ६४ ॥
याकारणें मनुष्यासी । पातकातें लाविलेंसी ।
रुद्रजाप्य महाविष । पातकातें जाळीतसे ॥ ६५ ॥
येणेंपरी यम देखा । विनविता झाला चतुर्मुखा ।
प्रत्युत्तर देतसे ऐका । ब्रह्मदेव यमासी ॥ ६६ ॥
अभक्तीनें दुर्मदेसीं । रुद्रजाप्य करिती तयांसी ।
अज्ञान लोक तामसी । उभे निजूनि पढती नर ॥ ६७ ॥
त्यातें अधिक पापें घडतीं । त्यांसी तुम्ही दंडा त्वरिती ।
जे जन भक्तिभावे व्यक्ती । रुद्रजाप्य नरांते ॥ ६८ ॥
बाधों नका तुम्ही ऐका । सांगावें ऐसें पातकां ।
रुद्रजाप्य पुण्य अधिका । जे जन म्हणती भक्तीसीं ॥ ६९ ॥
पूर्वजन्मीं पाप करिती । अल्पायुषी होऊनि उपजती ।
तया पापा होय निष्कृति । रुद्रजाप्यें करुनियां ॥ ७० ॥
तैसा अल्पायुषी नर । रुद्रजाप्य करितां निर्भर ।
पापें जावोनि निर्धार । दीर्घायुषी होय देखा ॥ ७१ ॥
तेजो-वर्चस्व-बल-धृति । आयुरारोग्य ज्ञान संपत्ति ।
रुद्र जपतां वर्धती । ऐक यमा एकचित्तें ॥ ७२ ॥
रुद्रजाप्यमंत्रेसीं । स्नान करविती ईश्र्वरासी ।
तेंचि उदक भक्तीसीं । जे जन करिती स्नानपान ॥ ७३ ॥
त्यातें मृत्युभय नाही । अणि एक नवल पाही ।
रुद्रजाप्यें पुण्य देही । चिरंजीव फळ आसे ॥ ७४ ॥
रुद्र जपोनि उदकासी । स्नान केलिया नरांसी ।
मृत्यु भीतसे तयांसी । तेही तरतील भवार्णवीं ॥ ७५ ॥
शतरुद्र-अभिषेकासी । पूजा करिती महेशासी ।
ते जन होती शतायुषी । पापनिर्मुक्त परियेसा ॥ ७६ ॥
ऐसें जाणोनि मानसीं । सांगावें आपुले दूतांसी ।
रुद्रजाप्य द्विजासी । बाधों नको म्हणे ब्रह्मा ॥ ७७ ॥
ऐकोनि ब्रह्मवचना । यम आला आपुले स्थाना ।
म्हणोनि पराशरें जाणा । रायापुढें निरोपिलें ॥ ७८ ॥
आतां तुझे कुमारासी । उपाय सांगेन परियेसीं ।
दहासहस्त्र रुद्रेसी । स्नपन करीं शिवासी ॥ ७९ ॥
दहा सहस्त्र वर्षांवरी । तुझे पुत्र वांचती स्थिरी ।
राज्य करतील धुरंधरी । जैसा इंद्र अमरनाथ ॥ ८० ॥
त्याचे राज्यश्रियेसी । नाश नव्हे परियेसी ।
अकंटक संतोषी । राज्य करिती तुझे सुत ॥ ८१ ॥
बोलवावें द्विजांसी । विद्वजन-शतांसी ।
ज्ञानी यज्ञनिष्ठांसी । पाचारावें परियेसा ॥ ८२ ॥
ऐशा विप्रांकरवीं देखा । करावें शिवासी अभिषेका ।
आयुष्य वर्धेल कुमारका । सद्यःश्रेय होईल ॥ ८३ ॥
येणेंपरी रायासी । सांगे पराशर ऋषि ।
राजा आनंदभरितेसीं । आरंभ केला तिये वेळी ॥ ८४ ॥
जैसा पराशर गुरु । निरोप दिधला द्विजवरु ।
तैसे बोलाविले सहस्त्रु । विद्वजन ब्राह्मणांसी ॥ ८५ ॥
शतसंख्या कलशेसी । पुण्य-इक्षुरसेसी ।
विधिपूर्वक शिवासी । अभिषेचिलें परियेसा ॥ ८६ ॥
त्याचि जळें पुत्रासी । स्नान करवी प्रतिदिवसीं ।
येणेपरी सात दिनेसी । आराधिला ईश्र्वर ॥ ८७ ॥
अवधि जहाली दिवस सात । मूर्छना आली अकस्मात ।
क्षण एक पडला अचेत । पराशरें रक्षिलें ॥ ८८ ॥
तया समयीं अवचिता । वाक्य जहालें अदृश्यता ।
सवेंचि दिसे अद्भुत । दंडहस्त महापुरुष ॥ ८९ ॥
महादंष्ट्र भयचकित । आले होते महादूत ।
समस्त द्विज रुद्र पढत । मंत्रस्वरें देताति ॥ ९० ॥
मंत्राक्षता अवसरीं । घालिती तया कुमरावरी ।
दूत पाहती उभे दूरी । जवळी येऊं न शकती ॥ ९१ ॥
होते महापाश हातीं । कुमरावरी टाकूं येती ।
दंडहस्त शिवदूती । मारुं आले तयेवेळीं ॥ ९२ ॥
भयचकित महादूत । पळोनि गेले त्वरित ।
पाठीं लागले शिवदूत । वेदपुरुषरुप देखा ॥ ९३ ॥
येणेंपरी द्विजवरें । रक्षिलें तया राजकुमरा ।
आशीर्वचन देती थोर । वेदश्रुतीकरुनियां ॥ ९४ ॥
इतुकियावरी राजकुमर । सावध झाला मन स्थिर ।
राजयातें आनंद थोर । समारंभ करीतसे ॥ ९५ ॥
पूजन केलें द्विजवरांसी । भोजन जाहलें समस्तांसी ।
तांबूलादि दक्षणेसीं । संतुष्टविलें महाराजें ॥ ९६ ॥
संतोषोनि महाराजा । सभा रचिली महावोजा ।
बैसवोनि समस्त द्विजां । महाऋषीतें सिंहासनीं ॥ ९७ ॥
राजा आपुले स्त्रियेसहित । भोजन केले इष्ट सुत ।
येवोनि बैसला सभेंत । महानंद प्रवर्तला ॥ ९८ ॥
तया समयीं ब्रह्मसुत । नारदमुनि आला त्वरित ।
राजा जाऊनि सन्मुखत । अभिवंदिलें तये वेळीं ॥ ९९ ॥
पूजा करी उपचारीं । राजा साष्टांगी नमस्कारी ।
विनवीतसे अवसरीं । कर जोडोनि परियेसा ॥ १०० ॥
राजा म्हणे ऋषीसी । तूं त्रैलोक्यीं हिंडसी ।
काय वार्ता विशेषीं । अपूर्व कांही निरोपिजे ॥ १०१ ॥
नारद म्हणे रायासी । गेलों होतों कैलासासी ।
येतां देखिलें मार्गासी । अपूर्व जाहलें परियेसा ॥ १०२ ॥
महामृत्यु दूतांसहित । न्यावया आला तुझा सुत ।
सवेंचि येऊनि शिवदूत । तया मृत्युसी पराभविलें ॥ १०३ ॥
यमदूत पळोनि जाती । तया यमापुढें सांगती ।
आमुतें मारिलें शिवदूतीं । कैसे जावें क्षितीसी ॥ १०४ ॥
यम कोपें निघाला । विरभद्रापाशीं गेला ।
म्हणे दूतां कां मार दिधला । निरपराधें स्वामिया ॥ १०५ ॥
निजकर्मानुबंधेसीं । राजपुत्र गतायुषी ।
त्यातें आणितां दूतांसी । कां मारिलें शिवदूतीं ॥ १०६ ॥
तयेवेळीं वीरभद्र । कोपोनि झाला महारौद्र ।
वर्षावधि दहा सहस्त्र । आयुष्य असे राजकुमारा ॥ १०७ ॥
न विचारितां चित्रगुप्ता । वायां पाठविलें त्वां दूतां ।
वोखटें केलें शिवदूतें । जीवें सोडिले तुझे दूत ॥ १०८ ॥
बोलावूनि चित्रगुप्ता । विचारावें आयुष्य क्षिप्ता ।
म्हणोनि पाठविलें दूतां । चित्रगुप्ता पाचारिलें ॥ १०९ ॥
पुसतां चित्रगुप्तासी । काढोनि पाहती पत्रासी ।
द्वादशाब्द वर्षायुषी । राजकुमारा लिहिलें असे ॥ ११० ॥
तेथेंचि लिहिले होतें आणिक । दहा सहस्त्र वर्षे लेख ।
पाहूनि यम धरी शंका । म्हणे स्वामी अपराध ॥ १११ ॥
वीरभद्रातें वंदूनि । यम गेला परतोनि ।
आम्ही आलों तेथोनि । म्हणोनि सांगे नारद ॥ ११२ ॥
रुद्रजाप्यें पुण्य करितां । आपुष्य जाहलें तुझ्या सुता ।
मृत्युतें जिंकिलें सत्य । पराशरगुरुकरितां ॥ ११३ ॥
ऐसें नारद सांगोनि । निघोन गेला तेथोनि ।
पराशर महामुनीं । निरोप घेतला रायाचा ॥ ११४ ॥
समस्त गेले द्विजवर । राजा हर्षें निर्भर ।
राज्य केलें धुरंधर । पुत्रपौत्रीं महीवरी ॥ ११५ ॥
ऐसा रुद्राध्यायमहिमा । पूजा करावी गुरुब्रह्मा ।
भेणें नलगे काळ यमा । श्रीगुरु म्हणती दंपतीसी ॥ ११६ ॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । ऐसी कथा विस्तारेसीं ।
श्रीगुरु सांगती दंपतीसी । प्रेमभावें करोनियां ॥ ११७ ॥
याकारणें श्रीगुरुसी । प्रीति बहु रुद्रेसीं ।
पूजा करी भक्तीसीं । रुद्राध्यायेंकरोनियां ॥ ११८ ॥
म्हणोनि सरस्वती-गंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार ।
ऐकतां तरती भवसागर । लाधे चारी पुरुषार्थ ॥ ११९ ॥
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने
सिद्ध-नामधारकसंवादे
रुद्राध्यायमहिमावर्णनं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
Gurucharitra Adhyay 34
गुरुचरित्र अध्याय ३४
Custom Search
No comments:
Post a Comment