Dashak Satava Samas Sahava BadhaMukta Nirupan
Samas Sahava BadhaMukta Nirupan, It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is describing Badha and Mukta. The qualities are described.
समास सहावा बद्धमुक्त निरुपण
श्रीराम ॥
अद्वैत ब्रह्म निरोपिलें । जें कल्पनेरहित संचलें ।
क्षणयेक तदाकार केलें । मज या निरुपणें ॥ १ ॥
१) श्रोता म्हणाला कीं, जेथें कल्पनेस वाव नाहीं असें सर्व ठिकाणीं सांठलेले अद्वैत ब्रह्म आपण वर्णन केले. तें वर्णन ऐकून एकक्षणभर मी त्या ब्रह्माशी तदाकार होऊन गेलो.
परी म्यां तदाकार व्हावें । ब्रह्मचि होऊन असावें ।
पुन्हा संसारास न यावें । चंचळपणें सर्वथा ॥ २ ॥
२) आतां असें वाटते कीं, त्या ब्रह्माशी तदाकार होऊन राहावें. वृत्ती चंचल होऊन परत संसारांत पडू नये.
कल्पनारहित जें सुख । तेथें नाहीं संसारदुःख ।
म्हणोनि तेंचि येक । होऊन असावें ॥ ३ ॥
३) कल्पनारहित झाल्यावर तेथें सुख मिळते व तेथें संसारांतील दुःखेंही नाहीत. म्हणून तेंच एक ( ब्रह्म ) होऊन असावेंसे वाटते.
ब्रह्मचि होईजे श्रवणें । पुन्हा वृत्तीवरी लागे येणें ।
ऐसें सदा येणें जाणें । चुकेना कीं ॥ ४ ॥
४) परंतु प्रत्यक्षांत असें घडते कीं श्रवणाने मन ब्रह्माकार होते. पण तेंच मन परत देहबुद्धिच्या वृत्तीवर येते. हे असे येणेजाणे कांहीं चुकत नाही.
मनें अंतरिक्ष जावें । क्षणयेक ब्रह्मचि व्हावें ।
पुन्हा तेथून कोंसळावें । वृत्तीवरी मागुतें ॥ ५ ॥
५) मन क्षणभर अंतराकाशांत विहार करतअसते परंतु परत तेंच मन वृत्तीवर कोसळते.
प्रत्यावृत्ती सैरावैरा । किती करुं येरझारा ।
पांई लाउनियां दोरा । कीटक जैसा ॥ ६ ॥
६) अशा वर जाणें व खाली येणें अशा येरझारा फार झाल्या. किटकला पायाला दोरा बांधून वरखाली फिरवावा तशी माझी अवस्था झाली आहे. उपदेशकाळीं तदाकार । होतां पडे हें शरीर ।
अथवा नेणे आपपर । ऐसें जालें पाहिजे ॥ ७ ॥
७) आपला उपदेश ऐकतांना मन ब्रह्माकार होतें. त्याच अवस्थेंत हा देह पडला पाहीजे. तसे होणार नसेल तर माझे तुझे हा भेदच मनांतून नाहींसा व्हावा.
ऐसें नस्तां जें बोलणें । तेंचि वाटे लाजिरवाणें ।
ब्रह्म होऊन संसार करणें । हेंहि विपरीत दिसे ॥ ८ ॥
८) अशी अवस्था जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलण्याची लाज वाटते. ब्रह्मस्वरुप झाल्यावर पुन्हा संसार करणें हेही विपरीत दिसते.
जो स्वयें ब्रह्मचि जाला । तो मागुता कैसा आला ।
ऐसें ज्ञान माझें मजला । प्रशस्त न वटे ॥ ९ ॥
९) जो स्वतः ब्रह्मरुप होतो. तो पुन्हा देहबुद्धींत माघारीं कसा येतो? ब्रह्मज्ञान झालेला परत देहबुद्धींत येत असेल तर त्याचें तें ज्ञान पक्के नाही, असे मला वाटते.
ब्रह्मचि होऊन जावें । कां तें संसारींच असावें ।
दोहींकडे भरंगळावें । किती म्हणूनी ॥ १० ॥
१०) एक ब्रह्मस्वरुप तरी होऊन जावें किंवा एक संसारांत असावें. दोन्हीकडची येरझारा आतां पुरें.
निरुपणीं ज्ञान प्रबळे । उठोन जातां तें मावळे ।
मागुता कामक्रोध खवळे । ब्रह्मरुपासी ॥ ११ ॥
११) ब्रह्नाचे निरुपण चालूं असतां ज्ञान होते. परंतु निरुपण संपल्यावर तेथून उठलें कीं तें ज्ञान नाहींसे होते. थोड्यावेळापूर्वीं ब्रह्मरुप झालेला आतां परत खवळलेल्या कामक्रोधांत बुडुन जातो.
ऐसा कैसा ब्रह्म जाला । दोहींकडे अंतरला ।
वोडगस्तपणेंचि गेला । संसार त्याचा ॥ १२ ॥
१२) मग असें वाटतें कीं, हे असे कसलें ब्रह्मरुप होणें ? अखेर ज्ञान मावळल्यावर ब्रह्म हातचें जाते व परमार्थाच्या नावावर संसार पण हातचा जातो. मनुष्य दोन्हींला मुकतो.
घेतां ब्रह्मसुखाची गोडी । संसारिक मागें वोडी ।
संसार करितां आवडी । ब्रह्मीं उपजे मागुती ॥ १३ ॥
१३) ब्रह्मसुखाची गोडी घेण्याचा प्रयत्न करुंलागल्यास संसारसुख माघारीं खेचतें, संसारंत मन गुतवलें तर ब्रह्मसुखाची गोडी मनाला परत आपल्याकडे खेचते.
ब्रह्मसुख नेलें संसारें । संसार गेला ज्ञानद्वारें ।
दोनी अपुरीं पुरें । येकहि नाहीं ॥ १४ ॥
१४) संसाराच्या ओढीनें ब्रह्मसुख हातचे जातें तर ब्रह्मज्ञानाच्या जोरानें संसार हातचा जातो. दोन्ही अर्धवट राहतात. एकही पुरें होत नाही.
याकारणें माझें चित्त । चंचळ जालें दुश्र्चीत ।
काये करणे निश्र्चीत । येकहि नाहीं ॥ १५ ॥
१५) श्रोता म्हणतो कीं, अशा परिस्थितींत सापडल्यानें माझें मन अस्वस्थ होऊन मी गोंधळून गेलो आहे. ब्रह्मज्ञान साध्य करावें कां सरळ संसार करावा, काय करावें, दोन्हीपैकी एकच करण्याचा मनाचा निश्र्चय होत नाही.
ऐसा श्रोता करी विनती । आतां राहावें कोणे रीतीं ।
म्हणे अखंड माझी मती । ब्रह्माकार नाहीं ॥ १६ ॥
१६) मग श्रोत्यानें विनंती केलीं कीं, मी आतां कोणत्या रीतीनें जीवन घालवावें? माझें मन कांहीं अखंड ब्रह्माकार होऊन राहू शकत नाही.
आतां याचें प्रत्योत्तर । वक्ता देईल सुंदर ।
श्रोतीं व्हावें निरोत्तर । क्षण येक आतां ॥ १७ ॥
१७) आतां याचे उत्तर वक्ता सुंदर उत्तर देणार आहे. श्रोत्यांनी क्षणभर मन स्वस्थ करुन ऐकावें.
ब्रह्मचि होऊन जे पडिले । तेचि मुक्तपदास गेले ।
येर ते काय बुडाले । व्यासादिक ॥ १८ ॥
१८) ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर ज्यांनी देह ठेविला तेवढेंच मुक्त झाले, आणि व्यासादिक बाकीचे मुक्त झालेंच नाहींत कां?
श्रोता विनती करी पुढती । शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती ।
दोघेचि मुक्त आदिअंतीं । बोलतसे ॥ १९ ॥
१९) श्रोता पुन्हा नम्रपणें विनंती करतो कीं, शुक व वामदेव हें मुक्त झालें असें वेदवचन आहे. आरंभापासून शेवटपर्यंत हे दोघेच मुक्त झाले असा या वाक्याचा अर्थ आहे.
वेदें बद्ध केले सर्व । मुक्त शुक वामदेव ।
वेदवचनीं अभाव । कैसा धरावा ॥ २० ॥
२०) वेदांच्या म्हणण्याप्रमाणें शुक व वामदेव हे दोघेच मुक्त झाले बाकीचे सर्व बद्धच समजावेत. वेदवचन चुकीचे मानता येणार नाही.
ऐसा श्रोता वेदाधारें । देता झाला प्रत्योत्तरें ।
दोघेचि मुक्त अत्यादरें । प्रतिपाद्य केले ॥ २१ ॥
२१) श्रोत्यानें वेदवचनाचा आधार घेऊन असें मोठ्या आदरानें दाखवून दिलें कीं दोघेच मुक्त आहेत व बाकीचे सर्व बद्ध आहेत, असे प्रतिपादन केले.
वक्ता बोले याउपरी । दोघेचि मुक्त सृष्टीवरी ।
ऐसें बोलतां उरी । कोणास आहे ॥ २२ ॥
२२) वक्ता म्हणाला तुझ्या म्हणण्याप्रमाणें दोघेंच मुक्त आहेत, हें खरें मानलें तर मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांना मुक्तांच्या वर्गांत जागाच उरणार नाही.
बहु ऋषि बहु मुनी । सिद्ध योगी आत्मज्ञानी ।
जाले पुरुष समाधानी । असंख्यात ॥ २३ ॥
२३) पुष्कळ ऋषी, मुनि, सिद्ध, योगी व आत्मज्ञानी आतांपर्यंत होऊन गेले, ते सगळे ब्रह्मज्ञानी होते. मुक्त होते. समाधानी होते. असे पुष्कळ होऊन गेले.
याहि वेगळे थोर थोर । ब्रह्माविष्णुमहेश्र्वर ।
आदिकरुन दिगंबर । विदेहादिक ॥ २४ ॥
२४) ब्रह्मा, विष्णु, शंकर, दत्तात्रेय, विदेही जनक इत्यादि आणखी किती थोर थोर मुक्त ज्ञानी होऊन गेले.
शुक वामदेव मुक्त जाले । येर ते अवघेचि बुडाले ।
या वचना विश्र्वासले । ते पढतमूर्ख ॥ २५ ॥
२५) शुक व वामदेव मुक्त झाले. बाकीचे मुक्त झाले नाहीत. या वचनावर जो विश्र्वास ठेवील तो पढतमूर्ख होय.
तरी वेद कैसे बोलिला । तो काये तुम्हीं मिथ्या केला ।
ऐकोन वक्ता देता जाला । प्रत्योत्तर ॥ २६ ॥
२६) श्रोता म्हणाला वेदांचे वचन तुम्ही खोटे मानणार कां? हे ऐकून वक्ता उत्तर देतो.
वेद बोलिला पूर्वपक्ष । मूर्ख तेथेंचि लावी लक्ष ।
साधु आणी वित्पन्न दक्ष । त्यांस हें न मने ॥ २७ ॥
२७) वेदानें पूर्वपक्ष मांडला आहे. मूर्ख माणूस तेवढेंच खरें मानतो. साधु, विद्वान व चतुर माणसें तेवढेंच खरें मानत नाहीत.
तथापी हें जरी मानलें । तरी वेदसामर्थ्य बुडालें ।
वेदांचेनि उद्धरिलें । न वचे कोणा ॥ २८ ॥
२८) तरीसुद्धा हें खरें मानलें तर वेदांचे सामर्थ्य राहणार नाही. कारण मग वेदांच्या सामर्थ्यानें कोणाचाच उद्धार होणें शक्य होणार नाही.
वेदा आंगीं सामर्थ्य नसे । तरी या वेदास कोण पुसे ।
म्हणौनि वेदीं सामर्थ्य असे । जन उधरावया ॥ २९ ॥
२९) वेदांच्या अंगीं ब्रह्मज्ञान करुन देऊन जीवाला उद्धरण्याचें सामर्थ्य नसेल तर वेदांना कोणी विचारणार नाहीं. वस्तुस्थिती अशी नाही. म्हणून जीवाला मुक्त करण्याचे सामर्थ्य वेदांच्या अंगी आहे यांत शंका नाही.
वेदाक्षर घडे ज्यासी । तो बोलिजे पुण्यरासी ।
म्हणौन वेदीं सामर्थ्यासी । काय उणे ॥ ३० ॥
३०) जो वेदांचा अभ्यास करतो, त्याला महापुण्याच्या राशी समजतात. यामुलें वेदांच्या सामर्थ्यामध्यें कमीपणा मुळींच नाही.
वेदशास्त्रपुराण । भाग्यें जालियां श्रवण ।
तेणें होईजे पावन । हें बोलती साधु ॥ ३१ ॥
३१) साधु असें सांगतांत कीं, वेद, शास्त्र व पुराण यांचे श्रवण भाग्यानें घडलें तर माणुस पवित्र होतो.
श्र्लोक अथवा श्र्लोकार्ध । नाहीं तरी श्र्लोकपाद ।
श्रवण होतां एक शब्द । नाना दोष जाती ॥ ३२ ॥
३२) एवढेंच नव्हे तर एक संपूर्ण श्र्लोक, किंवा अर्धा श्र्लोक, किंवा त्यांतील एक भाग, किंवा एक शब्द श्रवण केला तरी अनेक दोष नाहींसे होतात.
वेदशास्त्रीं पुराणीं । ऐशा वाक्याच्या आईणी ।
अगाध महिमा व्यासवाणी । वदोन गेली ॥ ३३ ॥
३३) वेद, शास्त्रें, पुराणें यांच्यांत अशी अनेक वाक्यें आढळतात. त्यांचा अगाध महिमा व्यासांनी सांगून ठेविला आहे.
येकाक्षर होतां श्रवण । तत्काळचि होईजे पावन ।
ऐसें ग्रंथाचें महिमान । ठाईं ठाईं बोलिलें ॥ ३४ ॥
३४) ज्यांतील एक अक्षर जरी कानावर पडलें तरी मनुष्य पावन होण्यास वेळ लागत नाही. असा ग्रंथांचा महिमा अनेक ठिकाणीं सांगितलेल आढळतो.
दोहीवेगळा तिजा नुधरे । तरी महिमा कैंचा उरे ।
असो हें जाणिजे चतुरें । येरां गथागोवी ॥ ३५ ॥
३५) शुक व वामदेव या दोघांशिवाय तिसरा कोणी उद्धार होऊन मुक्त झाला नसेल तर वेद शास्त्र पुराणांचा महिमा शिल्लक राहणार नाही. असो. हे चतुर पुरुषांना बरोबर समजते. इतरांना हा सगळा गोंधळच वाटेल.
वेदशास्त्रें पुराणें । कैसीं होतीं अप्रमाणें ।
दोघांवांचून तिसरा कोणें । उद्धरावा ॥ ३६ ॥
३६) वेद, शास्त्रें, पुराणें सांगतात तें विश्वसनीय आहे. शुक व वामदेव या दोघांखेरीज अनेक लोकांचा उद्धार त्यांच्यामुळें घडला आहे.
म्हणसीं काष्ठीं लागोन पडला । तोचि येक मुक्त जाला ।
शुक तोहि अनुवादला । नाना निरुपणें ॥ ३७ ॥
३७) ब्रह्मस्वरुप झाल्यावर जो लाकडाप्रमाणें पडून राहीला तोच मुक्त झाला असे समजणें चूक आहे. खुद्द शुकानेच अनेक विषयांचे विवेचन केले आहे.
शुक मुक्त ऐसें वचन । वेद बोलिला हें प्रमाण ।
परी तो नव्हता अचेतन । ब्रह्माकार ॥ ३८ ॥
३८) शुक मुक्त झाला हे वेदवचन खरें मानलेंच पाहीजे. पण तो शुक लाकडासारखा निर्जीव ब्रह्मरुप नव्हता.
अचेतन ब्रह्माकार । असता शुक योगेश्र्वर ।
तरी सारासारविचार । बोलणें न घडे ॥ ३९ ॥
३९) तो योगेश्र्वर शुक जर काष्ठवत, निर्जीव ब्रह्मस्वरुप असतां तर त्याला आत्मानात्मविवेक बोलून सांगता आला नसता.
जो ब्रह्माकार जाला । तो काष्ठ होऊन पडिला ।
शुक भागवत बोलिला । परीक्षितीपुढें ॥ ४० ॥
४०) जो ब्रह्मस्वरुप होतो तो लाकडासारखा कर्मरहित होऊन पडतो, हा समजच चुकीचा आहे. शुकब्रह्मस्वरुप असूनही त्यानें परीक्षितीला भागवत सांगितलें.
निरुपण हें सारासार । बोलिला पाहिजे विचार ।
धांडोळावें सचराचर । दृष्टांताकारणें ॥ ४१ ॥
४१) आत्मस्वरुपाचे वर्णन करण्यास सारासार विचार करावा लागतो. तो विचार शब्दांनीं बोलावा लागतो. विषय समजून देण्यास चराचर विश्व शोधून योग्य दृष्टांत द्यावे लागतात.
क्षण येक ब्रह्मचि व्हावें । क्षण येक दृश्य धांडोळावें ।
नाना दृष्टांतीं संपादावें । वगतृत्वासी ॥ ४२ ॥
४२) मुक्त पुरुष अध्यात्म विषय सांगतांना क्षणभर ब्रह्माकार होतो. क्षणभर दृश्य विश्र्व शोधतो, मग आपले भाषण योग्य, उचित दृष्टांतांनी सुंदर बनवतो.
असो भागवत निरुपण । शुक बोलिला आपण ।
तया आंगीं बद्धपण । लाऊं नये कीं ॥ ४३ ॥
४३) असो. स्वतः शुकानें एवढा मोठा आणि अध्यात्मानें भरलेला भगवत ग्रंथ सांगितला. त्याच्या अंगी बद्धपणा चिकटवता येईल काय? अर्थांतच नाही.
म्हणोनी बोलतां चालतां । निचेष्टित पडिलें नस्तां ।
मुक्ति लाभे सायोज्यता । सद्गुरुबोधें ॥ ४४ ॥
४४) थोडक्यांत लाकडासारखें निचेष्ट न पडून राहातां, चालतां, बोलतां, व्यवहार करतां सद्गुरुंनी केलेल्या बोधानें सायुज्यमुक्ती लाभते.
येक मुक्त येक नित्यमुक्त । येक जाणावे जीवन्मुक्त ।
येक योगी विदेहमुक्त । समाधानी ॥ ४५ ॥
४५) कोणी मुक्त असतात, कोणी नित्यमुक्त असतात. कोणी जीवनमुक्त असतात. तर कोणी योगी समाधानी विदेहमुक्त असतात.
सचेतन ते जीवन्मुक्त । अचेतन ते विदेहमुक्त ।
दोहिवेगळे नित्यमुक्त । योगेश्र्वर जाणावे ॥ ४६ ॥
४६) जे मुक्त असून जिवंत असतात ते जीवनमुक्त समजावेत. मुक्त होऊन ज्यांनी देह ठेविला ते विदेहमुक्त समजावेत. नित्यमुक्त या दोहोंहून थोडे वेगळे असतात. त्यांना योगेश्र्वर समजावे.
स्वरुपबोधें स्तब्धता । ते जाणावी ताटस्तता ।
ताटस्तता आणी स्तब्धता । हा देहसमंधु ॥ ४७ ॥
४७) एखादेवेळीं स्वरुपसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान झालें कीं देह स्वब्ध होतो. त्याचे कर्म करणें थांबते. पण तटस्थपणा व स्तब्धता याचा देहाशी संबंध असतो. स्वरुपानुभवाशीं नाही.
येथें अनुभवासी कारण । येर सर्व निःकारण ।
तृप्ती पावावी आपण । आपुल्या स्वानुभवें ॥ ४८ ॥
४८) येथें परमार्थामध्यें स्वरुपाच्या अनुभवाला परमोच्चा स्थान आहे. बाकी सर्व गोष्टी निरर्थक मानतात. म्हणून आपण स्वतः स्वरुपानुभव घ्यावा. आणि समाधान पावावे.
कंठमर्याद जेविला । त्यास म्हणती भुकेला ।
तेणें शब्दें जाजावला । हें तो घडेना ॥ ४९ ॥
४९) एखादा माणुस कंठापर्यंत येईस्तोवर जेवला, त्याला कोणी भुकेला आहे असे म्हटले तरी त्याला त्याचे कांहीं वाटत नाही. तसेंच मुक्त माणसाला बद्ध म्हटल्याने त्याचे समाधान भंगणार नाही.
स्वरुपीं नाहीं देहो । तेथे काईसा संदेहो ।
बद्ध मुक्त ऐसा भावो । देहाचकडे ॥ ५० ॥
५०) स्वस्वरुपाच्या साक्षात्कारांत देहभाव मुळींच नसतो. मग तेथें " मी मुक्त का बद्ध " हा संशय असणें शक्य नाही. देहाचे भान असते तेथें हा संशय असतो.
देहबुद्धि धरुन चिंती । मुक्त ब्रह्मादिक नव्हेती ।
तेथें शुकाची कोण गती । मुक्तपणाची ॥ ५१ ॥
५१) जोपर्यंत अंतःकरणांत देहबुद्धि असते तोपर्यंत ब्रह्मादिक देवसुद्धा मुक्त होऊं शकत नाहीत. मग देहबुद्धि असेल तर शुकसुद्धा मुक्त होऊं शकणार नाही. यांत नवल काय?
मुक्तपण हेंचि बद्ध । मुक्त बद्ध हें अबद्ध ।
सस्वरुप स्वतसिद्ध । बद्ध ना मुक्त ॥ ५२ ॥
५२) " मी मुक्त आहे हे बद्धपणाचेच लक्षण आहे. स्वस्वरुप स्वतः सिद्ध आहे म्हणून तें बद्ध नाहीं तसे मुक्तही नाही.
मुक्तपणाची पोटीं शिळा । बांधतां जाईजे पाताळा ।
देहबुद्धीचा आगळा । स्वरुपीं न संटे ॥ ५३ ॥
५३) " मी मुक्त आहे " हा एक अहंकार आहे. तो अहंकाररुपी दगड पोटाल बांधून जर कोणी जीवनसागरांत उतरला तर तो पाताळांत गेल्याखेरीज राहाणार नाही. देहबुद्ढीचा अहंकार धरुन जो स्वस्वरुपाकडे जाण्यास निघेल त्याला तेथपर्यंत पोहोचता येणार नाही.
मीपणापासून सुटला । तोचि येक मुक्त जाला ।
मुका अथवा बोलिला । तरी तो मुक्त ॥ ५४ ॥
५४) मीपणापासून जो मोकळा होतो तोच फक्त मुक्तदशेला पोहोचतो. मग त्यानें मौन धरलें किंवा संभाषण केले तरी तो मुक्त असतो.
जयास बाधावें तें वाव । तेथें कैंचा मुक्तभाव ।
पाहों जातां सकळ वाव । गुणवार्ता ॥ ५५ ॥
५५) सत्व, रज आणि तम या तीन गुणांनी बंधन निर्माण होते. स्वरुपाच्या ठिकाणीं त्रिगुण प्रवेश करुं शकत नाहीत. मग तेथें बंधनच उत्पन्न होऊं शकत नाही. तेथें मुक्तपण कसें असूं शकेल? स्वस्रुपाच्या ठिकाणीं त्रिगुणांना मुळीं स्थानच नसतें.
बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः ।
श्र्लोकः
गुणस्य मायामूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम् ॥
तत्वज्ञाता परमशुद्ध । तयासी नाहीं मुक्त बद्ध ।
मुक्त बद्ध हा विनोद । मायागुणें ॥ ५६ ॥
५६) जो परम शुद्ध ब्रह्मज्ञानी असतो, त्याच्याजवळ बद्ध व मुक्त असा भेद नसतो. हा बद्ध आणि हा मुक्त ही मायेच्या कक्षेंतील त्रिगुणांची करामत आहे.
जेथें नामरुप हें सरे । तेथें मुक्तपण कैंचें उरे ।
मुक्त बद्ध हें विसरे । विसरलेपणेंसीं ॥ ५७ ॥
५७) जेथें सारें नामरुपमय दृश्य विश्व अंतर्धान पावतें तेथें " मी मुक्त आहे " ही भावना उरणें शक्य नसते. स्वस्वरुपाच्या अनुभवांत बद्धपण व मुक्तपण यांचा विसर पडतो. पण हा विसर पडला याचें भानदेखील उरत नाही.
बद्ध मुक्त जाला कोण । तो तरी नव्हें कीं आपण ।
बधक जाणावें मीपण । धर्त्यास बाधी ॥ ५८ ॥
५८) खर्या मीचें ज्ञान झाल्यावर ज्ञानी म्हणतो कीं, जो कोणीं बद्ध होता तो मुक्त झाला. तो कोण असेल तो मुक्त झाला. पण मी मात्र खात्रीनें तो नव्हें. मीपण खरे बंधनाला कारण आहे. जो मीपणा धरतो त्याला तें बांधतें. बंधनांत टाकते.
एवं हा अवघा भ्रम । अहंतेचा जाला श्रम ।
मायातीत जों विश्राम । सेविला नाहीं ॥ ५९ ॥
५९) मी बद्ध होतो व मी मुक्त झालो हा सारा भ्रम समजावा. मीपणामुळें हे सारे श्रम होतात. मायेच्या पलीकडे जे समाधानरुप ब्रह्म आहे त्याचा अनुभव न घेतल्यानें हे श्रम भोगावें लागतात.
असो बद्धता आणी मुक्तता । आली कल्पनेच्या माथां ।
ते कल्पना तरी तत्वता । साच आहे ॥ ६० ॥
६०) बद्धपणा आणि मुक्तपणा दोन्हेंचें मूळ कल्पनेंमध्यें असते. बरें ती कल्पनासुद्धा वास्तविक खरी नाही.
म्हणौनि हें मृगजळ । माया नाथिलें आभाळ ।
स्वप्न मिथ्या तत्काळ । जागृतीस होय ॥ ६१ ॥
६१) म्हणून बद्ध व मुक्त या अवस्था मायामय आहेत. मृगजळाप्रमाणें किंवा आकाशांतील अभ्राप्रमाणें त्या मिथ्या आहेत. झोपेंत स्वप्न पहाणार्याला जागें केलें कीं, त्याचे स्वप्न तत्काळ खोटे ठरते. त्याचप्रमाणें ब्रह्मसाक्षात्कार झाला कीं, बद्धमुक्तपणाच्या कल्पना नाहींश्या होतात.
स्वप्नीं बद्ध मुक्त जाला । तो जागृतीस नाहीं आला ।
कैंचा कोण काये जाला । कांहीं कळेना ॥ ६२ ॥
६२) एका माणसाला स्वप्न पडले. आपण बद्ध होतो आतां आपण मुक्त झालो असें त्यानें स्वप्नांत पाहीले. जागा झाल्यावर तो बद्धही नसतो व मुक्तही नसतो. स्वप्नामध्यें कोण कसा काय झाला हें जागेंपणीं कांहीं ध्यानांत येत नाही.
म्हणोनि मुक्त विश्र्वजन । जयास जालें आत्मज्ञान ।
शुद्धज्ञाानें मुक्तपण । समूळ वाव ॥ ६३ ॥
६३) म्हणून ज्यांना आत्मसाक्षात्कार होऊन आत्मज्ञान प्राप्त होते ते सगळेंच मुक्त समजावेत. तेंच ज्ञान परिपक्व झालें कीं आपण मुक्त आहों ही जाणीव देखील नाहींशी होते.
बद्ध मुक्त हा संदेहो । धरी कल्पनेचा देहो ।
साधु सदा निःसंदेहो । देहातीत वस्तु ॥ ६४ ॥
६४) देहबुद्धीमध्यें निर्माण होणारी कल्पना बद्ध व मुक्त असा भेद निर्माण करते. पण आत्मज्ञानी माणुस देहाच्या पलीकडे असणार्या ब्रह्माशी समरस झाल्यानें सदैव भेदातीत व संदेहरहित असतो.
आतां असो हे पुढती । पुढें राहावें कोणे रितीं ।
तेचि निरुपण श्रोतीं । सावध परिसावें ॥ ६५ ॥
६५) हीच गोष्ट परत परत सांगणे पुरें. ब्रह्मस्वरुप होण्यासाठीं कोणत्या रीतीनें राहावें तें आतां सांगतो. श्रोत्यांनी तें लक्षपूर्वक ऐकावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे बद्धमुक्तनिरुपणनाम समास सहावा ॥
Samas Sahava BadhaMukta Nirupan
समास सहावा बद्धमुक्त निरुपण
Custom Search
No comments:
Post a Comment