Wednesday, May 6, 2020

Dnyaneshwari Adhyay 1 Part 6 ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ६


Dnyaneshwari Adhyay 1 Part 6 
ज्ञानेश्र्वरी अध्याय पहिला भाग ६

जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं ।
तैसीं महापापें कुळीं । प्रवेशती ॥ २५१ ॥
२५१) ज्याप्रमाणें चव्हाट्यावर ठेवलेल्या बळीवर चारी बाजूंनी कावळे येऊन पडतात, त्याप्रमाणें महापापें ( अशा ) कुळांत शिरतात.
मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां ।
येरयेरां नरका । जाणें आथी ॥ २५२ ॥
२५२) मग त्या संपूर्ण कुळाला आणि कुळपातक्यांना दोघांनाहि नरकाला जावें लागतें.
देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित ।
मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥ २५३ ॥
२५३) पाहा, याप्रमाणें वंशांत वाढलेली सर्व प्रजा अधोगतीला जाते; आणि मग त्यांचे स्वर्गांतील पूर्वज फिरुन परत येतात.  
जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक कर्म पारुखे ।
तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ॥ २५४ ॥
२५४) ज्या वेळीं रोज करावयाचीं धार्मिक कृत्यें बंद पडतात आणि प्रसंगविशेषीं करावयांची लोपतात, त्या वेळी कोण कोणाला तिलोदक देणार ?
तरी पितर काय करिती । कैसेनि स्वर्गीं वसती ।
म्हणोनि तेही येती । कुळापासीं ॥ २५५ ॥
२५५) असें झाल्यावर पितर काय करणार ? स्वर्गांत कसें राहाणार ? म्हणून ते देखील आपल्या ( भ्रष्ट ) कुळापाशीं ( नरकांत ) येतात.
जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें ।
तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥ २५६ ॥
२५६) ज्याप्रमाणे नखाच्या टोकाला साप चावला म्हणजें त्याचे विष शेंडीपर्यंत हां हां म्हणतां पसरतें त्याप्रमाणें थेट ब्रह्मदेवापासूनचें पुढील सर्व कुळ अशा पातकानें बुडून जातें.  
देवा अवधारीं आणीक एक । एथ घडे महापातक ।
जे सैंगदोषें हा लौकिक । भ्रंश पावे ॥ २५७ ॥
२५७) देवा, ऐक येथें आणखी एक महापातक घडतें तें हें कीं, त्या पतितांच्या संपूर्ण दोषानें इतर लोकांचे आचारविचार भ्रष्ट होतात.
जैसा घरीं आपुलां । वानिवसें वन्ही लागला ।
तो आणिकांही प्रज्वळिला । जाळुनि घाली ॥ २५८ ॥
२५८) ज्याप्रमाणें आपल्या घराला अकस्मात अग्नि लागला म्हणजे तो भडकलेला अग्नि दुसर्‍या घरांनाही जाळून टाकतो;
तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती ।
तेही बाधु पावती । निमित्तें येणें ॥ २५९ ॥
२५९) त्याप्रमाणें त्या कुळाच्या संसर्गाने जे जे लोक वागतात ते ते ह्या संसर्गरुप कारणानें दूषित होतात.
तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ ।
मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥ २६० ॥     
२६०) अर्जुन म्हणतो, त्याप्रमाणें अनेक दोषांमुळे मग त्या सर्व कुळाला भयंकर नरक भोगावा लागतो.
पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उगंडु नाहीं ।
येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥ २६१ ॥
२६१) त्या ठिकाणीं पडल्यावर कल्पांतीदेखील त्याची सुटका होत नाही; कुलक्षयामुळें एवढी अधोगती होते, असे अर्जुन पुढें म्हणाला.
देवा हें विविध कानीं  ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे ।
हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥ २६२ ॥ 
२६२) देवा, ही नाना प्रकारची बोलणीं कानानें ऐकतोस, पण अजूनपर्यंत तुला शिसारी येत नाहीं. ऐक, तूं आपलें हृदय वज्रासारखें कठोर केलेंस काय ?   
अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तव क्षणिक ।
ऐसें जाणतांही दोख । अव्हेरुं ना ॥ २६३ ॥
२६३) ज्या शरीराकरितां राज्यसुखाची इच्छा करावयाची; तें शरीर तर क्षणभंगुर आहे, असे कळत असतांहि, अशा ह्या घडणार्‍या महापातकाचा त्याग करुं नये काय ?   
जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले ।
सांग पां काय थेकुलें । घडलें आम्हां ॥ २६४ ॥
२६४) हे जे सर्व आपले वाडवडील जमले आहेत, त्यांस मारुन टाकावें अशा बुद्धीनें त्यांच्याकडे पाहिलें, ही काय लहानसहान गोष्ट ( पाप ) आमच्या हातून घडली ? तूंच सांग. 
आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें ।
जे शस्त्रें सांडूनि साहावे । बाण यांचे ॥ २६५ ॥
२६५) आतां इतक्यावरहि जगण्यापेक्षां आपण शस्त्रें टाकून देऊन यांचे बाण सहन करावे, हें चांगले !
तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें ।
परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥ २६६ ॥
२६६) असें केल्यानें जितकें दुःख भोगावें लागेल ( तितकें सहन करावें इतकेंच काय ; पण अशा करण्यानें ) मृत्युहि जरी प्राप्त झाला, तथापि तो अधिक चांगला; परंतु असें पातक करण्याची आपणांस इच्छा नाही.
ऐसें देखोनि सकळ । अर्जुनें आपुलें कुळ ।
मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥ २६७ ॥
२६७) याप्रमाणें अर्जुनानें आपले सर्व कुळ पाहून म्हटलें कीं, ( यांचा नाश करुन मिळविलेले ) राज्य म्हणजे केवळ नरकभोग आहे.  
ऐसें तिये अवसरीं । अर्जुन बोलिला समरीं ।
संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २६८ ॥
२६८) संजय धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. असें त्यावेळीं अर्जुन समरांगणावर बोलला.
मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहिंवरु आला ।
तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥ २६९ ॥
२६९) मग अर्जुन अत्यंत खिन्न झाला व त्याला अनिवार गहिंवर आला; मग त्याने रथावरुन खाली उडी घातली;
जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहृतु ।
कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥ २७० ॥
२७०) ज्याप्रमाणें अधिकारावरुन दूर झालेला राजपुत्र सर्व प्रकारांनी निस्तेज होतो किंवा जसा राहूनें ग्रासलेला सूर्य तेजरहित होतो;
नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतला तापसु भ्रमे ।
मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥ २७१ ॥
२७१) अथवा, महासिद्धीच्या मोहानें पछाडलेला तपस्वी भुलतो आणि मग कामनेच्या तडाक्यांत सांपडून दीन होतो;
तैसा तो धनुर्धरु । अत्यंत दुःखें जर्जरु ।
दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥ २७२ ॥
२७२) त्याप्रमाणें त्यानें जेव्हां रथाचा त्याग केला, तेव्हा तो अर्जुन दुःखाने फार पीडलेला दिसला;
मग धनुश्यबाण सांडिले । न धरत अश्रुपात आले ।
ऐसें ऐकें राया तेथें वर्तलें । संजयो म्हणे ॥ २७३ ॥
२७३) मग धनुष्यबाण त्यानें टाकून दिले व त्याला रडू आवरेना. संजय म्हणाला, राजा, ऐक तेथें अशी गोष्ट घडली.
आतां यावरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु ।
कवणेपरी परमार्थु । निरुपील ॥ २७४ ॥
२७४) आतां यावर तो वैकुंठपति कृष्ण अर्जुनाला खिन्न झालेला पाहून कोणत्या प्रकारें परमार्थाचा उपदेश करील,
ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां ।
ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥ २७५ ॥
२७५) ती आतां पुढे येणारी सविस्तर कथा ऐकावयास फार कौतुककारक आहे, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगो नाम प्रथमोऽध्यायः ॥ १ ॥
( श्र्लोक ४७; ओव्या २७५ ) 
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥


Custom Search

No comments: