Friday, May 15, 2020

ShriRamCharitManas Part 13 श्रीरामचरितमानस भाग १३


ShriRamCharitManas Part 13 
श्रीरामचरितमानस भाग १३
ShriRamCharitManas Part 13
श्रीरामचरितमानस भाग १३
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—सुनत बचन बिहसे रिषय गिरिसंभव तव देह ।
नारद कर उपदेसु सुनि कहहु बसेउ किसु गेह ॥ ७८ ॥
पार्वतीचे बोलणे ऐकून ऋषी हसले आणि म्हणाले, ‘ तुझा देह पर्वतापासून उत्पन्न झाला आहे, ( म्हणूनच तू अशी मंदबुद्धी आहेस. ) सांग, नारदांचा उपदेश ऐकून आजवर कुणाचे घर नांदले आहे बरे ? ॥ ७८ ॥
दच्छसुतन्ह उपदेसेन्हि जाई । तिन्ह फिरि भवनु न देखा आई ॥
चित्रकेतु कर घरु उन घाला । कनककसिपु कर पुनि अस हाला ॥
त्यांनी जाऊन दक्षाच्या मुलांना उपदेश दिला होता, त्यामुळे पुन्हा कधी परत येऊन त्यांनी घराचे तोंडही पाहिले नाही. चित्रकेतूचे घर नारदानेच उध्वस्त केले. नंतर हीच परिस्थिती हिरण्यकशिपूची झाली. ॥ १ ॥
नारद सिख जे सुनहिं नर नारी । अवसि होहिं तजि भवनु भिखारी ॥
मन कपटी तन सज्जन चीन्हा । आपु सरिस सबही चह कीन्हा ॥
जे स्री-पुरुष नारदांचे म्हणणे ऐकतात, ते घरदार सोडून नक्कीच भिकारी होतात. त्यांचे मन कपटी आहे, मात्र शरीरावर सज्जनपणाची चिन्हे ते मिरवतात. ते सर्वांना आपल्यासारखे बनवू इच्छितात. ॥ २ ॥
तेहि कें बचन मानि बिस्वासा । तुम्ह चाहहु पति सहज उदासा ॥
निर्गुन निलज कुबेष कपाली । अकुल अगेह दिगंबर ब्याली ॥
त्यांच्या ( नारदांच्या ) बोलण्यावर विश्र्वास ठेवून तुला असा पती   वाटला की जो स्वभावाने उदासीन, गुणहीन, निर्लज्ज, अशोभनीय वेश धारण करणारा, नर-कपालांची माला धारण करणारा, केलहीन, घर-दार नसलेला, नग्न आणि शरीरावर साप लपेटून घेणारा आहे. ॥ ३ ॥
कहहु कवन सुखु अस बरु पाएँ । भल भूलिहु ठग के बौराएँ ॥
पंच कहें सिवँ सती बिबाही । पुनि अवडेरि मराएन्हि ताही ॥
असा वर मिळाल्यावर तुला सुख मिळेल काय ? ते सांग. तू त्या लबाडाच्या ( नारदाच्या ) बहकण्यावर चांगली फसलीस. पूर्वी पंचांनी सांगितल्यामुळे शिवांनी सतीशी विवाह केला, परंतु नंतर तिला त्याग करुन मारुन टाकले. ॥ ४ ॥
दोहा—अब सुख सोवत सोचु नहिं भीख मागि भव खाहिं ।
सहज एकाकिन्ह के भवन कबहुँ कि नारि खटाहिं ॥ ७९ ॥
आता शिवांना काही काळजी उरली नाही. भीक मागून खातात, आणि सुखाने झोपतात. अशा स्वभावाच्या एकट्या राहणार्‍यांच्या घरात कधी कुणीहिं स्री टिकेल काय बरे ? ॥ ७९ ॥
अजहूँ मानहु कहा हमारा । हम तुम्ह कहुँ बरु नीक बिचारा ॥
अति सुंदर सुचि सुखद सुसीला । गावहिं बेद जासु जस लीला ॥
अजुन आमचे म्हणणे मान. आम्ही तुझ्यासाठी चांगला वर पाहिला आहे. तो फारच सुंदर, पवित्र, सुखदायक आणि सुशील आहे. त्याचे यशोगान व लीलागान वेद करतात. ॥ १ ॥
दूषन रहित सकल गुन रासी । श्रीपति पुर बैकुंठ निवासी ॥
अस बरु तुम्हहि मिलाउब आनी । सुनत बिहसि कह बचन भवानी ॥
तो दोषरहित आहे, सर्व गुणांचे भांडार आहे, लक्ष्मीचा स्वामी आहे आणि वैकुंठपुरात राहाणारा आहे, आम्ही अशा वराशी तुझी भेट घालून देतो. ‘ हे ऐकताच पार्वती हसून म्हणाली, ॥ २ ॥
सत्य कहेहु गिरिभव तनु एहा । हठ न छूट छूटै बरु देहा ॥
कनकउ पुनि पषान तें होई । जारेहुँ सहजु न परिहर सोई ॥
माझे शरीर पर्वतापासून उत्पन्न झाले आहे, हे तुम्ही बरोबर सांगितले आहे. म्हणून शरीर सुटले तरी माझा हट्ट सुटणार नाही. सोने हे सुद्धा पाषाणापासून बनते. म्हणून ते जाळल्यावर देखील आपला स्वभाव ( उजळपणा ) सोडत नाही. ॥ ३ ॥
नारद बचन न मैं परिहरऊँ । बसउ भवनु उजरउ नहिं डरऊँ ॥
गुर कें बचन प्रतीति न जेही । सपनेहुँ सुगम न सुख सिधि तेही ॥
म्हणून नारदांचे वचन मी मोडणार नाही. मग घर नांदो अगर उध्वस्त होवो, त्याला मी भीत नाही. ज्याचा गुरुंच्या वचनांवर विश्र्वास नसतो, त्याला सुख व सिद्धि स्वप्नांतही लाभत नाही. ॥ ४ ॥
महादेव अवगुन भवन बिष्नु सकल गुन धाम ।
जेहि कर मनु रम जाहि सन तेहि तेहि सन काम ॥ ८० ॥
महादेव अवगुणांचे माहेर आहेत आणि विष्णु सर्व सद्गुणांचे धाम आहेत, असे जरी मानले, तरी ज्याचे मन ज्याच्या ठिकाणी रमते, त्याला त्याच्याशीच कर्तव्य असते. ॥ ८० ॥
जौं तुम्ह मिलतेहु प्रथम मुनीसा । सुनतिउँ सिख तुम्हारि धरि सीसा ॥
अब मैं जन्मु संभु हित हारा । को गुन दूषन करै बिचारा ॥
हे मुनीश्र्वरांनो, तुम्ही जर मला पूर्वी भेटला असता, तर मी तुमचा उपदेश ( कदाचित ) शिरोधार्य मानला असता. परंतु आता मी आपला जन्म शिवांना अर्पण केलेला आहे. मग गुण-दोषांचा विचार कोण करणार ? ॥ १ ॥
जौं तुम्हरे हठ हृदयँ बिसेषी । रहि न जाइ बिनु किएँ बरेषी ॥
तौ कौतुकिअन्ह आलसु नाहीं । बर कन्या अनेक जग माहीं ॥
जर तुमचा फारच हट्ट असेल आणि विवाहाविषयीं बोलण्याविना तुम्हांला चैन पडत नसेल, तर जगात वर व कन्या पुष्कळ आहेत. गंमत करणार्‍यांना आळस नसतो. (म्हणून ही गंमत आणखी कुठेतरी जाऊन करा. ) ॥ २ ॥
जन्म कोटि लगि रगर हमारी । बरउँ संभु न त रहउँ कुआरी ॥
तजउँ न नारद कर उपदेसु । आपु कहहिं सत बार महेसू ॥  
वरायचे तर श्रीशिवांनाच वरीन, हाच माझा कोट्यावधी जन्मांपर्यंत आग्रह राहील. नाहीतर मी कुमारीच राहीन. स्वतः शिवांनी शंभर वेळा जरी मला सांगितले, तरी मी नारदांचा उपदेश सोडून देणार नाही. ‘ ॥ ३ ॥
मैं पा परउँ कहइ जगदंबा । तुम्ह गृह गवनहु भयउ बिलंबा ॥
देखि प्रेमु बोले मुनि ग्यानी । जय जय जगदंबिके भवानी ॥
जगज्जननी पार्वती पुढे म्हणाली की , ‘ मी तुमच्या पाया पडते. तुम्ही आपल्या घरी परत जा. खूप उशीर झाला आहे. ‘ ( शिवांच्याविषयी पार्वतीचे असे ) अढळ प्रेम पाहून ज्ञानी मुनी म्हणाले की, ‘ हे जगज्जननी, हे भवानी, तुझा विजय असो, विजय असो. ॥ ४ ॥
दोहा—तुम्ह माया भगवान सिव सकल जगत पितु मातु ॥
नाइ चरन सिर मुनि चले पुनि पुनि हरषत गातु ॥ ८१ ॥
तू माया असून शिव हे परमात्मा आहेत. तुम्ही दोघे संपूर्ण विश्वाचे माता-पिता आहात. ‘ ( असे म्हणून ) मुनी पार्वतीच्या पाया पडून निघाले. ( पार्वतीचा भाव पाहून ) त्यांचे देह वारंवार रोमांचित होत होते. ॥ ८१ ॥
जाइ मुनिन्ह हिमवंतु पठाए । करि बिनती गिरजहिं गृह ल्याए ॥
बहुरि सप्तरिषि सिव पहिं जाई । कथा उमा कै सकल सुनाई ॥
मुनींनी जाऊन हिमवानाला पार्वतीकडे पाठविले आणि त्याला सांगितले की, पार्वतीची समजूत घालून तिला घरी घेऊन या. नंतर सप्तर्षी शंकरांच्याजवळ गेले आणि त्यांनी पार्वतीची सगळी कथा त्यांना सांगितली. ॥ १ ॥
भए मगन सिव सुनत सनेहा । हरषि सप्तरिषि गवने गेहा ॥
मनु थिर करि तब संभु सुजाना । लगे करन रघुनायक ध्याना ॥
पार्वतीचे प्रेम ऐकून शिव आनंदमग्न झाले. सप्तर्षी प्रसन्न होऊन आपल्या घरी ब्रह्मलोकी गेले. तेव्हा ज्ञानी भगवान शिव मन स्थिर करुन श्रीरामांचे ध्यान करुं लागले. ॥ २ ॥
तारकु असुर भयउ तेहि काला । भुज प्रताप बल तेज बिसाला ॥
तेहिं सब लोक लोकपति जीते । भए देव सुख संपति रीते ॥
त्याच सुमारास तारकासुर उत्पन्न झाला होता. त्याचे बाहुबल, प्रताप व तेज प्रचंड होते. त्याने सर्व लोक आणि लोकपालांना जिंकले. त्यामुळे सर्व देव सुख-संपत्तिहीन झाले. ॥ ३ ॥
अजर अमर सो जीति न जाई । हारे सुर करि बिबिध लराई ॥
तब बिरंचि सन जाइ पुकारे । देखे बिधि सब देव दुखारे ॥
तारकासुर अजरामर होता, म्हणून त्याला कोणीही जिंकू शकत नव्हते. देवांनी त्याच्याबरोबर पुष्कळ युद्धे केली, पण ते पराभूत झाले. तेव्हा ते ब्रह्मदेवांपाशी जाऊन गार्‍हाणे सांगू लागले. ब्रह्मदेवांनी सर्व देवांचे दुःख प्रत्यक्ष पाहिले. ॥ ४ ॥          
दोहा—सब सन कहा बुझाइ बिधि दनुज निधन तब होइ ।
संभु सुक्र संभूत सुत एहि जीतइ रन सोइ ॥ ८२ ॥
ब्रह्मदेवांनी सर्वांना समजावून सांगितले की, ‘ भगवान शिवांच्या तेजापासून जेव्हा पुत्र जन्माला येईल, तेव्हा तो या दैत्याला युद्धात जिंकेल व त्यात त्याचा मृत्यु होईल. ॥ ८२ ॥
मोर कहा सुनि करहु उपाई । होइहि ईस्वर करिहि सहाई ॥
सतीं जो तजी दच्छ मख देहा । जनमी जाइ हिमाचल गेहा ॥
मी सांगतो, तो उपाय करा. ईश्र्वराचे साहाय्य लाभेल व तुमचे काम होईल. सतीने दक्षाच्या यज्ञात देहत्याग केला होता, तिनेच आता हिमालयाच्या घरी जन्म घेतला आहे. ॥ १ ॥
तेहिं तपु कीन्ह संभु पति लागी । सिव समाधि बैठे सबु त्यागी ॥
जदपि अहइ असमंजस भारी । तदपि बात एक सुनहु हमारी ॥
तिने भगवान शिव पती व्हावे, म्हणून तप केले आहे आणि इकडे शिव हे सर्व काही सोडून देऊन समाधी लावून बसले आहेत. ही मोठी घोटाळ्याची स्थिती आहे, परंतु मी सांगतो ते ऐका. ॥ २ ॥
पठवहु कामु जाइ सिव पाहीं । करै छोभु संकर मन माहीं ॥
तब हम जाइ सिवहि सिर नाई । करवाउब बिबाहु बरिआई ॥
तुम्ही जाऊन कामदेवाला शिवांच्याकडे पाठवून द्या. तो शिवांच्या मनांत क्षोभ उत्पन्न करील. ( त्यांची समाधी भंग करील. ) तेव्हा आपण जाऊन शिवांच्या चरणी मस्तक ठेवू आणि हट्ट धरुन ( त्यांना लग्नासाठी प्रवृत्त करुन ) त्यांचे लग्न करु. ‘ ॥ ३ ॥
एहि बिधि भलेहिं देवहित होई । मत अति नीक कहइ सबु कोई ॥
अस्तुति सुरन्ह कीन्हि अति हेतू । प्रगटेउ बिषमबान झषकेतू ॥
असे झाले तरच देवांचे कल्याण होईल. सर्वजण म्हणाले, ‘ हा विचार चांगला आहे. ‘ नंतर देवांनी मोठ्या प्रेमाने कामदेवाची स्तुती केली, तेव्हा माशाचा ध्वज असणारा पंचबाण कामदेव प्रकट झाला. ॥ ४ ॥
दोहा—सुरन्ह कही निज बिपति सब सुनि मन कीन्ह बिचार ।
संभु बिरोध न कुसल मोहि बिहसि कहेउ अस मार ॥ ८३ ॥
देवांनी आपले संकट कामदेवाला सांगितले, ते ऐकून कामदेवाने विचार केला आणि हसत म्हटले, ‘ शिवांशी विरोध करण्यामध्ये माझे काही खरे नाही. ॥ ८३ ॥
तदपि करब मैं काजु तुम्हारा । श्रुति कह परम धरम उपकारा ॥
पर हित लागि तजइ जो देही । संतत संत प्रसंसहिं तेही ॥
तरीही तुमचे काम मी करीन, कारण वेद दुसर्‍यावर केलेल्या उपकारास परमधर्म म्हणतात. जो दुसर्‍याच्या हितासाठी आपल्या शरीराचाही त्याग करतो, त्याची संत प्रशंसा करतात. ‘ ॥ १ ॥
अस कहि चलेउ सबहि सिरु नाई । सुमन धनुष कर सहित सहाई ॥
चलत मार अस हृदयँ बिचारा । सिव बिरोध ध्रुव मरनु हमारा ॥
असे म्हणून आणि सर्वांना नमस्कार करुन कामदेव आपले पुष्प-धनुष्य हाती घेऊन वसंतादी सहायकांबरोबर निघाला. जात असताना कामदेवाच्या मनात विचार आला की, शिवांशी विरोध केल्याने माझे मरण नक्की ओढवणार आहे. ॥ २ ॥
तब आपन प्रभाउ बिस्तारा । निज बस कीन्ह सकल संसारा ॥
कोपेउ जबहिं बारिचरकेतू । छन महुँ मिटे सकल श्रुति सेतू ॥
तेव्हा त्याने आपला प्रभाव टाकला आणि संपूर्ण जगाला आपल्या अधीन बनविले. ज्यावेळी कामदेव संतापला, तेव्हा एका क्षणात वेदांची सर्व मर्यादा धुळीला मिळाली. ॥ ३ ॥
ब्रह्मचर्ज ब्रत संजम नाना । धीरज धरम ग्यान बिग्याना ॥
सदाचार जप जोग बिरागा । सभय बिबेक कटकु सबु भागा ॥
ब्रह्मचर्य, व्रत, नाना प्रकारचे संयम, धैर्य, धर्म, ज्ञान, विज्ञान, सदाचार, जप, योग, वैराग्य इत्यादी विवेकाची संपूर्ण सेना घाबरुन पळून गेली. ॥ ४ ॥
छं—भागेउ बिबेकु सहाय सहित सो सुभट संजुग महि मुरे ।
सदग्रंथ पर्बत कंदरन्हि महुँ जाइ तेहि अवसर दुरे ॥
होनिहार का करतार को रखवार जग खरभरु परा ।
दुइ माथ केहि रतिनाथ जेहि कहुँ कोपि कर धनु सरु धरा ॥
विवेक आपल्या सहाय्यकांच्यासह पळून गेला. त्याचे योद्धे युद्ध-भूमीवरुन पाठ फिरवून निघाले. त्यावेळी ते सर्व सद्ग्रंथरुपी पर्वतांच्या कडे-कपार्‍यात जाऊन लपून बसले. ( अर्थात ज्ञान, वैराग्य, संयम, नियम, सदाचार इत्यादी फक्त ग्रंथामध्ये उरले, त्यांचे आचरण संपले. ) संपूर्ण जगात खळबळ माजली. ( सर्वजण म्हणू लागले, ) हे विधात्या ! आता काय होणार ? आमचे रक्षण कोण करणार ? असा दोन शिरांचा कोण आहे की, ज्याच्यासाठी रतीचा पती कामदेव याने कोप धरुन हातामध्ये धनुष्यबाण उचलला आहे ?
दोहा—जे सजीव जग अचर चर नारि पुरुष अस नाम ।
ते निज निज मरजाद तजि भए सकल बस काम ॥ ८४ ॥
जगामध्ये जे स्री-पुरुष जितके चराचर प्राणी होते, ते सर्व आपापली मर्यादा सोडून कामवश झाले. ॥ ८४ ॥
सब के हृदयँ मदन अभिलाषा । लता निहारि नवहिं तरु साखा ॥
नदीं उमगि अंबुधि कहुं धाईं । संगम करहिं तलाव तलाईं ॥
सर्वांच्या मनांत कामाची इच्छा उत्पन्न झाली. लतांना पाहून वृक्षांच्या फांद्या झुकु लागल्या. नद्या चेकाळून समुद्राकडे धावू लागल्या आणि तलाव व तळ्या परस्परांशी संगम करु लागल्या. ॥ १ ॥
जहँ असि दसा जडन्ह कै बरनी । को कहि सकइ सचेतन करनी ॥
पसु पच्छी नभ जल थल चारी । भए कामबस समय बिसारी ॥
जर अचेतन ( वृक्ष, नदी इत्यादी ) पदार्थांची अशी अवस्था झाली तर मग चेतन जीवांबद्दल काय सांगायचे ? आकाश, जल, आणि पृथ्वीवर संचार करणारे सर्व पशु-पक्षी ( आपल्या संयोगाचा ) काळ विसरुन काम-वश झाले. ॥ २ ॥
मदन अंध ब्याकुल सब लोका । निसि दिनु नहिं अवलोकहिं कोका ॥
देव दनुज नर किंनर ब्याला । प्रेत पिसाच भूत बेताला ॥
सर्वजण कामांध होऊन व्याकूळ झाले. चक्रवाक पक्षी व पक्षिणी यांनी रात्र-दिवस पाहिला नाही. देव, दैत्य, मनुष्य, किन्नर, सर्प, प्रेत, पिशाच, भूत, वेताळ,
इन्ह कै दसा न कहेउँ बखानी । सदा काम के चेरे जानी ॥
सिद्ध बिरक्त महामुनि जोगी । तेपि कामबस भए बियोगी ॥
हे सर्वजण नेहमीच कामाचे गुलाम असतात. म्हणून मी त्यांच्या अवस्थेचे वर्णन केलेले नाही. सिद्ध, विरक्त, महामुनी आणि महान योगी हे सुद्धा कामवश झाल्यामुळे योगापासून ढळले आणि स्रीच्या विरहाने पीडित झाले. ॥ ४ ॥
छं—भए कामबस जोगीस तापस पावँरन्हि की को कहै ।
देखहिं चराचर नारिमय जे ब्रह्ममय देखत रहे ॥
अबला बिलोकहिं पुरुषमय जगु पुरुष सब अबलामयं ।
दुइ दंड भरि ब्रह्मांड भीतर कामकृत कौतुक अयं ॥
जेव्हा योगीश्र्वर व तपस्वीसुद्धा कामाला वश झाले, मग बिचार्‍या मनुष्यांबद्दल काय सांगायचे ? ज्या लोकांना संपूर्ण चराचर सृष्टी ब्रह्ममय दिसत होती, त्यांना आता सर्व जग स्रीमय दिसू लागले. स्रीयांना सर्व जग पुरुषमय दिसू लागले, तर पुरुषांना ते स्रीमय दिसू लागले. दोन घटिका संपूर्ण ब्रह्मांडात कामदेवाने मांडलेले हे कौतुक दिसून आले.
सो—धरी न काहूँ धीर सब के मन मनसिज हरे ।
जे राखे रघुबीर ते उबरे तेहि काल महुँ ॥ ८५ ॥
कुणालाही मन आवरता येईल. कामदेवाने सर्वांचे मन हरण केले. श्रीरामांनी ज्यांचे रक्षण केले, फक्त तेवढेच भक्त ( कामदेवाच्या प्रभावापासून ) त्यावेळी वाचले. ॥ ८५ ॥
उभय घरी अस कौतुक भयऊ । जौ लगि कामु संभु पहिं गयऊ ॥
सिवहि बिलोकि ससंकेउ मारु । भयउ जथाथिति सबु संसारु ॥
दोन घटिका असा तमाशा झाला. तोपर्यंत कामदेव श्रीशिवांच्या जवळ पोहोचला. त्यांना पाहून कामदेव चपापला, तेव्हा संपूर्ण जग पूर्वीप्रमाणें स्थिर झाले. ॥ १ ॥
भए तुरत सब जीव सुखारे । जिमि मद उतारि गएँ मतवारे ॥
रुद्रहि देखि मदन भय माना । दुराधरष दुर्गम भगवाना ॥
ज्याप्रमाणे नशा उतरताच दारुडे लोक शांत होतात. त्याप्रमाणे सर्व जीव शांत झाले. अजिंक्य व अनाकलनीय अशा भगवान रुद्रांना पाहून कामदेव भ्याला. ॥ २ ॥
फिरत लाज कछु करि नहिं जाई । मरनु ठानि मन रचेसि उपाई ॥
प्रगटेसि तुरत रुचिर रितुराजा । कुसुमित नव तरु राजि बिराजा ॥
त्याला परत फिरण्याची लाज वाटत होती आणि काही करताही येत नव्हते. शेवटी त्याने मरायचे ठरवून एक उपाय योजला. त्याने लगेच सुंदर ऋतुराज वसंत प्रकट केला. फुललेल्या वृक्षांच्या रांगा शोभून दिसू लागल्या. ॥ ३ ॥
बन उपबन बापिका तडागा । परम सुभग सब दिसा बिभागा ॥
जहँ तहँ जनु उमगत अनुरागा । देखि मुएहुँ मन मनसिज जागा ॥
वने-उपवने, विहिरी-तलाव आणि सर्व दिशांचे प्रदेश रमणीय दिसू लागले. जिकडे-तिकडे जणू प्रेम उसळू लागले. ते पाहून मेलेल्या मनांमध्येही कामदेव जागा झाला. ॥ ४ ॥
छं—जागइ मनोभव मुएहुँ मन बन सुभगता न परै कही ।
सीतल सुगंध सुमंद मारुत मदन अनल सखा सही ॥
बिकसे सरन्हि बहु कंज गुंजत पुंज मंजुल मधुकरा ।
कलहंस पिक सुक सरस रव करि गान नाचहिं अपछरा ॥
मेलेल्या मनातही कामदेव जागा झाला, वनाचे सौंदर्य तर सांगण्यापलीकडचे होते. कामरुपी अग्नीचा सच्चा मित्र शीतल-मंद-सुगंधित पवन वाहु लागला. सरोवरात पुष्कळ कमळे उमलली व त्यांवर भ्रमरसमूह मधुर गुंजारव करु लागले. राजहंस, कोकिळा आणि पोपट हे मधुर बोल बोलू लागले आणि अप्सरा गात-गात नाचू लागल्या.
दोहा—सकल कला करि कोटि बिधि हारेउ सेन समेत ।
चली न अचल समाधि सिव कोपेउ हृदयनिकेत ॥ ८६ ॥
कामदेवाने आपल्या सर्व सेनेसह कोट्यावधी कळा दाखवूनही तो हरला. कारण श्रीशिवांची अढळ समाधी भंग पावली नाही. तेव्हा कामदेव संतापला. ॥ ८६ ॥
देखि रसाल बिटप बर साखा । तेहि पर चढेउ मदनु मन माखा ॥
सुमन चाप निज सर संधाने । अति रिस ताकि श्रवन लगि ताने ॥
त्याने आम्रवृक्षाची एक सुंदर फांदी पाहीली आणि मनांत चिडलेला मदन तिच्यावर चढला. त्याने पुष्प-धनुष्यावर आपले पाचही बाण चढविले आणि मोठ्या त्वेषाने लक्ष्य पाहून धनुष्य आकर्ण ताणले. ॥ १ ॥
छाडे बिषम बिसिख उर लागे । छूटि समाधि संभु तब जागे ॥
भयउ ईस मन छोभु बिसेषी । नयन उधारि सकल दिसि देखी ॥
आणि कामदेवाने तीक्ष्ण बाण सोडले. ते शिवांच्या हृदयाला लागले. त्यांची समाधि भंग झाली आणि ते जागे झाले. शिवांचे मन प्रक्षुब्ध झाले. त्यांनी डोळे उघडून इकडे तिकडे पाहिले. ॥ २ ॥
सौरभ पल्लव मदनु बिलोका । भयउ कोपु कंपेउ त्रैलोका ॥
तब सिवँ तीसर नयन उधारा । चितवत कामु भयउ जरि छारा ॥
आंब्याच्या पानांत दडलेल्या कामदेवाला पाहून त्यांना अतिशय क्रोध आला. त्यामुळे त्रैलोक्याचा थरकाप उडाला. तेव्हा शिवांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्यांनी पाहताच कामदेव भस्म होऊन गेला. ॥ ३ ॥
हाहाकार भयउ जग भारी । डरपे सुर भए असुर सुखारी ॥
समुझि कामसुखु सोचहिं भोगी । भए अकंटक साधक जोगी ॥
जगामध्ये मोठा हाहाकार उडाला. देव घाबरुन गेले तर दैत्य आनंदित झाले. भोगी लोक कामसुखाची आठवण करीत काळजीत पडले आणि साधक योगी यांचा मार्ग निष्कंटक झाला. ॥ ४ ॥
छं—जोगी अकंटक भए पति गति सुनत रति मुरुछित भई ।
रोदति बदति बहु भॉंति करुना करति संकर पहिं गई ॥
अति प्रेम करि बिनति बिबिध बिधि जोरि कर सन्मुख रही ।
प्रभु आसुतोष कृपाल सिव अबला निरखि बोले सही ॥
योगी लोक निर्भय झाले, परंतु कामदेवाची पत्नी रती ही पतीची दशा ऐकून मूर्छित झाली. ती आक्रोश करीत करुणा भाकीत भगवान शिवांच्याजवळ गेली. अत्यंत प्रेमाने अनेक प्रकारे विनंती करीत हात जोडून ती समोर उभी राहिली. त्या अबलेला पाहून आशुतोष कृपाळू शिव सांत्वन करीत बोलले.
दोहा—अब तें रति तव नाथ कर होइहि नामु अनंगु ।
बिनु बपु ब्यापिहि सबहि पुनि सुनु निज मिलन प्रसंगु ॥ ८७ ॥
हे रती, यापुढे तुझ्या पतीचे नाव अनंग होईल. तो शरीराविना सर्वांना व्यापून टाकील. आता तू आपल्या पतीच्या भेटीविषयी ऐक. ॥ ८७ ॥
जब जदुबंस कृष्न अवतारा । होइहि हरन महा महिभारा ॥
कृष्न तनय होइहि पति तोरा । बचनु अन्यथा होइ न मोरा ॥
जेव्हा पृथ्वीचा प्रचंड भार हरण करण्यासाठी यदुवंशात श्रीकृष्णांचा अवतार होईल, तेव्हा तुझा पती कृष्णांचा पुत्र प्रद्युम्न म्हणून जन्म घेईल. हे माझे वचन असत्य होणार नाही.’ ॥ १ ॥
रति गवनी सुनि संकर बानी । कथा अपर अब कहउँ बखानी ॥
देवन्ह समाचार सब पाए । ब्रह्मादिक बैकुंठ सिधाए ॥
शिवांचे वचन ऐकून रती निघपपन गेली. आता दुसरी कथा विस्ताराने वर्णन करुन सांगतो. ब्रह्मादी देवांनी ही वार्ता ऐकली, तेव्हा ते वैकुंठाला गेले. ॥ २ ॥
सब सुर बिष्नु बिरंचि समेता । गए जहॉं सिव कृपानिकेता ॥
पृथक पृथक तिन्ह कीन्हि प्रसंसा । भए प्रसन्न चंद्र अवतंसा ॥
नंतर तेथून विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यासह सर्व देव कृपासागर शिवांच्याकडे गेले. त्या सर्वांनी शिवांची वेगवेगळी स्तुती केली. तेव्हा शशिभूषण शिव प्रसन्न झाले. ॥ ३ ॥
बोले कृपासिंधु बृषकेतू । कहहु अमर आए केहि हेतू ॥
कह बिधि तुम्ह प्रभु अंतरजामी । तदपि भगति बस बिनवउँ स्वामी ॥
कृपासागर शिव म्हणाले, ‘ हे देवांनो, बोला. तुम्ही कशासाठी आला आहात ? ‘ ब्रह्मदेव म्हणाले, ‘ हे प्रभो, तुम्ही अंतर्यामी आहात, तरीही हे स्वामी, भक्तिपूर्वक मी विनंती करतो. ॥ ४ ॥
दोहा—सकल सुरन्ह के हृदयँ अस संकर परम उछाहु ।
निज नयनन्हि देखा चहहिं नाथ तुम्हार बिबाहु ॥ ८८ ॥
हे भगवान शंकर, आपल्या डोळ्यांनी तुमचा विवाह पाहावा, अशी खूप इच्छा सर्व देवांच्या मनात आहे. ॥ ८८ ॥
यह उत्सव देखिअ भरि लोचन । सोइ कछु करहु मदन मद मोचन ॥
कामु जारि रति कहुँ बरु दीन्हा । कृपासिंधु यह भला कीन्हा ॥
हे कामदेवाचा मद नष्ट करणारे प्रभू, सर्वजणांना असा उत्सव डोळे भरुन पाहाता यावा, असे काही करा. हे कृपासागर, कामदेवाला भस्म करुन रतीला वरदान दिलेत हे फारच चांगले झाले. ॥ १ ॥
सासति करि पुनि करहिं पसाऊ । नाथ प्रभुन्ह कर सहज सुभाऊ ॥
पारबतीं तपु कीन्ह अपारा । करहु तासु अब अंगीकारा ॥
हे नाथा, श्रेष्ठ स्वामींचा असा सहज स्वभावच असतो की, ते प्रथम शासन करतात आणि नंतर कृपा करतात. पार्वतीने अपार तप केलेले आहे, तेव्हा आता तिचा अंगीकार करा. ‘ ॥ २ ॥
सुनि बिधि बिनय समुझि प्रभु बानी । ऐसेइ होउ कहा सुखु मानी ॥
तब देवन्ह दुंदुभीं बजाईं । बरषि सुमन जय जय सुर साईं ॥
ब्रह्मदेवांची ही प्रार्थना ऐकून आणि प्रभू रामचंद्रांची वाणी स्मरण करुन शिवांनी प्रसन्नतेने म्हटले की, ’ ठिक आहे. मग देवांनी नगारे वाजविले आणि फुलांचा वर्षाव करीत ते म्हणू लागले, ‘ विजय असो, देवाधिदेवांचा विजय असो. ‘ ॥ ३ ॥
अवसरु जानि सप्तरिषि आए । तुरतहिं बिधि गिरिभवन पठाए ॥
प्रथम गए जहँ रहीं भवानी । बोले मधुर बचन छल सानी ॥
योग्यवेळ साधून सप्तर्षी आले आणि ब्रह्मदेवांनी लगेच त्यांना हिमालयाच्या घरी पाठविले. सप्तर्षी प्रथम पार्वतीकडे गेले आणि तिची थट्टा करीत म्हणाले-॥ ४ ॥


Custom Search

No comments: