Sunday, May 17, 2020

ShriRamCharitManas Part 15 श्रीरामचरितमानस भाग १५


ShriRamCharitManas Part 15 
श्रीरामचरितमानस भाग १५ 
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड

दोहा—नाथ उमा मम प्रान सम गृहकिंकरी करेहु ।
छमेहु सकल अपराध अब होइ प्रसन्न बरु देहु ॥ १०१ ॥
‘ हे नाथ ही उमा मला प्राणाहून प्रिय आहे. तुम्ही हिला आपली दासी म्हणून स्वीकारा आणि हिच्या सर्व अपराधांना क्षमा करा. प्रसन्न होऊन आता मला हा एकच वर द्या. ‘ ॥ १०१ ॥
बहु बिधि संभु सासु समुझाई । गवनी भवन चरन सिरु नाई ॥
जननीं उमा बोलि तब लीन्ही । लै उछंग सुंदर सिख दीन्ही ॥
भगवान शिवांनी अनेक प्रकारे आपल्या सासूचे समाधान केले, तेव्हा ती शिवांच्या पाया पडून घरी गेली. नंतर तिने पार्वतीला जवळ बोलावले आणि मांडीवर बसवून उपदेश दिला. ॥ १ ॥
करेहु सदा संकर पद पूजा । नारिधरमु पति देउ न दूजा ॥
बचन कहत भरे लोचन बारी । बहुरि लाइ उर लीन्हि कुमारी ॥
‘ हे पार्वती, तूं नेहमी शिवांच्या चरणांची सेवा कर. स्त्रियांचा हाच धर्म आहे. स्त्रियांना पती हाच परमेश्र्वर आहे; इतर कोणताही नाही.’ अशाप्रकारे बोलता बोलता तिचे डोळे पाणावले आणि तिने उमेला घट्ट छातीशी धरले. ॥ २ ॥
कत बिधि सृजीं नारि जग माहीं । पराधीन सपनेहुँ सुखु नाहीं ॥
भै अति प्रेम बिकल महतारी । धीरजु कीन्ह कुसमय बिचारी ॥
( नंतर ती म्हणाली, ) ‘ विधात्याने जगात स्त्रीजातीला जन्माला का घातले ? पराधीन असलेल्याला स्वप्नातही सुख लाभत नाही. ‘ असे म्हणत माता मैना व्याकूळ झाली. परंतु ही दुःख करण्याची वेळ नव्हे, हे लक्षात येऊन तिने स्वतःला सावरले. ॥ ३ ॥
पुनि पुनि मिलति परति गहि चरना । परम प्रेमु कछु जाइ न बरना ॥
सब नारिन्ह मिलि भेटि भवानी । जाइ जननि उर पुनि लपटानी ॥
मैना पार्वतीला वारंवार अलिंगन देऊन तिचे पाय धरुन विव्हळ होऊन पडत होती. तिच्या अपरिमित प्रेमाचे वर्णन करता येत नाही. भवानी सर्व स्त्रियांना भेटून झाल्यावर पुन्हा मातेला बिलगली. ॥ ४ ॥
छं—जननिहि बहुरि मिलि चली उचित असीस सब काहूँ दईं ।
फिर फिरि बिलोकति मातु तन तब सखीं लै सिव पहिं गईं ॥
जाचक सकल संतोषि संकरु उमा सहित भवन चले ।
सब अमर हरषे सुमन बरषि निसान नभ बाजे भले ॥
आईला पुन्हा एकवार भेटून पार्वती निघाली. सर्वांनी तिला यथोचित आशीर्वाद दिले. पार्वती आईकडे वारंवार पाहात होती. नंतर सख्या तिला घेऊन शिवांच्याकडे गेल्या. महादेवांनी सर्व याचकांना संतुष्ट केले व ते पार्वतीबरोबर घरी ( कैलासाला ) निघाले. सर्व देव आनंदाने पुष्प वर्षाव करु लागले आणि आकाशात सुंदर नगारे दुमदुमू लागले.
  दोहा—चले संग हिमवंतु तब पहुँचावन अति हेतु ।
बिबिध भॉंति परितोषु करि बिदा कीन्ह बृषकेतु ॥ १०२ ॥
नंतर हिमवान अत्यंत प्रेमाने शिवांना निरोप देण्यासाठी निघाला. शिवांनी अनेक प्रकारे त्याचे समाधान करुन त्याला निरोप दिला. ॥ १०२ ॥
तुरत भवन आए गिरिराई । सकल सैल सर लिए बोलाई ॥
आदर दान बिनय बहुमाना । सब कर बिदा कीन्ह हिमवाना ॥
पर्वतराज हिमवान त्वरित घरी आला आणि त्याने सर्व पर्वत व सरोवर यांना बोलाविले. त्यांना आदराने, विनयपूर्वक अहेर देऊन सन्मानाने निरोप दिला. ॥ १ ॥
जबहिं संभु कैलासहिं आए । सुर सब निज निज लोक सिधाए ॥
जगत मातु पितु संभु भवानी । तेहिं सिंगारु न कहउँ बखानी ॥
जेव्हा शिव कैलास पर्वतावर पोहोचले, तेव्हा सर्व देव आपापल्या लोकी गेले. ( तुलसीदास म्हणतात की, ) पार्वती व शिव हे जगाचे माता-पिता आहेत, म्हणून मी त्यांच्या श्रृंगाराचे वर्णन करीत नाही. ॥ २ ॥
करहिं बिबिध बिधि भोग बिलासा । गनन्ह समेत बसहिं कैलासा ॥
हर गिरिजा बिहार नित नयऊ । एहि बिधि बिपुल काल चलि गयऊ ॥
शिव-पार्वती विविध प्रकारचे भोग-विलास करीत आपल्या गणांसोबत कैलासावर राहूं लागले. ते नित्य विहार करीत होते, अशाप्रकारे बराच कालावधी लोटला. ॥ ३ ॥
तब जनमेउ षटबदन कुमारा । तारकु असुरु समर जेहिं मारा ॥
आगम निगम प्रसिद्ध पुराना । षन्मुख जन्मु सकल जग जाना ॥
नंतर सहा मुखांचा पुत्र-स्वामी कार्तिकेय याचा जन्म झाला. त्याने मोठा झाल्यावर तारकासुराला युद्धात ठार केले. वेद, शास्त्रे, पुराणे यांमध्ये कार्तिक स्वामीच्या जन्माची प्रसिद्ध कथा येते आणि सर्व जग ती जाणते. ॥ ४ ॥
छं—जगु जान षन्मुख जन्मु कर्मु प्रतापु पुरुषारथु महा ।
तेहि हेतु मैं बृषकेतु सुत कर चरित संछेपहिं कहा ॥
यह उमा संभु बिबाहु जे नर नारि कहहिं जे गावहीं ।
कल्यान काज बिबाह मंगल सर्बदा सुख पावहीं ॥  
कार्तिक स्वामीचा जन्म, कर्म, प्रताप व महान पुरुषार्थ सर्व जग जाणते. म्हणून मी शिवांचा पुत्र कार्तिकेय याचे चरित्र संक्षिप्तपणेच सांगितले आहे. सिव-पार्वतीच्या विवाहाची ही कथा जे स्त्री-पुरुष वर्णन करतील व गायन करतील , त्यांना कल्याणाची कार्ये व विवाहादी मंगल कार्ये यांमध्ये नित्य सुख-समाधान लाभेल.
दोहा—चरित सिंधु गिरिजा रमन बेद न पावहिं पारु ।
बरनै तुलसीदासु किमि अति मतिमंद गवॉंरु ॥ १०३ ॥
गिरिजापती महादेव यांचे चरित्र समुद्राप्रमाणे ( अपार ) आहे. त्याचा थांग वेदांनाही लागत नाही. मग अत्यंत मंदबुद्धीचा व अडाणी तुलसीदास त्याचे वर्णन कसे करु शकेल ? ॥ १०३ ॥
संभु चरित सुनि सरस सुहावा । भरद्वाज मुनि अति सुखु पावा ॥
बहु लालसा कथा पर बाढी । नयनन्हि नीरु रोमावलि ठाढी ॥
शिवांचे सुंदर व सुरस चरित्र ऐकून मुनी भरद्वाजांना फार आनंद झाला. ती कथा ऐकण्याची लालसा त्यांच्या मनात वाढली. नेत्रांमध्ये प्रेमाश्रू उचंबळले आणि शरीर रोमांचित झाले. ॥ १ ॥  
प्रेम बिबस मुख आव न बानी । दसा देखि हरषे मुनि ग्यानी ॥
अहो धन्य तव जन्मु मुनीसा । तुम्हहि प्रान सम प्रिय गौरीसा ॥
भरद्वाज मुनी प्रेमात दंग होऊन गेले. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना, त्यांची ही दशा पाहून ज्ञानी याज्ञवल्क्यांना फार आनंद वाटला.  ( ते म्हणाले, ) हे मुनीश्र्वर ! अहाहा, तुमचा जन्म धन्य होय. तुम्हांला गौरीपती शिव हे प्राणासमान प्रिय आहेत. ॥ २ ॥
सिव पद कमल जिन्हहि रति नाहीं । रामहि ते सपनेहुँ न सोहाहीं ॥
बिनु छल बिस्वनाथ पद नेहू । राम भगत कर लच्छन एहू ॥
भगवान शिवांच्या चरणकमली ज्यांना प्रेम नाही, ते लोक श्रीरामचंद्रांना स्वप्नातही आवडत नाहीत. विश्र्वनाथ श्रीशिवांच्या चरणी शुद्ध प्रेम असणे, हेच रामभक्ताचे लक्षण आहे. ॥ ३ ॥
सिव सम को रघुपति ब्रतधारी । बुनि अघ तजी सती असि नारी ॥
पनु करि रघुपति भगति देखाई । को सिव सम रामहि प्रिय भाई ॥
भगवान शिवांच्यासारखा श्रीरामांच्या भक्तीचे व्रत धारण करणारा कोण आहे ? त्यांनी कोणताही दोष नसताना सतीसारख्या स्त्रीचा त्याग केला आणि प्रतिज्ञा करुन श्रीरामांची भक्ती दाखवून दिली. श्रीरामांनाही शिवांसारखा दुसरा कोण प्रिय आहे ? ॥ ४ ॥
दोहा—प्रथमहिं मैं कहि सिव चरित बूझा मरमु तुम्हार ।
सुचि सेवक तुम्ह राम के रहित समस्त बिकार ॥ १०४ ॥
मी प्रथमतःच शिवांचे चरित्र सांगून तुमचे रहस्य जाणून घेतले आहे. तुम्ही श्रीरामांचे पवित्र सेवक आहात आणि सर्व दोषांनी रहित आहात. ॥ १०४ ॥
मैं जाना तुम्हार गुन सीला । कहउँ सुनहु अब रघुपति लीला ॥
सुनु मुनि आजु समागम तोरें । कहि न जाइ जस सुखु मन मोरें ॥
मी तुमचे गुण व शील जाणले आहे. आता मी श्रीरघुनाथांची लीला सांगतो. हे मुनी, ऐका. आज तुमची भेट झाल्यामुळे माझ्या मनाला आनंद वाटत आहे, तो काही सांगता येत नाही. ॥ १ ॥
राम चरित अमित मुनीसा । कहि न सकहिं सत कोटि अहीसा ॥
तदपि जथाश्रुत कहउँ बखानी । सुमिरि गिरापति प्रभु धनुपानी ॥
हे मुनीश्र्वरा, रामचरित्र हे अत्यंत अपार आहे. शंभर कोटी शेषसुद्धा ते सांगू शकणार नाहीत. तरीही मी जसे ऐकले आहे, तसे वाणीचे स्वामी ( प्रेरक ) आणि हाती धनुष्य धारण केलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण करुन त्यांचे चरित्र सांगणार आहे. ॥ २ ॥
सारद दारुनारि सम स्वामी । रामु सूत्रधर अंतरजामी ॥
जेहि पर कृपा करहिं जनु जानी । कबि उर अजिर नचावहिं बानी ॥
देवी सरस्वती ही कळसूत्री बाहुली आहे आणि अंतर्यामी स्वामी श्रीरामचंद्र हे ( दोरी धरुन कळसूत्री बाहुलीला नाचविणारे ) सूत्रधार आहेत. आपला भक्त जाणून ते ज्या कवीवर कृपा करतात, त्याच्या अंतःकरणाच्या अंगणात ते सरस्वतीला नाचवीत असतात. ॥ ३ ॥     
प्रनवउँ सोइ कृपाल रघुनाथा । बरनउँ बिसद तासु गुन गाथा ॥
परम रम्य गिरिबरु कैलासू । सदा जहॉं सिव उमा निवासू ॥
त्याच कृपाळू श्रीरघुनाथांना मी प्रणाम करतो आणि त्यांच्या निर्मल गुणांची कथा सांगतो. कैलास हा पर्वतांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत रमणीय आहे, तेथे शिव-पार्वती नित्य निवास करतात. ॥ ४ ॥
दोहा—सिद्ध तपोधन जोगिजन सुर किंनर मुनिबृंद ।
बसहिं तहॉं सुकृती सकल सेवहिं सिव सुखकंद ॥ १०५ ॥
सिद्ध, तपस्वी, योगीगण, देव, किन्नर व मुनींचे समुदाय त्या पर्वतावर राहातात. ते सर्व मोठे पुणात्मा असून आनंदकंद श्रीमहादेवांची सेवा करीत असतात. ॥ १०५ ॥
हरि हर बिमुख धर्म रति नाहीं । ते नर तहँ सपनेहुँ नहिं जाहीं ॥
तेहि गिरि पर बट बिटप बिसाला । नित नूतन सुंदर सब काला ॥
जे भगवान विष्णू व महादेव यांना विन्मुख असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नसते, ते लोक स्वप्नातही तेथे पोहोचू शकत नाहीत. त्या पर्वतावर एक विशाल वटवृक्ष आहे. तो नित्य ताजा व सहाही ऋतूंमध्ये सौंदर्याने नटलेला असतो. ॥ १ ॥
त्रिबिध समीर सुसीतलि छाया । सिव बिश्राम बिटप श्रुति गाया ॥
एक बार तेहि तर प्रभु गयऊ । तरु बिलोकि उर अति सुखु भयऊ ॥
तेथे तिन्ही प्रकारची ( शीतल, मंद, सुगंधी ) हवा वाहात असते आणि तेथे अतिशय शीतल सावली असते. तो शिवांच्या विश्रांतीचा वृक्ष आहे, असे त्याला वेदांनी म्हटले आहे. एकदा प्रभु शिव त्या वृक्षाखाली गेले आणि त्यांना मनातून खूप आनंद झाला. ॥ २ ॥
निज कर डासि नागरिपु छाला । बैठे सहजहिं संभु कृपाला ॥
कुंद इंदु दर गौर सरीरा । भुज प्रलंब परिधन मुनिचीरा ॥
कृपाळू शिवांनी स्वतः आपल्या हाताने तेथे व्याघ्रांबर अंथरले आणि सहजपणे ते तेथे बसले.कुंद-पुष्प, चंद्रमा आणि शंखासारखे त्यांचे शरीर गौर होते. बाहु लांबसडक होते आणि त्यांनी मुनींसारखे वल्कल वस्त्र परिधान केले होते. ॥ ३ ॥
तरुन अरुन अंबुज सम चरना । नख दुति भगत हृदय तम हरना ॥
भुजग भूति भूषन त्रिपुरारी । आननु सरद चंद छबि हारी ॥
त्यांचे चरण पूर्ण उमललेल्या लाल कमळासारखे होते. नखांची ज्योती भक्तांच्या हृदयांतील अंधकार नाहीसा करणारी होती. साप व भस्म हीच त्यांची भूषणे होती आणि त्या त्रिपुरारी शिवांचे मुख शरदाच्या चंद्राची शोभाही हरण करणारे होते. ॥ ४ ॥


Custom Search

No comments: