Saturday, May 16, 2020

ShriRamCharitManas Part 14 श्रीरामचरितमानस भाग १४


ShriRamCharitManas Part 14 
श्रीरामचरितमानस भाग १४
श्रीरामचरितमानस---प्रथम सोपान---बालकाण्ड
दोहा—कहा हमार न सुनेहु तब नारद कें उपदेस ।
अब भा झूठ तुम्हार पन जारेउ कामु महेस ॥ ८९ ॥
‘ नारदांच्या उपदेशामुळे तेव्हा तू आमचे म्हणणे ऐकले नाहीस, आता मात्र तुझी प्रतिज्ञा खोटी ठरली. कारण महादेवांनी कामदेवाला भस्म करुन टाकले. ’ ॥ ८९ ॥
मासपारायण, तिसरा विश्राम
सुनि बोलीं मुसुकाइ भवानी । उचित कहेहु मुनिबर बिग्यानी ॥
तुम्हरें जान कामु अब जारा । अब लगि संभु रहे सबिकारा ॥
ते ऐकून पार्वती थट्टेने हसत म्हणाली, ‘ हे ज्ञानी मुनीवरांनो, छान बोललात ! शिवांनी कामदेवाला आता जाळून टाकले, म्हणजे आतापर्यंत ते विकारयुक्त ( कामी ) होते, असे तुम्हाला वाटले ना ? ॥ १ ॥
हमरें जान सदा सिव जोगी । अज अनवद्य अकाम अभोगी ।
जौं मैं सिव सेये अस जानी । प्रीति समेत कर्म मन बानी ॥
परंतु मला माहीत आहे की, श्रीशिव हे नेहमी योगी, अजन्मा, अनिंद्य, कामरहित व भोगहीन आहेत आणि श्री शिवांना असेच समजून कायावाचामनाने प्रेमपूर्वक त्यांची उपासना केली आहे. ॥ २ ॥
तौं हमार पन सुनहु मुनीसा । करिहहिं सत्य कृपानिधि ईसा ॥
तुम्ह जो कहा हर जारेउ मारा । सोइ अति बड अबिबेकु तुम्हारा ॥
तेव्हां हे मुनीश्वरांनो, ऐका, ते कृपानिधान भगवान शंकर माझी प्रतिज्ञा खरी करतील. तुम्ही म्हणता की, शिवांनी कामदेवाला भस्म करुन टाकले, परंतु तेच तुमचे घोर अज्ञान आहे. ॥ ३ ॥
तात अनल कर सहज सुभाऊ । हिम तेहि निकट जाइ नहिं काऊ ॥
गएँ समीप सो अवसि नसाई । असि मन्मथ महेस की नाई ॥
महाराज, अग्नीचा असा स्वभावच आहे की, हिम त्याच्याजवळ जाऊच शकत नाही आणि जर गेलेच तर ते नष्ट होते. महेश आणि मन्मथ यांचा संबंध असाच आहे. ॥ ४ ॥
दोहा—हियँ हरषे मुनि बचन सुनि देखि प्रीति बिस्वास ।
चले भवानिहि नाइ सिर गए हिमाचल पास ॥ ९० ॥
पार्वतीचे हे बोलणे ऐकून व तिचे प्रेम आणि विश्वास पाहून सप्तर्षी मनातून खूष झाले. ते भवानीला वंदन करुन निघाले आणि हिमवानाकडे गेले. ॥ ९० ॥
सबु प्रसंगु गिरिपतिहि सुनावा । मदन दहन सुनि अति दुखु पावा ॥
बहुरि कहेउ रति कर बरदाना । सुनि हिमवंत बहुत सुखु माना ॥
त्यांनी पर्वताराज हिमालयाला सर्व वृत्तांत सांगितला. कामदेव भस्म झाल्याचे ऐकून हिमालय दुःखी झाला. नंतर मुनींनी रतीला वरदानाची गोष्ट सांगितली. तेव्हा हिमाचलाला आनंद झाला. ॥ १ ॥
हृदयँ बिचारि संभु प्रभुताई । सादर मुनिबर लिए बोलाई ॥
सुदिनु सुनखतु सुघरी सोचाई । बेगि बेदबिधि लगन धराई ॥
हिमाचलानें शिवांचा मोठेपणा जाणून श्रेष्ठ मुनींना आदराने बोलावून घेतले आणि त्यांच्या कड़ून शुभ दिवस, शुभ नक्षत्र व शुभ घटिका शोधून वेदविधिपूर्वक विवाह शीघ्र निश्चित करुन लग्नपत्रिका तयार केली. ॥ २ ॥
पत्री सप्तरिषिन्ह सोइ दीन्ही । गहि पद बिनय हिमाचल कीन्ही ॥
जाइ बिधिहि तिन्ह दीन्हि सो पाती । बाचत प्रीति न हृदयँ समाती ॥
नंतर हिमालयाने ती लग्नपत्रिका सप्तऋषींकडे दिली आणि त्यांच्या पायापडून त्यांना ती ब्रह्मदेवांना देण्याची विनंती केली. त्यांनी जाऊन ती लग्नपत्रिका ब्रह्मदेवांना दिली. ती वाचून त्यांचा आनंद गगनांत मावेनासा झाला. ॥ ३ ॥
लगन बाचि अज सबहि सुनाई । हरषे मुनि सब सुर समुदाई ॥
सुमन बृष्टि नभ बाजन बाजे । मंगल कलस दसहुँ दिसि साजे ॥
ब्रह्मदेवांनी ती लग्नपत्रिका सर्वांना वाचून दाखविली. ती ऐकून सर्व मुनी व देव आनंदित झाले. आकाशातून पुष्पवर्षा होऊ लागली, वाद्ये वाजू लागली आणि दश दिशांना मंगल कलश सजविले गेले. ॥ ४ ॥
दोहा—लगे सँवारन सकल सुर बाहन बिबिध बिमान ।
होहिं सगुन मंगल सुभद करहिं अपछरा गान ॥ ९१ ॥
सर्व देव आपापली तर्‍हेतर्‍हेची वाहने आणि विमाने सजवू लागले. शुभ शकुन होऊ लागले आणि अप्सरा गाणी गाऊ लागल्या ॥ ९१ ॥  
सिवहि संभु गन करहिं सिंगारा । जटा मुकुट अहि मौरु सँवारा ॥
कुंडल कंकन पहिरे ब्याला । तन बिभूति पट केहरि छाला ॥
शिवगण शिवांना सजवू लागले. जटांचा मुकुट बनवून त्यावर सर्पांचा मोर जडविला. शिवांनी सापांची कुंडले आणि कंकण धारण केले. शरीरावर भस्मलेपन केले आणि वस्त्रांऐवजी व्याघ्रांबर नेसले. ॥ १ ॥
ससि ललाट सुंदर सिर गंगा । नयन तीनि उपबीत भुजंगा ॥
गरल कंठ उर नर सिर माला । असिव बेष सिवधाम कृपाला ॥
शिवांच्या सुंदर मस्तकावर चंद्रमा, गंगा, त्रिनेत्र, सापाचे यज्ञोपवीत, कंठात विष आणि छातीवर नरमुंडमाळा होत्या. अशाप्रकारे त्यांचा वेष अशुभ असूनही ते कल्याणाचे निधान आणि कृपाळू होते. ॥ २ ॥
कर त्रिसूल अरु डमरु बिराजा । चले बसहँ चढि बाजहिं बाजा ॥
देखि सिवहि सुरत्रिय मुसुकाहीं । बर लायक दुलहिनि जग नाहीं ॥
त्यांच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसर्‍या हातात डमरु शोभत होता. शिव नंदीवर आरुढ झाले. वाद्ये वाजू लागली. शिवांना पाहून देवांगना हसू लागल्या. ( त्या म्हणू लागल्या की, ) या वराला योग्य अशी नवरी सार्‍या जगात सापडणार नाही. ॥ ३ ॥
बिष्णु बिरंचि आदि सुरब्राता । चढि चढि बाहन चले बाराता ।
सुर समाज सब भॉंति अनूपा । नहिं बरात दूलह अनुरुपा ॥
विष्णू, ब्रह्मदेव इत्यादी देव समाज आपापल्या वाहनात बसून वर्‍हाडातून निघाले. देवांचा समुदाय सर्व प्रकारे अनुपम होता, परंतु ते वर्‍हाड वराला शोभेसे नव्हते. ॥ ४ ॥
दोहा—बिष्नु कहा अस बिहसि तब बोलि सकल दिसिराज ।
बिलग बिलग होइ चलहु सब निज निज सहित समाज ॥ ९२ ॥
तेव्हा भगवान विष्णूनी सर्व दिक्पालांना बोलावून हसत सांगितले की, सर्वजण आपापल्या परिवारासह वेगवेगळे चला. ॥ ९२ ॥
बर अनुहारि बरात न भाई । हँसी करैहहु पर पुर जाई ॥
बिष्णु बचन सुनि सुर मुसुकाने । निज निज सेन सहित बिलगाने ॥
‘अरे बाबांनो, आपले हे वर्‍हाड वराच्या योग्यतेचे नाही. परक्या ठिकाणी गेल्यावर आपले हसे करुन घेणार काय ? ‘ भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून देव हसले आणि आपापला लवाजमा घेऊन वेगवेगळे चालू लागले. ॥ १ ॥
मनहीं मन महेसु मुसुकाहिं । हरि के बिंग्य बचन नहिं जाहीं ॥
अति प्रिय बचन सुनत प्रिय केरे । भंगिहि प्रेरि सकल गन टेरे ॥
( हे पाहून ) महादेव मनांत हसून म्हणाले की, ‘ भगवान विष्णूंची थट्टेची सवय सुटायची नाही. ‘ आपल्या आवडत्या भगवान विष्णूंचे बोलणे ऐकून शंकरांनी भृंगीला पाठवून आपल्या सर्व गणांना बोलावून घेतले. ॥ २ ॥
सिव अनुसासन सुनि सब आए । प्रभु पद जलज सीस तिन्ह नाए ॥
नाना बाहन नाना बेषा । बिहसे सिव समाज निज देखा ॥
शिवांची आज्ञा मिळताच सर्व गण आले आणि त्यांनी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवले. तर्‍हेतर्‍हेची वाहने आणि तर्‍हेतर्‍हेचा वेष केलेला आपला परीवार पाहून शिवांना हसू आले. ॥ ३ ॥                               
कोउ मुखहीन बिपुल मुख काहू । बिनु पद कर कोउ बहु पद बाहू ॥
बिपुल नयन कोउ नयन बिहीन । रिष्टपुष्ट कोउ अति तनखीना ॥
त्यामध्ये कोणी विना तोंडाचा, कोणाला अनेक तोंडे, कोणी हाता-पायांविना, तर कोणी अनेक हात-पायांचा. कुणाला अनेक डोळे, तर कुणाला एकही डोळा नाही. कुणी गलेलठ्ठ तर कुणी फारच कीडकीडीत. ॥ ४ ॥
छं—तन खीन कोउ अति पीन पावन कोउ अपावन गति धरें ।
भूषन कराल कपाल कर सब सद्य सोनित तन भरें ॥
खर स्वान सुअर सृकाल मुख गन बेष अगनित को गनै ।
बहु जिनस प्रेत पिसाच जोगि जमात बरनत नहिं बनै ॥
कोणी अस्थिपंजर तर कुणी गुबगुबीत, कुणी पवित्र तर कुणी अपवित्र वेष धारण केलेला, कुणी भयंकर दागिने घालून हातामध्ये नरकपाल घेतलेले व शरीराला ताजे रक्त माखलेले, कुणाची तोंडे गाढवासारखी, कुणाची कुत्र्यासारखी, कुणाची डुकराची, तर कोणाची कोल्हांची, गणांचे अगणित वेष होते, त्यांची गणना कोण करणार ? अनेक प्रकारची भूते, पिशाच आणि योगिनींचे समुदाय होते, त्यांचे तर वर्णन करणेंही अशक्य.
सो—नाचहिं गावहिं गीत परम तरंगी भूत सब ।
देखत अति बिपरीत बोलहिं बचन बिचित्र बिधि ॥ ९३ ॥
भूत-प्रेते नाचत आहेत, गात आहेत. ते सर्वजण मोठ्या मजेत आहेत. दिसायला फार विचित्र वाटत आहेत आणि अचकट-विचकट बोलत आहेत. ॥ ९३ ॥
जस दूलहु तसि बनी बराता । कौतुक बिबिध होहिं मग जाता ॥
इहॉं हिमाचल रचेउ बिताना । अति बिचित्र नहिं जाइ बखाना ॥
जसा नवरदेव तसे त्याचे वर्‍हाड. वाटेने जाताना तर्‍हेतर्‍हेची मजा चालली होती. इकडे हिमाचलाने असा विलक्षण मंडप केला होता की, त्याचे वर्णन करता येत नाही. ॥ १ ॥
सैल सकल जहँ लगि जग माहीं । लघु बिसाल नहिं बरनि सिराहीं ॥
बन सागर सब नदीं तलावा । हिमगिरि सब कहुँ नेवत पठावा ॥
जगामध्ये जितके लहान-मोठे पर्वत होते की, ज्यांचे वर्णन करुन संपणार नाही, तसेच जितकी वने, समुद्र, नद्या व तलाव होते, त्या सर्वांना हिमालयाने लग्नाचे निमंत्रण पाठविले. ॥ २ ॥
कामरुप सुंदर तन धारी । सहित समाज सहित बर नारी ॥
गए सकल तुहिनाचल गेहा । गावहिं मंगल सहित सनेहा ॥
ते सर्व आपापल्या इच्छेप्रमाणे सुंदर रुपे धारण करुन आपल्या सुंदर स्रिया आणि परिवाराला बरोबर घेऊन हिमालयाच्या घरी आले. सर्वांनी मोठ्या प्रेमाने मंगल गीते गाईली. ॥ ३ ॥
प्रथमहिं गिरि बहु गृह सँवराए । जथाजोगु तहँ तहँ सब छाए ॥
पुर सोभा अवलोकि सुहाई । लागइ लघु बिरंचि निपुनाई ॥
हिमालयाने प्रारंभीच पुष्कळशी घरे सुसज्ज करुन ठेवली होती. त्या ठिकाणी ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे सर्वजण उतरले. नगराची सुंदर शोभा पाहून ब्रह्मदेवाचे रचनाचातुर्य तुच्छ वाटत होते. ॥ ४ ॥
छं—लघु लाग बिधि की निपुनता अवलोकि पुर सोभा सही ।
बन बाग कूप तडाग सरिता सुभग सब सक को कही ॥
मंगल बिपुल तोरन पताका केतु गृह गृह सोहहीं ।
बनिता पुरुष सुंदर चतुर छबि देखि मुनि मन मोहहीं ॥
नगराची शोभा पाहून ब्रह्मदेवाचे नैपुण्य खरोखरच तुच्छ वाटत होते. वन, बागा, विहिरी, तलाव, नद्या सर्व काही सुंदर होते. त्यांचे वर्णन कोण करुं शकेल ? घरोघरी अत्यंत मंगलमय तोरणे, ध्वज-पताका शोभत होत्या. तेथील सुंदर व चतुर स्री-पुरुषांचे सौंदर्य पाहून मुनींचेही मन मोहित होत होते.
दोहा—जगदंबा जहँ अवतरी सो पुरु बरनि कि जाइ ।
रिद्धि सिद्धि संपत्ति सुख नित नूतन अधिकाइ ॥ ९४ ॥
ज्या नगरीत प्रत्यक्ष जगदंबेने अवतार घेतला होता, त्या नगरीचे वर्णन करता येईल काय ? तेथे ऋद्धी, सिद्धी, संपत्ती आणि सुख हे नित्य नवीन वाढतच जात असते. ॥ ९४ ॥
नगर निकट बरात सुनि आई । पुर खरभरु सोभा अधिकाई ॥
करि बनाव सजि बाहन नाना । चले लेन सादर अगवाना ॥
वर्‍हाड नगराजवळ आले, हे ऐकून नगरामध्ये धावपळ सुरु झाली. त्यामुळे त्याची शोभा आणखी वाढली. स्वागत करणारे लोक नटून-थटून आणि नाना प्रकारची वाहने सजवून मोठ्या आदराने वर्‍हाडास आणण्यास गेले. ॥ १ ॥
हियँ हरषे सुर सेन निहारी । हरिहि देखि अति भए सुखारी ॥
सिव समाज जब देखन लागे । बिहरि चले बाहन सब भागे ॥
देवांचा समुदाय पाहून सर्वांना आनंद झाला आणि विष्णूंना पाहून सर्व अत्यंत प्रसन्न झाले. परंतु लोक जेव्हा श्रीशिवांच्याकडची मंडळी पाहू लागले, तेव्हा त्यांची सर्व वाहने ( हत्ती, घोडे, रथाचे बैल इत्यादी ) घाबरुन पळू लागली. ॥ २ ॥
धरि धीरजु तहँ रहे सयाने । बालक सब लै जीव पराने ।
गएँ भवन पूछहिं पितु माता । कहहिं बचन भय कंपित गाता ॥
कांहीं प्रौढ वयाची समजुतदार माणसे धीराने तेथे ठाम उभी राहिली. सर्व मुले तर जीव घेऊन पळाली. घरी गेल्यावर आई-वडिलांनी जेव्हा त्यांना विचारले, तेव्हा ती भीतीने थरथरत म्हणाली, ॥ ३ ॥
कहिअ काह कहि जाइ न बाता । जम कर धार किधौं बरिआता ॥
बरु बौराह बसहँ असवारा । ब्याल कपाल बिभूषन छारा ॥
काय सांगायचे ? काहीही सांगता येत नाही. हे वर्‍हाड आहे की यमराजाची सेना? नवरा वेडा आहेआणि बैलावर बसला आहे. साप, नरकपाल आणि राख ही त्याची भूषणें आहेत. ॥ ४ ॥
छं—तन छार ब्याल कपाल भूषन नगन जटिल भयंकरा ।
सँग भूत प्रेत पिसाच जोगिनि बिकट मुख रजनीचरा ॥
जो जिअत रहिहि बरात देखत पुन्य बड तेहि कर सही ।
देखिहि सो उमा बिबाहु घर घर बात असि लरिकन्ह कही ॥
नवर्‍याच्या अंगाला राख फासलेली आहे. साप व नरकपालांचे अलंकार आहेत. तो निर्वस्त्र, जटाधारी व भयंकर आहे. त्याच्या सोबत भयंकर तोंडांची भूते, प्रेत, पिशाच, योगिनी आणि राक्षस आहेत. हे वर्‍हाड पाहून जे जिवंत राहतील ते खरोखर भाग्यवान होत आणि त्यांनाच पार्वतीचा विवाह पाहायला मिळेल. मुलांनी घरोघरी हेंच सांगितले.
दोहा—समुझि महेस समाज सब जननि जनक मुसुकाहिं ।
बाल बुझाए बिबिध बिधि निडर होहु डरु नाहिं ॥ ९५ ॥
शिवांच्या वर्‍हाडाचा हा परिवार पाहून सर्व मुलांचे आई-बाप हसू लागले. त्यांनी परोपरीने समजावून सांगितले की,  ‘ भिऊ नका, घाबरायचे काही कारण नाही. ‘ ॥ ९५ ॥
लै अगवान बरातहि आए । दिए सबहि जनवास सुहाए ॥
मैनॉं सुभ आरती सँवारी । संग सुमंगल गावहिं नारी ॥
स्वागतासाठी सामोरे गेलेले लोक वर्‍हाड घेऊन आले, त्यांनी सर्वांना सुंदर जानवश्यांमध्ये उतरविले. ( पार्वतीची आई ) मैनेने मंगलारती सजविली आणि तिच्या सोबतच्या स्त्रिया मंगलगीते गाऊ लागल्या. ॥ १ ॥
कंचन थार सोह बर पानी । परिछन चली हरहि हरषानी ॥
बिकट बेष रुद्रहि जब देखा । अबलन्ह उर भय भयउ बिसेषा ॥
मैनेच्या सुंदर हातांमध्ये सोन्याचे तबक शोभत होते. अशाप्रकारे ती मोठ्या आनंदाने श्रीशिवांना ओवाळण्यासाठी निघाली. जेव्हा महादेवांचा भयंकर वेष पाहिला, तेव्हा स्त्रिया मनात भयभीत झाल्या. ॥ २ ॥
भागि भवन पैठीं अति त्रासा । गए महेसु जहॉं जनवासा ॥
मैना हृदयँ भयउ दुखु भारी । लीन्ही बोलि गिरिसकुमारी ॥
भयंकर भीतीमुळे त्या घरात पळाल्या. जेथे जानवसा होता, तेथे श्रीशिव गेले. मैनेला फार वाईट वाटले. तिने पार्वतीला आपल्याजवळ बोलावले. ॥ ३ ॥
अधिक सनेहँ गोद बैठारी । स्याम सरोज नयन भरे बारी ॥
जेहिं बिधि तुम्हहि रुपु अस दीन्हा । तेहिं जड बरु बाउर कस कीन्हा ॥
मोठ्या प्रेमाने तिला आपल्याजवळ बसवून घेऊन ती निळ्या कमळांसारख्या नेत्रांतून अश्रू ढाळत म्हणाली, ‘ ज्या विधात्याने तुला असे सुंदर रुप दिले आहे, त्या मूर्खाने तुझ्या नवर्‍याला वेंधळा कसा बनविला ? ॥ ४ ॥
छं—कस कीन्ह बरु बौराह बिधि जेहिं तुम्हहि सुंदरता दई ।
जो फलु चहिअ सुरतरुहिं सो बरबस बबूरहिं लागई ॥
तुम्ह सहित गिरि तें गिरौं पावक जरौं जलनिधि महुँ परौं ।
घरु जाउ अपजसु होउ जग जीवत बिबाहु न हौं करौं ॥
ज्या विधात्याने तुला सौंदर्य दिले, त्याने तुझ्यासाठी बावळट नवरा कसा बनविला ? जे फळ कल्पवृक्षाला लागायला हवे, ते हट्टाने बाभळीला कसे लावले ? मी तुला घेऊन पर्वतावरुन उडी मारीन, आगीत जळून जाईन किंवा समुद्रात उडी घेईन. घर उध्वस्त झाले आणि जगात नाचक्की झाली, तरी मी जिवंतपणी या वेड्याशी तुझे लग्न लावणार नाही. ‘
दोहा—भईं बिकल अबला सकल दुखित देखि गिरिनारि ।
करि बिलापु रोदति बदति सुता सनेहु सँभारि ॥ ९६ ॥
हिमालयाची पत्नी ( मैना ) दुःखी झाल्याचे पाहून सर्व स्त्रिया व्याकूळ होऊन गेल्या. मैना आपल्या मुलीचे प्रेम आठवून विलाप करीत होती आणि रडत-रडत म्हणत होती, ॥ ९६ ॥
नारद कर मैं काह बिगारा । भवनु मोर जिन्ह बसत उजारा ॥
अस उपदेसु उमहि जिन्ह दीन्हा । बौरे बरहि लागि तपु कीन्हा ॥
‘ मी नारदांचे असे काय वाकडे केले होते, म्हणून त्यांनी माझे नांदते घर उजाड केले आणि पार्वतीला असला सल्ला दिला ! त्यामुळेच तिने या बावळट वरासाठी तप केले. ॥ १ ॥
साचेहुँ उन्ह कें मोह न माया । उदासीन धनु धामु न जाया ॥
पर घर घालक लाज न भीरा । बॉंझ कि जान प्रसव कै पीरा ॥
नारदांना खरोखर कुणाचा मोह नाही, माया नाही, धन, घर किंवा स्त्री या सर्वांपासून ते उदासीन आहेत. म्हणूनच दुसर्‍याचे घर उजाड करताना त्यांना कुणाची लाज वाटत नाही की भय वातत नाही. वांझ स्त्रीला प्रसूतिवेदना कशा कळणार बरे ?’ ॥ २ ॥
जननिहि बिकल बिलोकि भवानी । बोली जुत बिबेक मृदु बानी ॥
अस बिचारि सोचहि मति माता । सो न टरइ जो रचइ बिधाता ॥
आईला व्याकूळ झालेली पाहून पार्वती विवेकपूर्ण कोमल वाणीने म्हणाली, ‘ आई जे विधात्याने नशिबात लिहिले आहे, ते टळत नाही, असा विचार करुन तू काळजी करु नकोस. ॥ ३ ॥
करम लिखा जौं बाउर नाहू । तौ कत दोसु लगाइअ काहू ॥
तुम्ह सन मिटहिं कि बिधि के अंका । मातु ब्यर्थ जनि लेहु कलंका ॥
माझ्या नशिबी बावळट नवराच लिहिला असेल, तर कुणाला दोष का द्यावयाचा ? हे माते, विधात्याचे लिखित तुला पुसता येईल काय ? उगीच निंदेला पात्र होऊ नकोस. ॥ ४ ॥
छं—जनि लेहु मातु कलंकु करुना परिहरहु अवसर नहीं ।
दुखु सुखु जो लिखा लिलार हमरें जाब जहँ पाउब तहीं ॥
सुनि उमा बचन बिनीत कोमल सकल अबला सोचहीं ।
बहु भॉंति बिधिहि लगाइ दूषन नयन बारि बिमोचहीं ॥
अग आई ! उगीच ठपका ठेवून घेऊ नकोस. रडणे सोडून दे. ही वेळ दुःख करायची नव्हे. माझ्या भाग्यात जे सुख-दुःख लिहिले आहे, ते जेथे जाईन तेथे माझ्याबरोबर येणार. ‘ पार्वतीचे हे नम्र कोमल वचन ऐकून सर्व स्त्रिया हेलावून गेल्या आणि हर तर्‍हेने विधात्याला दोष लावीत अश्रू ढाळू लागल्या.
दोहा—तेहि अवसर नारद सहित अरु रिषि सप्त समेत ।
समाचार सुनि तुहिनगिरि गवने तुरत निकेत ॥ ९७ ॥
ते वर्तमान ऐकताच हिमाचल नारदांना व सप्तर्षींना बरोबर घेऊन तत्काळ घरी आले. ॥ ९७ ॥
तब नारद सबही समुझावा । पूरुब कथाप्रसंगु सुनावा ॥
मयना सत्य सुनहु मम बानी । जगदंबा तव सुता भवानी ॥
तेव्हा नारदांनी पूर्वजन्मीची कथा सांगून सर्वांना समजावले. ते म्हणाले, ‘ हे मैने, तुला खरे सांगतो ते ऐक. तुझी मुलगी साक्षात जगज्जननी भवानी आहे. ॥ १ ॥
अजा अनादि सक्ति अबिनासिनि । सदा संभु अरधंग निवासिनि ॥
जग संभव पालन लय कारिनि । निज इच्छा लीला बपु धारिनि ॥
ही जन्मरहित, अनादी व अविनाशिनी शक्ती आहे. श्रीशिवांच्या अर्धांगामध्ये ती नेहमी राहाते. ही जगाची उत्पत्ती, पालन व संहार करणारी आहे आणि आपल्या इच्छेनेच लील-शरीर धारण करते. ॥ २ ॥
जनमीं प्रथम दच्छ गृह जाई । नामु सती सुंदर तनु पाई ॥
तहँहुँ सती संकरहि बिबाहीं । कथा प्रसिद्ध सकल जग माहीं ॥
पूर्वी ही दक्षाच्या घरीजन्मली होती, तेव्हा हिचे नाव सती होते. तिला फार सुंदर देह लाभला होता. तेथेही सतीचे शंकरांशीच लग्न झाले होते. ही कथा जगप्रसिद्ध आहे. ॥ ३ ॥
एक बार आवत सिव संगा । देखेउ रघुकुल कमल पतंगा ॥
भयउ मोहु सिव कहा न कीन्हा । भ्रम बस बेषु सीय कर लीन्हा ॥
एकदा हिने शिवांच्याबरोबर येताना वाटेत रघुकुलरुपी कमलाचे सूर्य असलेल्या श्रीरामचंद्रांना पाहिले, तेव्हा तिला शंका आली आणि तिने शिवांचे सांगणे न ऐकता त्यांची परीक्षा पाहण्यासाठी भ्रमाने सीतेचा वेष घेतला. ॥ ४ ॥
छं—सिय बेषु सतीं जो कीन्ह तेहिं अपराध संकर परिहरीं ।
हर बिरहँ जाइ बहोरि पितु कें जग्य जोगानल जरीं ॥
अब जनमि तुम्हरे भवन निज पति लागि दारुन तपु किया ।
अस जानि संसय तजहु गिरिजा सर्बदा संकरप्रिया ॥
सतीने ( मातृसदृश ) सीतेचा वेष धारण केला, या अपराधामुळे शंकरांनी तिचा ( माता मानून ) त्याग केला. मग ती शिवांच्या वियोगामुळे आपल्या पित्याने केलेल्या यज्ञात जाऊन तेथे योगाग्नीने स्वतः भस्म झाली. आता हिने तुमच्या घरी जन्म घेऊन आपल्या पतीसाठी कठोर तप केले आहे. हे समजून घेऊन मनातील शंका काढून टाक. पार्वती ही तर नेहमीच शिवांची प्रिया ( अर्धांगिनी ) आहे. ‘
दोहा—सुनि नारद के बचन तब सब कर मिटा बिषाद ।
छन महुँ ब्यापेउ सकल पुर घर घर यह संबाद ॥ ९८ ॥
नारदांचे हे बोलणे ऐकून सर्वांच्या मनातील विषाद दूर झाला आणि एका क्षणांत ही वार्ता संपूर्ण नगरात पसरली.
तब मयना हिमवंतु अनंदे । पुनि पुनि पारबती पद बंदे ।
नारि पुरुष सिसु जुबा सयाने । नगर लोग सब अति हरषाने ॥
मग मैना व हिमाचल दोघेही आनंदून गेले आणि ते वारंवार पार्वतीच्या पाया पडले. नगरातील स्त्री-पुरुष, मुले, तरुण आणि वृद्ध हे सारेच फार प्रसन्न झाले. ॥ १ ॥
लगे होन पुर मंगल गाना । सजे सबहिं हाटक घट नाना ॥
भॉंति अनेक भई जेवनारा । सूपसास्त्र जस कछु ब्यवहारा ॥
नगरामध्ये मंगल गीते गाईली जाऊ लागली आणि सर्वांनी तर्‍हेतर्‍हेचे सुवर्ण कलश सजविले. पाकशास्त्रातील पद्धतीप्रमाणे अनेक प्रकारचे भोजन पदार्थ बनविले गेले. ॥ २ ॥
    सो जेवनार कि जाइ बखानी । बसहिं भवन जेहिं मातु भवानी ॥
    सादर बोले सकल बराती । बिष्नु बिरंचि देव सब जाती ॥
     ज्या घरी माता भवानी राहते, तेथील भोजनपदार्थांचे वर्णन कसे करता येईल ? हिमालयाने आदराने सर्व वर्‍हाडी मंडळींना-विष्णू, ब्रह्मदेव आणि सर्व जातीच्या देवांना बोलाविले. ॥ ३ ॥
बिबिधि पॉंति बैठी जेवनारा । लागे परुसन निपुन सुआरा ॥
नारिबृंद सुर जेवँत जानी । लगीं देन गारीं मृदु बानी ॥
भोजनाच्या अनेक पंक्ती बसल्या. चतुर वाढपी वाढत होते. स्त्रियांची मंडळें भोजन करीत असलेल्या देवांची कोमल वाणीने चेष्टामस्करी करु लागली. ॥ ४ ॥
छं—गारीं मधुर स्वर देहिं सुंदरि बिंग्य बचन सुनावहीं ।
भोजन करहिं सुर अति बिलंबु बिनोदु सुनि सचु पावहीं ॥
जेवँत जो बढ्यो अनंद सो मुख कोटिहूँ न परै कह्यो ।
अचवॉंइ दीन्हे पान गवने बास जहँ जाको रह्यो ॥
सर्व सुंदर स्त्रिया गोड स्वरात टोमणे मारु लागल्या व थट्टा करु लागल्या. सर्व देव तो हास्यविनोद ऐकत खूप आनंदित होत होते, म्हणून भोजन करताना वेळ लावत होते. भोजन-प्रसंगी जो आनंद वाढला, त्याचे वर्णन कोट्यावधी मुखांनीही सांगता येणार नाही. जेवण झाले. आचवल्यानंतर सर्वांना विडे दिले गेले. नंतर सर्वजण आपापल्या निवासात गेले.
दोहा—बहुरि मुनिन्ह हिमवंत कहुँ लगन सुनाई आइ ।
समय बिलोकि बिबाह कर पठए देव बोलाइ ॥
त्यानंतर मुनींनी परत येऊन हिमवानाला लग्नपत्रिका वाचून दाखविली आणि विवाहाची वेळ पाहून देवांना बोलावणे पाठविले. ॥ ९९ ॥
बोलि सकल सुर सादर लीन्हे । सबहि जथोचित आसन दीन्हे ॥
बेदी बेद बिधान सँवारी । सुभग सुमंगल गावहिं नारी ॥
सर्व देवांना आदरपूर्वक बोलावले व आल्यावर बसायला यथायोग्य आसने दिली. वैदिक पद्धतीने विवाह-वेदी सजविली गेली आणि स्त्रिया सुंदर मंगल गाणी गाऊ लागल्या. ॥ १ ॥
सिंघासनु अति दिब्य सुहावा । जाइ न बरनि बिरंचि बनावा ॥
बैठे सिव बिप्रन्ह सिरु नाई । हृदयँ सुमिरि निज प्रभु रघुराई ॥
वेदिकेवर एक अत्यंत सुंदर दिव्य सिंहासन होते. त्याचे वर्णन करता येणे शक्य नाही, कारण ते स्वतः ब्रह्मदेवांनी बनविले होते. ब्राह्मणांना नमस्कार करुन आणि मनात स्वामी श्रीरघुनाथांचे स्मरण करुन भगवान शिव त्या सिमहासनावर आरुढ झाले. ॥ २ ॥
बहुरि मुनीसन्ह उमा बोलाईं । करि सिंगारु सखीं लै आईं ॥
देखत रुपु सकल सुर मोहे । बरनै छबि अस जग कबि को है ॥
मग मुनीश्वरांनी पार्वतीला बोलावून घेतले. तिचा श्रृंगार करुन सख्या तिला घेऊन आल्या.पार्वतीचे रुप पाहताच सर्व देव मोहून गेले. त्या सौंदर्याचे वर्णन करु शकेल, असा कवी जगात कोण आहे ? ॥ ३ ॥
जगदंबिका जानि भव भामा । सुरन्ह मनहिं मन कीन्ह प्रनामा ॥
सुंदरता मरजाद भवानी । जाइ न कोटिहुँ बदन बखानी ॥
पार्वतीही जगदंबा आणि भगवान शिवांची पत्नी आहे, हे जाणून देवांनी मनातल्या मनात तिला प्रणाम केला. भवानी ही सौंदर्याची परिसीमा आहे. कोट्यावधी मुखांनीही तिची शोभा वर्णन करता येणार नाही. ३ ४ ॥
छं—कोटिहुँ बदन नहिं बनै बरनत जग जननि सोभा महा ।
सकुचहिं कहत श्रुति सेष सारद मंदमति तुलसी कहा ॥
छबिखानि मातु भवानि गवनीं मध्य मंडप सिव जहॉं ।
अवलोकि सकहिं न सकुच पति पद कमल मनु मधुकरु तहॉं ॥
जगज्जननी पार्वतीच्या महान शोभेचे वर्णन कोट्यावधी मुखांनी केले तरी अपुरेच राहील. वेद, शेष आणि सरस्वती यांना तिचे वर्णन करताना संकोच वाटतो, मग मंदबुद्धीच्या तुलसीदासाची काय कथा ? मंडपामध्ये जेथे शिव होते, तेथे सौंदर्य व लावण्याची खाण असलेली भवानी माता गेली. समकोचामुळे ती पतीचे चरणकमल पाहू शकत नव्हती, परंतु तिचा मनरुपी भ्रमर तेथेच ( रसपान करीत ) होता.
दोहा—मुनि अनुसासन गनपतिहि पूजेउ संभु भवानि ।
कोउ सुनि संसय करै जनि सुर अनादि जियँ जानि ॥ १०० ॥
मुनींच्या आज्ञेने शिवांनी आणि पार्वतीने श्रीगणेशाचे पूजन केले. देव हे अनादी आहेत. तेव्हा कुणी मनात शंका धरु नये. ( की गणेश हा शिव-पार्वतीचा पुत्र आहे. मग विवाहापूर्वी तो कसा आला ? ) ॥ १०० ॥
जसि बिबाह कै बिधि श्रुति गाई । महामुनिन्ह सो सब करवाई ॥
गहि गिरीस कुस कन्या पानी । भवहि समरपीं जानि भवानी ॥
वेदांमध्ये विवाहाची जी रीत सांगितली आहे, ती यथासांग महामुनींनी करविली. पर्वतराज हिमाचलाने हातामध्ये कुश घेऊन व कन्येचा हात धरुन तिला भवानी ( शिवपत्नी ) समजून शिवांना अर्पण केली. ॥ १ ॥
पानिग्रहन जब कीन्ह महेसा । हियँ हरषे तब सकल सुरेसा ॥
बेदमंत्र मुनिबर उच्चरहीं । जय जय जय संकर सुर करहीं ॥
महेश्र्वरांनी पार्वतीचे पाणिग्रहण केले, तेव्हा सर्व देवांना मनात फार आनंद झाला. श्रेष्ठ मुनिगण वेदमंत्रांचा उच्चार करु लागले आणि देवगण भगवान शिवांचा जयजयकार करु लागले. ॥ २ ॥
बाजहिं बाजन बिबिध बिधाना । सुमनबृष्टि नभ भै बिधि नाना ॥
हर गिरिजा कर भयउ बिबाहू । सकल भुवन भरि रहा उछाहू ॥
अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली. आकाशातून नाना प्रकारच्या फुलांचा वर्षाव झाला. सिव-पार्वतीचा विवाह झाला. तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आनंदानें भरुन गेले. ॥ ३ ॥
दासीं दास तुरग रथ नागा । धेनु बसन मनि बस्तु बिभागा ॥
अन्न कनकभाजन भरि जाना । दाइज दीन्ह न जाइ बखाना ॥
हुंडा म्हणून दासी, दास, रथ, घोडे, हत्ती, गाई, वस्त्रे,रत्ने इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू, अन्न व सोन्याची भांडी गाड्या भरभरुन दिली गेली.त्यांचे वर्णन करणें कठीण आहे. ॥ ४ ॥
छं—दाइज दियो बहु भॉंति पुनि कर जोरि हिमभूधर कह्यो ।
का देउँ पूरनकाम संकर चरन पंकज गहि रह्यो ॥
सिवँ कृपासागर ससुर कर संतोषु सब भॉंतिहिं कियो ।
पुनि गहे पद पाथोज मयनॉं प्रेम परिपूरन हियो ॥

पुष्कळ प्रकारचा हुंडा दिल्यावर हिमाचल हात जोडून म्हणाला, ‘ हे शंकर, तुम्ही पूर्णकाम आहात. तेव्हा मी तुम्हांला काय देणार ? ‘ ( असे म्हणून ) त्याने शिवांची चरणकमले धरली. तेव्हा कृपासागर शिवांनी आपल्या सासर्‍याचे सर्व प्रकारे समाधान केले. नंतर प्रेमाने मन भरुन येऊन मैनेने शिवांची चरणकमले धरली ( आणि म्हटले ) ॥



Custom Search

No comments: