Saturday, May 23, 2020

Dnyaneshwari Adhyay 2 Part 2 ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग २


Dnyaneshwari Adhyay 2 Part 2 
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग २

ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या २६ ते ५०
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपजलें ।
हें नेणिजे परि कुडें केलें । अर्जुना तुवां ॥ २६ ॥
२६) मग आतांच काय झालें ? ही ममता कोठून उत्पन्न झाली, हें मलाच कांहीं कळत नाहीं; पण अर्जुना वाईट केलेंस तूं.
मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥
२७) अशी ममता धरल्यास असें होईल कीं, असलेला मोठेपणा जाईल आणि तूं इहलोकासह परलोकास अंतरशील.
हृदयाचें ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रियांसीं ॥ २८ ॥
२८) ह्या वेळीं अंतःकरणाचा ढिलेपणा हा कांहीं चांगलें होण्याला कारण होणार नाही; लढाईंत ढिलेपणा ठेवल्यानें क्षत्रियांना अधोगति असते, हे लक्षांत ठेव.
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवतु ।
हें ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥
२९) याप्रमाणें त्या कृपाळु श्रीकृष्णानें अनेक प्रकारांनी अर्जुनाला बोध केला. तो बोध ऐकून अर्जुन काय म्हणाला ?
देवा हें येतुलेवरी । बोलावें नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि चित्तीं विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥
३०) देवा, ऐक. इतकें बोलण्याचें कांहीं कारण नाहीं. आधी तूंच चित्तात विचार कर. हे युद्ध आहे कां ?
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हां ॥ ३१ ॥
३१) हें युद्ध नव्हे; मोठा अपराध आहे. हा करण्यांत दोष दिसत आहे. हें उघड उघड थोरांच्या उच्छेदाचें कृत्य आमच्यावर येऊन पडलें आहे.
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुलां हातीं ॥ ३२ ॥
३२) पाहा, आईबापांची सेवा करावी, सर्व प्रकारें त्यांस संतोषवावें आणि पुढें आपल्याच हातांनीं त्यांचा वध कसा बरें करावा ?
देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥ ३३ ॥
३३) देवा, संतसमुदायाला वंदन करावें, अथवा घडलें तर त्यांचें पूजन करावें, ( पण ) हें टाकून आपणच वाचेनें त्यांची निंदा कशी करावी ? 
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमाचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचें । वर्ततसे ॥ ३४ ॥
३४) त्याप्रमाणें आमचें भाऊबंद व गुरु आम्हांला सदैव पूज्य आहेत. भीष्म व द्रोण यांचा तर मी किती ऋणी आहे !
जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शकों धरुं ।
तया प्रत्यक्ष केवीं करुं । घातु देवा ॥ ३५ ॥
३५) ज्यांच्याविषयी मनानें वैर आम्हांला स्वप्नांतहि धरतां यावयाचें नाहीं, त्यांचा, देवा, आम्ही प्रत्यक्ष घात कसा बरें करावा ?
वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसि हेंचि काय जाहलें ।
जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥
३६) यापेक्षा आग लागो या जगण्याला ! सगळ्यांनाच आज असें काय झालें आहे ? जो आम्ही ( शस्त्रविद्येचा ) अभ्यास केला त्याची प्रौढी यांचा वध करुन मिरवावयाची कां ?
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ३७ ॥
३७) मी पार्थ, द्रोणांनीं तयार केलेला ( त्यांचा चेला ) आहें. त्यांनींच मला धनुर्विद्या दिली. त्या उपकारांनीं दडपलेला मी त्यांचा वध करावा काय ?
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मनें व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥
३८) अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेनें वराची प्राप्ती करुन घ्यावी, त्यांच्यावरच मनानें उलटावें, असा मी काय भस्मासूर आहे ?    
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥
३९) देवा, समुद्र गंभीर आहे, असें ऐकतों; तथापि तोहि तसा वरवरच आहे, असें दिसतें. परंतु या द्रोणाचार्यांच्या मनाला क्षोभ कसा तो ठाऊकच नाहीं.
हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय याचें ॥ ४० ॥
४०) हें आकाश अमर्याद आहे खरें, पण ( एखाद्यावेळीं ) त्याचेंहि मोजमाप होईल; पण त्यांचे हृदय अत्यंत गहन व खोल आहे ( त्याचा ठाव लागावयाचा नाहीं. ).
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे ।
परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥
४१) एक वेळ अमृत विटेल किंवा कालवशात वज्र भंगेल; पण यांच्या मनांत विकार उत्पन्न करण्याचा कसाहि प्रयत्न जरी केला तरी, यांचे मन आपला ( अविकारी ) धर्म सोडणार नाही.
स्नेहालागी माये । म्हणिपे तें कीरु होये ।
पण कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥
४२) ममता आईनेंच करावी असें म्हणतात, तें खरें आहे; परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी ममता ही मूर्तिमंत आहे.  
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥
४३) अर्जुन म्हणाला, हे दयेचें माहेरघर, सर्व गुणांचें भांडार, विद्येचा अमर्याद सागर आहे.  
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु ।
आतां सांग पां येथ धातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥
४४) इतके हे मोठे आहेत; शिवाय आमच्यावर यांची कृपा आहे ! अशा स्थितींत यांच्या घाताची कल्पना तरी मनांत आणता येईल कां ? सांग.
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना नये आघवें । जीवितेंसी ॥ ४५ ॥
४५) अशांना युद्धांत मारावें आणि मग आपण राज्यसुखाचा उपभोग घ्यावा , ही गोष्ट अंतःकरणापासून मनांतसुद्धा येत नाही.
हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥
४६) द्रोणाचार्यांसारख्यांना मारावें तेव्हां आपण राज्यसुख भोगावें, अशा प्रकारें राज्यसुख भोगणें हें दुर्घट आहे. आतां राज्यसुख भोगणेंच काय पण ह्याहूनहि अधिक श्रेष्ठ ( इंद्रपदादिक ) भोग मिळाले, तरी आम्हांला ते द्रोणाचार्यांसारख्यांची हत्या करुन नकोत, यापेक्षा भीक मागितलेली बरी.
ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥
४७) अथवा देशत्याग करुन जावें, किंवा गिरिकंदरांचा आश्रय करावा; पण त्यांच्यावर आतां शस्र धरुं नये.
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥
४८) देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी यांच्या मर्मस्थानांवर प्रहार करुन त्यांच्या रक्तांत बुडालेले जे भोग कवटावयाचे,
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती ।
मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥
४९) ते मिळवून तरी काय करायचे आहेत ? रक्ताने भरलेल्या त्या भोगांचे सेवन तरी कसें करावें ? याचकरितां तुझा हा युक्तिवाद मला पसंत नाहीं.
ऐसें अर्जुन तिये अवसरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परि तें मना नयेचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥

५०) त्या वेळीं ‘ कृष्णा ऐक ‘ असें अर्जुन म्हणाला. पण 

ते ऐकून कृष्णाच्या मनाला ते पटलें नाही.


Custom Search

No comments: