Dnyaneshwari Adhyay 2 Part 3
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग ३
ज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा ओव्या ५१ ते ७५
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों
लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोला । देतीचिना ॥ ५१ ॥
५१) हें जाणून अर्जुन कचरला, मग पुन्हां बोलूं
लागला, तो म्हणाला, देव या ( माझ्या ) बोलण्याकडे कां बरें लक्ष देत नाहींत ?
येर्हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी
विचारुनि बोलिलों एथें ।
परि निकें काय यापरौतें । तें तुम्ही जाणा ॥ ५२
॥
५२) बाकी माझ्या मनांत जें होतें, तें मी येथें
स्पष्ट करुन बोललों; परंतु, याच्यापेक्षां चांगलें काय, तें तुम्हांलाच ठाऊक !
पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलींचि प्राणु
सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥
५३) पण ज्यांच्याशीं वांकडेपणा करण्याची गोष्ट
ऐकल्यावर आम्ही प्राण सोडावे, ते येथें युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत.
आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया
निघावें ।
या दोहोंमाजीं काइ करावें । तें नेणों आम्ही ॥
५४ ॥
५४) आतां अशांचा वध करावा किंवा याना सोडून येथून
निघून जावें या दोहोंपैकीं काय करावें, तें आम्हांला समजत नाही.
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जे मोहें येणें चित्त । व्याकूळ माझें ॥ ५५ ॥
५५) आम्हांला काय करणें उचित आहे, हें या वेळीं
विचार करुन पाहिलें तरी सुचत नाहीं; कारण या मोहामुळे माझें चित्त व्याकूळ झालें
आहे.
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचें तेज भ्रंशे ।
मग पांसींच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥
५६) डोळयांवर सारा आला म्हणजे दृष्टीचें तेज
लोपतें. मग जवळ असलेली कोणतीहि वस्तु दिसत नाहींशीं होते.
देवा मज तैसें जाहलें । जें मन हें भ्रांती ग्रासिलें
।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणें ॥ ५७ ॥
५७) देवा, तसे मला झालें आहे. कारण माझे मन
भ्रांतीनें ग्रासलें आहे. आतां आपले हित कशांत आहे हेहिं मला समजत नाहीं.
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें
आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसि तूं ॥ ५८ ॥
५८) तरीं कृष्णा, तूं ( यासंबंधाचा ) विचार करुन
पाहा आणि कल्याणकारक तें आम्हांला सांग; कारण आमचा सखा, ( आमचें ) सर्व कांहीं
तूंच आहेस.
तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुते ॥ ५९ ॥
५९) तूं आमचा गुरु, बंधु, पिता, तूं आमची इष्ट
देवता; संकटसमयीं नेहमी तूंच आमचे रक्षण करणारा आहेस.
जैसा शिष्यांते,गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।
कीं सरितांतें सागरु । त्यजी केवीं ॥ ६० ॥
६०) शिष्याचा अव्हेर करण्याची गोष्ट गुरुच्या
मनांतहि मुळीं ज्याप्रमाणें येत नाहीं, किंवा, समुद्र नद्यांचा त्याग कसा करील ?
नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये ।
तरी तें कैसेंनि जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥
६१) किंवा, कृष्णा ऐका मुलाला आई जर सोडून गेली
तर तें कसें जगेल ?
तैसा सर्वांपरी आम्हांसि । देवा तूंचि एक आहासि
।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥
६२) त्याप्रमाणें देवा, सर्वतोंपरी तूंच एक
आम्हांला आहेस आणि आतांपर्यंतचें माझें बोलणें जर तुला पटत नसेल;
तरी उचित काय आम्हां । जें व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥
६३) तर जें आम्हांला उचित असून, धर्माला विरुद्ध
नसेल, तें पुरुषोत्तमा चटकन आतां सांग पाहूं.
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥ ६४ ॥
६४) हें सर्व कुळ पाहून मनामध्यें जो शोक उत्पन्न
झाला आहे, तो, तुझ्या उपदेशावांचून ( दुसर्या ) कशानेंहि जाणार नाहीं.
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल
।
परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥
६५) या वेळीं सबंध पृथ्वी जरी हातीं आली,
किंबहुना, इंद्रपदहि जरी मिळालें, तरी माझ्या मनांतला मोह दूर होणार नाहीं.
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तीं सुक्षेत्रीं
जर्ही पेरिलीं ।
तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥
६६) ज्याप्रमाणें पूर्ण भाजलेलें बी उत्तम
जमिनींत पेरलें व त्यास हवें तितके पाणी जरी घातलें, तरी, त्यास अंकुर फुटणार
नाहीं;
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें कांहीं
नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥
६७) किंवा आयुष्य संपलें असलें म्हणजे औषधानें कांहीं
होत नाहीं; ( पण ) तेथें एका परमामृताचाच ( ज्याप्रमाणें ) उपयोग होतो;
तैसें राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि
।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥
६८) त्याच प्रमाणे या माझ्या मोहित झालेल्या बुद्धीला
राज्यभोगांची समृद्धि ही उत्तेजन ( देऊं शकणार ) नाहीं, या वेळीं, कृपानिधे, तुझी
कृपाच माझा आधार.
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांती
सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥ ६९ ॥
६९) जेव्हां क्षणभर अर्जुनाची भ्रांति दूर झाली,
तेव्हां अर्जुन असें बोलला. ( पण ) मग त्याला पुन्हां मोहाच्या लहरीनें व्यापलें.
कीं मज पाहतां उर्मी नोहे । हें अनारिसें गमत
आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥
७०) ( ज्ञानेश्र्वरमहाराज म्हणतात ) किंवा विचार
केला असतां मला असें वाटतें कीं, ही मोहाची लहर नाहीं, तर दुसरेंच कांहीं असावें.
( तें दुसरें हें कीं ) महामोहरुपी काळसर्पानें त्याला ग्रासलें असावें.
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥ ७१ ॥
७१) मर्माचें स्थान जें हृदयकमळ, त्या ठिकाणीं
करुणारुपी भर सांजवेळेला, ( ऐन दुपारीं ) त्या महामोहरुपी काळसर्पानें त्याला दंश
केला, म्हणून या लहरी उतरतच नाहींत.
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टिसवें विष फेडी
।
तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥
७२) त्या विषाचा असा जालिमपणा जाणून जो आपल्या
कृपाकटाक्षानेंच विषाची बाधा दूर करतो, तो गारुडी श्रीहरि,अर्जुनाच्या हाकेला
धावून आला.
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥
७३) तशा त्या व्याकुळ झालेल्या अर्जुनाशेजारी श्रीकृष्ण
गारुड्यासारखा शोभत होता; तो आपल्या कृपेच्या बळानें ( त्याचें ) आतां लीलेनें
रक्षण करील.
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥
७४) हा अभिप्राय लक्षांत घेऊनच त्या अर्जुनास
मोहरुपी सर्प चावला आहे, असें मी म्हटलें.
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती
कवळूनु ।
जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥
ज्याप्रमाणें मेघपटलानें सूर्य आच्छादला जावा,
त्याप्रमाणें
त्या प्रसंगीं अर्जुन भ्रांतीने घेरला होता, असें समजा.
Custom Search
No comments:
Post a Comment