श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय दुसरा भाग १
ओव्या १ ते २५
ShriDnyaneshwari Adhyay 2 Part 1
Stanzas 1 to 25
मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें
।
शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १ ॥
१) मग संजय, राजा धृतराष्ट्राला म्हणाला, ऐक. तो शोकाने
व्याप्त झालेला अर्जुन त्या वेळीं रडूं लागला.
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद]भुत ।
तेणें
द्रवलें असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥
२) तो सर्व आप्तसमुदाय पाहून ( त्याला ) विलक्षण
मोह उत्पन्न झाला. त्यायोगानें त्याचें चित्त द्रवलें. कसें म्हणाल तर,
जैसें लवण जळे झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले
।
तैसें सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३ ॥
३) ज्याप्रमाणें पाण्यानें मीठ विरघळतें किंवा
वार्यानें मेघ हालतात, त्याप्रमाणें त्याचें हृदय खंबीर खरें, परंतु त्या वेळीं
द्रवलें;
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥
४) म्हणून मोहाधीन झालेला ( तो अर्जुन ) चिखलांत
रुतलेल्या राजहंसाप्रमाणें अगदी कोमेजून गेलेला दिसला.
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अति जर्जरु ।
देखौनी । श्रीशर्ङ्गधरु । काय बोले ॥ ५ ॥
५) पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणें महामोहानें
जर्जर झालेला पाहून शार्ङ्गधर काय बोलला ( तें ऐका ).
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये
ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥
६) तो म्हणाला, अर्जुना, ह्या ठिकाणीं हें करणें
योग्य आहे काय ? तूं कोण आहेस आणि हें काय करीत आहेस त्याचा अगोदर विचार कर.
तुज सांगें काय जाहलें । कवण उणें आलें ।
कंरितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥
७) सांग, तुला झालें तरी काय ? काय कमी पडलें ?
काय करायचें राहिलें ? हा खेद कशाकरितां ?
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहींच न
संडिसी ।
तुझेनि नामें अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥
८) ( एरव्हीं ) तूं अयोग्य गोष्टींकडे लक्ष देत
नाहींस; कधीहि धीर सोडीत नाहींस. तुझे नांव ऐकल्याबरोबर अपयशानें देशोधडी पळून
जावें.
तूं शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥
९) तूं शूरवृत्तीचें ( शौर्याचें ) ठिकाण आहेस;
क्षत्रियांचा राजा आहेस; तुझ्या पराक्रमाचा दबदबा तिन्ही लोकांत आहे.
तुवां संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा
ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥
१०) तूं युद्धांत शंकरांना जिंकलेंस;
निवातकवचांचा ठावठिकाणा नाहींसा केलास; तूं गंधर्वांवरहि पराक्रम गाजविलास;
हें पाहतां तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही
थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझें ॥ ११ ॥
११) तुझ्या मानानें पाहिलें असतां, हें
त्रैलोक्यही लहानच वाटतें. पार्था, तुझा पराक्रम असा चांगला आहे.
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥
१२) पण, तोच तूं या वेळीं आपली वीरवृत्ति टाकून,
खालीं मान घालून रडत आहेस !
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु
।
सांग पा अंधकारें भानु । ग्रासिला आथी ॥ १३ ॥
१३) विचार कर. तूं अर्जुन, आणि करुणेनें तुला दीन
करुन सोडावें ! सांग बरें, अंधकार सूर्याला कधी ग्रासील काय ?
ना तरी पवनु मेधासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे
।
पाहें पां इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥
१४) अथवा वारा मेधाला कधीं भ्याला आहे कां ?
किंवा अमृताला मरण आहे कां ? अरे, विचार
कर. लाकूड अग्नीला गिळून टाकील कां ?
कीं लवणेंचि जळ विरे । संसर्गें कालकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥
१५) किंवा
मिठानें पाणी विरेल कां ? दुसर्याच्या संसर्गाने कालकूट मरेल काय ? सांग बरें,
बेडूक महासर्पाला गिळील कां ?
सिंहासी झोंबि कोल्हा । ऐसा अपाडु आथि कां जाहला
।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥
१६) कोल्हा सिंहाबरोबर झोंबी करील काय ? असें
अघटित कधीं घडलें आहे काय ? पण तो अघटित प्रकार तूं ( मात्र ) आज येथें खरा करुन
दाखविलास.
म्हणोनि अझूनि अर्जुना । झणें चित्त देसी या
हीना ।
वेगीं धीर करुनियां मना । सावधान होई ॥ १७ ॥
१७) म्हणून, अर्जुना, अजून तरी या अनुचित
गोष्टींकडे तूं लक्ष देऊं नकोस; तूं लवकर आपल्या मनाला खंबीर करुन सावध हो.
सांडीं हें मूर्खपण । उठी घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझें ॥ १८ ॥
१८) हा मूर्खपणा सोडून दे. ऊठ, धनुष्यबाण हातीं
घे. युद्धाच्या वेळीं ही कोण करुणा तुझी ?
हां गा तूं जाणता । तरी न विचारिसी कां आतां ।
सांगें झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥
१९) अरे, तूं जर चांगला जाणता आहेस; तर मग आतां
विचार करुन कां पाहात नाहींस ? युद्धाच्या वेळीं कारुण्य उचित आहे काय ? बोल.
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी
अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥
२०) जगन्निवास ( पुढें ) अर्जुनाला म्हणाला, ( या
वेळची तुझी दया ) ही ( तुझ्या ) असलेल्या कीर्तीचा नाश करणारी व परलोकाला
मुकविणारी आहे.
म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं ।
हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥
२१) म्हणून शोक करुं नकोस; तूं पुरता धीर धर;
अर्जुना, हा खेद टाकून दे.
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडलें बहुत ।
तूं अझुनिवरी हित । विचारीं पां ॥ २२ ॥
२२) तुला हें योग्य नाहीं. ( आजपर्यंत ) जें काय
पुष्कळ ( यश वगैरे ) तूं जोडलें आहेस, त्याचा यामुळें नाश होईल, तूं अजुनतरी
आपल्या हिताचा विचार कर.
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे
।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥
२३) लढाईच्या या ऐन प्रसंगीं कृपाळूपणा कामाचा
नाहीं. हे तुझें आतांच कां सोयरे झाले आहेत ?
तूं आधींचि काय नेणसी । कीं हे गोत्र नोळखसी ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥
२४) या पूर्वींच तूं हें जाणत नव्हतास कां ?
किंवा, या भाऊबंदांची ओळख तुला नव्हती कां ? आतांच ( त्यांच्याबद्दल ) विनाकारण हा
फाजील कळवळा कां ?
आजिचें हें झुंज । काय जन्मा नवल तुज ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथी ॥ २५ ॥
२५) आजचें युद्ध तुला जन्मांत नवीन का आहे ?
तुम्हां
एकमेकांना लढावयास निमित्त हें नेहमीचेंच आहे.
Custom Search
No comments:
Post a Comment