Tuesday, May 31, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 17 Doha 36 to 37 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १७ दोहा ३६ ते ३७

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 17 
Doha 36 to 37 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १७ 
दोहा ३६ ते ३७

छं०—कहि कथा सकल बिलोकि हरि मुख हृदयँ पद पंकज धरे ।

तजि जोग पावक देह हरि पद लीन भइ जहँ नहिं फिरे ॥

नर बिबिध कर्म अधर्म बहु मत सोकप्रद सब त्यागहू ।

बिस्वास करि कह दास तुलसी राम पद अनुरागहू ॥

सर्व कथा सांगितल्यावर भगवंतांच्या मुखाचे दर्शन घेऊन, हृदयामध्ये तिने त्यांचे चरण-कमल धारण केले आणि योगाग्नीने देह-त्याग करुन ती दुर्लभ हरिपदांमध्ये लीन झाली की, जेथून परत यावे लागत नाही. तुलसीदास म्हणतात की, अनेक प्रकारची कर्मे, अधर्म आणि अनेक मते ही सर्व दुःख देणारी आहेत. मनुष्यांनो, त्यांचा त्याग करा आणि विश्र्वासपूर्वक श्रीरामांच्या चरणीं प्रेम करा.

दोहा—जाति हीन अघ जन्म महि मुक्त कीन्हि असि नारि ।

महामंद मन सुख चहसि ऐसे प्रभुहि बिसारि ॥ ३६ ॥

जी शबरी हलक्या जातीत जन्मली असतानाही तिला ज्यांनी मुक्त केले, अरे महामूर्ख मना, तू अशा प्रभूंना विसरुन ऐहिक सुखप्राप्तीची इच्छा करतोस ? ॥ ३६ ॥

चले राम त्यागा बन सोऊ । अतुलित बल नर केहरि दोऊ ॥

बिरही इव प्रभु करत बिषादा । कहत कथा अनेक संबादा ॥

श्रीरामचंद्रांनी ते वन सोडले आणि ते पुढे निघाले. दोन्ही पुरुषसिंह बंधू अतुलनीय बलवान होते. प्रभू एखाद्या विरही पुरुषाप्रमाणे विषाद करीत अनेक कथा सांगत संवाद करीत होते. ॥ १ ॥

लछिमन देखु बिपिन कइ सोभा । देखत केहि कर मन नहिं छोभा ॥

नारि सहित सब खग मृग बृंदा । मानहुँ मोरि करत हहिं निंदा ॥

‘ हे लक्ष्मणा, जरा वनाची शोभा तर बघ. ती पाहून कुणाचे मन क्षुब्ध होणार नाही ? पक्षी व पशूंचे समूह हे सर्व आपापल्या माद्यांसोबत आहेत, जणूं ते माझी निंदा करीत आहेत. ॥ २ ॥

हमहि देखि मृग निकर पराहीं । मृगीं कहहिं तुम्ह कहँ भय नाहीं ॥

तुम्ह आनंद करहु मृग जाए । कंचन मृग खोजन ए आए ॥

आपणाला पाहून घाबरुन हरिणांचे कळप पळत आहेत, तेव्हा हरिणी त्यांना म्हणत आहेत, ‘ तुम्ही भिऊ नका. तुम्ही तर सामान्य हरीण आहात, म्हणून तुम्ही आनंदात राहा. हे लोक सोन्याचे हरीण शोधायला आले आहेत.’ ॥ ३ ॥

संग लाइ करिनीं करि लेहीं । मानहुँ मोहि सिखावनु देहीं ॥

सास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखिअ । भूप सुसेवित बस नहिं लेखिअ ॥

हत्ती हत्तिणींच्या मागे असतात. ते जणू मला शिकवीत आहेत की, ‘ स्त्रीला कधी एकटे सोडू नये. गहनपणे चिंतन केलेली शास्त्रेही वारंवार पाहात राहिले पाहिजे. चांगल्या प्रकारे सेवा केल्यावरही राजा आपल्याला वश आहे, असे समजू नये. ॥ ४ ॥

राखिअ नारि जदपि उर माहीं । जुबती सास्त्र नृपति बस नाहीं ॥

देखहु तात बसंत सुहावा । प्रिया हीन मोहि भय उपजावा ॥

आणि स्त्रीला अगदी हृदयात ठेवले, तरी युवती स्त्री, शास्त्र आणि राजा कुणालाही वश होत नाहीत. हे बंधो ! हा सुंदर वसंत ऋतु बघ. प्रियेविना तो माझ्या मनात भय उत्पन्न करीत आहे. ॥ ५ ॥

दोहा---बिरह बिकल बलहीन मोहि जानेसि निपट अकेल ।

सहित बिपिन मधुकर खग मदन कीन्ह बगमेल ॥ ३७ ( क ) ॥

मी विरहाने व्याकूळ, बलहीन आणि अगदी एकटा झालो आहे, हे पाहून कामदेवाने वने, भ्रमर आणि पक्षी यांना घेऊन माझ्यावर हल्ला केला आहे. ॥ ३७ ( क ) ॥

देखि गयउ भ्राता सहित तासु दूत सुनि बात ।

डेरा कीन्हेउ मनहुँ तब कटकु हटकि मनजात ॥ ३७ ( ख ) ॥

परंतु जेव्हा त्याला दिसले की, माझ्यासोबत भाऊ आहे, मी एकटा नाही, तेव्हा ही गोष्ट ऐकल्यावर कामदेवाने जणू आपली सेना थांबवून तळ ठोकला आहे. ॥ ३७ ( ख ) ॥

बिटप बिसाल लता अरुझानी । बिबिध बितान दिए जनु तानी ॥

कदलि ताल बर धुजा पताका । देखि न मोह धीर मन जाका ॥

विशाल वृक्षांना बिलगलेल्या वेली पाहून असे वाटते की, जणू नाना प्रकारचे तंबू ठोकले आहेत. केळी, ताड हे जणू सुंदर ध्वज-पताका आहेत. त्या पाहून ज्याचे मन धीट आहे, तोच मोहित होणार नाही. ॥ १ ॥

बिबिध भॉंति फूले तरु नाना । जनु बानैत बने बहु बाना ॥

कहुँ कहुँ सुंदर बिटप सुहाए । जनु भट बिलग बिलग होइ छाए ॥

अनेक वृक्ष नाना प्रकारे फुललेले आहेत. जणू ते वेगवेगळे वेष घातलेले पुष्कळ तिरंदाज असावेत, असे वाटते. कुठे कुठे सुंदर वृक्ष शोभून दिसत आहेत. ते जणू वेगवेगळ्या ठिकाणी योध्यांनी छावणी केल्या प्रमाणे वाटतात. ॥ २ ॥

कूजत पिक मानहुँ गज माते । ढेक महोख ऊँट बिसराते ॥

मोर चकोर कीर बर बाजी । पारावत मराल सब ताजी ॥

कोकिळ कूजन करीत आहेत, ते जणू मत्त हत्ती आहेत. तितर, लावा पक्षी जणू उंट व खेचरे आहेत. मोर, चकोर, पोपट, कबूतर आणि हंस हे सर्व जणू अरबी घोडे आहेत. ॥ ३ ॥

तीतिर लावक पदचर जूथा । बरनि न जाइ मनोज बरुथा ॥

रथ गिरि सिला दुंदुभीं झरना । चातक बंदी गुन गन बरना ॥

तितिर व बटेर पक्षी हे पायदळ शिपायांचे जमाव आहेत. कामदेवाची सेना अद्भुत आहे. पर्वतावरील शिळा हे रथ व पाण्याचे झरे हे नगारे आहेत. चातक हे भाट आहेत. ते बिरुदावली गात आहेत. ॥ ४ ॥

मधुकर मुखर भेरि सहनाई । त्रिबिध बयारि बसीठीं आई ॥

चतुरंगिनी सेन सॅंग लीन्हें । बिचरत सबहि चुनौती दीन्हें ॥

भ्रमरांचा गुंजारव दुंदुभी आणि सनई आहेत. शीतल, मंद आणि सुगंधित वारे जणू दूताचे काम करण्यासाठी आले आहेत. अशा प्रकारे चतुरंग सेना बरोबर घेऊन कामदेव जणू सर्वांना आव्हान देत फिरत आहे. ॥ ५ ॥

लछिमन देखत काम अनीका । रहहिं धीर तिन्ह कै जग लीका ॥

एहि कें एक परम बल नारी । तेहि तें उबर सुभट सोइ भारी ॥

हे लक्ष्मणा, कामदेवाची ही सेना पाहूनही जे निश्र्चल

 राहातात, त्यांनाच जगात प्रतिष्ठा मिळते. स्त्रीमध्ये या

 कामदेवाची मोठी शक्ती आहे. तुच्यापासून जो बचावेल,

 तोच मोठा योद्धा होतो. ॥ ६ ॥



Custom Search

No comments: