Friday, August 10, 2018

GovindDamodar Stotram गोविन्ददामोदर स्तोत्रम्


GovindDamodar Stotram 
GovindDamodar Stotram is in Sanskrit. It is a very beautiful creation of P.P. BilvaMagalacharya. He is advicing us to utter the names of God always. It will help us in our happiness, unhappiness or suffering any thye of difficulties in our life.
गोविन्ददामोदर स्तोत्रम्
अग्रे कुरुणामथ पाण्डवानां दुःशासनेनाहृतवस्त्रकेशा ।
कृष्णा तदाक्रोशदनन्यनाथा गोविन्द दामोदर माधवेति ॥ १ ॥
१) ज्यावेळी कौरव-पांडवाच्या उपस्थितींत भरलेल्या राजसभेमध्यें दुःशासनानें द्रौपदीचे वस्त्र व केस पकडून ओढत आणले तेव्हां जिचा दुसरा कोणी नाथ (रक्षण करणारा) नाहीं अशा द्रौपदीनें  " हे गोविन्द, हे दामोदर, हे माधव (माझे रक्षण कर !) असा मोठा आक्रोश केला.
श्रीकृष्ण विष्णो मधुकैटभारे भक्तानुकम्पिन् भगवन् मुरारे ।
त्रायस्व मां केशव लोकनाथ गोविन्द दामोदर माधवेति ॥ २ ॥
२) हे श्रीकृष्णा, हे विष्णो, हे मधुकैटभाला मारणार्‍या, हे भक्तांवर अनुकंपा करणार्‍या, हे भगवंता, हे मुरारे, हे केशवा, हे लोकेश्र्वर, हे गोविन्द, हे दामोदर, हे माधवा माझे रक्षण कर.
विक्रेतुकामाखिलगोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्तिः ।
दध्यादिकं मोहवशादवोचद् गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३ ॥ 
३) ज्यांची चित्तवृत्ती मुरारीच्या चरणकमलांत जडलेली आहे. त्या सर्व गोपकन्या दूध, दही विकण्याच्या इच्छेनें घरांतून निघाल्या पण त्यांचे मन तर मुरारीकडेच होते. त्यामुळें प्रेमानें शुद्ध हरपून त्या " दही घ्या, दूध घ्या " असें ओरडण्याऐवजी जोराजोरांत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असेंच ओरडूं लागल्या.
उलूखले सम्भृततण्डुलांश्र्च संघट्टयन्त्यो मुसलैः प्रमुग्धाः ।
गायन्ति गोप्यो जनितानुरागा गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४ ॥
४) उखळीमध्यें भरलेले धान्य कूटता कूटता मुग्ध गोपी कृष्णाच्या प्रेमानें भावविभोर होऊन " हे गोविन्द, हे दामोदर, हे माधव असें गाऊं लागल्या.
काचित्कराम्भोजपुटे निषण्णं क्रीडाशुकं किंशुकरक्ततुण्डम् ।
अध्यापयामास सरोसुहाक्षी गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५ ॥
५) कोणीतरी कमलनयनी बालिका विनोदाने आपल्या हातावर बसलेल्या व लाल रंगाची चोच असलेल्या किंशुकाला शिकवत होती कीं, अरे पोपटा " गोविंद, दामोदर, माधव " म्हण.
गृहे गृहे गोपवधुसमूहःप्रतिक्षणं पिञ्जरसारिकाणाम् ।
स्खलद्गिरं वाचयितुं प्रवृत्तो गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६ ॥
६) घरोघरी असलेली गोपी व त्यांचे समूह पाळलेल्या व पिंजर्‍यांत असलेल्या मैनांकडून त्यांच्या लडखडत्या वाणीनें " गोविंद, दामोदर, माधव " म्हणून घेण्यात दंग होत्या.
पर्य्यङ्किकाभाजमलं कुमारं प्रस्वापयन्त्योऽखिलगोपकन्याः ।
जगुः प्रबन्धं स्वरतालबन्धं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ७ ॥
७) पाळण्यांत पहुडलेल्या आपल्या मुलाला झोपवतांना सर्व गोपकन्या तालासुरांत गोविंद, दामोदर, माधव हे पदच म्हणत राहात.
रामानुजं वीक्षणकेलिलोलं गोपी गृहीत्वा नवनीतगोलम् ।
आबालकं बालकमाजुहाव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ८ ॥ 
८) हातांत लोण्याचा गोळा घेऊन यशोदामातेनें डोळेझाकाझाकीच्या खेळांत दंग असलेल्या व बलरामाचा धाकटा भाऊ असलेल्या श्रीकृष्णाला मुलांच्यामधून पकडून " गोविंद, दामोदर, माधव " असा धावां केला.
विचित्रवर्णाभरणाभिरामेऽभिधेहि वक्त्राम्बुजराजहंसि ।
सदा मन्दीये रसनेङग्ररङ्गे गोविन्द दामोदर माधवेति ॥ ९ ॥ 
९) आपल्या तोडांतील राजहंसीसारख्या रसनेला (जीह्वेला) की, जी विचित्र, वर्णमय आभूषणांनी सुंदर दिसते, तीला सांगत असते की तूं सर्वप्रथम " गोविंद, दामोदर, माधव " या नावांचाच उच्चार कर.
अङ्काधिरुढं शिशुगोपगूढं स्तनं धयन्तं कमलैककान्तम् ।
सम्बोधयामास मुदा यशोदा गोविन्द दामोदर माधवेति ॥ १० ॥
१०)  आपल्या मांडीवर बसून बालगोपालाचे रुप धारण केलेल्या भगवान लक्ष्मीपतींना अर्थात्  भगवान विष्णुनां " गोविंद, दामोदर, माधव " जरा माझ्याशी बोल तरी असे म्हणे.  
क्रीडन्तमन्तर्व्रजमात्मजं स्वं समं वयस्यैः पशुपालबालैः ।
प्रेम्णा यशोदा प्रजुहाव कृष्णं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ११ ॥
११) आपल्या समवयस्क गोपांबरोबर गोठ्यांत खेळणार्‍या आपल्या लाडक्या मुलाला कृष्णाला यशोदा मातेनें अत्यंत प्रेमानें हाक मारली, अरे गोविंद, दामोदर, माधव (कोठे आहेस रे? ) 
यशोदया गाढमुलूखेन गोकण्ठपाशेन निबध्यमानः ।
रुरोद मन्दं नवनीतभोजी गोविन्द दामोदर माधवेति ॥ १२ ॥
१२) फार दंगा केल्यामुळें यशोदामातेनें गाईंना बांधण्याच्या दोरीनें कृष्णाला उखळीला कस्सून बांधल्यानें तो डोळे पुसतपुसत हळुहळु हुंदके देतदेत " गोविंद, दामोदर, माधव " असे म्हणून रडूं लागला.
निजाङ्गणे कङ्कणकेलिलोलं गोपी गृहीत्वा नवनीतगोलम् ।
आमर्यदत्पाणितलेन नेत्रे गोविन्द दामोदर माधवेति ॥ १३ ॥ 
१३) श्रीनन्दनन्दन आपल्याच घरांत हातांतील कंकणांशी खेळत असतांना यशोदेन एका हातांत लोण्याचा गोळा घेऊन हळुच त्याच्या मागे जाऊन त्याचे दोन्हे डोळे आपल्या दुसर्‍या हातांने झाकले व म्हणू लागली " हे गोविंद, दामोदर, माधव " ( अरे बघ हा लोण्याचा गोळा खा.)
गृहे गृहे गोपवधूकदम्बाः सर्वे मिलित्वा समवाययोगे ।
पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ १४ ॥
१४) वृदावनांतील प्रत्येक घरांतील गोपी वेळ मिळाल्यावर एकत्र जमून त्या मनमोहकाच्या (कृष्णाच्या) गोविंद, दामोदर, माधव या नांवाचा पाठ करत.
मन्दारमूले वदनाबहिरामं बिम्बाधरे पूरितवेणुनादम् ।
गोगोपगोपीजनमध्यसंस्थं गोविन्द दामोदर माधवेति ॥ १५ ॥ 
१५) ज्याचा चेहरा अतिशय सुंदर आहे, जो आपल्या बिंबासमान लाल ओठांवर बासुरी ठेवून मधुर स्वर काढत आहे, जो कदम्ब वृक्षाखाली गाई, गोप व गोपीनीं वेढलेला आहे त्या भगवंताचे " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "  असे म्हणून नेहमी स्मरण करावयास हवे.
उत्थय गोप्योऽपररात्रभागे स्मृत्वा यशोदासुतबालकेलिम् ।
गायन्ति प्रोच्चैर्दधि मन्थयन्त्यो गोविन्द दामोदर माधवेति ॥ १६ ॥
१६) व्रहवासी स्त्रीया सकाळी लवकर उठून त्या यशोदेच्या मुलाच्या बालक्रीडा आठवत आठवत दही घुसळता घुसळता मोठ्यानें  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या पदाचे गान करतात.
जग्धोऽथ दत्तो नवनीतपिण्डो गृहे यशोदा विचिकित्सयन्ती ।
उवाच सत्यं वद हे मुरारे गोविन्द दामोदर माधवेति ॥ १७ ॥
१७) यशोदाने ठेवलेल्या लोण्याच्या गोळ्यावर दृष्टी पडताच लोणी आवडणार्‍या कृष्णाने त्यांतले कांही लोणी उचलून खाल्ले व कांही आपल्या सवंगड्यांत वाटले. यशोदाने त्याच्यावर संशय घेऊन " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " सरळ सरळ सांग लोण्याचा गोळा कोठे गेला?
अभ्यर्च्य गेहं युवतिः प्रवृद्धप्रेमप्रवाहा दधि निर्ममन्थ ।
गायन्ति गोप्योऽथ सखीसमेता गोविन्द दामोदर माधवेति ॥ १८ ॥ 
१८) जिच्या हृदयांत कृष्ण प्रेमाचा पूर आला आहे अशी यशोदा घरांत दही घूसळून लोणी काढत असतांना गोपकन्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "  यापदाचे गान करत होत्या.
क्वचित् प्रभाते दधिपूर्णपात्रे निक्षिप्य मन्थं युवती मुकुन्दम् ।
आलोक्य गानं विविधं करोति गोविन्द दामोदर माधवेति ॥ १९ ॥
१९) कधी एके दिवशीं दही घुसळणें थांबवून यशोदा उठली तेव्हां तीची दृष्टी बिछान्यावर बसलेल्या मनमोहक मुकुन्दावर पडली. ती त्याला बघून हर्षभराने " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असें गान करुं लागली. 
क्रीडापरं भोजनमज्जनार्थं हितैषिणी स्त्री तनुजं यशोदा ।
आजूहवत् प्रेमपरिप्लुताक्षी गोविन्द दामोदर माधवेति ॥ २० ॥
२०) खेळणे प्रिय असलेला बालमुकुंद बालकांबरोबर खेळत होता. त्याला ना आंघोळीची ना कांही खाण्याची शुद्ध होती. प्रेमळ माता त्याला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " अशा हाका मारुन आंघोळीसाठी व कांही खाण्यासाठी यावयास मोठ्या प्रेमानें बोलवत होती.
सुखं शयानं निलये च विष्णुं देवर्षिमुख्या मुनयः प्रमन्नाः ।
तेनाच्युते तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ २१ ॥
२१)  नारदादी ऋषी घरामध्यें सुखाने झोपलेल्या पुराणपुरुष बाळकृष्णाची " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असे म्हणून आराधना करतात. आणि त्या श्रीअच्युतामध्यें तन्मयता साधतात.
विहाय निद्रामरुणोदये च विधाय कृत्यानि च विप्रमुख्याः ।
वेदावसाने प्रपठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २२ ॥
२२) वेदज्ञ ब्राह्मण सकाळी लवकर उठून नित्य कर्मे उरकून वेदपाठाच्या शेवटी नेहमी " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या मधुर नामाचे किर्तन करतात.
वृन्दावने गोपगणाश्र्च गोप्यो विलोक्य गोविन्दवियोगखिन्नाम् ।
राधां जगुः साश्रुविलोचनाभ्यां गोविन्द दामोदर माधवेति ॥ २३ ॥
२३) वृंदावनांतील श्रीवृषभानुकुमारीला वनवारीच्या (कृष्णाच्या) वियोगाने व्याकुळ झालेली बघुन गोप आणि गोपी आपल्या कमलनयनांतून अश्रु ढाळत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असा धावा करुं लागले. 
प्रभातसञ्चरगता नु गावस्तद् रक्षणार्थं तनयं यशोदा ।
प्राबोधयत् पाणितलेन मन्दं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २४ ॥
२४) प्रातःकाळी जेव्हां गाई वनांत चरायला गेल्या तेव्हां त्यांचे रक्षण करण्यासाठी बिछान्यावर झोपलेल्या श्रीकृष्णाला प्रेमाने थापडा मारत व वनांत जाण्यासाठी उठवतांना यशोदा " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " उठ व गाईंच्या रक्षणासाठीं वनांत जा. असें सांगू लागली.
प्रवालशोभा इव दीर्घकेशा वाताम्बुपर्णाशनपूतदेहाः ।
मूले तरुणां मुनयः पठन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ २५ ॥ 
२५) फक्त हवा, पाणी आणि पानें यांचे भक्षण करुन ज्यांची शरीरें पवित्र झाली आहेत तसेच प्रवाळासारख्या लांबलांब शोभून दिसणार्‍या व थोड्या लालरंग असलेले जटाधारी मुनिजन पवित्र वृक्षांच्या सावलींत बसून " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचा पाठ करतात.
एवं ब्रुवाणा विरहातुरा भृशं व्रजस्त्रियः कृष्णविषक्तमानसाः ।
विसृज्य लज्जां रुरुदुः स्म सुस्वरं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २६ ॥   
२६) श्रीवनमालीच्या वियोगाने विह्वळ झालेल्या व्रजकन्या त्याच्याबद्दल (वनमालीबद्दल) निरनिराळ्या गोष्टी सांगून लोकलज्जेला तिलांजली देऊन मोठमोठ्याने " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असें म्हणत रडूं लागल्या.
गोपी कदाचिन्मणिपिञ्जरस्थं शुकं वचो वाचयितुं प्रवृत्ता ।
आनन्दकन्द व्रजचन्द्र कृष्ण गोविन्द दामोदर माधवेति ॥ २७ ॥ 
२७) गोपी राधिका एखाद्या दिवशी मण्यांच्या पिंजर्‍यांत असलेल्या पाळीव पोपटाला हे आनन्दकन्द, हे व्रजचन्द्र, हे कृष्ण, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांनी बोलवू लागली.   
गोवत्सबालैः शिशुकापक्षं बध्नन्तमम्भोजदलायताक्षम् ।
उवाच माता चिबुकं गृहीत्वा गोविन्द दामोदर माधवेति ॥ २८ ॥ 
२८) कमळासारखे डोळे असलेल्या कृष्णाला एखाद्या गोपबालेची वेणी गाईच्या बछड्याच्या शेपटाला बांधतांना बघून त्याला पकडून माझ्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " असे म्हणू लागली. 
प्रभातकाले वरवल्लवौघा गोरक्षणार्थं धृतवेत्रदण्डाः ।
आकारयामासुरनन्तमाद्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ २९ ॥  
२९) प्रातःकाळ झाल्यावर सर्व ग्वालबाल मंडळी हातांत वेताची काठी घेऊन गाईंना चरावयास निघाली तेव्हां आपल्या प्रिय आदिपुरुष कृष्णाला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून हाका मारु लागले. 
जलाशये कालियमर्दनाय यदा कदम्बादपतन्मुरारिः ।
गोपाङ्गनाश्र्चरक्रुशुरेत्य गोपा गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३० ॥
३०) कालियानागाला मारण्यासाठी जेव्हां कन्हैयाने कदम्बवृक्षावरुन पाण्यांत उडी मारली तेव्हां गोपी आणि गोप " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून रडू लागले.   
अक्रूरमासाद्य यदा मुकुन्दश्र्चापोत्सवार्थं मथुरां प्रविष्टः ।
तदा स पौरर्जयतीत्यभाषि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३१ ॥
३१) ज्यावेळी श्रीकृष्णाने अक्रूराबरोबर कंसाच्या धनुरोत्सवांसाठी मथुरेमध्यें प्रवेश केला तेव्हां सर्व पुरवासी जनांनी  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " तझा जय होवो. असा घोष केला.  
कंसस्य दूतेन यदैव नीतौ वृन्दावनान्ताद् वसुदेवसूनू ।
रुरोद गोपी भवनस्य मध्ये गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३२ ॥  
३२) जेव्हा कंसाचा दूत अक्रूर कृष्ण व बलराम यांना वृदावनांतून घेऊन गेले तेव्हां यशोदा " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून रडू लागली.
सरोवरे कालिययनागबद्धं शिशुं यशोदातनयं निशम्य ।
चक्रुर्लुठन्त्यः पथि गोपबाला गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३३ ॥   
३३) यशोदेचा पुत्र कृष्णाला कालिया नागाने जखडले आहे हे समजल्यावर गोपीबाला सुन्न होऊन रस्त्यावर लोळत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणून रडू लागल्या.
अक्रूरयाने यदुवंशनाथं संगच्छमानं मथुरां निरीक्ष्य ।
ऊचुर्वियोगात् किल गोपबाला गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३४ ॥  
३४) अक्रूराच्या रथावर चढून मथुरेला जाणार्‍या कृष्णाला बघून गोपी त्याच्या होणार्‍या वियोगानें " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " आम्हाला सोडून कोठे चाललास म्हणू लागल्या?
चक्रन्द गोपी नलिनीवनान्ते कृष्णेन हीना कुसुमे शयाना ।
प्रफुल्लनीलोत्पललोचनाभ्यां गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३५ ॥   
३५) श्रीराधा कृष्णाच्या वियोगाने कमलवनांत फुलांच्या शय्येवर झोपून आपल्या पूर्ण उमललेल्या कमळासमान डोळ्यांतून अश्रु ढाळीत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणत रडूं लागली.
मातापितृभ्यां परिवार्यमाणा गेहं प्रविष्टा विललाप गोपी ।
आगत्य मां पालय विश्र्वनाथ गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३६ ॥  
३६) आई-वडिल अशा सर्वांनी वेढलेली राधा घरांत प्रवेश करुन विलाप करु लागली कीं, हे विश्र्वनाथ, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " माझे रक्षण करा. माझे रक्षण करा.
वृन्दावनस्थं हरिमाशु बुद्ध्वा गोपी गता कापि वनं निशायाम् ।
तत्राप्यदृष्ट्वातिभुादवोचद् गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३७ ॥ 
३७) रात्रीच्यावेळी एका गोपीकन्येला असे वाटलें की वनमाळी वृदावनांत यावेळी आहेत. मग काय ती लगेचच तिकडे गेली पण त्या निर्जन वनांत वनमाळी न दिसल्यानें भयानें कांपत ती " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणूं लागली.  
सुखं शयाना निलये निजेऽपि नानानि विष्णोः प्रवदन्ति मर्त्याः ।
ते निश्र्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३८ ॥  
३८) (वनांत अगर कोठेंच वनमालीला न शोधता ) जे लोक आपल्याच घरी सुखाने शय्येवर पडून " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या भगवान विष्णुंच्या पवित्र नामांचा नेहमी जप करतात, ते निश्र्चितच भगवानांशी तन्मय होतात.
सा नीरजाक्षीमवलोक्य राधां रुरोद गोविन्द वियोगखिन्नाम् ।
सखी प्रफुल्लोत्पललोचनाभ्यां गोविन्द दामोदर माधवेति ॥ ३९ ॥  
३९) कमललोचनी राधाला कृष्णाच्या वियोगानें दुःखीत झालेली पाहून कोणी  गोपी आपल्या कमळासारख्या डोळ्यांतून अश्रु वाहात वाहात " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " म्हणू लागली. 
जिह्वे रसज्ञे मधुरप्रियात्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि ।
आवर्णयेथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४० ॥  
४०) हे निरनिराळ्या रसांचा स्वाद घेणार्‍या जीभे तुला गोड पदार्थ अधिक प्रीय असतात. म्हणून मी तुला एक फार चांगली व सुंदर गोष्ट सांगतो. तूं निरंतर " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "या मधुर नामांचा जप कर.
आत्यन्तिकव्याधिहरं जनानां चिकित्सकं वेदविदो वदन्ति ।
संसारतापत्रयनाशबीजं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४१ ॥  
४१)  मोठे मोठे वेदज्ञ विद्वान, " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामालाच मोठमोठ्या दुर्धर व्याधी नाहीसा करणारा वैद्य आणि संसारांतील आधिभौतिक, आधिदैविक व आध्यात्मिक या तीन्ही तापाचे अत्यंत प्रभावी बीज मानतात.
ताताज्ञया गच्छति रामचन्द्रो सलक्ष्मणेऽरण्यचये ससीते ।
चक्रन्द रामस्य निजा जनित्री गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४२ ॥  
४२) आपले पिता दशरथ यांच्या आज्ञेनुसार बन्धु लक्ष्मण व पत्नी सीता  यांच्यासह निबिड वनांत वनवास भोगण्या निघाले तेव्हां माता कौसल्या " हे राम, हे रघुनन्दन, हे राघव असा विलाप करुं लागली.
एकाकिनी दण्डककाननान्तात् सा नीयमाना दशकन्धरेण । 
सीता तदाक्रन्ददनन्यनाथा गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४३ ॥  
४३) जेव्हां राक्षसराज रावण पंचवटीतून सीतेला एकटी बघून रथांतून पळवून नेत होता तेव्हा रामाशिवाय जिचा दुसरा कोणी स्वामी नाही अशी सीता हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " मला वाचवां असे म्हणून रडू लागली.  
रामाद्वियुक्ता जनकात्मजा सा विचिन्तयन्ती हृदि रामरुपम् ।
रुरोद सीता रघुनाथ पाहि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४४ ॥  
४४) रावणाच्या रथामध्यें बसलेली रामाच्या वियोगाने दुःखी झालेली सीता प्रभु श्रीरामचन्द्रांचे ध्यान करत " हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " माझे रक्षण करा. असे म्हणू लागली.
प्रसीद विष्णो रघुवंशनाथ सुरासुराणां सुखदुःखहेतो ।
रुरोद सीता तु समुद्रमध्ये गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४५ ॥  
४५) जेव्हां रावणाच्या रथांतून सीता समुद्र मध्यापर्यंत पोहोचली तेव्हां हे विष्णो ! हे रघुकुलपते ! हे देवतांना सुख व राक्षसांना दुःख देणार्‍या हे राम, हे रघुनन्दन, हे राघव " मला प्रसन्न व्हा.
अन्तर्जले प्राहगृहीतपादो विसृष्टविक्लिष्टसमस्तबन्धुः ।
तदा गजेन्द्रो नितरां जगाद गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४६ ॥ 
४६) पाणी पीत असलेल्या हत्तीराजाचा पाय जेव्हां मगरीनें धरला व सर्व इतर हत्ती बन्धुंचा दुरावा झाला, तेव्हा गजराजाने मोठ्या अधीरतेने व अनन्यभावाने  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावानें भगवंतांचा धांवा केला. 
हंसध्वजः शङ्खयुतो ददर्श पुत्रं कटाहे प्रपन्तमेनम् ।
पुण्यानि नामानि हरेर्जपन्तं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४७ ॥  
४७) आपला पुरोहीत शंखमुनि याच्यासह राजा हंसध्वजाने आपला मुलगा सुध्नवा याला तापलेल्या तेलांत उडी मारतांना व " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचा जप करतांना पाहिले. 
दुर्वाससो वाक्यमुपेत्य कृष्णा सा चाब्रवीत् काननवासिनीशम् ।
अन्तःप्रविष्टं मनसा जुहाव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४८ ॥  
४८) ( एके दिवशी द्रौपदीचे जेवण झाल्यावर शिष्यांसह अवेळी येऊन दुर्वास ऋषीनी भोजनाची व्यवस्था करण्यास द्रौपदीस सांगितलें. ते तीने मान्य तर केलें ) पण त्याची पुर्तता व्हावी म्हणून द्रौपदीनें आपल्या अंतःकरणांत स्थित असलेल्या श्रीकृष्णाला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " अशी साद घातली.
ध्येयः सदा योगिभिरप्रमेयश्र्चिन्ताहरश्र्चिन्ताहरश्र्चिन्तितपारिजातः ।
कस्तूरिकाकल्पितनीलवर्णो गोविन्द दामोदर माधवेति ॥ ४९ ॥  
४९) योग्यांनासुद्ध जे अगम्य आहेत, जे सर्व चिंतांचे हरण करतात, जे मनांत असलेल्या सर्व वस्तु कल्पवृक्षाप्रमाणें देणारे आहेत, त्यांच्या " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "या नामांचे नेहमी स्मरण केले पाहिजे.
संसारकूपे पतितोऽत्यगाधे मोहान्धपूर्णे विषयाभितप्ते ।
करावलम्बं मम देहि विष्णो गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५० ॥ 
५०) जो मोहरुपी अन्धकाराने व्याप्त झालेला आहे, जो विशयांच्या ज्वलांनी तप्त अशा कूपांत पडला आहे,  अशा मला " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " आपल्या हातांचा आधार द्या. 
त्वामेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते ।
वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५१ ॥  
५१) हे जीभे ! मी तुझ्याजवळ एकाच गोष्टीची याचना करतो, ती तूं मला दे. जेव्हा दण्डपाणी यमराज या शरीराचा नाश करण्यासाठी येतील तेव्हां अत्यंत प्रेमानें गद्गद् स्वरांत " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामांचे उच्चारण करत रहा. 
भजस्व मन्त्रं भवबन्धमुक्त्यै जिह्वे रसज्ञे सुलभं मनोज्ञम् ।
द्वैपायनाद्यै र्मुनिभिः प्रजप्तं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५२ ॥ 
५२) हे जिह्वे ! हे रसज्ञे ! संसाररुपी बंधनांतून मुक्त होण्यासाठी तूं नेहमी  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "  या मंत्राचा जप करत रहा. तो सोपा व सुन्दर आहे. त्याचाजप व्यास, वसिष्ठ आदि ऋषींनीही केला आहे.     
गोपाल वंशीधर रुपसिन्धो लोकेश नारायण दीनबन्धो ।
उच्चस्वरैस्त्वं वद सर्वदैव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५३ ॥  
५३) हे जिह्वे ! तूं जिरंतर " गोपाल, वंशीधर, रुपसिन्धो, लोकेश, नारायण, दीनबन्धो,   हे गोविंद, हे दामोदर, हे माधव  या नावांचे मोठ्या आवाजांत किर्तन करत रहा.
जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि ।
समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५४ ॥
५४) हे जिह्वे ! तूं नेहमी श्रीकृष्णाच्या  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "  या मनोहर, मधुर नामांचे जी भक्तांच्या सर्व संकटांची निवृत्ती करणारी आहेत ती नामें भजत रहा.    
गोविन्द गोविन्द हरे मुरारे गोविन्द गोविन्द मुकुन्द कृष्ण ।
गोविन्द गोविन्द रथाङ्गपाणे गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५५ ॥  
५५) हे जिह्वे ! गोविन्द, गोविन्द, हरे मुरारे, गोविन्द, गोविन्द, मुकुंद, कृष्ण, गोविन्द, गोविन्द, रथाङ्गपाणे,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांचा सदा जप करत रहा.
सुखावसाने त्विदमेव सारं दुःखावसाने त्विदमेव गेयम्  ।
देहावसाने त्विदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५६ ॥ 
५६) सुखाच्या शेवटी हेच सार आहे. दुःखांत हेच गायन करण्यास योग्य आहे. 
आणि शरीराच्या अंत समयी याचाच जप करण्यास कोणता मंत्र योग्य आहे? तर तो  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "
दुर्वारवाक्यं परिगृह्य कृष्ण मृगीव भीता तु कथं कथञ्चित् ।
सभां प्रविष्टा मनसाजुहाव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५७ ॥  
५७) दुःशासनाच्या अविचारी बोलण्याने व्यथित झालेली व हरणीसारखी भयभीत झालेली द्रौपदी सबहेत प्रवेश करत मनांतल्या मनांत  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " हा जप करत होती.
श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णो ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५८ ॥ 
५८)  हे जिव्हे ! तू श्रीकृष्ण, राधारमण, व्रजराज, गोपाल, गोवर्धन, नाथ, विष्णो,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे सेवत करत रहा.  
श्रीनाथ विश्र्वेश्र्वर विश्र्वमूर्ते श्रीदेवकीनन्दन दैत्यशत्रो ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ५९ ॥   
५९) हे जिह्वे ! तू श्रीनाथ, सर्वेश्र्वर, श्रीविष्णुस्वरुप, श्रीदेवकीनन्दन, असुरनिकन्दन,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे निरंतर सेवन करत रहा.
गोपीपते कंसरिपो मुकुन्द लक्ष्मीपते केशव वासुदेव ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६० ॥  
६०) हे जिह्वे ! तू गोपीपते, कंसरिपो, मुकुन्द, लक्ष्मीपते, केशव, वासुदेव,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे निरंतर सेवन करत रहा.  
गोपीजनाह्लादकर व्रजेश गोचारण्यकृतप्रवेश ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६१ ॥    
६१) जे व्रजराज व्रजाङ्गनांना  आनन्दित करणारे आहेत, ज्यांनी गाईंना चरण्यासाठी वनांत नेले आहे, त्या मुरारीच्या  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे सेवन करत रहा.
प्राणेश विश्र्वम्भर कैटभारे वैकुण्ठ नारायण चक्रपाणे ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६२ ॥    
६२) हे जिह्वे ! तू प्राणेश, विश्र्वम्भर, कैटभारे, वैकुण्ठ, नारायण, चक्रपाणे,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामामृताचे नेहमी पान करत रहा.
हरे मुरारे मधुसूदनाद्य श्रीराम सीतावर रावणारे ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६३ ॥  
६३) हे हरे, हे मुरारे, हे मधुसूदन, हे पुराणपुरुषोत्तम, हे रावणारे, हे सीतापते श्रीराम,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे तू नित्य पान करत रहा.   
श्रीयादवेन्द्राद्रिधराम्बुजाक्ष गोगोपगोपीसुखदानदक्ष ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६४ ॥  
६४) हे जिह्वे ! श्रीयदुकुलनाथ, गिरिधर, कमलनयन, गौ, गोप, आणि गोपीयांना सुख देणार्‍या  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे तू निरंतर सेवन करीत रहा.   
धराभरोत्तारणगोपवेष विहारलीलाकृतबन्धुशेष ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६५ ॥    
६५) ज्यांनी पृथ्वीचा भार उतरण्यासाठी सुंदर बालकाचे रुप धारण केले आहे, आणि आपली क्रीडा/ लीला आनंदमयी करण्याच्या निमित्याने शेष नागाला भाऊ बनविले आहे, अश्या नटनागराच्या  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नावांचे तू सदा पान करत रहा.
बकीबकाघासुरधेनुकारे केशीतृणावर्तविघातदक्ष ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६६ ॥ 
६६) जो पूतना, बकासुर, अघासुर, आणि धेनुकासुर आदि राक्षसांचा शत्रु आहे आणि केशी व तृणावर्त यांना मारणारा आहे त्या असुरारि मुरारीच्या   " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नांवांचे हे जिह्वे तू निरंतर सेवन करत रहा.   
श्रीजानकीजीवन रामचन्द्र निशाचरारे भरताग्रजेश ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६७ ॥    
६७) हे जिह्वे ! तू " हे जानकीजीवन भगवान राम, हे दैत्यदलन भरताग्रज, हे ईश,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव "या नामामृताचे निरंतर सेवन कर.
नारायणानन्त हरे नृसिंह प्रह्लादबाधाहर हे कृपालो ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६८ ॥     
६८) हे प्रल्हादाची बाधा हरण करणार्‍या दयाळु नृसिंहा, नारायणा, अनन्त, हरे,  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे पान हे जिह्वे तू निरंतर करत रहा.
लीलामनुष्याकृतिरामरुप प्रतापदासीकृतसर्वभूप ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ६९ ॥  
६९) हे जिह्वे ! ज्यांनी मनुष्यरुप धारण करुन राम अवतार घेतला आणि आपल्या प्रबल पराक्रमाने सर्व राजांना दास बनवले तू त्या नीलाम्बुज श्यामसुन्दर श्रीरामाच्या  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा.    
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ७० ॥   
७०)  हे जिह्वे तूं मात्र श्रीकृष्ण, गोविंद, हरे, मुरारे, हे नाथ, नारायण, वासुदेव, तसेच  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा.  
वक्तुं समर्थोऽपि न वक्ति कश्र्चिदहो जनानां व्यसनाभिमुख्यम् ।
जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति ॥ ७१ ॥   
७१) अहो मनुष्याची विषयलोलुपता किती आश्र्चर्यकारक आहे बघा बोलण्याची शक्ति असूनही त्याच्या तोंडून देवाचे नांव येत नाही. तरी हे जिह्वे तूं मात्र  " हे गोविंद, हे दामोदर, हे माधव " या नामरुपी अमृताचे सदा सेवन करत रहा. 
इति श्रीबिल्वमङ्गलाचार्यविरचितं श्रीगोविन्ददामोदरस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
GovindDamodar Stotram 
गोविन्ददामोदर स्तोत्रम्


Custom Search

No comments: