Lanka Kanda Part 3
दोहा---बॉंध्यो बननिधि नीरनिधि जलधि सिंधु बारीस ।
सत्य तोयनिधि कंपति उदधि पयोधि नदीस ॥ ५ ॥
‘ वननिधी, नीरनिधि, जलधी, सिंधू, वारीश, तोयनिधी, कंपाती,
उदधी, पयोधी, नदीश याला खरोखरंच बांधले आहे ? ‘ ॥ ५ ॥
निज बिकलता बिचारि बहोरी । बिहँसि गयउ गृह करि भय भोरी ॥
मंदोदरीं सुन्यो प्रभु आयो । कौतुकहीं पाथोधि बँधायो ॥
मग आपली व्याकुळता जाणून वर वर हसत, भय विसरुन रावण महालात गेला. जेव्हा मंदोदरीने
हे ऐकले की, प्रभू रामचंद्र आले आहेत आणि सहजासहजी समुद्राला बांध घातला आहे. ॥ १
॥
कर गहि पतिहि भवन निजआनी । बोली परम मनोहर बानी ॥
चरन नाइ सिरु अंचलु रोपा । सुनहु बचन पिय परिहरि कोपा ॥
तेव्हा ती पतीचा हात पकडून आपल्या महालात घेऊन गेली आणि
मधुर वाणीने म्हणाली. ती त्याचे पाय धरुन पदर पसरुन म्हणाली, ‘ हे प्रियतम, क्रोध
सोडून माझे म्हणणे ऐका. ॥ २ ॥
नाथ बयरु कीजे ताही सों । बुधि बल सकिअ जीति जाही सों ॥
तुम्हहि रघुपतिहि अंतर कैसा । खलु खद्योत दिनकरहि जैसा ॥
हे नाथ, ज्याला बुद्धी व बळाने जिंकता येईल त्याच्याशीच वैर
करावे. पण तुमच्यात आणि श्रीरघुनाथ यांच्यात अंतर आहे, ते काजवा व सूर्याप्रमाणे.
॥ ३ ॥
अति बल मधु कैटभ जेहिं मारे । महाबीर दितिसुत संघारे ॥
जेहिं बलि बॉंधि सहसभुज मारा । सोइ अवतरेउ हरन महि भारा ॥
ज्यांनी विष्णुरुपाने अत्यंत बलवान अशा मधू व कैटभ
दैत्यांना मारले आणि वराह व नृसिंहरुपाने महान शूर, दितीचे पुत्र हिरण्याक्ष व
हिरण्यकशिपू यांचा संहार केला, ज्यांनी वामनरुपाने बलीला बांधून टाकले आणि परशुरामरुपाने
सहस्रबाहुला मारले, तेच भगवान पृथ्वीचा भार हरण करण्यासाठी रामरुपाने प्रकट झाले
आहेत. ॥ ४ ॥
तासु बिरोध न कीजिअ नाथा । काल करम जिव जाकें हाथा ॥
ज्यांच्या अधीन काल, कर्म व जीव आहेत, हे नाथ, त्यांचा
विरोध पत्करु नका. ॥ ५ ॥
दोहा--- रामहि सौंपि जानकी नाइ कमल पद माथ ।
सुत कहुँ राज समर्पि बन जाइ भजिअ रघुनाथ ॥ ६ ॥
श्रीरामांना शरण जाऊन त्यांना जानकी समर्पण करा आणि तुम्ही
पुत्राला राज्य देऊन, वनात जाऊन श्रीरामांचे भजन करा. ॥ ६ ॥
नाथ दीनदयाल रघुराई । बाघउ सनमुख गएँ न खाई ॥
चाहिअ करन सो सब करि बीते । तुम्ह सुर असुर चराचर जीते ॥
हे नाथ, श्रीरघुनाथ हे दीनांवर दया करणारे आहेत. शरण
गेल्यावर वाघसुद्धा खात नाही. तुम्हांला जे काहीकरायचे होते, ते तुम्ही केलेले
आहे. तुम्ही देव, राक्षस व चराचर सर्वांना जिंकले आहे. ॥ १ ॥
संत कहहिं असि नीति दसानन । चौथेंपन जाइहि नृप कानन ॥
तासु भजनु कीजिअ तहँ भर्ता । जो कर्ता पालक संहर्ता ॥
हे नाथ, वृद्धापकाळी राजाने वनात जायला हवे. अशी नीती संत
सांगतात. वनात तुम्ही सृष्टीची रचना, पालन व संहार करणार्या श्रीरामांचे भजन
करावे. ॥ २ ॥
सोइ रघुबीर प्रनत अनुरागी । भजहु नाथ ममता सब त्यागी ॥
मुनिबर जतनु करहिं जेहि लागी । भूप राजु तजि होहिं बिरागी ॥
हे नाथ, तुम्ही विषयांची सर्व ममता सोडून शरणागतावर प्रेम
करणार्या भगवंतांचे भजन करा. ज्यांच्यासाठी श्रेष्ठ मुनी साधना करतात आणि
राजेसुद्धा राज्य सोडून वैरागी होतात, ॥ ३ ॥
सोइ कोसलाधीस रघुराया । आयउ करन तोहि पर दाया ॥
जौं पिय मानहु मोर सिखावन । सुजसु होइ तिहुँ पुर अति पावन ॥
तेच कोसलाधीश श्रीरघुनाथ तुमच्यावर दया करण्यास आले आहेत.
हे प्रियतम, जर तुम्ही माझे म्हणणे मान्य कराल, तर तुमची अत्यंत पवित्र व सुंदर
कीर्ती तिन्ही लोकी पसरेल. ‘ ॥ ४ ॥
दोहा---अस कहि नयन नीर भरि गहि पद कंपित गात ।
नाथ भजहु रघुनाथहि अचल होइ अहिवात ॥ ७ ॥
असे म्हणत नेत्रांमधून अश्रू ढाळत आणि पतीचे चरण धरुन थरथरा
कापत असलेल्या मंदोदरीने म्हटले, “ हे नाथ, श्रीरघुनाथांचे भजन करा. त्यामुळे माझे
सौभाग्य अखंड राहील. “ ॥ ७ ॥
तब रावन मयसुता उठाई । कहै लाग खल निज प्रभुताई ॥
सुनु तैं प्रिया बृथा भय माना । जग जोधा को मोहि समाना ॥
तेव्हा मंदोदरीला उठवून तो दुष्ट तिला आपली महती सांगू
लागला, ‘ हे प्रिये, तू विनाकारण भीती बाळगतेस. माझ्यासारखा योद्धा जगात कोण आहे,
ते सांग. ॥ १ ॥
बरुन कुबेर पवन जम काला । भुजबल जितेउँ सकल दिगपाला ॥
देव दनुज नर सब बस मोरें । कवन हेतु उपजा भय तोरें ॥
वरुण, कुबेर, वायू, यमराज इत्यादी दिक् पालांना व कालालाही
मी आपल्या भुजबळाने जिंकले आहे. देव, दानव, मनुष्य सर्व माझ्या अधीन आहेत. मग तुला
ही भीती का वाटते ? ‘ ॥ २ ॥
नाना बिधि तेहि कहेसि बुझाई । सभॉं बहोरि बैठ सो जाई ॥
मंदोदरीं हृदयँ अस जाना । काल बस्य उपजा अभिमाना ॥
मंदोदरीने पुष्कळ प्रकारे समजावून सांगितले, तरी रावणाने
तिचे काही ऐकले नाही, मग तो सभेत जाऊन बसला. मंदोदरीला कळून चुकले की, कालाच्या
अधीन असल्यामुळे पतीला अभिमान झालेला आहे. ॥ ३ ॥
सभॉं आइ मंत्रिन्ह तेहिं बूझा । करब कवन बिधि रिपु सैं जूझा ॥
कहहिं सचिव सुनु निसिचर नाहा । बार बार प्रभु पूछहु काहा ॥
कहहु कवन भय करिअ बिचारा । नर कपि भालु अहार हमारा ॥
सभेत आल्यावर रावणाने मंत्र्यांना विचारले की, शत्रूबरोबर
कशा प्रकारे युद्ध करावे ? मंत्री म्हणाले, ‘ हे राक्षसराज ! ऐका. आपण हे वारंवार
काय विचारता ? सांगा तरी, असे कोणते मोठे भय उत्पन्न झालेआहे की ज्याचा विचार
करावा ? मनुष्य व वानर हे तर आपले भोजन आहेत. ‘ ॥ ४-५ ॥
1 comment:
It's my Pleasure to Visit This Site Again and Again For Bhakti Sangeet
Post a Comment