Sunday, May 2, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 4 
Ovya 86 to 111 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ४ 
ओव्या ८६ ते १११
मूळ श्लोक

कविं पुराणमनुशासितामणोरणियांसमनुस्मरेद् यः ।

सर्वस्य धातारमचिन्त्यरुपमादिवर्णं तमसः परस्तात् ॥ ९ ॥

९) सर्वज्ञ, पुरातन ( विश्र्वाचा ) नियंता, अणुपेक्षां ( देखील ) लहान, सर्व ( स्थूलसूक्ष्म जगाचा ) आश्रय, ज्याचें स्वरुप कल्पनेला अगोचर आहे, सूर्याप्रमाणें ( प्रकाशरुप असें ) ज्याचें स्वरुप आहे असा, ( अज्ञानरुप ) अंधकाराच्या पलीकडे असलेला जो ( परम पुरुष ), त्याचें जो सतत स्मरण करतो,    

जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें ।

जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे ॥ ८६ ॥

८६)  ज्याचें अस्तित्व आकाराशिवाय आहे व जें जन्ममृत्युरहित असून, जे सर्वत्र असल्यामुळें सर्वपणानें पाहातें;  

जें गगनाहून जुनें । जें परमाणुहूनि सानें ।

जयाचेनि संन्निधानें । विश्र्व चळे ॥ ८७ ॥

८७) जें आकाशाहून पुरातन आहे व जें परमाणूपेक्षांहि लहान असून ज्ताच्या सान्निध्यानें विश्र्वाची हालचाल होते;   

जें सर्वांतें यया वियें । सर्व जेणें जिये ।

हेतु जया विहे । अचिंत्य जें ॥ ८८ ॥

८८) जें या सर्वांना प्रसवतें व ज्याच्या योगानें सर्व असतें, तर्क ज्याला भितो, असें जेकल्पनेच्या पलीकडे आहे;  

देखें वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर जेथ न सरे ।

जें देहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं ॥ ८९ ॥

८९) पाहा, विस्तवास जशी वाळवी लागत नाहीं, ज्या स्वरुप्रकाशाच्या ठिकाणी ( अज्ञानरुप ) अंधाराचा लाग नाहीं, त्याचप्रमाणें जो स्वभावतः ज्ञानप्रकाशाचा दिवस असूनहि स्थूल दृष्टीला अंधार आहे,

सुसडा सूर्यकणांचा राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी ।

अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं ॥ ९० ॥

 ९०) ( जो स्वरुपदिवस अज्ञान्यांना अंधाराप्रमाणें असतो, तें या ओवींत सांगतात. ) जें चैतन्य स्वच्छ सूर्यरुपी कर्णाचा ढीग आहे, जें ज्ञानवानांना नित्य अपरोक्ष आहे व ज्या चैतन्यरुप दिवसाला अस्तमानाचें आडनांवसुद्धा नाहीं ( जेथें अस्त होत नाहीं ).

प्रयाणकाले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।

भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक् स तं परं पुरुमुपैति दिव्यम् ॥ १० ॥

१०) ( जो ) मरणसमयीं एकाग्र मनानें, भक्तीनें व योगबलानें युक्त होऊन, दोन भुवयांमध्यें प्राणवायूची योग्य प्रकारें स्थापना करुन ( त्याचें स्मरण करतो ), तो त्या तेजस्वी परमपुरुषाप्रत जातो.   

तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते ।

जो स्थिरावलेनि चित्ते । जाणोनि स्मरे ॥ ९१ 

९१) मरणकाल प्राप्त झाला असतांना, स्थिर अंतःकरणानें कांहीं व्यंग नसलेल्या ब्रह्माला, जो जाणून स्मरतो,

बाहेरी पद्मासन रचुनि । उत्तराभिमुख बैसोनि ।

जीवीं सुख सूनि । कर्मयोगाचें ॥ ९२ ॥

९२) बाहेर पद्मासन घालून, उत्तरेकडे तोंड करुन बसून, कर्मयोगाच्या आचरणानें प्राप्त झालेल्या समाधानानें सुख अंतःकरणांत साठवून,     

आंतु मीनलेनि मनोधर्में । स्वरुपप्राप्तीचेनि प्रेमें ।

आपेंआप संभ्रमें । मिळावया ॥ ९३ ॥

९३) आंत मन एकाग्र झाल्यानें व आत्मस्वरुपप्राप्तीच्या प्रेमानें आपल्या ठिकाणीं आपण समारंभाने मिळण्याकरितां;

आकळोनि योगें । मध्यमामध्यमार्गें ।

अग्निस्थानौनि निगे । ब्रह्मरंध्रा ॥ ९४ ॥

९४) स्वाधीन झालेल्या अष्टांग योगानें, सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गानें, अग्निस्थानापासून ब्रह्मरंध्रास जाण्यास तों प्राण निघतो.

तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु ।

तेथ प्राणु गगनाआंतु । संचरे कां ॥ ९५ ॥

९५) जेथें प्राणवायु मूर्ध्निआकाशांत प्रवेश करतो, तेथे प्राणाचा आणि चित्ताचा वरवर संबंध झालेला दिसतो.   

परी मनाचेनि स्थैर्यें धरिला । भक्तिचिया भावना भरला ।

योगबळें आवरला । सज्ज होउनी ॥ ९६ ॥

९६) परंतु मनाच्या स्थिरतेनें धरलेला व भक्तीच्या भावानें भरलेला व योगबलानें आवरलेला असा तयार होऊन,

तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतामाजीं रचतु ।

जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसीच होय ॥ ९७ ॥

९७) तो प्राणवायु चेतन व अचेतन पदार्थांस नाहींसे करुन भुवयांत संचार करतो ( आणि तेथे लय पावतो; ) ज्याप्रमाणें घंटेचा नाद घंटेत लय पावतो, 

कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।

या रीती जो पांडवा । देह ठेवी ॥ ९८ ॥

९८) अथवा घटाखालीं झांकलेला दिवा केव्हां काय झाला ( विझाला ) हें जसें कळत नाहीं, त्याप्रमाणे अर्जुना, जो देह ठेवतो, 

तो केवळ परब्रह्म । जया परमपुरुष ऐसें नाम ।

तें माझें निजधाम । होऊनि ठाके ॥ ९९ ॥

९९) जें केवळ परब्रह्म आहे व ज्याला परमपुरुष हें नांव आहे, असें माझें खास स्वरुप आहे, तें तो पुरुष होऊन राहतो.

मूळ श्लोक

यदक्षरं वेदविदो वदन्ति विशन्ति यद् यतयो वीतरागाः ।

यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति तत् ते पदं संग्रहेण प्रवक्ष्ये ॥ ११ ॥

११) जें अविनाशी आहे असें वेदवेत्ते सांगतात, ( संसाराच्या

 )  इच्छेपासून पराङ्मुख झालेले विरक्त ज्यामध्ये  प्रवेश

 करतात. व जें जाणण्याची इच्छा करणारे ब्रह्मचर्य

 आचरण करतात., तें ( ‘ ब्रह्म ‘ नामक ) पद मी तुला

 संक्षेपानें सांगतों.    

सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणियेची जे खाणी ।

तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे ॥ १०० ॥

१००) जें ज्ञान संपूर्ण ज्ञानाचा शेवट आहे, त्या ज्ञानाची तें केवळ खाणच आहे, त्या ब्रह्मज्ञान्यांच्या बुद्धीनें ज्यास ( ब्रह्मस्वरुपास ) अविनाशी असें म्हणतात.   

चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें ।

वांचूनि जरी होईल मेहुडें । तरी उरेल कैचें ॥ १०१ ॥

१०१) प्रचंड वार्‍यानेंहि जें नाहींसें होत नाहीं, तें खरोखर आकाशच होय. नाहीं तर तें जर ढग असतें, तर तें प्रचंड वार्‍यापुढें कसें टिकतें ?

तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें ।

मग नेणवेचि तयातें म्हणितलें । अक्षर सहजे ॥ १०२ ॥

१०२) त्याप्रमाणे ज्ञानाला जें विषय झालें, आणि विषय झाल्यामुळेंच त्याच्याकडून जें मोजलें गेलें ( तें क्षर होय ). नंतर वृत्तिज्ञानाला जें विषय होत नाहीं ( तर उलट वृत्तिज्ञानच जेथें लय पावतें ) त्याला सहजच अक्षर असें म्हटलें.   

म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर ।

जें प्रकृतीसी पर । परमात्मरुप ॥ १०३ ॥

१०३) म्हणून वेद जाणणारे पुरुष ज्याला अक्षर असें म्हणतात आणि जें परमात्मस्वरुप प्रकृतीपलीकडचें आहे;

आणि विषयांचें विष उलंडूनि । जें सर्वेंद्रियां प्रायश्र्चित्त देऊनि ।

आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळीं ॥ १०४ ॥

१०४) आणि जे विषयांचा विषवत् त्याग करुन व सर्वेंद्रियांना शुद्ध करुन, देहरुप झाडाच्या खालीं बसलेले आहेत; 

ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात ।

निष्कानासि अभिप्रेत । सर्वदा जें ॥ १०५ ॥

१०५) याप्रमाणें विरक्त पुरुष आहेत, ते ज्याची ( परब्रह्माची ) नेहमीं वाट पाहात असतात; आणि जे निष्काम पुरुषांना अखंड अत्यंत प्रिय आहे;

जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्याचीं सांकडीं ।

निष्ठूर होऊनि बापुडीं । इंद्रियें करिती ॥ १०६ ॥

१०६) ज्याच्या प्रेमानें ते ब्रह्मचर्यासारख्या कठीण गोष्टी जुमानीत नाहीत आणि इंद्रियांवर कठोर होऊन त्यांना दीन करतात;

ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध ।

जयाचिये थडियेचे वेद । चुबुकळिले ठेले ॥ १०७ ॥

१०७) असें जे ठिकाण, जे मिळावयास कठीण व जाणण्यास कठीण व ज्याच्या अलीकडच्या कांठाशींच वेद गटांगळ्या खात राहिले आहेत ( वेदांसहि जे अगम्य आहे, )      

तें ते पुरुष होती । जे यापरी लया जाती ।

तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगों ॥ १०८ ॥

१०८) तें ( परब्रह्म ) जे पुरुष याप्रमाणें देह ठेवतात, ते होतात. तर अर्जुना, हाच प्रकार तुला आणखी एक वेळ सांगतों. 

तेथें अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पा मी ।

तंव सहजें कृपा केली तुम्हीं । परी बोलिजे कां जी ॥ १०९ ॥

१०९) त्याप्रसंगीं अर्जुन म्हणाला, महाराज, मी हेंच विचारण्याच्या बेतांत होतों. इतक्यांत तुम्हीं सहजच कृपा केली. तर महाराज, आतां सांगावें. 

परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें ।

तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक ॥ ११० ॥

११०) परंतु जें सांगाल तें अतिशय सोपें करुन सांगा. त्या प्रसंगी त्रैलोक्याचें प्रकाशन करणारे श्रीकृष्ण म्हणाले, आम्ही तुझे मनोगत ओळखीत नाहीं काय ? तुला तें थोडक्यांत सांगतों, ऐक.    

तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवें मोडे ।

हें हृदयाचां डोहीं बुडे । तैसें कीजे ॥ १११ ॥     

१११) तरी या मनाला बाहेर येण्याची जी संवय आहे, ती सहज नाहींशी करुन, तें हृदयाच्या डोहांत बुडेल तसें करावें. 

   


Custom Search

No comments: