Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 19 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग १९

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 19 
Doha 107 to 112 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग १९ 
दोहा १०७ ते ११२

 दोहा—करम बचन मन छाड़ि जब लगि जनु न तुम्हार ।

तब लगि सुखु सपनेहुँ नहीं किएँ कोटि उपवार ॥ १०७ ॥

जोपर्यंत काया-वाचा-मनाने कपट सोडून मनुष्य तुमचा दास होत नाही, तोपर्यंत कोट्यावधी उपाय केले तरी त्याला स्वप्नातही सुख मिळत नाही. ‘ ॥ १०७ ॥

सुनि मुनि बचन रामु सकुचाने । भाव भगति आनंद अघाने ॥

तब रघुबर मुनि सुजसु सुहावा । कोटि भॉंति कहि सबहि सुनावा ॥

मुनिवर भरद्वाजांचे बोलणें ऐकून त्यांच्या भक्तिभावामुळे आनंदाने तृप्त होऊन भगवान रामचंद्र मानवी लीला म्हणून संकोच पावले. तेव्हा आपले ऐश्र्वर्य गुप्त ठेवून श्रीरामांनी भरद्वाज मुनींची सुंदर कीर्ती अनेक प्रकारे सर्वांना सांगितली. ॥ १ ॥

सो बड़ सो सब गुन गन गेहू । जेहि मुनीस तुम्ह आदर देहू ॥

मुनि रघुबीर परसर नवहीं । बचन अगोचर सुखु अनुभवहीं ॥

ते म्हणाले की, ‘ हे मुनीश्र्वर, ज्याला तुम्ही आदर द्याल, तोच मोठा आणि सर्वगुणांचे घर होय.’ अशा प्रकारे श्रीराम आणि मुनी भरद्वाज हे दोघे परस्पर विनम्र होत होते आणि अनिर्वचनीय सुखाचा अनुभव घेत होते. ॥ २ ॥

यह सुधि पाइ प्रयाग निवासी । बटु तापस मुनि सिद्ध उदासी ॥

भरद्वाज आश्रम सब आए । देखन दसरथ सुअन सुहाए ॥

श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या आगमनाची वार्ता मिळताच प्रयागवासी ब्रह्मचारी, तपस्वी, सिद्ध आणि संन्यासी हे सर्व दशरथांच्या सुंदर पुत्रांना पाहण्यासाठी भरद्वाजांच्या आश्रमात पोहोचले. ॥ ३ ॥

राम प्रनाम कीन्ह सब काहू । मुदित भए लहि लोयन लाहू ॥

देहिं असीस परम सुखु पाई । फिरे सराहत सुंदरताई ॥

श्रीरामचंद्रांना सर्वांनी प्रणाम केला. नेत्रांचे पारणे फिटल्यामुळे सर्वजण आनंदित झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिले. श्रीरामांच्या लावण्याची प्रशंसा करीत ते परत गेले. ॥ ४ ॥

दोहा—राम कीन्ह बिश्राम निसि प्रात प्रयाग नहाइ ।

चले सहित सिय लखन जन मुदित मुनिहि सिरु नाइ ॥ १०८ ॥

श्रीरामांनी रात्री तेथे विश्रांती घेतली आणि प्रातःकाळी प्रयागराजाचे स्नान करुन आणि प्रसन्न होऊन मुनींना मस्तक नमवून सीता, लक्ष्मण व गुह यांच्यासह ते पुढे निघाले. ॥ १०८ ॥

राम सप्रेम कहेउ मुनि पाहीं । नाथ कहिअ हम केहि मग जाहीं ॥

मुनि मन बिहसि राम सन कहहीं । सुगम सकल मग तुम्ह कहुँ अहहीं ॥

निघताना मोठ्या  प्रेमाने श्रीराम मुनींना म्हणाले, ‘ मुनिवर्य ! आम्ही कोणत्या वाटेने जावे, ते सांगा.’ मुनी मनात हसून म्हणाले की, ‘ तुम्हाला सर्व मार्ग सुगम आहेत.’ ॥ १ ॥

साथ लागि मुनि सिष्य बोलाए । सुनि मन मुदित पचासक आए ॥

सबन्हि राम पर प्रेम अपारा । सकल कहहिं मगु दीख हमारा ॥

मग त्यांच्या सोबतीसाठी मुनींनी शिष्यांना बोलावले. आपल्याला श्रीरामांच्या सोबत जायचे आहे, हे ऐकून मनात आनंदित होऊन जवळ जवळ पन्नास शिष्य आले. सर्वांचे श्रीरामांच्यावर फार प्रेम होते. सर्वजण म्हणत होते की, हा मार्ग आम्हाला माहीत आहे, आम्हाला माहीत आहे. ॥ २ ॥

मुनि बटु चारि संग तब दीन्हे । जिन्ह बहु जनम सुकृत सब कीन्हे ॥

करि प्रनामु रिषि आयसु पाई । प्रमुदित हृदयँ चले रघुराई ॥

तेव्हा मुनींनी निवडक चार ब्रह्मचार्‍यांना त्यांच्यासोबत दिले, त्यांनी अनेक जन्मांत सुकृत केले होते. श्रीरघुनाथ प्रणाम करुन आणि ऋषींची आज्ञा घेऊन मनात अतिशय आनंदित होऊन चालू लागले. ॥ ३ ॥

ग्राम निकट जब निकसहिं जाई । देखहिं दरसु नारी नर धाई ॥

होहिं सनाथ जनम फलु पाई । फिरहिं दुखित मनु संग पठाई ॥

जेव्हा ते एखाद्या गावाजवळून जायचे, तेव्हा तेथील स्त्री-पुरुष त्यांचे लावण्य पाहात राहात. ते जन्माचे फळ मिळाल्याने अनाथ असलेले सर्व सनाथ होत आणि मनाने श्रीरामांच्या बरोबर जाऊन शरीराने जाता येत नाही, म्हणून दुःखी होऊन परत फिरत होते. ॥ ४ ॥

दोहा—बिदा किए बटु बिनय करि फिरे पाइ मन काम ।

उतरि नहाए जमुन जल जो सरीर सम स्याम ॥ १०९ ॥

त्यानंतर श्रीरामांनी विनंती करुन चारी ब्रह्मचार्‍यांना निरोप दिला. ते मनोवांच्छित अनन्य भक्ती मिळवून परत गेले. नंतर यमुनेमध्ये उतरुन सर्वांनी स्नान केले. ते जल श्रीरामामच्या शरीरासारखेच सावळे होते. ॥ १०९ ॥

सुनत तीरबासी नर नारी । धाए निज निज काज बिसारी ॥

लखन राम सिय सुंदरताई । देखि करहिं निज भाग्य बड़ाई ॥

यमुनेच्या किनार्‍यावर राहणारे स्त्री-पुरुष हे निषाद राजाबरोबर दोन परम सुंदर सुकुमार नवयुवक आणि एक परम सुंदर स्त्री आली आहे, हे ऐकून आपले सर्व काम विसरुन धावले आणि लक्ष्मण, राम व सीता यांचे सौंदर्य पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करु लागले. ॥ १ ॥

अति लालसा बसहिं मन माहिं । नाउँ गाउँ बूझत सकुचाहीं ॥

जे तिन्ह महुँ बयबिरिध सयाने । तिन्ह करि जुगुति रामु पहिचाने ॥

त्यांच्या मनांत ओळख करुन घेण्याची मोठी लालसा होती. परंतु नाव-गाव विचारण्यास ते समकोचत होते. त्या लोकांमध्ये जे वयोवृद्ध व चतुर होते, त्यांनी युक्तीने श्रीरामांना ओळखले. ॥ २ ॥

सकल कथा तिन्ह सबहि सुनाई । बनहि चले पितु आयसु पाई ॥

सुनि सबिषाद सकल पछिताहीं । रानी रायँ कीन्ह भल नाहीं ॥

पित्याच्या आज्ञेने हे वनात निघाले आहेत, ही गोष्ट त्यांनी सर्व लोकांना सांगितली. ते ऐकून सर्व लोकांना दुःख वाटले. राणी व राजांनी हे चांगले केले नाही, म्हणून त्यांना वाईट वाटले. ॥ ३ ॥

तेहि अवसर एक तापसु आवा । तेजपुंज लघुबयस सुहावा ॥

कबि अलखित गति बेषु बिरागी । मन क्रम बचन राम अनुरागी ॥

त्यावेळी एक तापसी तेथे आला. तो तेजःपुंज, लहान वयाचा आणि सुंदर होता. तो कवी होता पण आपला परिचय देऊ इच्चित नव्हता. तो बैराग्याच्या वेषात होता आणि मन-वचन-कर्माने श्रीरामांचा भक्त होता. ॥ ४ ॥

दोहा—सजले नयन तन पुलकि निज इष्टदेउ पहिचानि ।

परेउ दंड जिमि धरनितल दसा न जाइ बखानि ॥ ११० ॥

आपल्या इष्टदेवास पाहून त्याच्या नेत्रांतून पाणी वाहू लागले. शरीर पुलकित झाले आणि त्याने पृथ्वीवर लोटांगण घातले. त्याच्या प्रेमविव्हळ दशेचे वर्णन करणे कठीण होते. ॥ ११० ॥

राम सप्रेम पुलकि उर लावा । परम रंक जनु पारसु पावा ॥

मनहुँ प्रेमु परमारथु दोऊ । मिलत धरें तन कह सबु कोऊ ॥

श्रीरामांनी त्याला प्रेमाने हृदयाशी धरले. त्याला इतका आनंद झाला की, महादरिद्री माणसाला परीस लाभावा. पाहणारे सर्वजण म्हणू लागले की, जणू प्रेम व परमार्थ हे दोघे सकार होऊन भेटत आहेत. ॥ १ ॥

बहुरि लखन पायन्ह सोइ लागा । लीन्ह उठाइ उमगि अनुरागा ॥

पुनि सिय चरन धूरि धरि सीसा । जननि जानि सिसु दीन्हि असीसा ॥

मग तो तपस्वी लक्ष्मणाच्या चरणीं लागला. त्याने प्रेमभराने त्याला उठवले. नंतर त्याने सीतेची चरण-धूळ आपल्या मस्तकी धारण केली. सीता मातेनेही त्याला आपले लहान मूल समजून आशीर्वाद दिला. ॥ २ ॥

कीन्ह निषाद दंडवत तेही । मिलेउ मुदित लखि राम सनेही ॥

पिअत नयन पुट रुपु पियूषा । मुदित सुअसनु पाइ जिमि भूखा ॥

त्यानंतर निषादराजाने त्याला दंदवत घातला. श्रीरामांचा भक्त समजून तो निषादाला आनंदाने भेटला. तो तपस्वी आपल्या नेत्ररुपी द्रोणांनी श्रीरामांच्या सौंदर्याचे पान करुं लागला आणि इतका आनंदित झाला की, एखादा भुकेला माणूस सुंदर भोजन मिळाल्यावर होतो तसा. ॥ ३ ॥

ते पितु मातु कहहु सखि कैसे । जिन्ह पठए बन बालक ऐसे ॥

राम लखन सिय रुपु निहारी । होहिं सनेह बिकल नर नारी ॥

इकडे गावातील स्त्रिया म्हणत होत्या की, ‘ हे सखी, ते माता-पिता किती निष्ठुर आहेत, ज्यांनी अशा सुंदर सुकुमार बालकांना वनांत धाडले ? ‘ श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांचे रुप पाहून सर्व स्त्री-पुरुष प्रेमाने व्याकुळ होत. ॥ ४ ॥  

दोहा—तब रघुबीर अनेक बिधि सखहि सिखावनु दीन्ह ।

राम रजायसु सीस धरि भवन गवनु तेइँ कीन्ह ॥ १११ ॥

मग श्रीरामचंद्रांनी मित्र गुहाला अनेक तर्‍हेने परत जाण्यासाठी समजून सांगितले. श्रीरामांची आज्ञा शिरोधार्य मानून तो घरी परतला. ॥ १११ ॥

पुनि सियँ राम लखन कर जोरी । जमुनहि कीन्ह प्रनामु बहोरी ॥

चले ससीय मुदित दोउ भाई । रबितनुजा कइ करत बड़ाई ॥

सीता, राम व लक्ष्मण यांनी हात जोडून यमुनेला पुन्हा प्रणाम केला आणि सूर्यकन्या यमुनेची स्तुती करीत ते दोघे भाऊ प्रसन्न होऊन पुढे निघाले ॥ १ ॥

पथिक अनेक मिलहिं मग जाता । कहहिं सप्रेम देखि दोउ भ्राता ॥

राजा लखन सब अंग तुम्हारें । देखि सोचु अति हृदय हमारे ॥

वाटेमध्ये जाताना त्यांना पुष्कळ वाटसरु भेटले. त्या दोघा भावांना पाहून ते प्रेमाने म्हणत की, ‘ तुमच्या अंगावरील सर्व राजचिन्हे पाहून आमच्या मनात मोठी शंका येते. ॥ २ ॥

मारग चलहु पयादेहि पाएँ । ज्योतिषु झूठ हमारें भाएँ ॥

अगमु पंथु गिरि कानन भारी । तेहि महँ साथ नारि सुकुमारी ॥

अशी राजचिन्हे असताना तुम्ही पायी चालत आहात. यावरुन असे वाटते की, ज्योतिषशास्त्र खोटे असले पाहिजे. दाट जंगले व मोठमोठ्या पर्वतांमधील दुर्गम रस्ते आहेत. त्याशिवाय तुमच्यासोबत नाजुक स्त्री आहे. ॥ ३ ॥

करि केहरि बन जाइ न जोई । हम सँग चलहिं जो आयसु होई ॥

जाब जहॉं लगि तहँ पहुँचाई । फिरब बहोरि तुम्हहि सिरु नाई

हत्ती आणि सिंह यांनी भरलेले हे भयानक वन पाहावतसुद्धा नाही. जर आज्ञा असेल, तर आम्ही सोबतीने येऊ. जिथे जायचे आहे, तेथे तुम्हांला पोहोचवून आणि प्रणाम करुन आम्ही परत जाऊ. ‘ ॥ ४ ॥

दोहा—एहि बिधि पूँछहिं प्रेम बस  पुलक गात जलु नैन ।

कृपासिंधु फेरहिं तिन्हहि कहि बिनीत मृदु बैन ॥ ११२ ॥

अशा प्रकारे ते यात्रेकरु प्रेमाने पुलकित होऊन व डोळ्यांत प्रेमाश्रू आणून विचारत, परंतु कृपासिंधु श्रीरामचंद्र विनयाने मृदु बोलून त्यांना परत पाठवून देत. ॥ ११२ ॥

जे पुर गॉंव बसहिं मग माहीं । तिन्हहि नाग सुर नगर सिहाहीं ॥

केहि सुकृतीं केहि घरीं बसाए । धन्य पुन्यमय परम सुहाए ॥

नाग व देव हे वाटेतील गाव, वाड्या यांची प्रशंसा व हेवा करीत होते आणि लालसेने म्हणत होते की, कोणत्या पुण्यवानाने, कोणत्या शुभ क्षणी यांना बनविले असावे ? कारण, हे श्रीराम आज ज्यांमधून जात आहेत, ते निवास किती धन्य व परम सुंदर झाले आहेत ! ॥ १ ॥

जहँ जहँ राम चरन चलि जाहीं । तिन्ह समान अमरावति नाहीं ॥

पुन्यपुंज मग निकट निवासी । तिन्हहि सराहहिं सुरपुरबासी ॥

जिथे जिथे श्रीरामांची पावलें पडत होती. त्या स्थानाइतकी इंद्राची अमरावतीही पवित्र नाही. वाटेजवळ राहणारेसुद्धा पुणात्मे होत. स्वर्गातील देवसुद्धा त्यांची स्तुती करीत होते. ॥ २ ॥

जे भरि नयन बिलोकहिं रामहि । सीता लखन सहित घनस्यामहि ॥

जे सर सरित राम अवगाहहिं । तिन्हहि देव सर सरित सराहहिं ॥

जे, डोळे भरुन सीता आणि लक्ष्मणासह श्रीरामांचे दर्शन घेत होते, ज्या तलावांत व नद्यांमध्ये श्रीराम स्नान करीत, त्यांची थोरवी देवसरोवरे व देवनद्याही करीत होत्या. ॥ ३ ॥

जेहि तरु तर प्रभु बैठहिं जाई । करहिं कलपतरु तासु बड़ाई ॥

परसि राम पद पदुम परागा । मानति भूमि भूरि निज भागा ॥

ज्या वृक्षाखाली प्रभू राम जाऊन बसत, त्यांची प्रशंसा

 कल्पवृक्षसुद्धा करी. श्रीरामचंद्रांच्या चरण-कमलांच्या

 धुळीचा स्पर्श होणे, हे पृथ्वी आपले सौभाग्य समजत

 होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: