Monday, May 10, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 24 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग २४

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 24 
Doha 137 to 142 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग २४ 
दोहा १३७ ते १४२
दोहा--नीलकंठ कलकंठ सुक चातक चक्क चकोर ।
भॉंति भॉंति बोलहिं बिहग श्रवन सुखद चित चोर ॥ १३७ ॥                   
मोर, कोकिळ, पोपट, चातक, चक्रवाक, चकोर इत्यादी पक्षी कानांनी सुख देणारे व मन आकर्षित करणारे तर्‍हेतर्‍हेचे बोल बोलत होते. ॥ १३७ ॥
करि केहरि कपि कोल कुरंगा । बिगतबैर बिचरहिं सब संगा ॥
फिरत अहेर राम छबि देखी । होहिं मुदित मृगबृंद बिसेषी ॥
हत्ती, सिंह, वानर, डुक्कर आणि हरीण हे सर्व परस्पर वैरभाव सोडून बरोबरीने वावरत होते. वनात फिरत असताना श्रीरामांचे सौंदर्य पाहून पशूंचे ते कळप विशेष आनंदित होत होते. ॥ १ ॥
बिबुध बिपिन जहँ लगि जग माहीं । देखि रामबनु सकल सिहाहीं ॥
सुरसरि सरसइ दिनकर कन्या । मेकलसुता गोदावरि धन्या ॥
जगात जितकी म्हणून देवांची वने आहेत, ती सर्व श्रीरामचंद्रांचे हे वन समाधान पावत. गंगा, सरस्वती, सूर्यकुमारी यमुना, नर्मदा, गोदावरी इत्यादी धन्य नद्या, ॥ २ ॥
सब सर सिंधु नदीं नद नाना । मंदाकिनि कर करहिं बखाना ॥
उदय अस्त गिरि अरु कैलासू । मंदर मेरु सकल सुरबासू ॥
सर्व तलाव, समुद्र, नद्या आणि अनेक नद हे सर्व मंदाकिनीचे माहात्म्य सांगत होते. उदयाचल, अस्ताचल, कैलास, मंदराचल आणि सुमेरु इत्यादी सर्व जे देवांचे निवासस्थान असलेले पर्वत आहेत, ॥ ३ ॥
सैल हिमाचल आदिक जेते । चित्रकूट जसु गावहिं तेते ॥
बिंधि मुदित मन सुखु न समाई । श्रम बिनु बिपुल बड़ाई पाई ॥
आणि हिमाचल इत्यादी जितके पर्वत आहेत, ते सर्व चित्रकूटाची कीर्ती गाऊ लागले. विंध्याचल मोठा आनंदित होता, त्याच्या मनात आनंद मावत नव्हता, कारण विनासायास त्याला फार मोठे माहात्म्य प्राप्त झाले होते. ॥ ४ ॥
दोहा--चित्रकूट के बिहग मृग बेलि बिटप तृन जाति ।
पुन्य पुंज सब धन्य अस कहहिं देव दिन राति ॥ १३८ ॥
चित्रकूटातील पक्षी, पशू, वेल, वृक्ष, तृणांकुर इत्यादी सर्व जातीचे प्राणी व वनस्पती पुण्याच्या राशी होत व धन्य होत, असे देव रात्रंदिवस म्हणत होते. ॥ १३८ ॥
नयनवंत रघुबरहि बिलोकी । पाइ जनम फल होहिं बिसोकी ॥
परसि चरन रज अचर सुखारी । भए परम पद के अधिकारी ॥
डोळे असणारे जीव श्रीरामचंद्रांना पाहून जन्माचे साफल्य लाभल्यामुळे शोकरहित होत होते. पर्वत, वृक्ष, भूमी, नदी इत्यादी अचर हे भगवंतांच्या चरण-रजाच्या स्पर्शाने सुखी झाले. तसेच ते सर्वच मोक्षाचे अधिकारी बनले. ॥ १ ॥
सो बनु सैलु सुभायँ सुहावन । मंगलमय अति पावन पावन ॥ 
महिमा कहिअ कवनि बिधि तासू । सुखसागर जहँ कीन्ह निवासू ॥
ते वन आणि पर्वत स्वाभाविकपणे सुंदर, मंगलमय आणि अत्यंत पवित्र असणार्‍यांनांही पवित्र बनविणारे होते. जेथे सुख-सागर असलेल्या श्रीरामांनी निवास केला आहे, त्या स्थानांचा महिमा कसा सांगता येईल ? ॥ २ ॥
पय पयोधि तजि अवध बिहाई । जहँ सिय लखनु रामु रहे आई ॥
कहि न सकहिं सुषमा जसि कानन । जौं सत सहस होहिं सहसानन ॥
क्षीरसागर व अयोध्या यांचा त्याग करुन सीता, लक्ष्मण आणि रामचंद्र जेथे येऊन राहिले, त्या वनाची परम शोभा अशी आहे की, हजार मुखांचे लाखो शेष असले, तरी तेही सांगू शकणार नाहीत. ॥ ३ ॥
सो मैं बरनि कहौं बिधि केहीं । डाबर कमठ कि मंदर लेहीं ॥
सेवहिं लखनु करम मन बानी । जाइ न सीलु सनेहु बखानी ॥
मग मी कसा त्याचे वर्णन करु शकेन ? तलावामधील कासव हे मंदराचलाला उचलू शकेल काय ? लक्ष्मण हा मन, वचन आणि कर्माने श्रीरामांची सेवा करीत होता. त्याचा स्वभाव व स्नेह याचे वर्णनच करता येत नाही. ॥ ४ ॥
दोहा--छिनु छिनु लखि सिय राम पद जानि आपु पर नेहु ।
करत न सपनेहुँ लखनु चितु बंधु मातु पितु गेहु ॥ १३९ ॥
क्षणोक्षणी श्रीसीतारामांच्या चरणांच्या दर्शनामुळे आणि स्वतःवर त्यांचा स्नेह असलेला बघून लक्ष्मणाला स्वप्नातहि भाऊ, माता-पिता व घराची आठवण येत नव्हती. ॥ १३९ ॥
राम संग सिय रहति सुखारी । पुर परिजन गृह सुरति बिसारी ॥
छिनु छिनु पिय बिधु बदनु निहारी । प्रमुदित मनहुँ चकोर कुमारी ॥
श्रीरामांबरोबर सीताही अयोध्यापुरी, आप्तजन आणि घर यांची आठवण विसरुन सुखी होती. क्षणोक्षणी पती श्रीरामांचे चंद्रासारखे मुख पाहून चकोरी जशी चंद्रम्याला पाहून प्रसन्न असते तशी ती अतिशय प्रसन्न होत होती. ॥ १ ॥
नाह नेहु नित बढ़त बिलोकी । हरषित रहति दिवस जिमि कोकी ॥
सिय मनु राम चरन अनुरागा । अवध सहस सम बनु प्रिय लागा ॥  
स्वामींचे आपल्यावरील नित्य वाढत जाणारे प्रेम पाहून सीता अशी हर्षित होती की, ज्याप्रमाणे दिवस चकवी असते. सीतेचे मन श्रीरामांच्या चरणी अनुरक्त असल्यामुळे तिला वन हे हजारो अयोध्यांसमान प्रिय वाटत होते. ॥ २ ॥
परनकुटी प्रिय प्रियतम संगा । प्रिय परिवारु कुरंग बिहंगा ॥
सासु ससुर सम मुनितिय मुनिबर । असनु अमिअ सम कंद मूल फर ॥
तिला प्रियतम श्रीरामांच्या सोबतीमुळे पर्णकुती आवडत होती. पशु-पक्षी हे प्रिय कुटुमबियांप्रमाणें वाटत होते. मुनींच्या पत्नी या सासूसारख्या, श्रेष्ठ मुनी हे सासर्‍यासारखे वाटत होते आणि कंद-मुळे व फळे यांचा आहार तिला अमृतासारखा आवडत होता. ॥ ३ ॥
नाथ साथ सॉंथरी सुहाई । मयन सयन सय सुखदाई ॥
लोकप होहिं बिलोकत जासू । तेहि कि मोहि सक बिषय बिलासू ॥
तिला स्वामीमसोबत सुंदर कुश-पानांची पथारी ही शेकडो कामदेवांच्या शय्येप्रमाणे सुखकारक वाटत होती. ज्यांच्या कृपाकटाक्षामुळे जीव हे लोकपाल बनतात, त्यांना भोग विलास कधी मोहित करु शकतील काय ? ॥ ४ ॥
दोहा--सुमिरत रामहि तजहिं जन सम बिषय बिलासु ।
रामप्रिया जग जननि सिय कछु न आचरजु तासु ॥ १४० ॥
ज्या श्रीरामचंद्रांचे फक्त स्मरण केल्यामुळे भक्तजन सर्व भोग-विलास कस्पटासमान फेकून देतात, त्या श्रीरामांची प्रिय पत्नी आणि जगाची माता सीता हिच्यासाठी हा भोग-विलासाचा त्याग ही काही आश्चर्यकारक गोष्ट नाही. ॥ १४० ॥
सीय लखन जेहि बिधि सुखु लहहिं । सोइ रघुनाथ करहिं सोइ कहहीं ॥
कहहिं पुरातन कथा कहानी । सुनहिं लखन सिय अति सुखु मानी ॥
सीता व लक्ष्मण यांना सुख मिळावे, म्हणून श्रीरघुनाथ तशाच प्रकारच्या गोष्टी करीत होते. ते त्यांना प्राचीन कथा व गोष्टी सांगत आणि सीता व लक्ष्मण त्या आनंदाने ऐकत. ॥ १ ॥
जब जब रामु अवध सुधि करहीं । तब तब बारि बिलोचन भरहीं ॥
सुमिरि मातु पितु परिजन भाईं । भरत सनेहु सीलु सेवकाई ॥
जेव्हा जेव्हा श्रीरामांना अयोध्येची आठवण येई, तेव्हा तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटत. माता-पिता, कुटुंबीय, बंधू व भरताचे प्रेम, शील आणि सेवाभाव आठवून, ॥ २ ॥
कृपासिंधु प्रभु होहिं दुखारी । धीरजु धरहिं कुसमउ बिचारी ॥
लखि सीय लखनु बिकल होइ जाहीं । जिमि पुरुषहि अनुसर परिछाहीं ॥
कृपासागर श्रीरामचंद्र दुःखी होत, परंतु सद्य वेळ वाईट आहे, असे समजून धीर धरत. श्रीरामांना दुःखी झालेले पाहून सीता व लक्ष्मण हे सुद्धा व्याकूळ होऊन जात. ज्याप्रमाणे मनुष्याचे प्रतिबिंब मनुष्यासारखेच वागते, त्याप्रमाणे, ॥ ३ ॥
प्रिय बंधु गति लखि रघुनंदनु । धीर कृपाल भगत उर चंदनु ॥
लगे कहन कछु कथा पुनीता । सुनि सुखु लहहिं लखनु अरु सीता ॥
मग धीर, कृपाळू आणि भक्तांचे हृदय शांत करण्यासाठी चंदनरुप बनून रघुकुलाला आनंदित करणारे श्रीराम हे प्रिय पत्नी, बंधू लक्ष्मण यांची दशा पाहून काही पवित्र कथा सांगू लागत. त्या ऐकल्याने लक्ष्मण व सीता सुखी होत. ॥ ४ ॥
दोहा--रामु लखन सीता सहित सोहत परन निकेत ।
जिमि बासव बस अमरपुर सची जयंत समेत ॥ १४१ ॥
अमरावतीत इंद्र हे शची व पुत्र जयंतासह राहातात, त्याप्रमाणे लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम पर्णकुटीत शोभून दिसत होते. ॥ १४१ ॥
जोगवहिं प्रभु सिय लखनहि कैसें । पलक बिलोचन गोलक जैसें ॥
सेवहिं लखनु सीय रघुबीरहि । जिमि अबिबेकी पुरुष सरीरहि ॥
ज्याप्रमाणे पापण्या डोळ्यांचे रक्षण करतात, त्याप्रमाणे प्रभू श्रीराम हे सीता व लक्ष्मण यांची काळजी घेत. तर लक्ष्मण हा सीता व रामचंद्र यांची अशी सेवा करी की, ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य शरीराची सेवा करीत असतो. ॥ १ ॥
एहि बिधि प्रभु बन बसहिं सुखारी । खग मृग सुर तापस हितकारी ॥
कहेउँ राम बन गवनु सुहावा । सुनहु सुमंत्र अवध जिमि आवा ॥
पक्षी, पशू, देवता व तपस्वी यांचे हितकारी असलेले प्रभू अशा प्रकारे सुखाने वनात निवास करीत होते. ( तुलसीदास म्हणतात, ) मी श्रीरामांचे झालेले सुंदर वनगमन सांगितले. आता सुमंत्र अयोध्येमध्ये आला, ती कथा ऐका. ॥ २ ॥
फिरेउ निषादु प्रभुहि पहुँचाई । सचिव सहित रथ देखेसि आई ॥
मंत्री बिकल बिलोकि निषादू । कहि न जाइ जस भयउ बिषादू ॥
प्रभू श्रीरामांना पोहोचवून जेव्हा निषादराजा गुह परतला, तेव्हा आल्यावर त्याला सुमंत्र रथ घेऊन उभा असल्याचे दिसले. मंत्री व्याकूळ झाल्याचे पाहून निषादाला इतके दुःख झाले की, काही सांगता येत नाही. ॥ ३ ॥
राम राम सिय लखन पुकारी । परेउ धरनितल ब्याकुल भारी ॥
देखि दखिन दिसि हय हिहिनाहीं । जनु बिनु पंख बिहग अकुलाहीं ॥
निषाद एकटाच परत आल्याचे पाहून सुमंत्र ' हे रामा, हे सीते, हे लक्ष्मणा ' असे पुकारत फार व्याकूळ होऊन जमिनीवर पडला. रथाचे घोडे दक्षिण दिशेकडे पाहात खिंकाळत होते. पंख नसलेले पक्षी व्याकूळ होतात, त्याप्रमाणे तेसुद्धा व्याकुळ होते. ॥ ४ ॥
दोहा--नहिं तृन चरहिं न पिअहिं जलु मोचहिं लोचन बारि ।
ब्याकुल भए निषाद सब रघुबर बाजि निहारि ॥ १४२ ॥
ते गवत खात नव्हते, पाणी पीत नव्हते, त्यांच्या डोळ्यांतून फक्त पाणी वाहात होते. श्रीरामांच्या घोड्यांची दशा पाहून सर्व निषाद व्याकूळ झाले. ॥ १४२ ॥
धरि धीरजु तब कहइ निषादू । अब सुमंत्र परिहरहु बिषादू ॥
तुम्ह पंडित परमारथ ग्याता । धरहु धीर लखि बिमुख बिधाता ॥
तेव्हा धीर धरुन निषादराज म्हणू लागला, ' हे सुमंत्र, आता खेद सोडून द्या. तुम्ही विद्वान व परमार्थ जाणणारे आहात. दैव प्रतिकूल आहे, असे समजून स्वतःला सावरा.' ॥ १ ॥
बिबिधि कथा कहि कहि मृदु बानी । रथ बैठारेउ बरबस आनी ॥
सोक सिथिल रथु सकइ न हॉंकी । रघुबर बिरह पीर उर बॉंकी ॥
गोड बोलून तर्‍हेतर्‍हेच्या कथा सांगून निषादाने सुमंत्राला बळेच रथात बसविले. परंतु शोकामुळे त्याच्यामध्ये रथ हाकण्याचे त्राणही उरले नव्हते. त्याच्या मनात श्रीरामांच्या विरहाची मोठी तीव्र वेदना होती. ॥ २ ॥
चरफाराहिं मग चलहिं न घोरे । बन मृग मनहुँ आनि रथ जोरे ॥
अढ़ुकि परहिं फिरि हेरहिं पीछें । राम बियोगि बिकल दुख तीछें ॥
घोडे तडफडत होते. आणि वाटेवर धड चालत नव्हते. असे वाटत होते की, जंगलातले पशू आणून रथाला जोडले असावेत. श्रीरामांच्या विरहामुळे घोडे कधी ठोकर खाऊन पडत होते. कधी वळून मागे पाहात होते. दुःखाने ते फार व्याकूळ झाले होते. ॥ ३ ॥
जो कह रामु लखनु बैदेही । हिंकरि हिंकरि हित हेरहिं तेही ॥
बाजि बिरह गति कहि किमि जाती । बिनु मनि फनिक बिकल जेहि भॉंती ॥
जर कुणी राम, लक्ष्मण किंवा सीता यांचे नाव घेतले तर त्याच्याकडे घोडे खिंकाळून प्रेमाने पाहात होते. घोड्यांची दशा काय वर्णावी ? ते मण्याविना व्याकूळ झालेल्या सापाप्रमाणे झाले होते. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: