ShriRamCharitManas
दोहा—पद पखारि जलु पान करि आपु सहित परिवार ।
पितर पारु करि प्रभुहि पुनि मुदित गयउ लेइ पार ॥ १०१ ॥
नावाड्याने श्रीरामांचे चरण धुऊन व आपल्या कुटुंबासह जलप्राशन करुन प्रथम आपल्या
पितरांना भवसागरांतून पार केले. मग मोठ्या आनंदाने प्रभूंना गंगानदीच्या पलीकडे
नेले. ॥ १०१ ॥
उतरि ठाढ़ भए सुरसरि रेता । सीय रामु गुह लखन समेता ॥
केवट उतरि दंडवत कीन्हा । प्रभुहि सकुच एहि नहिं कछु दीन्हा
॥
निषादराज, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम नावेतून उतरुन
वाळूच्या किनार्यावर उभे राहिले. नावाड्याने उतरुन साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामप्रभूंना
वाटत होते की, याला आपण काहीच दिले नाही. ॥ १ ॥
पिय हिय की सिय जाननिहारी । मनि मुदरी मन मुदित उतारी ॥
कहेउ कृपाल लेहि उतराई । केवट चरन गहे अकुलाई ॥
पतीचे मन ओळखून सीतेने आनंदाने आपली रत्नजडित अंगठी काढली.
कृपाळू श्रीरामांनी नावाड्यास सांगितले की, ‘ नावेचे भाडे घे . ’ नावाड्याने
व्याकूळ होऊन त्यांचे चरण धरले. ॥ २ ॥
नाथ आजु मैं काह न पावा । मिटे दोष दुख दारिद दावा ॥
बहुत काल मैं कीन्हि मजूरी । आजु दीन्ह बिधि बनि भलि भूरी ॥
तो म्हणाला, ‘ हे नाथ, आज मला काय माही मिळाले ? माझे दोष,
दुःख आणि दारिद्र्य यांची झळ आज नाहीशी झाली. मी बराच काळ मजुरी केली. आज नशिबाने
फार चांगली व भरपूर मजुरी दिली आहे. ॥ ३ ॥
अब कछु नाथ न चाहिअ मोरें । दीनदयाल अनुग्रह तोरें ॥
फिरती बार मोहि जो देबा । सो प्रसादु मैं सिर धरि लेबा ॥
हे नाथ, हे दीनदयाळ, तुमची कृपा लाभल्यामुळे आता काही नको.
परत येताना तुम्ही जे द्याल, ते प्रसाद म्हणून मस्तकी धरीन.’ ॥ ४ ॥
दोहा—बहुत कीन्ह प्रभु लखन सियँ नहिं कछु केवटु लेइ ।
बिदा कीन्ह करुनायतन भगति बिमल बरु देइ ॥ १०२ ॥
प्रभु श्रीराम, लक्ष्मण व सीता या सर्वांनी खूप आग्रह केला,
परंतु त्याने काही घेतले नाही. तेव्हा करुणानिधान भगवान श्रीरामांनी त्याला निर्मल
भक्तीचे वरदान देऊन निरोप दिला. ॥ १०२ ॥
तब मज्जनु करि रघुकुलनाथा । पूजि पारथिव नायउ माथा ॥
सियँ सुरसरिहि कहेउ कर जोरी । मातु मनोरथ पुरउबि मोरी ॥
नंतर रघुकुलाचे स्वामी श्रीरामांनी स्नान करुन पार्थिव
शिवलिंगाची पूजा केली आणि शिवांना प्रणाम केला. सीतेने हात जोडून गंगेला विनविले
की, ‘ हे माते, माझे मनोरथ पूर्ण कर. ‘ ॥ १ ॥
पति देवर सँग कुसल बहोरी । आइ करौं जेहिं पूजा तोरी ॥
सुनि सिय बिनय प्रेम रस सानी । भइ तब बिमल बारि बन बानी ॥
ज्या योगे मी पती व दीर यांच्याबरोबर सुखरुप परतून तुझी
पूजा करीन, ‘ सीतेची प्रेमरसाने ओथंबलेली विनंती ऐकून गंगेच्या निर्मल जलातून
श्रेष्ठ वाणी प्रगट झाली. ॥ २ ॥
सुनु रघुबीर प्रिया बैदेही । तव प्रभाउ जग बिदित न केही ॥
लोकप होहिं बिलोकत तोरें । तोहि सेवहिं सब सिधि कर जोरें ॥
‘ हे रघुवीरांच्या प्रियतम जानकी, तुझा प्रभाव जगात कोण
जाणत नाही ? तू कृपादृष्टीने पाहिलेस की, सामान्य माणूस लोकपाल बनतात. सर्व सिद्धी
हात जोडून तुझी सेवा करतात. ॥ ३ ॥
तुम्ह जो हमहि बड़ि बिनय सुनाई । कृपा कीन्हि मोहि दीन्हि
बड़ाई ॥
तदपि देबि मैं देबि असीसा । सफल होन हित निज बागीसा ॥
तू मला प्रेमाने विनंती केलीस, ही माझ्यावर कृपाच होय. तू
मला मोठेपणा दिलास. तरीही हे देवी, मी आपली वाणी सफल होण्यासाठी तुला आशीर्वाद
देते. ॥ ४ ॥
दोहा—प्राननाथ देवर सहित कुसल कोसला आइ ।
पूजिहि सब मनकामना सुजसु रहिहि जग छाइ ॥ १०३ ॥
तू आपले प्राणनाथ व दीर यांच्यासह अयोध्येला सुखरुप परत
येशील. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुझी उज्जव कीर्ती जगात पसरेल. ॥ १०३
॥
गंग बचन सुनि मंगल मूला । मुदित सीय सुरसरि अनुकूला ॥
तब प्रभु गुहहि कहेउ घर जाहू । सुनत सूख मुखु भा उर दाहू ॥
मांगल्याचे मूळ असलेल्या गंगेचे वचन ऐकून आणि देवनदी अनुकूल
आहे, असे पाहून सीतेला आनंद झाला. तेव्हा श्रीरामचंद्रांनी गुहाला सांगितले की, ‘
हे बंधू, आता तू घरी जा. ‘ हे ऐकताच त्याचा चेहरा पडला आणि मनात दुःख उसळले. ॥ १ ॥
दीन बचन गुह कह कर जोरी । बिनय सुनहु रघुकुलमनि मोरी ॥
नाथ साथ रहि पंथु देखाई । करि दिन चारि चरन सेवकाई ॥
गुह हात जोडून दीनवाणीने म्हणाला, ‘ हे रघुकुलशिरोमणी, माझी
विनंती ऐका. मी तुमच्या सोबत राहून मार्ग दाखवून व चार दिवस तुमच्या चरणांची सेवा
करुन- ॥ २ ॥
जेहिं बन जाइ रहब रघुराई । परनकुटी मैं करबि सुहाई ॥
तब मोहि कहँ जसि देब रजाई । सोइ करिहउँ रघुबीर दोहाई ॥
हे रघुराज, ज्या वनात तुम्ही राहाल, तेथे मी सुंदर पर्णकुटी
तयार करुन देईन. हे रघुवीर, मी तम्हाला प्रार्थना करतो की, मग तुम्ही जी आज्ञा
कराल, त्याप्रमाणे मी करीन. ॥ ३ ॥
सहज सनेह राम लखि तासू । संग लीन्ह गुह हृदयँ हुलासू ॥
पुनि गुहँ ग्याति बोलि सब लीन्हे । करि परितोषु बिदा तब
कीन्हे ॥
त्याचे ते स्वाभाविक प्रेम पाहून श्रीरामांनी त्याला आपल्या
सोबत घेतले. त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. मग गुहाने आपल्या जातभाईंना बोलावले
आणि त्यांचे समाधान करुन त्यांना निरोप दिला. ॥ ४ ॥
दोहा—तब गनपति सिव सुमिरि प्रभु नाइ सुरसरिहि माथ ।
सखा अनुज सिय सहित बन गवनु कीन्ह रघुनाथ ॥ १०४ ॥
मग श्रीरघुनाथांनी गजानन आणि शिव यांचे स्मरण करुन तसेच
गंगेला नमस्कार करुन मित्र निषाधराज, बंधू लक्ष्मण व सीता यांच्यासह ते वनात
निघाले. ॥ १०४ ॥
तेहि दिन भयउ बिटप तर बासू । लखन सखॉं सब कीन्ह सुपासू ॥
प्रात प्रातकृत करि रघुराई । तीरथराजु दीख प्रभु जाई ॥
त्यादिवशी त्यांनी झाडाखाली निवास केला. लक्ष्मण व गुह
यांनी विश्रांतीची चांगली व्यवस्था केली. प्रभू श्रीरामचंद्रांनी प्रातःकाली सर्व
कर्मे आटोपून तीर्थराज प्रयागाचे दर्शन घेतले. ॥ १ ॥
सचिव सत्य श्रद्धा प्रिय नारी । माधव सरिस मीतु हितकारी ॥
चारि पदारथ भरा भँडारु । पुन्य प्रदेस देस अति चारु ॥
त्या तीर्थराजाचा सत्य हा मंत्री आहे. श्रद्धा ही त्याची
प्रिय पत्नी आहे आणि श्रीवेणीमाधव यांच्यासारखे हितकारक मित्र आहेत. त्याचे भांडार
धर्मादी चार पदार्थांनी भरले आहे आणि पुण्यमय प्रांत हाच त्या राजाचा सुंदर देश
आहे. ॥ २ ॥
छेत्रु अगम गढ़ु गाढ़ सुहावा । सपनेहुँ नहिं प्रतिपच्छिन्ह
पावा ॥
सेन सकल तीरथ बर बीरा । कलुष अनीक दलन रनधीरा ॥
प्रयाग क्षेत्र हे दुर्गम, मजबूत आणि सुंदर किल्ला आहे.
स्वप्नातही पापरुपी शत्रू त्याला जिंकू शकत नाहीत. संपूर्ण तीर्थे हे त्याचे वीर व
श्रेष्ठ सैन्य आहे. ते पापाची सेना चिरडून टाकणारे व रणधीर आहे. ॥ ३ ॥
संगमु सिंहासनु सुठि सोहा । छत्रु अखयबटु मुनि मनु मोहा ॥
चवँर जमुन अरु गंग तरंगा । देखि होहिं दुख दारिद भंगा ॥
गंगा यमुना व सरस्वती यांचा संगम हाच त्याचे अत्यंत सुशोभित
सिंहासन आहे. अक्षयवट हा छत्र आहे. तो मुनींच्या मनास मोहित करुन टाकतो. यमुना च
गंगा यांच्या लाटा या श्याम व शुभ्र चामरे आहेत. त्यांचे दर्शन होताच दुःख आणि
दारिद्र्य नष्ट होते. ॥ ४ ॥
दोहा—सेवहिं सुकृती साधु सुचि पावहिं सब मनकाम ।
बंदी बेद पुरान गन कहहिं बिमल गुन ग्राम ॥ १०५ ॥
पुण्यात्मे व पवित्र साधू त्याची सेवा करतात आणि त्यांचे
सर्व मनोरथ पूर्ण होतात. वेद आणि पुराणांचे समूह हे भाट होत. ते त्याच्या निर्मल
गुणांचे गायन करतात. ॥ १०५ ॥
को कहि सकइ प्रयाग प्रभाऊ । कलुष पुंज कुंजर मृगराऊ ॥
अस तीरथपति देखि सुहावा । सुख सागर रघुबर सुखु पावा ॥
पापांच्या समूहरुपी हत्तीला मारण्यासाठी सिंहरुप असलेल्या
प्रयागराजाचे माहात्म्य कोण सांगू शकणार ? अशा सुंदर तीर्थराजाचे दर्शन घेऊन
सुख-सागर रघुकुलश्रेष्ठ श्रीरामांनासुद्धा सुख झाले. ॥ १ ॥
कहि सीय लखनहि सखहि सुनाई । श्रीमुख तीरथराज बड़ाई ॥
करि प्रनामु देखत बन बागा । कहत महातम अति अनुरागा ॥
त्यांनी आपल्या श्रीमुखाने सीता, लक्ष्मण व गुह यांना
तीर्थराज प्रयागचा महिमा सांगितला. त्यानंतर प्रणाम करुन वने व बगीचे पाहात आणि
मोठ्या प्रेमाने त्यांचे माहात्म्य सांगत- ॥ २ ॥
एहि बिधि आइ बिलोकी बेनी । सुमिरत सकल सुमंगल देनी ॥
मुदित नहाइ कीन्हि सिव सेवा । पूजि जथाबिधि तीरथ देवा ॥
श्रीरामांनी येऊन त्रिवेणीचे दर्शन घेतले. त्रिवेणीचे स्मरण
केल्यानेच सर्व सुंदर मंगल ती देते. नंतर त्यांनी त्रिवेणीमध्ये स्नान करुन भगवान
शिवांची पूजा केली आणि विधिपूर्वक तीर्थदेवतांचे पूजन केले. ॥ ३ ॥
तब प्रभु भरद्वाज पहिं आए । करत दंडवत मुनि उर लाए ॥
मुनि मन मोद न कछु कहि जाई । ब्रह्मानंद रासि जनु पाई ॥
स्नान-पूजा इत्यादी झाल्यावर प्रभू श्रीराम भरद्वाज ऋषींकडे
आले. त्यांना दंडवत घालत असताना मुनीनीं त्यांना हृदयाशी धरले. मुनींच्या मनाला
झालेला आनंद अवर्णनीय होता. जणू त्यांना ब्रह्मांनंदाचे भांडार मिळाले होते. ॥ ४ ॥
दोहा—दीन्हि असीस मुनीस
उर अति अनंदु अस जानि ।
लोचन गोचर सुकृत फल मनहुँ किए बिधि आनि ॥ १०६ ॥
मुनीश्र्वर भरद्वाजांनी आशीर्वाद दिला. आज विधात्याने सीता
व लक्ष्मणासह प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घडविले, याचा त्यांच्या मनास आनंद
झाला. जणु आपल्या संपूर्ण पुण्यांचे फल त्यांच्या डोळ्यांसमोर आणून उभे केले. ॥
१०६ ॥
कुसल प्रस्न करि आसन दीन्हे । पूजि प्रेम परिपूरन कीन्हे ॥
कंद मूल फल अंकुर नीके । दिए आनि मुनि मनहुँ अमी के ॥
खुशाली विचारल्यावर मुनींनी त्यांना आसन दिले, आणि प्रेमाने
पूजा करुन त्यांना संतुष्ट केले. नंतर जणू अमृतापासून बनविलेले चांगले कंद, मुळे,
फळे व अंकुर आणून दिले. ॥ १ ॥
सीय लखन जन सहित सुहाए । अति रुचि राम मूल फल खाए ॥
भए बिगतश्रम रामु सुखारे । भरद्वाज मृदु बचन उचारे ॥
सीता, लक्ष्मण व सेवक गुह यांच्यासह श्रीरामांनी ती कंदमुळें
व फळे मोठ्या आवडीने खाल्ली. थकवा दूर झाल्यावर श्रीरामांना समाधान वाटले. तेव्हा
भरद्वाज मुनी त्यांना मृदु वाणीने म्हणाले, ॥ २ ॥
आजु सुफल तपु तीरथ त्यागू । आजु सुफल जप जोग बिरागू ॥
सफल सकल सुभ साधन साजू । राम तुम्हहि अवलोकत आजू ॥
‘ हे राम, तुमचे दर्शन होताच आज माझे तप, तीर्थसेवन, त्याग,
जप, योग आणि वैराग्य सफल झाले. तसेच आज माझ्या संपूर्ण शुभ साधनांचा समूहसुद्धा
सफल झाला. ॥ ३ ॥
लाभ अवधि सुख अवधि न दूजी । तुम्हरें दरस आस सब पूजी ॥
अब करि कृपा देहु बर एहू । निज पद सरसिज सहज सनेहू ॥
प्रभुदर्शन सोडल्यास लाभाची व सुखाची दुसरी काहीही
परिसीमा नाही. तुमच्या दर्शनामुळे माझ्या सर्व आशा
पूर्ण झाल्या. आता तुमच्या चरण-कमलांवर माझे
नापासून प्रेम जडावे, असे वरदन मला द्या. ॥ ४ ॥
No comments:
Post a Comment