Wednesday, July 20, 2022

KikshindhaKanda Part 2 ShriRamCharitManas Doha 2 to Doha 4 किष्किन्धाकाण्ड भाग २ श्रीरामचरितमानस दोहा २ ते दोहा ४

 

KikshindhaKanda Part 2
ShriRamCharitManas
Doha 2 to Doha 4
किष्किन्धाकाण्ड भाग २
श्रीरामचरितमानस 
दोहा २ ते दोहा ४

दोहा---एकु मैं मंद मोहबस कुटिल हृदय अग्यान ।

पुनि प्रभु मोहि बिसारेउ दीनबंधु भगवान ॥ २ ॥

एक तर मी मंद, दुसरे म्हणजे मोहान्ध. तिसरे हृदयाने कुटिल व अज्ञानी आहे. शिवाय हे दीनबंधू भगवान ! तुम्हीही मला तुमचा विसर पाडलात. ॥ २ ॥

जदपि नाथ बहु अवगुन मोरें । सेवक प्रभुहि परै जनि भोरें ॥

नाथ जीव तव मायॉं मोहा । सो निस्तरइ तुम्हारेहिं छोहा ॥

हे नाथ, जरी माझ्यामध्ये अनेक अवगुण असले, तरी मला तुमचा विसर पडू नये. हे नाथ, जीव तुमच्या मायेने मोहित असतात, ते तुमच्याच कृपेने मुक्त होऊ शकतात. ॥ १ ॥

ता पर मैं रघुबीर दोहाई । जानउँ नहिं कछु भजन उपाई ॥

सेवक सुत पति मातु भरोसें । रहइ असोच बनइ प्रभु पोसें ॥

त्याशिवाय हे रघुवीर, मी तुमची शपथ घेऊन सांगतो की, मी भजन-साधन हे काहीही जाणत नाही. सेवक हा स्वामीच्या व पुत्र मातेच्या भरवशावर निश्चिंत असतो. त्यामुळे प्रभूला सेवकाचे पालन-पोषण करावेच लागते.’ ॥ २ ॥

अस कहि परेउ चरन अकुलाई । निज तनु प्रगटि प्रीति उर छाई ॥

तब रघुपति उठाइ उर लावा । निज लोचन जल सींचि जुड़ावा ॥

असे म्हणून हनुमान व्याकूळ होऊन प्रभूंच्या चरणी पडला. त्याने आपले खरे स्वरुप प्रकट केले. त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचे भरते आले. तेव्हा प्रभूंनी त्याला उठवून हृदयाशी धरले आणि आपल्या प्रेमाश्रूंचा वर्षाव करुन त्याला भिजविले. ॥ ३ ॥

सुनु कपि जियँ मानसि जनि ऊना । तैं मम प्रिय लछिमन ते दूना ॥

समदरसी मोहि कह सब कोऊ । सेवक प्रिय अनन्यगति सोऊ ॥

प्रभू म्हणाले, ‘ हे हनुमाना, कष्टी होऊ नकोस. तू मला लक्ष्मणापेक्षाही अधिक प्रिय आहेस. सर्वजण मला समदर्शी म्हणतात. मला कोणी प्रिय किंवा अप्रिय नाही. परंतु मला भक्त फार आवडतो. कारण त्याला माझ्याशिवाय दुसर्‍या कोणाचा आधार नसतो. ॥ ४ ॥          

दोहा—सो अनन्य जाकें असि मति न टरइ हनुमंत ।

मैं सेवक सचराचर रुप स्वामि भगवंत ॥ ३ ॥

आणि हे हनुमाना, आपण सेवक असून चराचर जग आपले स्वामी भगवान यांचे रुप आहे, अशी ज्याची बुद्धी कधी ढळत नाही, तोच अनन्य समजावा.’ ॥ ३ ॥

देखि पवनसुत पति अनुकूला । हृदयँ हरष बीती सब सूला ॥

नाथ सैल पर कपिपति रहई । सो सुग्रीव दास तव अहई ॥

स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत, असे पाहून पवनकुमार हनुमानाच्या मनात हर्ष दाटला आणि त्याचे सर्व दुःख नाहीसे झाले. तो म्हणाला, ‘ हे नाथ, या पर्वतावर वानरराज सुग्रीव राहातो. तो तुमचा दास आहे. ॥ १ ॥

तेहि सन नाथ मयत्री कीजे । दीन जानि तेहि अभय करीजे ॥

सो सीता कर खोजा कराइहि । जहँ तहँ मरकट कोटि पठाइहि ॥

हे नाथ, त्याच्याशी मैत्री करा आणि त्याला दीन समजून निर्भय करा. तो सर्व कोट्यावधी वानरांना पाठवील व सीतेचा शोध लावेल.॥ २ ॥

एहि बिधि सकल कथा समुझाई । लिए दुऔं जन पीठि चढ़ाई ॥

जब सुग्रीवँ राम कहुँ देखा । अतिसय जन्म धन्य करि लेखा ॥

अशाप्रकारे सर्व गोष्टी समजावून हनुमानाने श्रीराम-लक्ष्मण या दोघांना आपल्या पाठीवर घेतले. जेव्हा सुग्रीवाने श्रीरामचंद्रांना पाहिले, तेव्हा त्याला आपला जन्म अतिशय धन्य झाला असे वाटले. ॥ ३ ॥

सादर मिलेउ नाइ पद माथा । भेंटेउ अनुज सहित रघुनाथा ॥

कपि कर मन बिवार एहि रीती । करिहहिं बिधि मो सन ए प्रीती ॥

सुग्रीव श्रीरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना आदराने भेटला. श्रीराम-लक्ष्मणांनी त्याला आलिंगन दिले. सुग्रीव मनात म्हणत होता, हे दैवा ! हे माझ्यावर प्रेम करतील काय ? ॥ ४ ॥

दोहा---तब हनुमंत उभय दिसि की सब कथा सुनाइ ।

पावक साखी देइ करि जोरी प्रीति दृढ़ाइ ॥ ४ ॥

तेव्हा हनुमानाने दोन्ही बाजूंच्या सर्व गोष्टी सांगून अग्नीला साक्षी ठेवून त्यांची मैत्री दृढ केली. ॥ ४ ॥

कीन्हि प्रीति कछु बीच न राखा । लछिमन राम चरित सब भाषा ॥

कह सुग्रीव नयन भरि बारी । मिलिहि नाथ मिथिलेसकुमारी ॥

दोघांनीही मनःपूर्वक परस्परांवर प्रेम केले, काहीही अंतर ठेवले नाही. तेव्हा लक्ष्मणाने श्रीरामांची सारी हकीगत सांगितली. तेव्हा सुग्रीवाने डोळ्यांत पाणी आणून सांगितले की, ‘ हे नाथ, मिथिलेशकुमारी जानकी नक्की मिळेल. ॥ १ ॥

मंत्रिन्ह सहित इहॉं एक बारा । बैठ रहेउँ मैं करत बिचारा ॥

गगन पंथ देखी मैं जाता । परबस परी बहुत बिलपाता ॥

मी एकदा येथे मंत्रांसह बसून विचारविनिमय करीत होतो, तेव्हा मी शत्रूच्या ताब्यात पडून खूप विलाप करीत असलेल्या सीतेला आकाशमार्गाने जाताना पाहिले होते. ॥ २ ॥

राम राम हा राम पुकारी । हमहि देखि दीन्हेउ पट डारी ॥

मागा राम तुरत तेहिं दीन्हा । पट उर लाइ सोच अति कीन्हा ॥

आम्हांला पाहून तिने ‘ हे राम, हे राम ‘ असे म्हणत उपवस्त्र टाकले होते. श्रीरामांनी ते मागितले, तेव्हा सुग्रीवाने लगेच ते दिले. ते वस्त्र हृदयापाशी धरुन श्रीरामचंद्रांनी फार शोक केला. ॥ ३ ॥

कह सुग्रीवा सुनहु रघुबीरा । तजहु सोच मन आनहु धीरा ॥

सब प्रकार करिहउँ सेवकाई । जेहि बिधि मिलिहि जानकी आई ॥

सुग्रीव म्हणाले, ‘ हे रघुवीर, काळजी सोडून द्या आणि धीर

 बाळगा. मी सर्व प्रकारे तुमची सेवा करीन. त्यामुळे

 जानकी येऊन तुम्हांला भेटेल. ॥ ४ ॥



Custom Search

No comments: